जिल्ह्यातील किन्होळा, गणेशपुर आणि जानेफळ प्राथमिक आरोग्य केंद्राला ‘राष्ट्रीय गुणवत्ता आश्वासन मानांकन’ पुरस्कार;

 





केंद्रीय आयुष, आरोग्य व कुटूंब कल्याण राज्यमंत्री प्रतापराव जाधव यांनी उत्तम सेवा देणाऱ्या चमुचे केले अभिनंदन !

 

बुलढाणा, (जिमाका) दि. 30 सार्वजनिक आरोग्य  सेवेची गुणवत्ता सुधारण्यासाठी केंद्र सरकारने सुरू केलेल्या  राष्ट्रीय गुणवत्ता आश्वासन मानांकनाची एक यादी नुकतीच प्रसिद्ध झाली आहे. या यादीमध्ये राज्यातील 5 प्राथमिक आरोग्य केंद्राचा समावेश आहे. त्यातील 3 प्राथमिक आरोग्य केंद्र हे बुलढाणा जिल्ह्यातील आहे. तर 2 प्राथमिक आरोग्य केंद्र धाराशिव(उस्मानाबाद) जिल्ह्यातील आहेत. राष्ट्रीय गुणवत्ता मानांकन प्राप्त करणाऱ्या प्राथमिक आरोग्य केंद्रातील उत्तम आरोग्य सेवा देणाऱ्या सर्वच कर्मचाऱ्यांचे केंद्रीय आयुष, आरोग्य व कुटुंब कल्याण राज्यमंत्री प्रतापराव जाधव यांनी अभिनंदन केले आहे.  

 

आरोग्यसेवाची गुणवत्ता सुधारण्याच्या दृष्टिकोनातून केंद्र सरकारच्यावतीने राष्ट्रीय गुणवत्ता आश्वासन मानांकन पुरस्कार देण्यात येतात. प्राथमिक आरोग्य सेवा केंद्रात दिले जाणारे तातडीचे उपचार, रुग्ण रेफरचे प्रमाण, प्रसूती, रुग्णांसाठी असलेली आरोग्य सेवा, परिसर स्वच्छता, उद्यान, अत्याधुनिक यंत्रांचा वापर वैद्यकीय अधिकारी व कर्मचाऱ्यांची उपस्थिती यासह इतर बाबींना केंद्रबिंदु ठेवून पुरस्कारासाठी तपासणी करण्यात येते. 7 जानेवारी  ते 18 जानेवारी 2026 दरम्यान केंद्रीय परीक्षकांनी मुद्देनिहाय तपासणी करुन या संदर्भाचा अहवाल केंद्रीय समितीस सादर केला होता.

 

राष्ट्रीय गुणवत्ता आश्वासन मानकांचा एक अहवाल नुकताच प्रसिद्ध झाला आहे.  या यादीमध्ये राज्यातील 5 प्राथमिक आरोग्य केंद्राचा समावेश आहे त्यातील 3 प्राथमिक आरोग्य केंद्र हे बुलढाणा जिल्ह्यातील आहे तर दोन धाराशिव( उस्मानाबाद) जिल्ह्यातील आहेत.  राष्ट्रीय गुणवत्ता आश्वासन मानांकनामध्ये बुलढाणा जिल्ह्यातील चिखली तालुक्यामधील प्राथमिक आरोग्य केंद्र किन्होळा, खामगाव तालुक्यामधील प्राथमिक आरोग्य केंद्र गणेशपुर व मेहकर तालुक्यामध्ये प्राथमिक आरोग्य केंद्र जानेफळ, यांचा समावेश आहे. तर धाराशिव जिल्ह्यातील दहिपाल, अनाळा या प्राथमिक आरोग्य केंद्राचा समावेश आहे. राष्ट्रीय गुणवत्ता आश्वासक मानांकन मध्ये पुरस्कार प्राप्त करणाऱ्या प्राथमिक आरोग्य केंद्रातील डॉक्टर्स व कर्मचाऱ्यांचे केंद्रीय आयुष आरोग्य व कुटुंब कल्याण राज्यमंत्री प्रतापराव जाधव यांनी अभिनंदन केले आहे.

 

ना. प्रतापराव जाधव यांना आरोग्य अधिकाऱ्यांनी केले होते आश्वस्त

 

केंद्रीय आयुष आरोग्य राज्यमंत्री प्रतापराव जाधव यांनी बुलढाणा येथील जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन भवनांमध्ये बैठक घेतली होती.या बैठकीदरम्यान राष्ट्रीय आरोग्य सेवेच्या मानांकनामध्ये जिल्ह्याच्या आरोग्य सेवेचा समावेश व्हावा अशी अपेक्षा केंद्रीय राज्यमंत्री प्रतापराव जाधव यांनी व्यक्त केली होती. त्यासंदर्भातील सूचना संबंधित अधिकारी व कर्मचाऱ्यांना दिल्या होत्या. यावेळी जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.अमोल गीते,नोडल अधिकारी तथा जिल्हा माता बाल संगोपन अधिकारी डॉ. मिलिंद जाधव, जिल्हा सार्वजनिक आरोग्य परिचारिका शितल साखळीकर, कार्यक्रम सहाय्यक अमर राठोड जिल्हा हिवताप अधिकारी शिवराज चव्हाण यांनी जिल्ह्यातील प्राथमिक आरोग्य केंद्रांना मानांकन प्राप्त करुन देण्यासाठी त्यांना आश्वस्त केले होते.

नुकत्याच प्रसिद्ध झालेल्या यादीमध्ये पाच पैकी तीन प्राथमिक आरोग्य केंद्र हे बुलढाणा जिल्ह्यातील आहे हे विशेष राष्ट्रीय मानांकनासाठी तालुका आरोग्य अधिकारी चिखली डॉ.ऋषिकेश कणखर, वैद्यकीय अधिकारी डॉ.अनुराधा गारोडे व प्रा.आ.केंद्र किन्होळा चमू, तालुका आरोग्य अधिकारी खामगाव डॉ.अभिलाष खंडारे व वैद्यकीय अधिकारी डॉ.बी.एस.तेलंग व गणेशपुर प्रा.आ.केंद्र चमू, तालुका आरोग्य अधिकारी मेहकर डॉ.विजय बलकार वैद्यकीय अधिकारी डॉ.सूरज ठाकरे व जानेफळ प्रा.आ.केंद्र चमू यांनी विशेष परिश्रम घेतले. या राष्ट्रीय मानांकनानंतर संबंधित प्राथमिक आरोग्य केंद्रांना दरवर्षी रुपये तीन लाख हे तीन वर्षाकरिता बक्षीस स्वरूपात मिळणार आहे. सदर बक्षीसांमधून प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये रुग्णांकरिता सुविधा तसेच आरोग्य कर्मचाऱ्यांना बक्षीस स्वरूपात देण्यात येणार आहेत.

00000

Comments

Popular posts from this blog

लोकशाहीर अण्णाभाऊ साठे महामंडळाची थेट कर्ज योजना

बुलढाणा जिल्ह्याची महान हो कीर्ती

दत्तक विधान प्रक्रिया; इच्छुक पालकांनी कायदेशीर प्रक्रिया पुर्ण करावी