Tuesday 31 October 2017

news 31.10.2017 dio buldana

       सरदार वल्लभभाई पटेल जयंतीनिमित्त एकता रॅली
·        राष्ट्रीय एकतेची दिली शपथ
बुलडाणा, दि. 31 -  लोहपुरूष सरदार वल्लभभाई पटेल जयंतीनिमित्त राष्ट्रीय एकता दिवस आज 31 ऑक्टोंबर 2017 रोजी साजरा करण्यात आला. त्यानिमित्त एकता रॅलीचे आयोजन पोलीस मुख्यालय मैदानावर करण्यात आले. या एकता रॅलीला शुभारंभप्रसंगी आमदार चैनसुख संचेती, जिल्हाधिकारी डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार, जिल्हा पोलीस अधिक्षक शशीकुमार मीना, जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी एस षण्मुखराज, निवासी उपजिल्हाधिकारी ललीत वराडे यांच्या उपस्थितीत हिरवी झेंडी दाखविण्यात आली.
  पोलीस मुख्यालय मैदान येथून सदर रॅली कारंजा चौक, जिल्हाधिकारी कार्यालय, बाजार लाईन, कारंजा चौक व पोलीस मुख्यालय मैदान अशी काढण्यात आली. रॅलीचा समारोप पोलीस मुख्यालय मैदानावर करण्यात आला. रॅलीमध्ये महाविद्यालयीन, विद्यालयीन विद्यार्थी, पोलीस दलाचे जवान आदींचा समावेश होता.  या कार्यक्रमाचे प्रास्ताविक पोलीस निरीक्षक भाऊसाहेब सातपुते यांनी केले. तसेच जिल्हाधिकारी यांनी राष्ट्रीय एकतेची शपथ दिली. कार्यक्रमाचे संचलन व आभार प्रदर्शन नरेंद्र लांजेवार यांनी केले.
*******
दुर्देवाने झाला अपघात.. विम्याची मदत मिळेल हमखास..
* स्व. गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात विमा योजना
* 96 मृत शेतकऱ्यांच्या वारसांना मिळाला लाभ
* 192 लक्ष रूपयांची मदत                         
    बुलडाणा, दि. 31 :  दुर्दैवाने अपघात होवून बळीराज्याच्या कुटूंबावर दु:खाचा डोंगर कोसळतो. अशावेळी कुटूंबप्रमुख बळीराजा जर दगावला किंवा अपंग झाला, तर कुटूंब आर्थिक संकटात सापडते. या परिस्थितीत बळीराजाच्या कुटूंबाला मोठ्या हिंमतीने सावरावे लागते. मात्र अशा बिकट प्रसंगी राज्य शासन शेतकऱ्यांच्या मदतीला धावून आले आहे. दुर्दैवाने अपघात झाल्यास स्व. गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात विमा योजनेतंर्गत विम्याची मदत दिली जाणार आहे. त्यासाठी शासनाने सर्व खातेदार शेतकऱ्यांचा विमा उतरविला आहे. त्यामुळे शेतकरी कुटूंबाला अशा प्रसंगी विम्याची हमखास मदत मिळणार आहे. जिल्ह्यात सन 2015-16 मध्ये 96 मृत शेतकऱ्यांच्या वारसांना योजनेतंर्गत 192 लक्ष रूपयांची मदत देण्यात आली आहे.
   या योजनेतंर्गत शेतकऱ्याचा अपघाती मृत्यू झाल्यास दोन लाख रूपये, अपघातामुळे दोन डोळे अथवा दोन अवयव निकामी झाल्यास, एक डोळा व एक अवयव निकामी झाल्यास दोन लक्ष रूपये आणि अपघातामुळे एक डोळा अथवा एक अवयव निकामी  झाल्यास एक लक्ष रूपये मदत  दिल्या जाणार आहे. या लाभासाठी लाभार्थ्यांकडे सात बारा प्रमाणपत्र, 6 क, 6 ड (फेरफार) आदी पात्रता असावी. यामध्ये नोंदणीकृत असलेले 10 ते 75 वयोगटातील खातेदार शेतकऱ्यांचा विमा उतरविण्यात आला आहे.
   विमा संरक्षणासाठी रस्ता/रेल्वे अपघात, उंचावरून पडणे, बुडून मृत्यू, सर्पदंश, प्राणीदंश, खून, जनावराचा हल्ला, दंगल, वीज पडणे, विषबाधा, नक्षलवादी हल्ला व इतर अपघात आदींमधील अपघातांचा समावेश आहे. विम्याचा दावा करण्यासाठी दावा पत्र, वारसा नोंद, शेतकऱ्याचा वयाचा पुरावा, पोलीस (एफ आय आर) किंवा जवाब, बँक पासबुक प्रत, सातबारा उतारा, तलाठी प्रमाणपत्र, 6 ड (फेरफार), उतारा 6 क, शव विच्छेदन अहवाल, पोलीस स्थळ पंचनामा, अपंगत्व आल्यास टक्केवारी प्रमाणपत्र, लाभार्थ्याचे स्टॅम्प पेपरवर प्रतिज्ञापत्र, मृत्यू प्रमाणपत्र व पोलीस मरणोत्तर पंचनामा आदी कागदपत्रे आवश्यक आहे. राज्यातील जवळपास 1.37 कोटी खातेदार शेतकऱ्यांचा विमा शासनाने उतरविला आहे. विम्याचा हप्ताही कंपनीकडे सुपूर्द करण्यात आला  आहे. दुर्देवाने अपघात झाल्यास अशा संकटसमयी केवळ कृषि कार्यालयात अर्ज भरून अपघातग्रस्त शेतकरी कुंटूंबीय विम्याची मदत मिळवू शकतात. एवढी सुटसुटीत लाभाची ही योजना आहे.  जिल्ह्यात योजेनंतर्गत सन 2016-17 मध्ये 50 अर्ज आतापर्यंत प्राप्त झालेले आहे. त्यामधील 10 अर्ज मंजूर करण्यात आले आहे.
    या योजनेचा लाभ घेण्यासाठी अपघातानंतर लवकरात लवकर संबंधित जिल्हा/तालुका कृषि अधिकारी यांच्याकडे आवश्यक कागदपत्रांसहीत दावा अर्ज दाखल करावे. याकरिता कोणताही वकील किंवा एजंट नेमण्याची आवश्यकता नाही. तरी अपघातग्रस्त शेतकऱ्यांनी या योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहन करण्यात येते. या योजनेुळे घरातील कर्ता पुरूष शेतकरी गेल्यामुळे हवालदील झालेल्या शेतकरी कुटूंबाला ही आर्थिक मदत जगण्याचे बळ देवून जाते.
                                         *****
दक्षता जनजागृती सप्ताहाचे आयोजन
·        5 नोव्हेंबर 2017 पर्यंत विविध कार्यक्रमांद्वारे भ्रष्टाचाराविरूद्ध जनजागृती
  बुलडाणा, दि. 31 : जिल्ह्यात 4 नोव्हेंबर 2017 पर्यंत लाच लुचपत प्रतिबंधक विभागाच्यावतीने दक्षता जनजागृती सप्ताहाचे आयोजन करण्यात आले आहे. या सप्ताहादरम्यान नागरिकांना विविध कायद्यांचे मार्गदर्शन करण्यात येणार आहे. सप्ताहादरम्यान 30 ऑक्टोंबर रोजी बुलडाणा, धाड व चिखली येथे जनजागृती करण्यात आले आहे. विभागाच्या 1064 या टोल फ्री क्रमांकाची माहिती देण्यात आली. तसेच 31 ऑक्टोंबर रोजी मेहकर व लोणार येथे शासकीय कार्यालयात पत्रके वाटणे व लाच लुचपत बाबत जनजागृती  करण्यात आले आहे. त्याचप्रमाणे 1 नोव्हेंबर 2016 रोजी नांदुरा, खामगांव व शेगांव येथे, 2 नोव्हेंबर रोजी संग्रामपूर व जळगाव जामोद येथे, 3 नोव्हेंबर रेाजी दे.राजा, सिंदखेड राजा व किनगांव राजा येथे आणि 4 नोव्हेंबर रोजी मोताळा व मलकापूर येथे जनजागृती करण्यात येणार आहे, असे लाच चुलपत प्रतिबंधक विभागाचे पोलीस उपअधिक्षक यांनी कळविले आहे.
******
डॉ. बाबासाहेब आंबेडकर कृषि स्वावलंबन योजना
नविन विहीर, विहीर दुरूस्ती  व कृषि साहित्यासाठी मिळणार अनुदान
·       इच्छूकांनी www.krishi.maharashtra.gov.in  या संकेतस्थळावर ऑनलाईन नोंदणी करावी
·       अनुसूचित जाती व नवबौद्ध प्रवर्गातील शेतकरी असावा
बुलडाणा, दि‍. 31 - राज्य शासनाने अनुसूचित जाती व नवबौद्ध प्रवर्गातील शेतकरी बांधवाकरीता डॉ. बाबासाहेब आंबेडकर कृषि स्वावलंबन योजना अंमलात आणली आहे. या योजनेतंर्गत शेतकऱ्यांना अर्थसहाय्य देण्यात येणार आहे. ही योजना या प्रवर्गातील शेतकरी बांधवांचे आर्थिक उत्पन्न वाढविण्याकरीता अंमलात आणली आहे. या योजनेचा लाभ घेण्यासाठी इच्छूक अर्जदार शेतकऱ्यांनी www.krishi.maharashtra.gov.in  या संकेतस्थळावर ऑनलाईन अर्ज करावा.
   या योजनेतंर्गत नविन विहीर, जुनी विहीर दुरूस्ती, इनवेल बोअरींग, पंपसंच, वीज जोडणी आकार, शेततळ्याचे प्लॅस्टीक अस्तरीकरण, सुक्ष्म सिंचन संच आदी बाबींकरीता अनुदान देण्यात येणार आहे. नविन विहीरीकरीता अनुदान मर्यादा 2 लक्ष 50 हजार, जुनी विहीर दुरूस्तीकरीता 50 हजार, इनवेल बोअरींगकरीता 20 हजार, पंपसंचसाठी 25 हजार, वीज जोडणी आकाराकरीता 10 हजार, शेततळ्याचे  प्लॅस्टीक अस्तरीकरणकरीता 1 लक्ष रूपये, ठिबक सिंचन संचासाठी 50 हजार रूपये व तुषार सिंचन संचाकरीता 25 हजार रूपये अनुदान देण्यात येणार आहे.
   या योजनेचा शेतकऱ्यांनी लाभ घेण्याकरीता किंवा अधिक माहितीसाठी तालुका पंचायत समिती कार्यालयातील कृषि विभागात, कृषि अधिकारी यांचेकडे ऑनलाईन अर्जासाठी संपर्क साधावा. तसेच स्वयंसाक्षांकित केलेला अर्ज गट विकास अधिकारी पंचायत समिती कार्यालयात 11 नोव्हेंबर 2017 पूर्वी सादर करावे, असे आवाहन कृषि सभापती दिनकरराव देशमुख, कृषि विकास अधिकारी जिल्हा परिषद यांनी केले आहे.
असा सादर  करावा अर्ज
इच्छूक अर्जदारांनी www.krishi.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर दर्शविलेल्या लिंकवर किंवा http// agriwell.mahaonline.gov.in या युआरएल वर जावून नविन युजर येथे नोंदणी करावी. अशाप्रकारे अर्जदाराने नोंदणी करून संपूर्ण माहितीसह आवश्यक त्या सर्व दस्ताऐवजासह अपलोड करावे.  ऑनलाईन असलेल्या अर्जाची प्रिंट काढून त्यावर अर्जदाराने स्वाक्षरी करून व ऑनलाईन अटॅचमेंट केलेले सर्व दस्ताऐवज पंचायत समिती कार्यालयात कृषि अधिकारी यांचेकडे सादर करावे. तसेच स्थानिक पातळीवर इतर आवश्यक प्रमाणपत्र जसे ग्रामसभेचा ठराव, लाभार्थीने शासकीय योजनेतुन विहीरीचा लाभ न घेतल्याचा दाखला, अर्जदाराचा फोटो आदी कागदपत्रासह अर्जदाराने प्रस्तावाची प्रत पंचायत समिती पातळीवर सादर करावी.
*********
पुनर्रचित हवामान आधारीत फळपिक विमा योजना जाहीर
  • संत्रा व काजू फळपिकाकरिता 30 नोव्हेंबर, तर आंबा फळासाठी 31 डिसेंबर अंतिम मुदत
  • द्राक्ष फळपिकासाठी 15 ऑक्टोंबर पर्यंत, तर लिंबूकरीता 14 नोव्हेंबर प्रस्ताव सादर करण्याची मुदत
  • शेतकऱ्यांचे अर्ज अथवा विमा हप्ता कॉमन सर्व्हीस सेंटरमार्फत ऑनलाईन स्वीकारणार
बुलडाणा, दि. 31 -  सन 2017-18 साठी आंबिया बहार व गारपीटमध्ये पुर्नरचित हवामान आधारीत फळपिक विमा योजना जाहीर करण्यात आली आहे.  जिल्ह्यामध्ये ही योजना संत्रा,  मोसंबी, केळी, द्राक्ष, आंबा, पेरू, डाळींब व लिंबू या फळपिकांकरिता राबविण्यात येणार आहे. योजनेतंर्गत फळपिक निहाय विमा संरक्षण रक्कम शासनाने मंजूर केलेली आहे. ही योजना जिल्ह्यात  राबविण्यात येणार आहे. शेतकऱ्यांचे अर्ज अथवा विम्याचा हप्ता भरण्याची सुविधा कॉमन सर्व्हिस सेंटरमध्ये उपलब्ध करून देण्यात आली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना बँकामध्ये गर्दी टाळता येणार आहे व अर्ज भरण्यामध्ये सुलभता येणार आहे.
    ही योजना कर्जदार शेतकऱ्यांना सक्तीची असून बिगर कर्जदार शेतकऱ्यांना ऐच्छीक आहे. योजना 4 समूहांमध्ये राबविण्यात येणार आहे. समूह एक मध्ये इफको टोकियो जनरल इन्शुरन्स कंपनी लिमिटेड, समूह दोन व तीमध्ये एचडीएफसी इर्गो जनरल इन्शुरन्स कंपनी व समूह 4 मध्ये बजाज अलायन्झ जनरल इन्शुरन्स कंपनीमार्फत राबविण्यात येणार आहे. शेतकऱ्यांना विमा हप्ता दर संरक्षीत रक्कमेच्या पाच टक्के किंवा वास्तवदर्शी दर यापैकी जी कमी असेल ती रक्कम शेतकऱ्यांनी भरावयाची आहे. उर्वरित विमा हप्ता केंद्र व राज्य शासन समप्रमाणात अदा करणार आहे.  
        आंबिया बहारातील मोसंबी, केळी, पेरू, डाळींब या पाच फळपिकांसाठी शेतकऱ्यांनी विमा प्रस्ताव बँकांकडे सादर करण्याची मुदत संपली आहे. तसेच द्राक्ष फळपिकाकरीता 15 ऑक्टोंबर, लिंबूकरीता 14 नोव्हेंबर, आंबा फळपिकासाठी 31 डिसेंबर, तर संत्रा व काजू फळपिकाकरीता 30 नोव्हेंबर 2017 पर्यंत प्रस्ताव बँकांना सादर करावयाचे आहेत.  
     योजनेनुसार कमी /जास्त पाऊस, वेगाचा वारा, गारपीट व सापेक्ष आर्द्रता या हवामान धोक्यापासून निर्धारीत केलेल्या कालावधीत शेतकऱ्यांना विमा संरक्षण आणि आर्थिक सहाय्य देण्यात येते.  शेतकऱ्यांनी जास्तीत जास्त संख्येने या योजनेत सहभागी व्हावे. याबाबत अधिक माहितीसाठी तालुका कृषि अधिकारी कार्यालय, कृषि सहायक, कृषि पर्यवेक्षक, मंडळ कृषि अधिकारी, नजीकच्या बँक शाखेशी व संबंधीत विमा कंपनीशी संपर्क साधावा. शेतकऱ्यांनी अंतिम मुदतीची वाट न बघता जास्तीत जास्त प्रमाणात या योजनेत सहभागी व्हावे, असे आवाहन  कृषि विभागाने केले  आहे.
                                                            *******
निलक्रांती धोरणातंर्गत मत्स्यव्यवसायासाठी 50 टक्के अनुदानावर अर्थसहाय्य
  • मत्स्यव्यवसायाच्या विविध योजना कार्यान्वीत
बुलडाणा, दि. 31 -  केंद्र शासन अर्थसहाय्यीत निलक्रांती धोरण राज्यात जाहीर झाले आहे. या धोरणातंर्गत मत्स्यव्यवसायाचे एकात्मिक विकास व व्यवस्थापन योजनांच्या लाभासाठी 50 टक्के अनुदानावर अर्थसहाय्य देण्यात येणार आहे. मत्स्यव्यवसाच्या विविध योजना कार्यरत आहेत.
   या योजनांमध्ये मत्स्यबीज संवर्धन तलाव संच, जलाशयात पिंजरा पद्धतीने मत्स्यसंवर्धन, नविन नौका व जाळी तयार करणे, क्रियाशील मच्छिमारांकरीता गट विमा योजना, मच्छिमारांकरीता राष्ट्रीय कल्याणकारी बचतीसह मदत योजना, मच्छिमारांसाठी घरकुल योजना, नविन मत्स्यसंवर्धन तळी तयार करणे, मत्स्यबीज निर्मिती केंद्र स्थापन करणे, गोड्या पाण्यातील मत्स्यसंवर्धन निविष्ठा खर्च अर्थसहाय्य योजना, मत्स्यसंवर्धन तळ्याचे नुतनीकरण आणि लघुखाद्य कारखाना निर्मिती योजना यांचा समावेश आहे.
    या योजनेचा लाभ घेण्यासाठी सहाय्यक आयुक्त, मत्स्यव्यवसाय कार्यालय, प्रशासकीय इमारत, बस स्थानकासमोर, बुलडाणा या कार्यालयाशी किंवा 07262 242254 या क्रमांकावर संपर्क साधावा. तरी मत्स्य व्यवसायिक, मत्स्यव्यवसाय सहकारी संस्था, शेततळीधारक, मत्स्यप्रेमी, खाजगी मत्स्यद्योजक यांनी या योजनांचा लाभ घ्यावा, असे आवाहन सहायक आयुक्त, मत्स्यव्यवसाय स. ई नायकवडी यांनी केले आहे.
                                                            *************
जिल्ह्याच्या तांदुळ मासिक परिमाणात बदल
बुलडाणा, दि. 31 -  माहे नोव्हेंबर 2017 करीता जिल्ह्यासाठी तांदुळाचे मासिक परिमाणात बदल करण्यात आला आहे. शासनाकडून माहे नोव्हेंबर 2017 चे गहू, तांदुळ व साखरेचे नियतन प्राप्त झाले असून मासिक परिमाण निश्चित करयात आले आहे. राष्ट्रीय अन्न सुरक्षा अधिनियम 2013 अंतर्गत समाविष्ट न होणाऱ्या एपीएल (केशरी) शिधापत्रिकाधारक शेतकरी असलेल्या लाभार्थ्यांसाठी गहू 4 किलो प्रतिव्यक्ती 2 रूपये प्रतिकिलो, तांदुळ 1 किलो प्रतिव्यक्ती 3 रूपये प्रतिकिलो परिमाण आहे. राष्ट्रीय अन्न सुरक्षा अधिनियम 2013 अंतर्गत प्राधान्य कुटूंबातील पात्र लाभार्थ्यांसाठी गहू 3 किलो प्रतिव्यक्ती रूपये 2 प्रतिकिलो, तांदुळ 2 किलो प्रतिव्यक्ती रूपये 3 प्रतिकिलो परिमाण आहे. राष्ट्रीय अन्न सुरक्षा अधिनियम 2013 अंतर्गत अंत्योदय योजनातंर्गत गहू 21 किलो प्रतिकार्ड रूपये 2 प्रतिकिलो, तांदुळ 10 किलो प्रतिकार्ड रूपये 3 प्रतिकिलो आणि साखर प्रतिकार्ड 1 किलो रूपये 20 प्रतिकिलोप्रमाणे परिमाण  निश्चित आहे, असे जिल्हा पुरवठा अधिकारी यांनी कळविले आहे.
                                                                        *********
कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत जिल्हा दौऱ्यावर
बुलडाणा, दि. 31 -  कृषी, फलोत्पादन व पणन, पाणीपुरवठा व स्वच्छता राज्यमंत्री सदाभाऊ खोत उद्या दि. 1 नोव्हेंबर 2017 रोजी जिल्हा दौऱ्यावर येत आहे. त्यांचा दौरा कार्यक्रम पुढीलप्रमाणे आहे: दि. 1 नोव्हेंबर 2017 रोजी पहाटे 4.28 वाजता अमरावती एक्सप्रेसने मलकापूर रेल्वे स्टेशन येथे आगमन व विश्रामगृहाकडे प्रयाण, पहाटे 4.45 वाजता विश्रामगृह मलकापूर येथे आगमन व राखीव, सकाळी 7.30 वाजता शासकीय विश्रामगृह येथून चिंचपूर ता. मोताळा कडे प्रयाण, सकाळी 8 वाजता  लाभार्थ्यांना गायी-म्हशी वाटप व गाव प्रवेशद्वार उद्घाटन कार्यक्रमास उपस्थिती, सकाळी 9 वाजता चिंचपूर येथून मोटारीने बुलडाणाकडे प्रयाण, सकाळी 10 वाजता शासकीय विश्रामगृह बुलडाणा येथे आगमन व राखीव, सकाळी 11 वाजता बुलडाणा कृषि उत्पन्न बाजार समितीस भेट व उडीद, मूग खरेदी केंद्राचे उद्घाटन तसेच कृषि यांत्रिकीकरण उपअभियान अंतर्गत शेतकऱ्यांना अवजारे वाटप कार्यक्रमास उपस्थिती,  दुपारी 1 वाजता जिल्हा कृषी, पणन आणि पाणीपुरवठा, स्वच्छता विभागाच्या अधिकाऱ्यांसमवेत शासकीय विश्रामगृह येथे चर्चा, दु 2 वाजता शासकीय विश्रामगृह येथून खंडाळा मकरध्वज ता. चिखलीकडे प्रयाण, दु. 2.30 वा खंडाळा मकरध्वज येथे स्वच्छतागृहाची बांधणी शुभारंभ कार्यक्रमास उपस्थिती, दु 3 वाजता खंडाळा मकरध्वज येथून चिखलीकडे प्रयाण, दु 3.10 वाजता रेणुका कनिष्ठ महाविद्यालय मेहकर फाटा, चिखली येथे स्वच्छता स्पर्धा कार्यक्रमास उपस्थिती, दु 3.30 वाजता चिखली विश्रामगृह येथे आगमन व राखीव, दु 4 वाजता बस स्थानकाच्याबाजूला रयत क्रांती शेतकरी मेळावा कार्यक्रमास उपस्थिती, सायं सोयीनुसार चिखली येथून बुलडाणाकडे प्रयाण, रात्री 8.15 वा बुलडाणा येथून मलकापूरकडे प्रयाण, रात्री 22.10 वाजता मलकापूर रेल्वे स्टेशन येथे आगमन व विदर्भ एक्सप्रेसने मुंबईकडे प्रयाण करतील.
                                                                        *******
राष्ट्रीय सफाई कर्मचारी आयोगाचे सदस्य दिलीप हाथीबेडजी जिल्हा दौऱ्यावर
बुलडाणा, दि. 31 -  राष्ट्रीय सफाई कर्मचारी आयोगाचे सदस्य दिलीप हाथीबेडजी उद्या 1 नोव्हेंबर 2017 रोजी जिल्हा दौऱ्यावर येत आहे. त्यांचा दौरा कार्यक्रम पुढीलप्रमाणे आहे : दि. 1 नोव्हेंबर 2017 रोजी सकाळी 11 वाजता सफाई कर्मचाऱ्यांच्या समस्यांबाबत शेगांव विश्राम गृह येथे बैठकीस उपस्थिती,  दु. 12 शेगांव येथून खामगांवकडे प्रयाण, दु 2 वाजता खामगांव विश्रामगृह येथे आगमन व सफाई कर्मचाऱ्यांच्या समस्यांसंदर्भात अधिकाऱ्यांची बैठकीस उपस्थिती, दु 3 वाजता सफाई कर्मचाऱ्यांच्या युवक-युवती सामुहिक विवाह सोहळ्यात उपस्थिती, सायं 5 वाजता खामगांव येथून अकोल्याकडे प्रयाण करतील.
                                                                        ******
महाराष्ट्र राज्य सफाई कर्मचारी आयोगाचे अध्यक्ष रामुजी पवार जिल्हा दौऱ्यावर
बुलडाणा, दि. 31 -  महाराष्ट्र राज्य सफाई कर्मचारी आयोगाचे अध्यक्ष रामुजी पवार उद्या 1 नोव्हेंबर 2017 रोजी जिल्हा दौऱ्यावर येत आहे. त्यांचा दौरा कार्यक्रम पुढीलप्रमाणे आहे : दि. 1 नोव्हेंबर 2017 रोजी सकाळी 11 वाजता खामगांव येथे आगमन, दु 1 वाजता सामुहिक विवाह सोहळ्यामध्ये उपस्थिती, सायं 5 ते 8 वाजेदरम्यान खामगांव विश्रामगृह येथ सामाजिक कार्यकर्त्यांची बैठकीस उपस्थिती व मुक्कम, दि. 2 नोव्हेंबर 2017 रोजी सकाळी 11 वाजता नगर परिषद खामगांव येथे सफाई कर्मचाऱ्यांच्या समस्यांबाबत अधिकाऱ्यांशी बैठक, दु 3 वाजता खामगांव येथून शेगांवकडे प्रयाण,  दु 4 वाजता शेगांव नगर परिषद येथे सफाई कर्मचाऱ्यांच्या समस्यांसंदर्भात बैठकीस उपस्थिती, सायं 6 वाजता शेगांव येथून दिग्रस जि. यवतमाळकडे प्रयाण करतील.
                                                                        *********
वाहन नोंदणी प्रकरणांचा 3 नोव्हेंबर पर्यंत निपटारा करावा
बुलडाणा, दि. 31 -  वाहन 4.0 व सारथी 4.0 प्रणाली कार्यान्वीत होत असल्यामुळे वाहन वितरक व संचालक मोटार ड्रायव्हींग स्कूल यांनी नविन खाजगी वाहन नोंदणी, चालक अनुज्ञप्ती, परिवहनेत्तर वाहनांचे हस्तांतरण, ना हरकत प्रमाणपत्र याबाबत त्रुटी असलेल्या प्रकरणांचा निपटारा 3 नोव्हेंबर 2017 पर्यंत करावा. तसेच ज्या वाहन धारकांनी ग्रास प्रणालीद्वारे कराचा भरणा केलेला आहे, त्यांनी या चलानच्या पावत्या उपप्रादेशिक परिवहन कार्यालयात येवून 3 नोव्हेंबर 2017 पर्यंत फाडुन घ्याव्यात, असे आवाहन उपप्रादेशिक परिवहन कार्यालयाच्यावतीने करण्यात आले आहे.

                                                                        ******

Friday 27 October 2017

news 27.10.2017 dio buldana

पालकमंत्री यांच्याहस्ते विजेत्या खेळाडूंना बक्षीस वितरण
  • राज्यस्तरीय शालेय कराटे  स्पर्धा

     बुलडाणा, दि. 27 : स्थानिक सहकार विद्या मंदीर येथे आयोजित राज्यस्तर शालेय कराटे स्पर्धेतील विविध वजन गटातील विजेत्या खेळाडूंना बक्षीस वितरण आज 27 ऑक्टोंबर 2017 रोजी करण्यात आले. यावेळी पालकमंत्री पांडुरंग फुंडकर, बुलडाणा अर्बनचे राधेश्याम चांडक, कराटे असोसिएशनचे अध्यक्ष श्री. वाछा, श्री. नायर, जिल्हा क्रीडा अधिकारी शेखर पाटील आदी उपस्थित होते.   
   विदर्भात प्रथमच कराटे खेळाच्या राज्यस्तरीय स्पर्धा बुलडाण्यात आयोजित होत असल्याबद्दल  क्रीडा विभागाचे आभार मानीत पालकमंत्री यावेळी म्हणाले,  या स्पर्धांतून खेळाडूंची राष्ट्रीय चमूमध्ये निवड करण्यात येणार आहे. त्यामुळे निश्चितच प्रत्येक खेळाडूने जीव ओतून खेळला असेल. भविष्यात या खेळांमधून खेळाडूने आपले करीअर करून देशाचे नाव उंचवावे.
   याप्रसंगी प्रास्ताविक जिल्हा क्रीडा अधिकारी शेखर पाटील यांनी केले. आभार बी. आर जाधव यांनी मानले. खेळामध्ये प्रथम, द्वितीय व तृतीय क्रमांकाचे पदक, गुलाबपुष्प देवून खेळाडूंचा गौरव करण्यात आला. कार्यक्रमाला खेळाडूंचे नातेवाईक, परीक्षक, खेळाडू मोठ्या प्रमाणात उपस्थित होते.
                                                  *********
पाण्याचा वापर काटकसरीने करावा
-       पालकमंत्री
  • पाणी आरक्षण समितीची बैठक
  • पिण्यासाठी पाण्याचे प्रथम आरक्षण करावे
  • प्रकल्पात पाणीसाठा कमी असल्यास ओलीताखालील पीक घेवू नये

     बुलडाणा, दि. 27 : यंदाच्या पावसाळ्यात पाऊस समाधानकारक जरी पडला असेल, तरी  जलसाठे ओसंडून वाहतील, असा झालेला नाही. त्यामुळे भविष्यात पाणी टंचाईचे सावट जिल्ह्यात येणार आहे. या संकटाचा सामना करण्यासठी आतापासून पर्यायी व्यवस्था करणे आवश्यक आहे. सिंचन विभागाने पाणीसाठ्यातील पाण्याचा साठा लक्षात घेवून लाभ क्षेत्रातील गावांमध्ये सिंचन न करण्याबाबत जागृती करावी. तसेच प्रत्येक नागरीकाने पाण्याचा वापर काटकसरीने करावा, असे आवाहन  पालकमंत्री पांडुरंग फुंडकर यांनी केले आहे.
  पाणी आरक्षण समितीच्या बैठकीचे जिल्हाधिकारी कार्यालयाच्या नियोजन समिती सभागृहात आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी पालकमंत्री बोलत होते. याप्रसंगी जिल्हाधिकारी डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार, जि.प मुख्य कार्यकारी अधिकारी एस षण्मुखराज, बुलडाणा पाटबंधारे विभागाचे कार्यकारी अभियंता कैलास ठाकरे आदी उपस्थित होते.
  पाणीटंचाईचे भविष्यातील सावट लक्षात घेता पाणी टंचाईचा कृती आराखडा तयार करणे गरजेचे असल्याचे सांगत पालकमंत्री म्हणाले, ज्या प्रकल्पांमध्ये पाणी साठा अत्यल्प आहे, अशा प्रकल्पांमधून सिंचनासाठी पाणी मिळणार नाही. लाभार्थी गावातील शेतकऱ्यांनी पाणी साठा अत्यल्प असल्यामुळे ओलीताखालील पिक घेवू नये. जेणेकरून भविष्यात पिकाला पाणी न मिळाल्यास पीक नष्ट व्हायची वेळ येणार नाही. ज्या प्रकल्पांमधून प्रादेशिक पाणी पुरवठा योजनांना पाईप लाईनद्वारे पाणी देणे शक्य असल्यास अशा ठिकाणी नदीद्वारे पाणी सोडण्यात येवू नये. त्यामुळे पाण्याची नासाडी होते. पाण्याची थकबाकी असणाऱ्या स्थानिक स्वराज्‍य संस्था, शासनाचे विभाग यांनी त्वरित थकबाकी जमा करावी. तसेच कुणीही परवानगीशिवाय प्रकल्पांमधील पाणी नदीमध्ये अथवा कालव्याद्वारे सोडणार नाही.
    जिल्हाधिकारी श्री. पुलकुंडवार यावेळी म्हणाले, मोटारीने कुणी प्रकल्पांमधून पाणी उचलत असल्यास त्वरित मोटारींच्या जोडण्या बंद कराव्यात. अशा वेळेस महसूल, सिंचन व पोलीस विभागाच्या संयुक्त पथकांनी कारवाई करावी. पाणीटंचाईग्रस्त गावांमध्ये भूजल अधिनियमाची तातडीने प्रभावी अंमलबजावणी करावी. सार्वजनिक पाण्याचे स्त्रोतांचे संरक्षण करावे. यावेळी कार्यकारी अभियंता श्री. ठाकरे यांनी विविध प्रकल्पांमधील उपलब्ध पाणी साठा व पिण्याच्या पाण्यासाठी असलेले पाणी मागणी याची माहिती दिली. बैठकीला सिंचन, महसूल, पाणी पुरवठा विभागाचे अधिकार व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
                                                  ************
शिष्यवृत्तीच्या महाडीबीटी पोर्टलवरील तांत्रिक मार्गदर्शनासाठी 31 ऑक्टोंबर रोजी कार्यशाळेचे आयोजन

     बुलडाणा, दि. 27 : महाडीबीटी पोर्टलबाबत भारत सरकार मॅट्रीकोत्तर शिष्यवृत्ती योजनेच्या ऑनलाईन संगणकीय प्रणालीतील तांत्रिक अडचणींबाबत मार्गदर्शन करण्यासाठी कार्यशाळेचे आयोजन 31 ऑक्टोंबर 2017 रोजी दुपारी 12 वाजता डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन, चिखली रोड, बुलडाणा येथे करण्यात आले आहे.
    शिष्यवृत्ती योजनेचे काम पाहणारे कर्मचारी यांनी अनुसूचित जाती, विजाभज, इमाव व विमाप्र प्रवर्गनिहाय एकूण शिष्यवृत्ती व फ्रिशिप विद्यार्थी संख्या, नोंदणी झालेली शिष्यवृत्ती, फ्रिशिप विद्यार्थी संख्या तसेच नोंदणी न होण्याचे सविस्तर कारणासह कार्यशाळेस न चुकता हजर रहावे.  त्याचप्रमाणे ज्या महाविद्यालयांनी विशेष चौकशी पथक यांचेकडून झालेल्या लेखा परिक्षण अहवालातील तदर्थ अनुदानाबाबत माहिती दिलेली नाही. त्यांनी तदर्थ अनुदानाच्या सविस्तर माहितीसह उपरोक्त स्थळी 31 ऑक्टोंबर 2017 रेाजी दुपारी 12 वाजता हजर रहावे, असे आवाहन सहायक आयुक्त, समाज कल्याण यांनी केले आहे.
                                          **********
महाराष्ट्र राज्य  सहकार परिषदेचे अध्यक्ष शेखर चरेगांवकर यांचा दौरा

     बुलडाणा, दि. 27 :  महाराष्ट्र राज्य सहकार परिषदेचे अध्यक्ष शेखर चरेगांवकर दि. 31 ऑक्टोंबर 2017 रोजी  जिल्हा दौऱ्यावर येत आहे. त्यांचा दौरा कार्यक्रम पुढीलप्रमाणे : दि. 30 ऑक्टोंबर 2017 रोजी सायंकाळी सोयीनुसार वाशिम येथून बुलडाणाकडे प्रयाण, रात्री शासकीय विश्रामगृह बुलडाणा येथे आगमन व मुक्काम, दि. 31 ऑक्टोंबर रोजी सकाळी 9 वाजता बुलडाणा येथून मलकापूरकडे प्रयाण, सकाळी 10 वाजता जनकल्याण नागरी सहकारी पतसंस्थेच्या मलकापूर शाखेच्या उद्घाटन कार्यक्रमास उपस्थिती, सकाळी 11.30 वाजता मलकापूर येथून बुलडाणाकडे प्रयाण, दुपारी 12.30 वाजता शासकीय विश्रामगृह येथे आगमन व राखीव, दुपारी 2 वाजता जिल्हा उपनिबंधक कार्यालय, सहकार भारती यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित सहकार परिषद कार्यक्रमास सहकार विद्या मंदीर येथे उपस्थिती, रात्री 9 वाजता बुलडाणा येथून पुणेकडे प्रयाण करतील.
                                          ***********
सैन्यदलात अधिकारी पदाच्या पूर्व प्रशिक्षणाची सुवर्णसंधी
  बुलडाणा, दि. 27 : संघ लोकसेवा आयोगामार्फत फेब्रुवारी 2018 मध्ये घेण्यात येणाऱ्या कम्बाईंड डिफेन्स सर्व्हिसेस या संरक्षण दलातील अधिकारी पदाच्या परीक्षेकरीता जाहीरात प्रसिद्ध झालेली आहे. केंद्रीय लोकसेवा आयोगाकडून ऑनलाईन अर्ज मागविण्यात येत आहे. पदवीधर उमेदवार असून सीडीएस परीक्षेचा फॉर्म ऑनलाईन भरून पाठवतील. जाहीरातीनुसार पात्र असलेल्या उमेदवारांची निवड परीक्षापूर्व तयारीसाठी छात्रपूर्व प्रशिक्षण केंद्र, नाशिक रोड, नाशिक येथे करण्यात येणार आहे. सीडीएस परीक्षेचा ऑनलाईन फॉर्म भरण्यासाठी http://www.upsconline.nic.in  या संकेतस्थळावर सुविधा उपलब्ध आहे.

   कंम्बाईन्ड डिफेन्स सर्व्हिसेसच्या परीक्षेची तयारी करून घेण्यासाठी छात्रपूर्व प्रशिक्षण केंद्र, नाशिक येथे राज्य शासनातर्फे १८ नोव्हेंबर 2017 ते 31 जानेवारी 2018 या कालावधीत प्रशिक्षण वर्ग 55 चालविण्यात येणार आहे. निवास, भोजन प्रशिक्षणाची सोय शासनामार्फत मोफत करण्यात येणार आहे. जिल्ह्यातील जास्तीत जास्त पात्र उमेदवारांनी सैन्य दलात अधिकारी पदाची संधी घेण्यासाठी जिल्हा सैनिक कल्याण कार्यालय, बुलडाणा येथे 12 नोव्हेंबर 2017 रोजी पदवी पर्यंतच्या सर्व मूळ कागदपत्रांसह उपस्थित रहावे. ऑनलाईन फॉर्म भरल्या नंतर त्याची प्रिंट घेवून मुलाखतीचे वेळेस दाखविल्याशिवाय उमेदवाराची निवड करण्यात येणार नाही. मुलाखतीचे वेळी वस्तुनिष्ठ पद्धतीची लेखी परीक्षा मुलाखत जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी यांचेकडून घेतली जाणार आहे. मुलाखतीस येण्याआधी उमेदवारांनी सैनिक कल्याण विभाग, पुणे यांचे संकेतस्थळ www.mahasainik.com  वर recruitment tab ला क्लिक करून त्यामध्ये CDS-55 या कोर्ससाठी उपलब्ध महत्वाच्या तारखा चेक लिस्ट सोबत असणारी सर्व परिशिष्टांचे अवलोकन करून त्यांना डाऊनलोड करावे. त्याची दोन प्रती काढून ते पूर्ण भरून घेवून यावे. अधिक माहितीसाठी छात्रपूर्व प्रशिक्षण केंद्र, नाशिक रोड, नाशिक यांच्या 0253-2451031 2451032 या क्रमांकावर कार्यालयीन वेळेत संपर्क करावा. अथवा प्रत्यक्ष संपर्क करावा, असे आवाहन जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी यांनी केले आहे.