Monday 26 September 2016

news 26.9.16 dio buldana

                                                     




जिल्ह्यातील 1551 पात्र कर्जदार शेतकऱ्यांना कर्जमाफी
·        जिल्हास्तरीय समितीकडून 2 कोटी 90 लक्ष रूपयांच्या प्रस्तावांना मान्यता
·        755 शेतकऱ्यांना गहाण वस्तु परत मिळाल्या
   बुलडाणा, दि 26 -  शेतकऱ्यांसमोर बदलत्या हवामानाचे मोठे आव्हान उभे ठाकले आहे. हवामान बदलामुळे पीक पद्धतीत बदल करून हवामानाशी सुसंगत पीक घेण्यासाठी शेतकरी सज्ज आहे. मात्र  कर्ज हा त्याच्यासमोरचा मोठा प्रश्न असून कर्जामुळे शेतकरी मेटाकुटीस येत असल्याचा अनुभव आहे.  शासनाने विदर्भ व मराठवाड्यामधील परवानाधारक सावकारांचे कर्ज काढलेल्या शेतकऱ्यांना व्याजासह कर्जमाफी दिली आहे. या दिलासा देणाऱ्या निर्णयामुळे निश्चितच जिल्ह्यातील शेतकऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे. खरोखरच शासनाने दिलेली कर्जमाफी ही जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी वचनपूर्ती ठरली आहे.
   शासनाने परवानाधारक सावकारांकडील विदर्भ मराठवाड्यातील  शेतकऱ्यांनी काढलेले कर्ज माफ करण्याचा निर्णय घेतला होता. त्यानुसार जिल्ह्यातील परवानाधारक 50 सावकारांकडून कर्ज घेतलेल्या 1551 पात्र कर्जदार शेतकऱ्यांचे कर्ज त्यावरील व्याज शासनाने माफ केले आहे. जिल्हास्तरीय समितीने 2 कोटी 90 लक्ष रूपयांचे प्रस्तावांना मान्यता देण्यात आली आहे. यामध्ये मुद्दल 2 कोटी 48 लक्ष आणि 42 लक्ष रूपयांच्या व्याजाचा समावेश आहे.  त्यानुसार आतापर्यंत जिल्ह्यात 36 सावकारांकडील 755 कर्जदार शेतकऱ्यांपोटी 1 कोटी 80 लक्ष रूपयांची रक्कम खर्च केली आहे. ही रक्कम परवानाधारक सावकारांना शासन कर्जाची व व्याजाची रक्कम अदा करणार असल्यामुळे निश्चितच शेतकऱ्यांच्या डोक्यावरचे कर्जाचे ओझे हलके होण्यास मदत मिळणार आहे.
       या योजनेनुसार 30 नोव्हेंबर 2014 रोजी परवानाधारक सावकाराकडून येणे असलेले आजमितीस परत फेड केलेली कर्ज, त्यावरील व्याजासह शासनाने माफ केले आहे. या कर्जमाफीसाठी कर्जदार हा शेतकरी अथवा शेतकरी कुटूंबातील असावा, परवानाधारक सावकाराच्या कार्यक्षेत्रातील रहीवासी शेती असणारा असावा. नोकरदार, निवृत्ती वेतन धारक, दुकान आस्थापना अधिनियमनातंर्गत परवानाधारक या कर्ज माफीसाठी अपात्र आहेत.
    जिल्ह्यात परवानाधारक सावकारांची संख्या 30 नोव्हेंबर 2014 रोजी 158 होती. त्यापैकी या योजनेतंर्गत शेतकरी कर्जदारांचे कर्ज माफ करण्यासाठी तालुका स्तरीय समितीने छाननी करून 1551 कर्जदार शेतकऱ्यांचे प्रस्ताव पाठविले आहेत. त्यापैकी 755 शेतकऱ्यांना मुद्दल व्याज, असे 1 कोटी 80 लक्ष रूपयांचे प्रस्ताव निकाली काढण्यात आले आहे. उर्वरित शेतकऱ्यांना कर्जमाफी देण्याची कार्यवाही सुरू आहे. कर्ज व व्याज माफीसोबतच शासनाने सावकारांकडे गहाण ठेवलेल्या वस्तु शेतकऱ्यांना परत देण्याची कार्यवाहीसुद्धा केली आहे. आतापर्यंत 755 शेतकऱ्यांना सावकारांकडे गहाण ठेवलेल्या वस्तु मिळाल्या आहेत.
       जिल्हाधिकारी यांनी या योजनेतंर्गत ज्या शेतकऱ्यांचे कर्ज माफ करण्यात आले आहे. त्यांच्या सावकाराकडील तारण वस्तू 7 दिवसांच्या आत शेतकऱ्यांना परत करून देण्याची कार्यवाही करण्याच्या व या शेतकऱ्यांना कर्जमुक्तीचे प्रमाणपत्र देण्याच्या सूचना दिल्या आहेत. सध्या जिल्ह्यातील परवानाधारक सावकारांचे 12 हजार 93 कर्जदार शेतकऱ्यांच्या 13.40 कोटी रूपये कर्जाच्या याद्या तालुका स्तरीय समितीकडे प्राप्त झाल्या आहेत. या याद्या शासन निर्णयातील तरतूदीनुसार तापासणी करून घेण्याची कार्यवाही करण्यात येत आहे. कर्जमाफी करण्याची कार्यवाही जिल्ह्यात सुरू असल्यामुळे शेतकरी पुढील हंगामाला आशेने सामोरे जात आहे. शेतकरी सुखी तर जग सुखी या उक्तीप्रमाणे राज्य सरकार बळीराजाला सुखी करण्याचा पुरेपूर प्रयत्न करीत आहे. हा याच प्रयत्नांचा भाग आहे.
  कर्ज माफी दिलेल्या शेतकऱ्यांना जिल्हा प्रशासनाच्यावतीने प्रमाणपत्रही दिल्या जाणार आहे. यामुळे शेतकऱ्याला सदर सावकार पुढे कर्ज वसूलीचा तगादाही लावणार नाही. सावकारांचे कर्ज माफ होत असल्यामुळे शासनाचे शतश: आभार जिल्ह्यातील शेतकरी मानत आहे. शेतकऱ्यांचे सावकारांकडील कर्ज माफ झाल्यामुळे नव्या उमेदीने शेतकरी सज्ज झाला आहे. एवढे मात्र निश्चित.
****
नगर परिषद निवडणूकीची प्रारूप मतदार यादी प्रसिद्ध
  • 7 ऑक्टोंबर 2016 पर्यंत हरकती, सूचना दाखल कराव्यात
बुलडाणा, दि. 26 - राज्य निवडणूक आयोगाच्या कार्यक्रमाप्रमाणे नगर परिषद निवडणूक -2016 करीता प्रारूप मतदार यादी तयार करण्यात आली आहे. ही यादी नगर परिषद बुलडाणा, चिखली, दे.राजा, मेहकर, खामगांव, शेगांव, जळगाव जामोद, नांदुरा व मलकापूर येथील मतदारांची आहे. यादी संबंधित नगर पालिकांमध्ये प्रकाशित करण्यात आली आहे. तरी या नगर परिषदांमधील रहिवाशांनी प्रारूप मतदार यादीवर काही हरकती व सूचना असल्यास संबंधित नगर परिषदांचे मुख्याधिकारी यांचेकडे 7 ऑक्टोंबर 2016 पर्यंत कार्यालयीन वेळेत सादर कराव्यात, असे जिल्हाधिकारी कार्यालयाकडून कळविण्यात आले आहे.
----------------
पं. दिनदयाल उपाध्याय यांना अभिवादन
बुलडाणा, दि. 26 पं. दिनदयाल उपाध्याय यांच्या जयंतीनिमित्त त्यांच्या प्रतिमेला 25 सप्टेंबर 2016 रोजी जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात अभिवादन करण्यात आले. उपजिल्हाधिकारी रमेश घेवंदे यांनी पुष्प अर्पण केले.
याप्रसंगी जिल्हा पुनर्वसन अधिकारी एस.ए खांदे, लघु पाटबंधारे विभागाचे कार्यकारी अभियंता श्री. चौधरी, अधिक्षक एन.डी कुळकर्णी, नायब तहसीलदार के.व्ही पाटील, एन.व्ही येलकर, एस.जी गिरी, श्री मोगल आदींसह कर्मचारी उपस्थित होते.

*******

Tuesday 20 September 2016

बातमी 20.9.16

                                                                 





चिखली येथील परिवहन विभागाचे ‍िशबीर 30 जुलै रोजी
 बुलडाणा दि.20 -  उपप्रादेशिक परिवहन कार्यालयाचे चिखली येथे 26 सप्टेंबर 2016 रोजी शिबीराचे आयोजन करण्यात आले होते. मात्र 26 सप्टेंबर 2016 रोजी मराठा क्रांती मोर्चा बुलडाणा येथे असल्यामुळे प्रशासकीय कारणास्तव सदर शिबिर आता 30 सप्टेंबर 2016 रोजी होणार आहे, याबाबत सर्व वाहनधारक व नागरिकांनी नोंद घ्यावी, असे आवाहन उपप्रादेशिक परिवहन अधिकारी यांनी केले आहे.
--------------
सोशीत व पिडीत समाजाला न्याय देणारे विचार आवश्यक
- जिल्हाधिकारी
* सामाजिक न्याय विभागाची कार्यशाळा
 बुलडाणा दि.20 -  समाजातील शेवटच्या घटकापर्यंत कल्याणकारी विचार पोहोचले पाहिजे. या घटकामध्येच समाजातील  सोशीत व पिडीत वर्ग मोठ्या प्रमाणावर असतो. अशाप्रकारे या सोशीत व पिडीत घटकाला विकासाच्या मुख्य प्रवाहात आणून त्यांचा विकास साधला पाहिजे. त्यासाठी प्रशासनात अशा सोशीत व पिडीत समाजाला न्याय देणारे विचार आवश्यक आहे, असे प्रतिपादन जिल्हाधिकारी डॉ. विजय झाडे यांनी आज केले.
 समाजाभिमुख व सामाजिक सद्भावना निर्माण करण्यासाठी राजपत्रित अधिकाऱ्यांच्या कार्यशाळेचे आयोजन   जिल्हाधिकारी कार्यालयाच्या नियोजन समिती सभागृहात करण्यात आले. त्यावेळी उद्घाटक म्हणून जिल्हाधिकारी बोलत होते. यावेळी व्यासपीठावर मुख्य कार्यकारी अधिकारी श्रीमती दीपा मुधोळ, अप्पर जिल्हाधिकारी शिवानंद टाकसाळे,  सहाय्यक आयुक्त एम.जी वाठ, उपवनसंरक्षक बी.टी भगत, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. नेवाने, शिवाजी महाविद्यालय, अकोल्याचे प्रा. डॉ. एम आर इंगळे व बार्टी पुणे येथील श्री. गव्हाळे उपस्थित होते.
    भ्रष्टाचारमुक्त समाज ठेवण्यासाठी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे समता, बधूता व एकात्मतेचे विचार अंगीकारणे गरजेचे असल्याचे सांगत जिल्हाधिकारी म्हणाले, सामान्य माणूस आपल्या कार्यशैलीचा शेवटचा घटक माणून कार्य केले पाहिजे. प्रशासनात आल्यानंतर गरजवंत नागरिकांना आपल्या पदापासून लाभ मिळवून दिला पाहिजे.
  याप्रसंगी  डॉ. बाबासाहेब आंबेडकर अभ्यास केंद्र, श्री शिवाजी महाविद्यालय, अकोला येथील डॉ. एम. आर इंगळे यांनी  डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे संविधान सभेतील विचार व मार्गदर्शन या विषयावर मार्गदर्शन केले. तसेच ॲड वसंत गव्हाळे यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे प्रशासकीय कार्य या विषयावर विचार मांडले. यावेळी मुख्य कार्यकारी अधिकारी श्रीमती दीपा मुधोळ, अप्पर जिल्हाधिकारी शिवानंद टाकसाळे आदींनी मार्गदर्शन केले. प्रास्ताविक सहायक आयुक्त एम. जी वाठ यांनी केले.
   कार्यक्रमाच्या सुरूवात दिपप्रज्वलनाने करण्यात आली. संचलन सतिश बाहेकर यांनी केले. कार्यक्रमाला विविध विभागांचे विभागप्रमुख, अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते. कार्यशाळेच्या दुसऱ्या सत्रात महान अर्थशास्त्रज्ञ व आर्थिक धोरणाचे धुरीण डॉ. बाबासाहेब आंबेडकर या विषयावर प्रा. प्रेमकुमार बोके, अंजनगाव सुर्जी, जि. अमरावती. यांचे व्याख्यान झाले, तर महिलांसाठी समान हक्काचे उद्गाते व कामगारांच्या न्याय अधिकाराचे लढवय्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकर या विषयावर राजीव शिवअप्पा पांडे, वाशिम यांनी मार्गदर्शन केले. यावेळीही मोठ्या प्रमाणावर अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.
*******


मुलींच्‍या जन्‍मदराबाबत जिल्‍हयातील 125 गावे संवेदनशील
बुलडाणा, दि. 20-  जिल्‍हयातील मुलींच्‍या घटत्‍या जन्‍मदराच्‍या चिंताजनक सामाजिक परिस्‍थीतीच्‍या दृष्‍टीने बेटी बचाओ बेटी पढाओ या उपक्रमातंर्गत सुक्ष्‍म विश्‍लेषण व नियोजन प्रक्रीयेच्‍या माध्‍यमातून जिल्‍हयातील 125 गांवे ही मुलींच्‍या जन्‍मदराबाबत अत्‍यंत संवेदनशील असल्‍याचे निदर्शनास आले असून, या गांवात जन्‍म घेणा-या मुलींच्‍या जन्‍माचे गुणोत्‍तर हे मुलांपेक्षा कमी असल्‍याचे निदर्शनास आले आहे. दरम्‍यान या संवेदनशील गावांमध्‍ये बेटी बचाओ बेटी पढाओ अभियानाची व्‍याप्‍ती वाढविण्‍यात येणार असल्‍याचे जिल्‍हा परिषदेच्‍या मुख्‍य  कार्यकारी अधिकारी दिपा मुधोळ यांनी सांगितले आहे.
    मुलींच्‍या घटत्‍या जन्‍मदाच्‍या अनुषंगाने बुलडाणा हा महाराष्‍ट्रातील संवेदनशिल असलेल्‍या 10 जिल्‍हयामध्‍ये समाविष्‍ट असलेला जिल्‍हा आहे. तर देशातील 100 जिल्‍हयामध्‍ये सुध्‍दा बुलडाणा जिल्‍हयाचा समावेश आहे. जिल्‍हयातील गर्भलिंग निदान करणा-या अपप्रवृत्‍तींना  आळा घालुन मुलींचा जन्‍मदर वाढविण्‍यासाठी आवश्‍यक जाणीव जागृती करणे, त्‍याच प्रमाणे मुलींना शिक्षणाच्‍या नियमीत प्रवाहात कायम ठेवणे, मुलगा-मुलगी असा भेद न करता  समान दर्जा व संधी मुलींना सुध्‍दा उपलब्‍ध करुन देणे आवश्‍यक आहे. त्‍या दृष्‍टीने जिल्‍हयात जिल्‍हा परिषदेच्‍या मुख्‍य कार्यकारी दिपा मुधोळ यांच्‍या पुढाकारातून विविध उपक्रमांमधून सक्रीय  सहभागातून प्रशासनाच्‍या वतीने बेटी बचाओ बेटी पढाओ हे अभियान यशस्‍वीरीत्‍या सुरु आहे. त्‍याचप्रमाणे जिल्‍हा परिषद अध्‍यक्ष श्रीमती अलका खंडारे व उपाध्‍यक्ष पांडुरंग खेडेकर यांच्‍या माध्‍यमातून बुलडाणा जिल्‍हा परिषदेने सुध्‍दा सन 2016 हे वर्ष वरीस लेकीचं म्‍हणून साजरा करण्‍याचे निश्‍चीत केले आहे.
       दरम्‍यान जिल्‍हयातील मुलींच्‍या जन्‍मदरात भरीव वाढ होण्‍याच्‍या दृष्‍टीने करण्‍यात येत असलेल्‍या सुक्ष्‍म नियोजनात  आरोग्‍य विभागाने मागील दोन वर्षाच्‍या केलेल्‍या विविध गांवाच्‍या  विश्‍लेषणात्‍मक अभ्‍यासात सुमारे 125 गांवे ही मुलींच्‍या जन्‍मदराबाबत अति संवेदनशील असल्‍याचे दिसून आले आहे. यामध्‍ये बुलडाणा तालुक्‍यातील 17, चिखली तालुक्‍यातील 39 गांवांचा समावेश्‍ असून, देऊळगांव राजा (22),सिंराजा (24),लोणार (08) ,नांदुरा (15) अशा एकूण 125 गांवांचा समावेश आहे.
       यावर्षी माहे ऑगस्‍ट 2016 पर्यंत झालेल्‍या बालकांच्‍या जन्‍माच्‍या गुणोत्‍तराचा विचार करता नांदुरा तालुक्‍यात हा मुलींचा जन्‍म दर दरहजारी 726 असून, संग्रामपूर व मोताळा तालुक्‍यात अनुक्रमे 836 व 843 असल्‍याचे निदर्शनास आले आहे. या पार्श्‍वभूमीवर जिल्‍हा परिषदेच्‍या मुख्‍य कार्यकारी अधिकारी दिपा मुधोळ यांनी खंत व्‍यक्‍त केली असून, आरोग्‍य,महिला व बालकल्‍याण तसेच शिक्षण विभागास संवेदनशील गावे व तालुक्‍यामध्‍ये जाणीव जागृती विषयक उपक्रमांची व्‍याप्‍ती वाढविण्‍याचे निर्देश दिले आहेत

**********
              अनुदानावरील कृषि अवजारांसाठी 30 सप्टेंबरपर्यंत अर्ज सादर करण्याचे आवाहन
  • लाभार्थ्यांनी संबंधित कृषि कार्यालयाशी संपर्क साधावा

     बुलडाणा, दि. 20 :  केंद्र शासनाने 12 व्या पंचवार्षिक योजनेमध्ये सन 2014-15 पासून राष्ट्रीय कृषि विस्तार व तंत्रज्ञान अभियान राबविण्याचे निश्चित केले आहे. या अभियानातंर्गत कृषि यांत्रिकीकरण उपअभियानाचा अंतर्भाव केला होता. शासनाने सन 2015-16 पासून केंद्र शासनाने सदर उपअभियानाचा अंतर्भाव कृषि उन्नती योजनेतंर्गत केला आहे. या अभियानात सन 2016-17 मध्ये अनुदानावर कृषि अवजारांचा पुरवठा व भाडे तत्वावर कृषि यांत्रिकीकरण सेवा-सुविधा पुरविण्यासाठी कृषि अवजारे बँक स्थापना या दोन घटकांच्या कार्यक्रमास केंद्र शासनाची मान्यता प्राप्त झालेली आहे.
   सदर अभियानामध्ये लाभ घेण्यास इच्छूक असलेल्या लाभार्थ्यांनी संबंधित तालुका कृषि कार्यालयाशी संपर्क साधून विहीत नमुन्यातील मागणी अर्जामध्ये अवजारे/उपकरणांचा प्रस्ताव एमएआयडीसी, अकोला यांचे नावे पूर्ण रक्कमेच्या डी.डी/ आरटीजीएस पोहोच समवेत सादर करावा.
  या अभियानामध्ये पुरवठादार म्हणून महाराष्ट्र कृषि उद्योग विकास महामंडळ मर्या. अकोला या संस्थेची राज्य शासनाने निवड केलेली आहे. तथापी योजनेतील सर्व अवजारे/उपकरणांचा पुरवठा एमएआयडीसी अकोला यांचेमार्फतच करण्यात येईल. याची लाभार्थ्यांनी नोंद घ्यावी.
    लक्षांकानुसार प्राप्त प्रस्तावातील अवजारे/उपकरणांचा पुरवठा आदेश एमएआयडीसी अकोला या संस्थेस दिल्यानंतर सदर अवजारे/उपकरणांचा पुरवठा 15 दिवसांच्या आत केल्या जाणार आहे. त्यानंतर सदर बाबींसाठी अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, अल्प, अत्यल्प व महिला यांचेसाठी एकूण यंत्र / अवजारांच्या 50 टक्के व सर्वसाधारण प्रवर्गासाठी एकूण यंत्र/ अवजारांच्या किंमतीच्या 40 टक्के किंवा सदर अवजारांच्या उच्चतम मर्यादा यापैकी जे कमी असेल ते अनुदान देय राहील. तरी सदर प्रस्ताव सादर करण्याची अंतिम मुदत 30 सप्टेंबर 2016 रोजी संध्याकाळी 6 वाजेपर्यंत असणार आहे. अधिक माहितीसाठी संबंधित तालुका कृषि अधिकारी यांचेशी संपर्क साधून या योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी प्रमोद लहाळे यांनी केले आहे.
*****
क्रॉपसॅप प्रकल्पातंर्गत कृषि विभागामार्फत पिक पाहणी

     बुलडाणा, दि. 20 :  कृषि उपविभाग बुलडाणा, चिखली, मोताळा व मलकापूर तालुक्यातील सोयाबीन पिकाच्या शेंगा दाणे भरणे तथा परिपक्वतेच्या स्थितीत आहे. तसेच समाधानकारक पाऊस झाल्यामुळे पिक चांगल्या अवस्थेत आहे. क्रॉपसॅप प्रकल्पातंर्गत उपविभागीय कृषि अधिकारी, कृषि अधिकारी व किड नियंत्रक यांच्या चमूकडून  पाहणी करण्यात आली. मात्र या पाहणी दरम्यान  सोयाबीन पिकावर ऑगस्अ महिन्यात पावसाने खंड दिल्यामुळे सोयाबीनवरसुद्धा तंबाखूची पाने खाणारी अळी व हिरवी उंट अळीचा प्रादुर्भाव काही प्रमाणात दिसून येत आहे. त्याच्या नियंत्रणाकरिता तंबाखूची पाने खाणाऱ्या व हिरवी उंट अळीने आर्थिक नुकसानीची पातळी म्हणजे प्रती मीटर ओळीत 4 अळ्या आढळून आल्यास इन्डोक्झार्ब 5 इसी  6 मि.ली किंवा क्लोरानट्रॅनीप्रोल 18.5, एस.सी 3 मि.ली प्रती 10 लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी, असे आवाहन उपविभागीय कृषि अधिकारी, बुलडाणा एस. जी डाबरे यांनी केले आहे.
******
पलसोडा ते बावनबीर फाटा मार्गावरील पोलमुळे बसफेरी बंद
  • मार्गावरील विद्युत पोल हटविल्यास बसफेरी सुरू होणार
  • जळगाव जामोद आगाराचा खुलासा

     बुलडाणा, दि. 20 :  जळगाव जामोद आगाराअंतर्गत संग्रामपूर तालुक्यातील आलेवाडी ते सोनाळा या मार्गावर मानव विकास मिशन अंतर्गत बसफेरी चालविण्यात येते. गटशिक्षणाधिकारी यांनी महामंडळाला कळविल्यानुसार दिलेला बस मार्ग पलसोडा- बावनबीर- टुनकी- आलेवाडी- जामोद असा आहे. यामधील पलसोडा ते बावनबीर फाटा  हा 2.4 किलोमीटरचा मार्ग मागील पाच वर्षापासून रस्ता वाहतूकीस बंद योग्य नसल्याने बंद होता. महामंडळामार्फत या मार्गाची मार्ग तपासणीही करण्यात आली होती. तसे संबंधीत सरपंच यांना कळविले. या मार्गावरील खड्डे बुजविण्यात आले, मात्र महावितरणचा पोल हटविण्यात न आल्यामुळे या मार्गावर मानव विकास मिशनची बसफेरी बंदच आहे.
  याबाबत 8 सप्टेंबर 2016 रोजी महामंडळाने प्रशिक्षण वाहन सोबत घेवून वाहतूक निरीक्षक श्री. साळवे व जळगाव जामोद आगाराचे वाहतुक निरीक्षक वाय. एस वांदे यांनी मार्ग तपासणी केली. त्यानंतर खड्डे बुजविण्यात आले. त्याचप्रमाणे 25 ऑगस्ट 2016 रोजी सुद्धा या मार्गाची तपासणी महामंडळाने केली आहे. इलेक्ट्रिक पोल हटविल्यास पुन्हा एकदा या मार्गाची तपासणी करण्यात येवून मानव विकास मिशनची बसफेरी सुरू करता येणे शक्य आहे. जेणेकरून विद्यार्थीनींचे शैक्षणिक नुकसान होणार नाही व प्रवाशांनाही लाभ होईल, असस खुलासा जळगाव जामोद आगाराकडून प्राप्त झाला आहे.
** 
मराठा समाज क्रांती मोर्चादिनी जिल्ह्यात दारूबंदी जाहीर
बुलडाणा, दि. 14 - जिल्ह्यात 26 सप्टेंबर 2016 रोजी मराठा समाजाच्यावतीने मराठा क्रांती मोर्चाचे आयोजन करण्यात आले आहे. सदर मोर्चाचे कालावधीत कायदा व सुव्यवस्था तसेच सार्वजनिक शांतता अबाधित रहावी, यासाठी जिल्ह्यात 26 सप्टेंबर मुंबई दारूबंदी कायदा १९४९ चे कलम १४२ अन्वये दारूबंदी जाहीर करण्यात आली आहे. त्यामुळे या दिवशी संपूर्ण जिल्ह्यात सर्व देशी, विदेशी मद्य विक्री दुकाने, परवानाकक्ष व बिअरबार अनुज्ञप्ती, एफएल/बीआर-2 अनुज्ञप्ती आदी अबकारी अनुज्ञप्त्या बंद राहतील, असे अधिक्षक राज्य उत्पादन शुल्क यांनी कळविले आहे.
*******

   

Thursday 15 September 2016

news 15.9.16 dio buldana

                                                यशोगाथा
जलयुक्त पावले.. शिवार फुलले  !
40 हजार 167 टीसीएम पाणीसाठा उपलब्ध
17 हजार 620 हेक्टर क्षेत्रावर दोन वेळेच्या संरक्षित सिंचन
दुष्काळ.. अनावृष्टी.. शाश्वत सिंचनाची वानवा असे पाचवीला पुजलेले शब्द सारखे आपल्या कानावर पडत असतात. दुष्काळाची दाहकता आपल्या भागातील शेतकऱ्यांनी सातत्याने अनुभवली आहे. अनावृष्टीमुळे करपणारी पिके आपण अनुभवली आहे. त्यामुळे शाश्वत सिंचनाने ही पिके वाचली पाहिजेत. शाश्वत सिंचनाची सोय उपलब्ध नसल्यामुळे पीके हातची जाताना पाहताना खेदही होतो. आता मात्र असा खेद करण्याची पाळी शेतकऱ्यांवर येणार नाही. राज्य शासनाचे महत्वाकांक्षी जलयुक्त शिवार अभियानामुळे सर्वत्र शिवार फुलले आहेत.
जलयुक्त शिवार अभियानांतर्गत निवड करण्यात आलेल्या गावांमधील पाण्याचा ताळेबंद  तयार करुन गावात पाण्याची उपलब्धता व आवश्यकता किती आहे व त्याकरिता कोणकोणते तंत्रज्ञान अंवलंबविण्याची आवश्यकता आहे, हे शिवार फेरी करुन ठरविण्यात येवून त्यानुसार गावाचा आराखडा तयार करण्यात आला. या आराखड्यास ग्रामसभेची, जिल्हाधिकारी, विभागीय आयुक्त यांची मान्यता घेण्यात आल्यानंतर गावातील कामांना  सुरुवात होते. गावशिवारातील वाहून जाणारे पाणी विविध पद्धतीने शिवारातच अडविले जाऊन गावामध्ये विकेंद्रीत स्वरुपाचे पाणीसाठे निर्माण करणे, भूगर्भातील पाण्याच्या पातळीत वाढ करणे, गाळ काढणं, खोलीकरणे आणि रुंदीकरण करणे, ओढे, नदी पुन:र्जिवन प्रकल्प राबविणे ही या अभियानाची प्रमुख उद्दिष्टे आहेत.
     जलयुक्त शिवार अभियानुसार जलसंधारण व मृदसंधारणाचे खूप मोठे काम जिल्ह्यात सुरू आहे. जिल्ह्यातील 330 गावांची पहिल्या टप्प्यासाठी निवड करण्यात आली. तसेच दुसऱ्या टप्प्यात 245 गावे निवडण्यात आली आहे. पहिल्या टप्प्यातील  330 गावांमध्ये विविध प्रकारची कामे सुरू असून  6 हजार 454 कामे पूर्ण झाली, तर 425 कामे प्रगतीपथावर आहे. या कामांवर आतापर्यंत 117 कोटी रूपये खर्च झालेले आहेत. त्याचप्रमाणे दुसऱ्या टप्प्यात 66 कामे सुरू आहेत. जलयुक्त शिवार अभियानातंर्गत जिल्ह्यातील प्रमुख नद्यांवर मोठ्या प्रमाणावर साखळी सिमेंट नाला बांधण्यात आले. अशाप्रकारे जिल्ह्यात 365 साखळी  सिमेंट नाला बांधांची निर्मिती करण्यात आली आहे. त्यामुळे 1825 टी.सी.एम पाणीसाठा निर्माण झाला आहे. यावर्षीच्या समाधानकारक पावसामुळे सर्व बंधारे भरून वाहत आहे.  तसेच मागील वर्षात जिल्ह्यातील दुष्काळी परिस्थिती पाहता जिल्ह्यात  मोठ्या प्रमाणावर गाळ काढणे, खोलीकरण व रूंदीकरणाची कामे करण्यात आली. ती सर्व नदी- नाले, बंधारे आता ओसंडून वाहत आहे.
   एकंदरीतच या अभियानामुळे जिल्ह्यात 40 हजार 167 टी.सी.एम पाणीसाठा निर्माण झाला असून 33 हजार 28 हेक्टर क्षेत्रावर एक वेळच्या संरक्षित सिंचनाची सोय उपलब्ध झाली आहे. तर 17 हजार 620 हेक्टर क्षेत्रावर दोन वेळेच्या संरक्षित सिंचन होऊ शकणार आहे. जलयुक्त शिवार अभियानातील कामांमुळे भूजल पातळीत कमालीची वाढ झाली आहे. हे अभियान  शेतकऱ्यांसाठी वरदान ठरले आहे.  या अभियानातंर्गत जिल्ह्यात प्रामुख्याने नाला, ओढा, नदी यामधील गाळ काढणे, खोलीकरण, रुंदीकरण करणे अशी कामे लोकसहभागातून झालेली आहेत. जलयुक्त शिवार अभियानांतर्गत सन 2015-16 मध्ये अमरावती विभागातील पाच जिल्ह्यांमध्ये एकूण 1396 गावांची निवड करण्यात आली होती. निवड करण्यात आलेल्या गावांमध्ये  एकूण 33 हजार 255 कामे पूर्ण झालेली आहेत.  
जलयुक्त शिवार कार्यक्रमांतर्गत सन 2016-17 मध्ये बुलडाणा जिल्ह्यात 245 गावांची निवड करण्यात आली असून या गावामध्ये कामे सुरू आहेत. जनमानसांचा, शेतकऱ्यांचा विकास साधावा, निसर्गाच्या लहरीपणाचा फटका येथील अन्नदात्याला सोसावा लागू नये यासाठी ‘जलयुक्त शिवार’ अल्पखर्चाची, शेतकऱ्यांना तारणारी संकल्पना अख्ख्या महाराष्ट्रात राबविली जात आहे. परंतू कोणतीही संकल्पना तडीस नेण्यासाठी, जनहिताचा निर्णय घेतांना, त्या परिकल्पनेचा परीघ वाढावा म्हणून आवश्यक बाब म्हणजे लोकसहभाग. कोणत्याही शासकीय योजनेची यशस्विता ही लोकसहभागावर अवलंबून असते. म्हणून ‘जलयुक्त शिवार’ या महत्वाकांक्षी योजनेची पूर्तता करण्यासाठी सर्वांनी सहकार्य करण्याची गरज आहे.
***
सहकार पुरस्कारासाठी अर्ज करावे
बुलडाणा दि. 15- सन 2015-16 मध्ये सहकार क्षेत्रात उत्कृष्ट काम करणाऱ्या संस्थांना पुरस्कार देऊन त्यांचा उचित गौरव करण्यासाठी शासनाने गतवर्षी प्रमाणे सहकार पुरस्कार देण्याचे ठरविले आहे. तरी इच्छुक संस्थांनी, त्यनुसार सविस्तर प्रस्ताव तयार करुन ज्या तालुक्यात त्यांचे मुख्यालय आहे त्या तालुक्याचे संबंधीत सहाय्यक निबंधक यांच्या कायार्घ्लयात  15 सप्टेंबर 2016 ते 07 ऑक्टोबर 2016 पर्यंत सादर करावेत.
या संदर्भातील माहितीसाठी संस्थांनी संबंधीत सहाय्यक निबंधक/जिल्हा उपनिबंधक/विभ्ज्ञागीय सहनिबंधक कार्यालयाशी संपर्क साधावा, असे आवाहन सहकार विभागातर्फे करण्यात येत आहे.
**
मानसेवी होमगार्ड सदस्य नोंदणी
बुलडाणा दि. 15- जिल्हयातील 07  तालुका पथकानुसार रिक्त अनुशेषाप्रमाणे (पुरुष 140 व महिला 74) पुरुष व महिला उमेदवारांची सदस्य नोंदणी 15ऑगस्ट पर्यंत घेण्यात आलेली होती. सदर नोंदणी प्रक्रियेकरिता एकुण 1298 पुरुष व 104 महिला उमेदवार यांची नोंदणी झाली होती. त्यापैकी शारीरिक चाचणीमध्ये एकूण 558 पुरूष व 92 महिला उमेदवार मैदानी चाचणीसाठी पात्र ठरले. त्यापैकी केवळ एकच महिला उमेदवार मैदानी चाचण्यांमध्ये उत्तीर्ण झल्याने त्या पात्र ठरल्या आहेत.  गुणानुक्रमे एकुण 136 पुरुष उमेदवार व 1 महिला उमेदवार यांची गुणवत्तेनुसार व नियमाप्रमाणे निवड झालेली आहे.
निवड झालेल्या उमेदवारांची निवड यादी 11 स्प्टेंबर रोजी सर्व सातही तालुका समोदशक अधिकारी होमगार्ड पथकाच्या ठिकाणी व संबंधित तालुका पोलीस स्टेशनाला लावण्यात आलेल्या आहेत. निवड झालेल्या उमेदवारांनी तालुका होमगार्ड कार्यालय येथे संपर्क साधुन इतर माहिती जाणुन घ्यावी. उमेदवारांनी नोंदणी प्रक्रियेच्या वेळी दाखल केलेली कागदपत्रे 19 सप्टेंबर  ते 23 सप्टेंबर 2016 दरम्यान जिल्हा होमगार्ड कार्यालय, बुलडाणा येथुन कार्यालयीन वळेत घेऊन जावीत. निवड झालेल्या उमेदवारांनी अधिक माहितीसाठी आपल्या तालुक्यातील होमगार्ड पथकाचे कार्यालयात त्वरीत संपर्क साधावा, असे आवाहन श्रीमती श्वेता खेडेकर जिल्हा समादेशक होमगार्ड यांनी केले आहे.
**
18 वर्षाखालील वाहन चालविणाऱ्या मुलांवर होणार कारवाई
बुलडाणा दि. 15-मोटार वाहन कायदा 1988 व केंद्रीय मोटार वाहन नियम 1989 मध्ये नमूद केलयाप्रमाणे 18 वर्षाखालील वाहन चालविणाऱ्या मुलासंदर्भात वाहन मालकास शिक्षा करण्याची तरतूद आहे. मोआर वाहन कायदा 1988 च्या कलम 4 अन्वये सार्वजनिक ठिकाणी 50 सीसी पेक्षा जास्त क्षमतेचे वाहन चालविणऱ्या व्यक्तीस व कलम 18 मध्ये सार्वजनिक ठिकाणी 20 वर्षाखालील व्यक्तीने वाहन चालविल्यास वाहन मालकास तुरूंगवासाची शिक्षा आहे. तसेच 1 हजार रूपये दंड अथवा दोन्ही शिक्षा आहे. असे निर्दशनास आल्यास कारवाई करण्यात येईल, असे उपप्रादेशिक परिवहन कार्यालयाने कळविले आहे.
**
अजिसपूर येथे शासकीय योजनांचा जागर
संवादपर्व कार्यक्रमातंर्गत कलापथकाच्या माध्यमातून प्रसार
बुलडाणा दि. 15- तालुक्यातील अजिसपूर येथे माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाच्या संवादपर्व 2016 कार्यक्रमातंर्गत जिल्हा माहिती कार्यालय, बुलडाणाच्यावतीने अजिसपूर सार्वजनिक गणेशोत्सव मंडळात शासनाच्या विविध योजनांचा जागर करण्यात आला. नांद्राकोळी येथील जनसेवा सांस्कृतिक कलापथक मंडळाने विविध शासकीय योजनांवर आधारीत कला सादर केली.
  जलयुक्त शिवार अभियान, मागेल त्याला शेततळे कसे शेतकऱ्याच्या लाभाचे आहे, याबाबत पारंपारिक वेशभूषेत कलापथक सादर करण्यात आले. अटल सौर कृषि पंप योजना, पशुधन विमा योजना, सावकारग्रस्त शेतकऱ्यांना कर्जमाफी याकृषि संबंधीत योजनांवर नाटीकेच्या माध्यमातून कला सादर करण्यात आली. महात्मा फुले जनआरोग्य अभियान, बेटी बचाओ-बेटी पढाओ, स्वच्छ भारत अभियान यासाठी खास वेशभुषा कलाकारांनी धारण केली.
  ग्रामस्थांनी यावेळी विविध योजनांविषयी माहितीही विचारली. अशाप्रकारे दुतर्फा संवाद साधण्यात आला. ग्रामस्थांनी विविध शासकीय योजनांविषयीच्या शंका विचारल्या. शासन राबवित असलेल्या योजनांमधून सामान्य माणसाचा कसा विकास होवू शकतो, याबाबतचे प्रात्याक्षिकच त्यांनी सादर केले.
  सर्वप्रथम गणेश पूजनाने कार्यक्रमाची सुरूपात झाली. यावेळी अजिसपूरचे सरपंच बाळ जगताप, तसेच परमेश्वर बापुराव, विलास मुळे, किशोर जाधव, भास्कर जाधव, संदेश चवरामोळ आदींसह मोठ्या संख्येने गावकरी उपस्थित होते.

Thursday 8 September 2016

news 8.9.2016 dio buldana

जिल्हा क्रीडा संकूल समितीची बैठक संपन्न
बुलडाणा, दि. 8 : जिल्हा क्रीडा संकूल समितीची बैठक आज 8 सप्टेंबर 2016 रोजी अप्पर जिल्हाधिकारी यांच्या दालनात आयोजित करण्यात आली होती. बैठकीत जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी श्रीमती दीपा मुधोळ, अप्पर जिल्हाधिकारी शिवानंद टाकसाळे यांनी आढावा घेतला.
या बैठकीत जिल्हा क्रीडा संकूल बांधकाम, रोजंदारी कर्मचाऱ्यांबाबत चर्चा करण्यात आली. तसेच संकूलात स्क्वॅश खेळासाठी कोर्ट तयार करण्याबाबत सूचीत करण्यात आले. बैठकीत जिल्हा क्रीडा अधिकारी अशोक गिरी यांनी माहिती दिली. याप्रसंगी कंत्राटदार, क्रीडा कार्यालयातील अधिकारी व कर्मचारी आदी उपस्थित होते.
********
उद्योजकांकरिता शासनाची सामुहिक प्रोत्साहन योजना जाहीर
* लाभार्थ्यांनी माहिती ऑनलाईन भरावी
बुलडाणा, दि. 8 : विविध क्षेत्रातील उद्योजकांना उत्तेजन देवून कमी विकसित क्षेत्रात जास्तीत जास्त उद्योजकांनी गुंतवणूक करावी. उद्योजकांना स्वयंपूर्ण बनविणे व रोजगार निर्मिती करून नवतरूणांना प्रोत्साहन मिळावे या हेतूने उद्योग संचालनालयाच्या अंतर्गत जिल्हा उद्योग केंद्राद्वारे सामुहिक प्रोत्साहन योजना-2013 राबविण्यात येत आहे. सदर योजनेचा लाभ उद्योजकांना सहजतेने व स्वावलंबी बनून लवकर लाभ घेण्याच्या हेतूने ही योजना संपूर्णत: ऑनलाईन करण्यात आली आहे.
उद्योजकांनी लाभ घेण्यासाठी http://di.maharashtra.gov.in या वेबपोर्टलवर नवीन युजर म्हणून रजिस्टर करून घ्यावे. युजर रजिस्ट्रेशन नंतर 1 ते 3 स्टेप्स व्यवस्थित भरून नोंदविलेली माहिती कायमस्वरूपी वारायची आहे. त्यामुळे ती जतन करून ठेवावी. या योजनेतंर्गत लाभ घेवू इच्छिणाऱ्या उद्योजकांना काही अडचणी आल्यास सविस्तर माहितीकरिता जिल्हा उद्योग केंद्र, मलकापूर रोड, दूरदर्शन केंद्राजवळ, बुलडाणा या कार्यालयाशी प्रत्यक्ष अथवा दूरध्वनी क्रमांक 07262-242367 क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन महाव्यवसथापक, जिल्हा उद्योग केंद्र यांनी केले आहे.
**********
जिल्हा ग्राहक संरक्षण परिषदेच्या बैठकीचे 15 सप्टेंबर रोजी आयोजन
बुलडाणा, दि. 8 : जिल्हा ग्राहक संरक्षण परिषदेच्या बैठकीचे आयोजन जिल्हाधिकारी डॉ. विजय झाडे यांच्या अध्यक्षतेखाली 15 सप्टेंबर 2016 रोजी जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात सकाळी 11 वाजता करण्यात आले आहे. तरी जिल्हा ग्राहक संरक्षण परिषदेच्या अनुषंगाने असलेल्या तक्रारी पुराव्यासह दोन प्रतीत लेखी स्वरूपात बैठकीत सादर कराव्यात, असे आवाहन जिल्हा पुरवठा अधिकारी यांनी केले आहे.
*******
‘बेटी बचाओ, बेटी पढाओ’ उपक्रमातंर्गत जिल्‍हास्‍तरीय निबंध स्‍पर्धेचे आयोजन

बुलडाणा, दि. 8 - जिल्‍हयातील मुलींच्‍या घटत्‍या जन्‍मदराच्‍या चिंताजनक सामाजिक परिस्‍थीतीच्‍या दृष्‍टीने जाणीव जागृती करण्‍यात येत आहे. त्याच उद्देशाने जिल्‍हास्‍तरावर विद्यालयीन व महविद्यालयीन गटासाठी खुली निबंध स्‍पर्धा आयोजित करण्‍यात आली आहे. या स्‍पर्धेत युवक-युवती व नागरिकांनी मोठ्या प्रमाणावर सहभागी व्‍हावे, असे आवाहन जिल्‍हा परिषदेच्‍या मुख्‍य कार्यकारी अधिकारी दिपा मुधोळ यांनी केले आहे.
मुलींना शिक्षणाच्‍या नियमीत प्रवाहात कायम ठेवणे मुलगा मुलगी असा भेद न करता समान दर्जा व संधी मुलींना सुध्‍दा उपलब्‍ध करुन देणे आवश्‍यक आहे. या पार्श्‍वभुमीवर बुलडाणा जिल्‍हा परिषदेच्या अध्‍यक्षा अलकाताई खंडारे व उपाध्‍यक्ष पांडुरंग खेडेकर यांच्‍या मार्गदर्शनाखाली जिल्‍हा परिषदेच्‍यावतीने सन 2016 हे वर्ष वरीस लेकीचं म्‍हणून साजरा करण्‍याचे यापूर्वीच निश्‍चीत करण्‍यात आले आहे
त्‍या अनुषंगाने दिनांक 11 ऑक्‍टोंबर 2016 रोजी असलेल्‍या जागतिक बालीका दिनांच्‍या औचित्‍यावर दिपा मुधोळ यांच्‍या विशेष प्रयत्‍नातून कनिष्‍ठ, वरीष्‍ठ महाविद्यालयीन व खुला अशा दोन गटात निबंध स्‍पर्धेचे आयोजन करण्‍यात आले आहे. या निबंध स्‍पर्धेकरीता कनिष्‍ठ व वरीष्‍ठ महाविद्यालयीन गटासाठी ‘माझ्या समोरील आदर्श महिला व्‍यक्‍तीमत्‍व’ हा विषय असून खुल्‍या गटासाठी ‘गर्भलिंग निदान व माझी भुमिका’ असे विषय आहेत. निबंध लेखन हे मराठी, हिंदी, इंग्रजी अथवा उर्दू या भाषेतून करता येणार आहे. महाविद्यालयीन गटासाठीची स्‍पर्धा ही 17 सप्‍टेंबर 2016 रोजी त्‍या-त्‍या विद्यालय स्‍तरावर आयोजीत करण्‍यात येणार आहे. या गटामध्‍ये इयत्‍ता 11 वी 12 वी , डी.एड, बी.एड. पॉलीटेक्‍नीक, इंजिनिअरींग, आयटीआय, नर्सिंग, समाजसेवा विद्यालय,कला-वाणिज्‍य-शाखेचे विद्यालय, कृषी पदवीका विद्यालय, डीफार्म,बीफार्म विद्यालय, बीएएमएस,डीएचएमएस, बीएचएमएस इत्‍यादी विद्यालये सहभागी होऊ शकतील. तर खुल्‍या गटातील स्‍पर्धकांनी आपले निबंध हे तालुक्‍यांच्‍या गटशिक्षणाधिकारी यांच्‍याकडे दिनांक 19 सप्‍टेंबर 2016 रोजी सायं. 5 वाजे पर्यंत सादर करावे.
या स्‍पर्धेच्‍या मुल्‍यांकनासाठी जिल्‍हास्‍तरावर तज्ञांची समिती स्‍थापीत करण्‍यात आली आहे. या स्‍पर्धेत सहभागी स्‍पर्धकांना सुध्‍दा प्रमाणपत्र देण्‍यात येणार असून, उपरोक्‍त दोन्‍ही गटातून जिल्‍हा स्‍तरावर प्रथम, व्दितीय व तृतीय क्रमांक निश्‍चीत करण्‍यात येणार आहेत.त्‍याचप्रमाणे विजेत्‍यांना सन्‍मान चिन्‍ह व प्रमाणपत्र देवून जिल्‍हा परिषदेच्‍या वतीने सन्‍मानित करण्‍यात येणार असल्‍याचे मुख्‍य कार्यकारी अधिकारी दिपा मुधोळ यांनी सांगितले.
अधिक माहितीसाठी इच्‍छूकांनी पंचायत समिती स्‍तरावर गटशिक्षणाधिकारी कार्यालयाशी संपर्क साधावा, असे कळविण्‍यात आले आहे. तसेच जिल्‍ह्यातील सर्व विद्यालय, महाविद्यालय व नागरिकांनी या स्‍पर्धेत सहभागी होऊन बेटी बचाओ बेटी पढाओ ही वैचारिक चळवळ बळकट करावी असे आवाहन सुध्‍दा दिपा मुधोळ यांनी केले आहे.
********
सुक्ष्म सिंचनासाठी जिल्ह्यास 951.98 लक्ष रूपयांचा पहिला हप्ता मंजूर
• प्रधानमंत्री कृषि सिंचाई योजना
• केंद्र शासनाचा हिस्सा
बुलडाणा, दि. 8 – प्रधानमंत्री कृषि सिंचाई योजनेतंर्गत केंद्र पुरस्कृत सुक्ष्म सिंचन योजना 2016-17 वर्षाकरिता लागू करण्यात आली आहे. या वर्षाकरिता सुक्ष्म सिंचन संच बसविण्यासाठी शेतकऱ्यांचे अर्ज ई-ठिबक आज्ञावलीमध्ये ऑनलाईन प्रणालीद्वारे स्वीकारण्यात येत आहे. ही प्रणाली सुरू करण्यात आली असून त्यासाठी जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी आपले अर्ज www.mahaagri.gov.in या संकेतस्थळावर 6 ऑक्टोंबर 2016 पर्यंत ऑनलाईन भरावे.
शेतकऱ्यांनी ऑनलाईन प्रणालीद्वारे केलेल्या अर्जाची व त्यात नमूद केलेल्या अभिलेखांची त्यामध्ये 7/12, नमुना 8-अ, बँक पासबुकच्या पहिल्या पानाची प्रत यांचा समावेश असावा. त्याची एक प्रत तालुका कृषि अधिकारी कार्यालयास वरील मुदतीत सादर करणे बंधनकारक आहे. ज्या शेतकऱ्यांनी ऑनलाईन अर्ज भरला आहे. मात्र पूर्व मान्यता न घेता शेतकऱ्याने सुक्ष्म सिंचन संचाची उभारणी केली असेल व अनुदानासाठी प्रस्ताव सादर केला असेल, तर अशा शेतकऱ्यास अनुदान अनुज्ञेय असणार नाही. अवर्षण प्रवण क्षेत्रातील अल्प व अत्यल्प भूधारकांसाठी 60 टक्के व सर्वसाधारण भूधारकांसाठी 45 टक्के अनुदान देय आहे. तसेच अवर्षण प्रवण क्षेत्राबाहेरील याच भूधारकांसाठी 45 टक्के व सर्वसाधारण भूधारकांसाठी 35 टक्के अनुदान देय आहे.
या योजनेतंर्गत सर्व पिकांचा समावेश करण्यात आला आहे. ऊस, कापूस यासारखी नगदी पिके, केळी, द्राक्षे, डाळींब यासारखी फळपिके, कडधान्य, तृणधान्य, गळीतधान्य पिके, हळद, आले यासारखी सर्व मसाला पिके आणि सर्व भाजीपाला, फुलपिके यासाठी या योजनेतंर्गत शेतकऱ्यांना सुक्ष्म अनुदान अनुज्ञेय आहे. तरी वरील कालावधीत विहीत पद्धतीत शेतकऱ्यांनी अर्ज सादर करावे, असे आवाहन जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी प्रमोद लहाळे यांनी केले आहे.
******
कृषि व फलोत्पादन मंत्री पांडुरंग फुंडकर यांचा दौरा
बुलडाणा, दि. 8 - कृषि व फलोत्पादन मंत्री तथा पालकमंत्री पांडुरंग फुंडकर 9 सप्टेंबर 2016 रोजी जिल्हा दौऱ्यावर येत आहे. त्यांचा दौरा कार्यक्रम पुढीलप्रमाणे : दि.9 सप्टेंबर 2016 रोजी सकाळी 5.28 वाजता शेगांव येथे आगमन व शासकीय मोटारीने खामगांवेकडे प्रयाण, सकाळी 6 वाजता खामगांव येथे आगमन व राखीव, दुपारी 12 ते 1 वाजेदरम्यान शासकीय विश्राम गृह येथे राखीव राहणार आहे.
*******
मंगरूळ नवघरे शिवारात दारूची अवैध वाहतूक करताना पकडले
• 2 लक्ष 20 हजार 572 रूपयांचा मुद्देमाल जप्त
• उत्पादन शुल्क विभागाची कारवाई
बुलडाणा, दि. 8 : मंगरूळ नवघरे शिवारात अमडापूर-ल्व्हाळा चौफुलीवर देशी दारूची वाहतूक करताना एकाला पकडण्यात आले. यावेळी कारवाईत 180 मि.ली क्षमतेच्या 120 बाटल्या व एक महिन्द्रा मीनी ट्रक जप्त करण्यात आला. आरोपीला महाराष्ट्र दारूबंदी कलम 65 ड नुसार अटक करण्यात आली. तसेच शेगांव परिसरात अवैध मद्यवाहतूक करणाऱ्या दुचाकीस्वारास सापळा रचून पकडण्यात आले. यावेळी आरोपीकडून देशी दारूच्या 180 मि.ली क्षमतेच्या 96 बाटल्या व एक मोटारसायकल जप्त करण्यात आली.
या कारवाईत सर्व आरोपींच्या ताब्यातून 816 बाटल्या, एक मोटार सायकल व एक मिनी ट्रक असा एकूण 2 लक्ष 20 हजार 572 रूपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. सदर कार्यवाही अधिक्षक एस.एल कदम यांच्या मार्गदर्शनाखाली दुय्यम निरीक्षक एस.डी चव्हाण, सहायक दुय्यम निरीक्षक ए.ए शेख, अमोल सुसरे, अमोल अवचार व विशालसिंग पाटील व त्यांचे सहकारी यांनी केली. अवैध दारू विषयी काही तक्रार असल्यास ७०२०७१३५१३ या क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन अधिक्षक, उत्पादन शुल्क विभाग, बुलडाणा यांनी केली आहे.
**********