Monday 30 January 2023

DIO BULDANA NEWS 30.01.2023

 





पदवीधर मतदारसंघासाठी जिल्ह्यात उत्साहात मतदान

*जिल्हाधिकारी यांनी केली मतदान केंद्रांची पाहणी

बुलडाणादि. 30 : अमरावती पदवीधर मतदारसंघासाठी आज जिल्ह्यातील 52 केंद्रांवर सकाळी आठ ते सायंकाळी चार वाजेपर्यंत उत्साहात मतदान झाले. दरम्यान जिल्हाधिकारी डॉ. एच. पी. तुम्मोड यांनी बुलडाणा शहरातील मतदान केंद्रांना भेटी देऊन पाहणी केली. यावेळी त्यांनी आवश्यक त्या सूचना केल्या.

          आज सकाळपासून बुलडाणा शहरासह जिल्ह्यातील मतदान केंद्रावर मतदारांनी मतदान करण्यासाठी रांगा लावल्या. मतदान करण्यासाठी सर्वच मतदान केंद्रावर सुविधा पुरविण्यात आल्या. मतदारांना येणाऱ्या अडचणी जाणून मतदान केंद्राधिकारी यांनी मार्गदर्शन केले.

          दरम्यान जिल्हाधिकारी डॉ. एच. पी. तुम्मोड यांनी सकाळी बुलडाणा तहसिल कार्यालय, एडेड हायस्कूल, शिवाजी हायस्कूल या मतदान केंद्रांना भेटी देऊन पाहणी केली. यावेळी मतदारांना मतदानासाठी एका रांगेत ठेवणे, त्यांच्यासाठी आवश्यक त्या सोयी पुरविणे, मतदान केंद्रावर असलेल्या अधिकारी, कर्मचाऱ्यांसाठी असणाऱ्या सोयी आदीबाबत सूचना केल्यात.

          जिल्ह्यात एकूण 37 हजार 894 मतदार आहेत. यात 10 हजार 726 महिला आणि 27 हजार 168 पुरूष मतदार आहेत. जिल्ह्यात 52 मतदान केंद्रावर मतदान घेण्यात येत आहे. सकाळी 8 ते 10 वाजेपर्यंत 6.38 टक्के मतदान झाले. दुपारी 12 वाजेपर्यंत 17.89 टक्के मतदान झाले. दुपारी दोन वाजेपर्यंत 33.47 टक्के मतदान झाले.

00000

जिल्हास्तर एफसी बायर्न महाराष्ट्र कप स्पर्धेत सहभागी होण्याचे आवाहन

बुलडाणादि. 30 : प्रतिभावान फुटबॉलपटूंचा शोध घेण्यासाठी जर्मनी येथील फुटबॉल क्लबशी करार करण्यात आला आहे. जर्मनी येथे प्रशिक्षणासाठी खेळाडूंची निवड करण्यात येणार आहे. यासाठी जिल्हास्तर एफसी बायर्न महाराष्ट्र कप स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. यात जिल्ह्यातील 14 वर्षाखालील खेळाडूंनी सहभाग नोंदवावा, असे आवाहन करण्यात आला आहे.

राज्यात फुटबॉल खेळाच्या विकास आणि प्रसारासाठी फुटबॉल क्लब बायर्न म्युनिकजर्मनी यांच्याशी क्रीडा व युवक सेवा संचालनालयाने करार केला आहे. फुटबॉल क्लब बायर्नजर्मनी हा जागतिक अग्रगण्य लोकप्रिय फुटबॉल क्लब पैकी एक आहे. या करारामुळे राज्यातील फुटबॉल खेळाची लोकप्रियता वाढीस लागेल. खेळाडू व क्रीडा मार्गदर्शकांना फुटबॉल खेळातील तांत्रिक प्रशिक्षणक्रीडा नैपुण्याचा शोध घेण्यासाठी तसेच योजनाबद्ध प्रशिक्षणपायाभूत सुविधा यांना चालना मिळणार आहे.

क्रीडा व युवक सेवा संचालनालय, तसेच फुटबॉल क्लब बायर्न यांच्या करारामध्ये क्रीडा नैपुण्याचा शोध घेवून त्यांना जर्मनीत प्रशिक्षण देण्यात येणार आहे. या अंतर्गत राज्यात 14 वर्षाखालील मुलांच्या एफ. सी. बायर्न महाराष्ट्र कप स्पर्धेचे आयोजन करण्यात येणार आहे. या स्पर्धेकरीता दि. 1 जानेवारी 2009 नंतर जन्मलेला खेळाडू पात्र राहतील. या स्पर्धेकरीता जिल्ह्यातील 14 वर्षाखालील मुलांच्या संघांनी सहभाग नोंदवावा. तसेच अधिक माहितीसाठी जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयक्रीडानगरीजांभरुन रोडबुलडाणा येथे संपर्क साधावाअसे आवाहन जिल्हा क्रीडा अधिकारी गणेश जाधव यांनी केले आहे.

00000




जिल्हास्तरीय युवा संसद वक्तृत्व स्पर्धेत

अंजली औतकार, राजनंदीनी राजपूत यशस्वी

बुलडाणादि. 30 : जिल्हास्तरीय राष्ट्रीय युवा संसद वक्तृत्व स्पर्धा शुक्रवार, दि. 27 जानेवारी रोजी ऑनलाईन पद्धतीने घेण्यात आली. यात जिल्ह्यातील अंजली औतकार प्रथमतर राजनंदीनी राजपूत हिने द्वितीय क्रमांक पटकविला. या दोघीही पुणे पुणे येथे होणाऱ्या राज्यस्तरीय स्पर्धेसाठी पात्र ठरल्या आहेत. 

नेहरु युवा केंद्रातर्फे युवकांमध्ये नेतृत्व गुण विकसित व्हावे, त्यांना आपले विचार व्यक्त करण्याची संधी मिळावी. राष्ट्रीय सामाजिक विषयावर विचार मंथन व्हावे, यासाठी राष्ट्रीय युवा संसद घेण्यात आली. या स्पर्धेतून जिल्हाराज्य आणि राष्ट्रीय पातळीवर वक्तृत्व स्पर्धेच्या माध्यमातून युवक-युवतींची निवड करण्यात येणार आहे. दि. 23 आणि 24 फेब्रुवारी 2023 रोजी संसद भवनाच्या मुख्य सभागृहात होणाऱ्या राष्ट्रीय युवा संसद कार्यक्रमात विचार मांडण्याची संधी राज्यस्तरावर विजयी झालेल्या युवक-युवतींना मिळणार आहे.

नेहरू युवा केंद्रातर्फे जिल्हास्तरीय राष्ट्रीय युवा संसद वक्तृत्व स्पर्धा ऑनलाईन पद्धतीने घेण्यात आली. या स्पर्धेचे उद्घाटन नेहरु युवा केंद्र संगठन महाराष्ट्र – गोवाचे राज्य संचालक प्रकाश मनुरे यांनी केले. जिल्हा युवा अधिकारी नरेंद्र डागर यांनी सूत्रसंचलन केले. स्पर्धेत स्वास्थकल्याण एवं खेल : युवाओं के लिए अजेंडाकौशल्य विकास : युवाओं को सशक्त बनाने की कुंजी में से एकसोशल मीडीया : युवा दृष्टिकोण हे विषय देण्यात आले. जिल्हास्तरीय स्पर्धेत यशस्वी झालेले पुणे येथे आयोजित राज्यस्तरीय युवा संसद -वक्तृत्व स्‌पर्धेकरीता त्या पात्र ठरले आहेत.

00000









जिल्हा ग्रंथालयात मराठी भाषा पंधरवड्याचा समारोप

बुलडाणादि. 30 : जिल्हाधिकारी कार्यालय, जिल्हा ग्रंथालयाच्या वतीने घेण्यात आलेल्या मराठी भाषा पंधरवड्याचा शुक्रवार, दि. 27 जानेवारी रोजी समारोप करण्यात आला. यानिमित्ताने दोन दिवसांची ग्रंथ प्रदर्शनी आयोजित करण्यात आली होती.

ग्रंथप्रदर्शनाचे उद्घाटन मराठी भाषा सदस्य डॉ. कि. वा. वाघ यांच्या हस्ते करण्यात आले. जिल्हा ग्रंथालय अधिकारी सतिश जाधव अध्यक्षस्थानी होते. प्रमुख पाहुणे म्हणून श्री. कंकाळ उपस्थित होते.

          ग्रंथ प्रदर्शनाच्या उद्घाटनानंतर जिल्हा ग्रंथालयातील अभ्यासिकेत व्याख्यान आयोजित करण्यात आले. यात श्री. कंकाळ यांनी स्पर्धा परिक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांना मराठीसह इंग्रजी व्याकरण या विषयावर मार्गदर्शन केले. गजेंद्रसिंह राजपूर यांनी मराठी कोष व्याकरण याविषयी मार्गदर्शन केले. निशिकांत ढवळे यांनी मराठी भाषा संवर्धनानिमित्त मार्गदर्शन केले.

डॉ. वाघ यांनी मराठी भाषा संवर्धनासाठी असलेल्या राज्य, जिल्हास्तरीय समित्यांची माहिती दिली. मराठी भाषा संवर्धन करणे गरजेचे असून या भाषेची जपणूक करण्याचे महत्व विषद केले. इतर भाषा शिकत असताना मातृभाषा मराठीकडे दुर्लक्ष करू होऊ नये, इतर भाषा शिकताना मातृभाषेतील ज्ञान मिळविणे आणि जीवन यशस्वी करणे सोपे जाते. विविध संकल्पना स्पष्ट होण्यासाठी मातृभाषेचे ज्ञान असणे गरजेचे असल्याचे सांगितले. विदर्भ साहित्य संघाच्या वैशाली तायडे यांनी मराठी भाषेवरील कविता सादर केल्या.

000000

मंत्री संजय राठोड यांचा जिल्हा दौरा

बुलडाणादि. 30 : अन्न व औषध प्रशासन मंत्री संजय राठोड मंगळवार, दि. 31 जानेवारी 2023 रोजी जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत आहेत.

          श्री. राठोड यांच्या दौऱ्यानुसार, मंगळवारी, दि. 31 जानेवारी 2023 रोज सकाळी दहा वाजता सुंदरखेड येथील संत सेवालाल महाराज मंदिर मैदान येथे बंजारा समाज सहविचार सभेस उपस्थित राहतील. त्यानंतर दुपारी 12 वाजता बिबी, ता. लोणार कडे प्रयाण करतील. दुपारी दोन वाजता बिबी येथील बंजारा समाज सहविचार सभेस उपस्थित राहतील. त्यानंतर दुपारी साडेतीन वाजता मंठा, जि. जालना कडे प्रयाण करतील.

000000





प्रजासत्ताक दिनी तृणधान्याबाबत जनजागृती

बुलडाणादि. 30 : आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्षानिमित्त विविध विभागातर्फे प्रजासत्ताक दिनी तृणधान्याबाबत जनजागृती करण्यात आली. सदर पिकांचे उत्पादन वाढ आणि आहारातील वापर वाढविण्यासाठी विविध उपक्रम आयोजित करण्यात आले.

जिल्ह्यातील विविध विभाग, कृषि महाविद्यालय, शाळांतर्फे जनजागृतीचे कार्यक्रम हाती घेण्यात आले आहे. प्रजासत्ताक दिनानिमित्त शाळा, कॉलेजमार्फत प्रभात फेरी काढण्यात आली. यात पौष्टिक तृणधान्याबाबत म्हणी असलेले बॅनल लावण्यात आले. चित्ररथ, रांगोळी, पथनाट्य आदी कार्यक्रमातून जनजागृती करण्यात आली. तसेच पौष्टिक तृणधान्य वापराबाबत शपथ घेण्यात आली. कार्यक्रमांमधून दैनंदिन आहारातील आरोग्याच्या दृष्टीने पौष्टिक तृणधान्याचे महत्व अधिकारी, कर्मचारी, शाळा, कॉलेजचे प्राचार्य तसेच कृषि सहायकांनी पटवून दिले.

000000

किसान सन्मान निधीसाठी बँक खाते

आधार क्रमांकाशी जोडण्याचे आवाहन

*पोस्टातही आधार क्रमांक जोडण्याची सुविधा

बुलडाणा, दि. 30 : प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेंतर्गत पात्र शेतकरी कुटुंबाला 2 हजार रूपये प्रति हप्ता याप्रमाणे 6 हजार रूपये प्रती वर्षी लाभ देण्यात येतो. या योजनेतील 13वा हप्त्याचा लाभ जमा करण्याची कार्यवाही करण्यात येत आहे. केंद्र शासनाने 13व्या हप्त्याचा लाभ मिळण्यासाठी लाभार्थींनी त्यांचा लाभ ज्या बँक खात्यात जमा करावयाचा आहे ते बँक खाते आधार क्रमांकास जोडणे आवश्यक आहे. यासाठी आधार क्रमांक बँक खात्याशी संलग्न करावे, असे आवाहन करण्यात आले आहे.

राज्यात सद्यस्थितीत 14 लाख 32 हजार लाभार्थींची बँक खाती त्यांच्या आधार क्रमांकास जोडलेली नाहीत. त्यामुळे या लाभार्थींच्या खात्यात 13व्या हप्त्याचा लाभ जमा होणार नाही. लाभार्थीना त्यांचे बँक खाते आधार क्रमांकाशी जोडण्याची सुविधा त्यांच्या गावातील पोस्टमास्टर यांच्यामार्फत उपलब्ध करण्यात आली आहे. यासाठी आधार कार्ड, मोबाईल क्रमांक या कागदपत्रांचे आधारे इंडिया पोस्ट पेमेंट बँकेत (आयपीपीबी) आपल्या गावातील पोस्ट विभागाचे कर्मचारी यांच्यामार्फत खाते उघडावे. सदरचे बँक खाते आपल्या आधार क्रमांकाशी 48 तासात जोडल्या जाईल. सदरची पद्धत कोणत्याही अतिरिक्त कागदपत्रांशिवाय करता येणार असल्याने अत्यंत सोपी व सुलभ आहे. आयपीपीबीमध्ये बँक खाते सुरू करण्याची सुविधा आपल्या गावातील पोस्ट कार्यालयातच उपलब्ध करण्यात आली आहे.

पीएम किसान योजनेतील प्रलंबित लाभार्थींची बँक खाते आयपीपीबीमध्ये उघडून ती आधार क्रमांकास जोडण्यासाठी राज्याच्या आयपीपीबी कार्यालयास गावनिहाय याद्या उपलब्ध करून दिल्या आहेत. त्याप्रमाणे गावातील पोस्टमास्टर या लाभार्थींना संपर्क करून आयपीपीबीमध्ये बँक खाते सुरू करतील. योजनेच्या 13 व्या हप्त्याच्या लाभासाठी आधार संलग्न बँक खाते अनिवार्य केलेले असल्याने आयपीपीबीमार्फत दि. 1 ते 12 फेब्रुवारी 2023 या कालावधीत राज्यात मोहिम राबविण्यात येत आहे. आयपीपीबीमार्फत आयोजित या मोहिमेमध्ये लाभार्थींनी त्यांचे बँक खाते उघडावे, असे आवाहन करण्यात आले आहे.

00000

Friday 27 January 2023

DIO BULDANA NEWS 27.01.2023

 






नेहरू युवा केंद्राच्या तालुकास्तरीय क्रीडा स्पर्धा उत्साहात

बुलडाणा, दि. 27 : नेहरू युवा केंद्राच्या युवा कार्यक्रम क्रीडा अंतर्गत तालुकास्तरीय क्रीडा स्पर्धा चिखली येथील तालुका क्रीडा संकुल पार पडल्या.

तालुका क्रीडा संयोजक दिलीप लांडकर अध्यक्षस्थानी होते. तालुका कृषि अधिकारी अमोल शिंदे उद्घाटक म्हणून उपस्थित होते. प्रमुख पाहुणे म्हणून तालुका क्रीडा अधिकारी बाळकृष्ण महानकार, नेहरू युवा केंद्राचे लेखा व कार्यक्रम पर्यवेक्षक अजयसिंग राजपूत, कृषि अधिकारी योगेश सरोदे, तलवारबाजी प्रशिक्षक अक्षय गोलांडे, युथवेलचे संचालक राजेश शेळके उपस्थित होते.

सुरुवातीला मेजर ध्यानचंद यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करण्यात आले. श्री. शिंदे यांनी, खेळामुळे व्यक्त‍िमत्वाचा विकास होतो. एकसंघ भावना व संघटन कौशल्य निर्माण होते. तसेच मानसिक ताणतणाव कमी होतो, एकाग्रता वाढत असल्याने खेळांमध्ये सहभागी व्हावे असे आवाहन केले. श्री. महानकर यांनी, शासन खेळाडूंसाठी विविध कार्यक्रम उपक्रम राबविते. याचा युवकांनी लाभ घ्यावा, असे आवाहन केले. श्री. राजपूत यांनी नेहरू युवा केंद्राच्या कार्यक्रमाची माहिती दिली. गजानन जाधव यांनी सूत्रसंचालन केले. देवानंद नेमाने यांनी आभार मानले.

या स्पर्धेमध्ये कबड्डीमध्ये प्रथम क्रमांक भानखेड कबड्डी संघ, द्वितीय पाटोदा कबड्डी संघ, तृतीय राष्ट्रमाता जिजाऊ इंग्ल‍िश स्कुल, चिखली संघाने पटकविला. मुलींमध्ये प्रथम क्रमांक राष्ट्रमाता जिजाऊ इंग्ल‍िश स्कुल, चिखली, द्वितीय संघर्ष ग्रुप, चिखली, तृतीय श्री शिवशंकर विद्यालय, भरोसा यांनी पटकविला. हॉलीबॉलमध्ये प्रथम मातोश्री संघ, चिखली, द्वितीय अनुराधा इंग्ल‍िश स्कुल, चिखली, तृतीय क्रमांक जिल्हा परिषद शाळा, चिखली संघाने पटकावला.

वैयक्तिक खेळामध्ये 100 मीटर धावणे स्पर्धेत मुलींमधून प्रथम वैशाली गांगुर्डे, द्वितीय प्रगती जाधव, तृतीय क्रमांक सपना राठोड यांनी पटकाविला. 100 मीटर धावणे मुलांमधून प्रथम विशाल गालट, द्वितीय जय फोलाने, तृतीय क्रमांक स्वहम सुरडकर यांनी पटकविला. गोळाफेक स्पर्धेत मुलींमध्ये प्रथम आरती ठेंग, द्वितीय कोमल लोढे, तृतीय वैशाली गांगुर्डे, तर मुलांमध्ये प्रथम रुषिकेश इंगळे, द्वितीय अभिषेक सानम, तृतीय क्रमांक गणेश भिमराव तायडे यांनी पटकविला. देवानंद नेमाने, दिलीप लांडकर, राम काछवाल, गणेश पेरे, गजानन जाधव, संदिप बिथरे, दिपक शेलार, पुरुषोत्तम कापसे, मंगेश कांडेकर, विठ्ठल महाले, बन्टी लोखंडे यांनी पंच म्हणून काम पाहिले.

विजयी संघ आणि खेळाडूना प्रशिक्षक संजय गायकवाड, सचिन आखाडे, क्रीडा संयोजक दिलीप लांडकर, अजयसिंग राजपूत, राजेश शेळके यांच्या हस्ते ट्रॉफी आणि मेडल देऊन सन्मानित करण्यात आले. कार्यक्रमासाठी आकाश साळोक, पांडुरंग कोईगडे, अर्जुन साळवे, दिपक महाले, भागवत शेळके, भागवत सुरुशे, सागर काळे आणि आई क्रीडा मंडळाच्या सदस्यांनी पुढाकार घेतला.

000000

जिल्हा रुग्णालयात राष्ट्रीय बालिका दिन साजरा

बुलडाणा, दि. 27 : जिल्हा रुग्णालयातील पीसीपीएनडीटी विभागात राष्ट्रीय बालिका दिन साजरा करण्यात आला.

राष्ट्रीय बालिका दिनाचे औचित्य साधून जिल्हा रुग्णालयामध्ये या आठवड्यामध्ये जन्माला आलेल्या नवजात बालिकांना कपडे आणि पालकांना स्मृतीचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला. यावेळी जिल्हा रुग्णालयाचे प्रभारी जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. सुशील एस. चव्हाण, निवासी वैद्यकीय अधिकारी डॉ. यास्मीन चौधरी, आरती कुळकर्णी, वैद्यकीय अधिकारी डॉ. साईनाथ तोडकर, प्रसुतीगृह प्रभारी श्रीमती डांगे, ॲड. वंदना तायडे, श्री. भोंडे आदी उपस्थित होते.

यावेळी जिल्हा शल्य चिकीत्सक डॉ. चव्हाण यांनी समाजात मुलींच्या प्रती जागरुकता निर्माण करुन मुलींचा जन्मदर वाढविणे, तसेच मुलींच्या गर्भाची भ्रुणहत्या रोखून मुलींप्रती आदरभाव जोपासण्‍यात यावी, असा संदेश दिला.

0000000

Thursday 26 January 2023

DIO BULDANA NEWS 26.1.2023

 







प्रजासत्ताक दिनी उत्साहात राष्ट्रध्वज वंदन

*प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा

* खेळ, सांस्कृतिक कार्यक्रम सादर

बुलडाणा, दि. 26 : प्रजासत्ताक दिनाच्या 73 व्या वर्धापनदिनी आज दि. 26 जानेवारी 2023 रोजी सकाळी 9.15 वाजता जिल्हाधिकारी डॉ. ह. पि. तुम्मोड यांच्या हस्ते पोलिस कवायत मैदान येथे राष्ट्रध्वज वंदन करण्यात आले.

यावेळी आमदार संजय गायकवाड, मुख्य कार्यकारी अधिकारी भाग्यश्री विसपुते, जिल्हा पोलिस अधीक्षक सारंग आवाड, अतिरिक्त जिल्हाधिकारी धनंजय गोगटे, निवासी उपजिल्हाधिकारी दिनेश गिते, उपजिल्हा निवडणूक अधिकारी गौरवी सावंत, जिल्हाधिकारी कार्यालयाच्या अधीक्षक शामला खोत, अतिरिक्त पोलिस अधीक्षक बाबुराव महामुनी, पोलिस उपअधीक्षक गिरीश ताथोड यांच्यासह विरमाता, विरपिता, विविध विभागाचे अधिकारी आदी उपस्थित होते.

राष्ट्रध्वज वंदनानंतर डॉ. तुम्मोड यांनी परेड निरीक्षण केले. पोलिस दल, होमगार्ड, राष्ट्रीय छात्र सेना, राजीव गांधी सैनिकी शाळा, मुलींची सैनिकी शाळा, सेंट जोसेफ शाळा, पोलिस बँड पथक, श्वान पथक, मोटार परिवहन विभाग यांच्या परेड संचलनानंतर त्यानंतर कृषि विभाग, उपप्रादेशिक परिवहन विभाग, नगर विकास शाखा, सामाजिक वनीकरण विभाग, निवडणूक विभाग यांच्या चित्ररथाने मार्गक्रमण केले.

यावेळी सॅन्डो बटालियनमध्ये कार्यरत असताना शहिद झालेले कैलास पवार यांच्या विरमाता उज्ज्वला भारत पवार यांना ताम्रपट देऊन गौरव करण्यात आले. तसेच प्रशंसनीय सेवेबद्दल पोलिस दलातील पंकज सपकाळे, मोहम्मद शफीक अब्दुल रहिम, केशव नागरे, गजानन नाटेकर, शिष्यवृत्ती परीक्षेत गुणवत्ता प्राप्त श्रीनिल बेलोकार, अदिती राणे, हर्ष कुंभारे, आदिनाथ इंगळे, वृंदा राठी, जिल्हा शल्य चिकित्सक कार्यालयाचे नेत्रतज्ज्ञ डॉ. रवी शिंदे, डॉ. यास्मिन चौधरी, एस. जी. सोळंकी, कैलास बेंडवाल, आयुष्मान भारतच्या डॉ. रिया चोपडे, जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी कार्यालयाचे अविनाश महाले, फुल सिंह, धीर वाकोडे, पराग गवई, जिल्हाधिकारी कार्यालयाचे श्रीकांत हाके यांचा प्रशस्तीपत्र देऊन गौरव करण्यात आला.

यावेळी बाल शिवाजी कॉन्व्हेंट, कराटे प्रशिक्षण केंद्र, महिला स्वसंरक्षण स्वयंसिद्धा, मर्दाणी खेळ, शिवाजी विद्यालय, शारदा कॉन्व्हेंट, एडेड हायस्कूल, मौलाना आझाद उर्दू हायस्कूल, उर्दू हायस्कूल,भारत विद्यालय, प्रबोधन विद्यालय, श्री. शिंदे गुरूजी कन्या विद्यालय, जिल्हा परिषद हायस्कूल, रूखाबाई कन्या विद्यालय, सेंट जोसेफ हायस्कूल, सहकार विद्या मंदिर यांनी सांस्कृतिक कार्यक्रम सादर केले.

जिल्हा शल्य चिकित्सक कार्यालयाचे आहारतज्ज्ञ साहेबराव सोळंकी यांनी सूत्रसंचालन केले. यावेळी विविध विभागाचे अधिकारी, कर्मचारी, शहरातील गणमान्य नागरिक आणि विद्यार्थ्यांनी उपस्थिती दर्शविली होती.

00000

Wednesday 25 January 2023

DIO BULDANA NEWS 25.1.2023

 जिल्हाधिकारी यांच्या हस्ते आज राष्ट्रध्वज वंदन

बुलडाणा, दि. 25 : प्रजासत्ताक दिनाच्या 73 व्या वर्धापन दिनानिमित्त गुरूवारी, दि. 26 जानेवारी 2023 रोजी सकाळी 9.15 वाजता जिल्हाधिकारी डॉ. ह. पि. तुम्मोड यांच्या हस्ते पोलिस कवायत मैदान येथे राष्ट्रध्वज वंदन होणार आहे.

प्रजासत्ताक दिनानिमित्त राष्ट्रध्वज वंदन आणि संचलन होणार आहे. संचलनात विविध विभागाचे चित्ररथ सहभागी होतील. तसेच उत्कृष्ट कार्याबद्दल गौरव करण्यात येणार आहे. राष्ट्रध्वज वंदनाच्या कार्यक्रमाला नागरिकांनी राष्ट्रीय पोषाखात सकाळी नऊ वाजेपूर्वी उपस्थित राहावे, असे आवाहन जिल्हा प्रशासनाने केले आहे.

000000



आरसेटी प्रशिक्षणार्थ्यांचे कौशल्य, ज्ञान स्पर्धेत यश

बुलडाणा, दि. 25 : बँक ऑफ महाराष्ट्र, जीवननोत्ती अभियान उमेद आणि आरसेटी यांच्या वतीने आरसेटीच्या प्रशिक्षणार्थ्यांसाठी जिल्हास्तरीय कौशल्य आणि ज्ञान स्पर्धा घेण्यात आली. त्यात अनिता चवरे यांनी उद्योजकता विकास प्रशिक्षणाविषयी सादरीकरण केले. जिल्हास्तरीय स्पर्धेत निवड झाल्याने त्या राज्यस्तरीय स्पर्धेसाठी पात्र ठरल्या आहेत.

विभागनिहाय स्पर्धा घेऊन प्रशिक्षणार्थ्यांची सोलापूर येथे होणाऱ्या राज्यस्तरीय स्पर्धेकरिता निवड करण्यात आली. यात सेंट्रल बँक ऑफ इंडिया बुलडाणा आरसेटी येथील चार महिलांनी सहभाग घेतला. आरसेटीमध्ये प्रशिक्षण घेतलेल्या प्रशिक्षणार्थीची विभागीय स्पर्धा वाशिम येथील स्टेट बँक आरसेटी येथे घेण्यात आली. यामध्ये शिवणकाम, ब्युटी पार्लर, शेळी संगोपन आणि उद्योजकता विकासाचे प्रशिक्षण घेतलेल्या प्रशिक्षणार्थींनी स्पर्धेमध्ये सहभाग घेतला.

000000‍

महाडीबीटी प्रणालीवरील अर्ज निकाली काढण्याचे आवाहन

बुलडाणा, दि. 25 : महाडीबीटी प्रणालीवरील महाविद्यालय स्तरावरील मॅट्रीकोत्तर शिष्यवृत्तीचे अर्ज तात्काळ निकाली काढावेत, असे आवाहन समाज कल्याण सहायक आयुक्त यांनी केले आहे.

सामाजिक न्याय व विशेष सहाय्य तसेच बहुजन कल्याण इतर मागास विभागामार्फत प्रत्येक वर्षी अनुसूचित जाती, भटक्या जमाती, इतर मागास व विशेष मागास प्रवर्गातील मॅट्रीकोत्तर शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थ्यांना भारत सरकार शिष्यवृत्ती आणि राज्य शासनाची शिक्षण फी, परिक्षा फी या योजनांचा लाभ देण्यात येतो.

सदर योजनेचा लाभ घेण्यासाठी विद्यार्थ्यांनी केलेले ऑनलाईन अर्ज महाविद्यालयांकडे पाठविले जातात. महाविद्यालय प्राप्त अर्जांची तपासणी करून पात्र अर्ज समाज कल्याण विभागाकडे पाठवितात. यातील त्रृटी असलेले अर्ज विद्यार्थ्यांच्या लॉगीनला परत पाठविणे आवश्यक आहे. मात्र जिल्ह्यातील चार हजार 18 विद्यार्थ्यांचे अर्ज महाविद्यालय स्तरावर प्रलंबित ठेवण्यात आले आहे.

यात स्व. भास्करराव शिंगणे कला, प्रा. एन. गावंडे विज्ञान आणि ए. गावंडे वाणिज्य महाविद्यालय, साखरखेर्डा, परमहंस रामकृष्ण मौनीबाबा शिक्षण संस्थेचे अनुराधा अभियांत्रिकी महाविद्यालय, चिखली, श्री संत गजानन महाराज अभियांत्रिकी महाविद्यालय, शेगाव, पद्मश्री डॉ. व्ही. बी. कोलते अभियांत्रिकी महाविद्यालय, मलकापूर, व्यवस्थापन महाविद्यालय, खामगाव, आदर्श बहुउद्देशीय शिक्षण प्रसारक मंडळ, डॉ. आर. एन. लाहोटी तंत्रनिकेतन, सुलतानपूर, गावंडे औषधनिर्माण महाविद्यालय, साखरखेडा, सहकार महर्षि भास्करराव शिंगणे कला महाविद्यालय, खामगाव, मॉडर्न डिग्री कॉलेज बुलडाणा, श्री पुंडलिक महाराज महाविद्यालय, नांदुरा या महाविद्यालयांचे अर्ज प्रलंबित आहेत.

अनुसूचित जाती प्रवर्गाच्या विद्यार्थ्यांचे प्रलंबित असलेल्या अर्जाची महाविद्यालयस्तरावर तपासणी करून पात्र अर्ज समाज कल्याण विभागाच्या लॉगीनला दि. 26 जानेवारी 2023 पर्यंत पाठविण्यात यावे. तसेच त्रृटी असलेले अर्ज विद्यार्थ्यांच्या लॉगीनला परत करण्याची कारवाई करण्यात यावी. अन्यता मागासवर्गीय विद्यार्थ्यांना शिष्यवृत्तीपासून वंचित ठेवल्याप्रकरणी महाविद्यालयांवर कारवाई करण्यात येईल. जिल्ह्यातील मागासवर्गीय विद्यार्थी शिष्यवृत्तीच्या लाभापासून वंचित राहणार नाही, याची दक्षता घेण्याची जबाबदारी संबंधित महाविद्यालयाच्या प्राचार्यांवर राहणार आहे. त्यामुळे महाविद्यालयांनी प्रलंबित अर्ज तात्काळ निकाली काढावे, असे आवाहन सहाय्यक आयुक्त डॉ. अनिता राठोड यांनी केले आहे.

000000

दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी शिष्यवृत्तीसाठी अर्ज करण्याचे आवाहन

बुलडाणा, दि. 25 : दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी नॅशनल सेंटर फॉर प्रमोशन ऑफ एम्प्लॉयमेंट फॉर डिसेबल पिपल संस्थेकडून बजाज फिनसर्व स्कॉलरशिप प्रोग्राम फॉर स्टुडंट विथ डिसेबिलीटी ही शिष्यवृत्ती राबविण्यात येत आहे. यासाठी इच्छुकांनी दि. 31 जानेवारी 2023 पर्यंत अर्ज करावे, असे आवाहन करण्यात आले आहे.

सदर शिष्यवृत्तीसाठी दिव्यांग विद्यार्थ्यांनी bspf.ncpedp@gmail.com किंवा secretatiat.ncpedp@gmail.com या मेल आयडीवर पीडीएफ किंवा वर्ड फाईलमध्ये विहित नमुन्यात  अर्ज करावे लागणार आहे. या शिष्यवृत्ती योजनेचा लाभ जिल्ह्यातील दिव्यांग विद्यार्थ्यांनी घ्यावा, असे आवाहन जिल्हा समाज कल्याण अधिकारी मनोज मेरत यांनी केले आहे.

000000

जिल्हा ग्रंथालयात शुक्रवारी ग्रंथप्रदर्शन

बुलडाणा, दि. 25 : मराठी भाषा पंधरवाड्यानिमित्त जिल्हाधिकारी कार्यालय, जिल्हा ग्रंथालयाच्या वतीने ग्रंथप्रदर्शनीचे आयोजन करण्यात आले आहे.

जिल्हा ग्रंथालयात सायंकाळी पाच वाजता ग्रंथप्रदर्शन आणि त्यानंतर व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले आहे. ग्रंथ प्रदर्शनी शुक्रवार, दि. 27 जानेवारी 2023 आणि शनिवार, दि. 28 जानेवारी 2023 या दोन दिवशी सर्वांसाठी नि:शुल्क खुली राहणार आहे. नागरिकांनी याचा लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हा ग्रंथालय अधिकारी यांनी केले आहे.

000000

Tuesday 24 January 2023

DIO BULDANA NEWS 24.1.2023

 







पदवीधर मतदारसंघाच्या मतदान केंद्रावर सुविधा पुरवाव्यात

-निवडणूक निरीक्षक पंकज कुमार

*निवडणूक निरिक्षकांकडून केंद्राची पाहणी

*मतदान केंद्रावर प्रकाशाची व्यवस्था करावी

*आदर्श आचारसंहितेचे काटेकार पालन करावे

बुलडाणा, दि. 24 : अमरावती विभाग पदवीधर मतदारसंघासाठी 30 जानेवारी रोजी मतदान होत आहे. जिल्ह्यातील सर्व 52 मतदान केंद्रावर मतदारांसाठी आवश्यक असणाऱ्या सुविधा पुरविण्यात याव्यात, तसेच मतदान केंद्राच्या ठिकाणी पुरेशा प्रकाशाची व्यवस्था करावी, अशा सूचना निवडणूक निरीक्षक पंकज कुमार यांनी केल्या.

निवडणूक निरीक्षक पंकज कुमार यांनी आज जिल्हाधिकारी कार्यालयात पदवीधर मतदारसंघासाठी होणाऱ्या मतदानाचा आढावा घेतला. यावेळी जिल्हाधिकारी डॉ. एच. पी. तुम्मोड, जिल्हा पोलिस अधीक्षक सारंग आवाड, अतिरिक्त जिल्हाधिकारी धनंजय गोगटे, निवासी उपजिल्हाधिकारी दिनेश गिते, उपजिल्हा निवडणूक अधिकारी गौरी सावंगत आदी उपस्थित होते.

निवडणूक निरीक्षक पंकज कुमार यांनी पदवीधर मतदारसंघासाठी घेण्यात आलेल्या नोंदणीचा आढावा घेतला. गेल्या वेळच्या तुलनेत यावेळी मतदारसंख्या वाढल्याबद्दल समाधान व्यक्त केले. यावेळी त्यांनी मतदान केंद्र, मतदानासाठी आवश्यक साहित्य, वाहतुकीची व्यवस्था, मतदानानंतर मतपेट्या वाहून नेण्याची व्यवस्था आदींबाबत माहिती घेतली. मतपेट्या अमरावती येथे नेताना वाटेत त्या कोणत्याही ठिकाणी थांबू नये, तसेच याकामी पोलिस बंदोबस्त पुरविण्यात यावा, तसेच मतपेट्यांची वाहतूक करणाऱ्या वाहनांना जीपीएस बसविण्यात याव्यात, अशा सूचनाही त्यांनी केल्या.

पदवीधर मतदारसंघासाठी आदर्श आचारसंहिता लागू झाली आहे. त्याचे काटेकोरपणे पालन व्हावे. मतदानाची प्रक्रिया मतपत्रिकेवर होणार असल्यामुळे सदोष मतपत्रिकांबाबत उमेदवारांना कळविण्यात यावे. वेबकास्टिंग साठी मतदान केंद्रावर वेब कॅमेरे बसविण्यात यावे. त्यांची जागा ही समोरून प्रकाश येणार नाही, तसेच मतदानाची माहिती दिसणार नाही, अशा पद्धतीने बसविण्यात यावे. या मतदान प्रक्रियेमध्ये युवा मतदार असल्यामुळे ज्या ठिकाणी शासकीय कार्यालयात मतदानाची प्रक्रिया होणार आहे,
त्याठिकाणी कार्यालये सुस्थितीत ठेवण्यात यावेत.

निवडणूक निरीक्षक पंकजकुमार यांनी आज शिवाजी विद्यालय आणि एडेड हायस्कूल येथील मतदान केंद्राला भेटी दिल्या. यावेळी त्यांनी मतदारांना पसंतीक्रम लिहिणे सोयीस्कर होईल यासाठी मतदानाच्या ठिकाणी पुरेशी प्रकाश व्यवस्था करावी, तसेच मतदान केंद्रावर नागरिकांना आवश्यक असणाऱ्या मुलभूत सुविधा पुरविण्याच्या सूचनाही त्यांनी केल्या.

निवडणूक निरीक्षक पंकजकुमार यांनी जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित मतदान केंद्र अधिकारी यांच्या प्रशिक्षणाला भेट दिली. यावेळी त्यांनी निवडणूक कामाचे प्रशिक्षण उत्तम झाल्यास अडचणी येत नाहीत. अडचणी आल्या तरी आपली पूर्वतयारी झालेली असल्यामुळे निवडणूक प्रक्रिया सुरळीतरित्या पार पाडण्यास मदत होते. मायक्रो निरीक्षक यांच्यावर निवडणूक प्रक्रिया सुरळीत पार पडण्याची जबाबदारी सोपविण्यात आली आहे. या दरम्यान येणाऱ्या अडचणींची त्यांनी वस्तुस्थिती मांडावी. मतदान प्रतिनिधींची संख्या आणि त्यांच्या वावराबाबत योग्य कार्यवाही करावी.

मतदान प्रक्रियेबाबत तक्रारी येणार नाही, याची काळजी घेण्यात येणार आहे. तक्रारी आल्यास त्याची दखल घेतली जाईल. जिल्ह्याच्या बाबतीत सीव्हीजीलच्या डॅशबोर्डवरील तक्रारीबाबत सजग रहावे. यावर येणाऱ्या तक्रारी सोडविण्यासाठी प्राधान्य द्यावे. मतदान मतपत्रिकेद्वारे होणार असल्यामुळे मतदारांना कोणत्याही परिस्थितीत दोन मतपत्रिका जाणार नाही, याची दक्षता घ्यावी. मतदारांना मतदान जागृतीसाठी मोबाईल संदेश पाठविण्यात येणार आहे. केवळ दिव्यांग आणि वृद्ध मतदारांना अपवादात्मक स्थितीत मतदानासाठी मतदान केंद्राधिकारी यांनी मदत करावी. मात्र मतदान करण्याच्यासाठीच्या ठिकाणी कोणत्याही परिस्थितीत जावू नये, याची काळी घेण्याचे आवाहन केले.

00000



नेताजी सुभाषचंद्र बोस, बाळासाहेब ठाकरे जयंतीनिमित्त वकृत्व स्पर्धा

बुलडाणा, दि. 24 : नेहरू युवा केंद्रातर्फे न्यू दीपस्तंभ स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्रात नेताजी सुभाषचंद्र बोस आणि बाळासाहेब ठाकरे जयंती सोमवार, दि. 23 जानेवारी 2023 रोजी साजरी करण्यात आली. नेताजी सुभाषचंद्र बोस जयंती पराक्रम दिवसानिमित्त वक्तृत्व स्पर्धा घेण्यात आली.

यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून तहसीलदार रुपेश खंदारे, नायब तहसिलदार प्रकाश डब्बे, मंडळ अधिकारी अशोक शेळके उपस्थित होते. तहसिलदार श्री. खंदारे यांनी नेहरु युवा केंद्राच्या माध्यमातून युवकांना व्यासपीठ उपलब्ध करुन देण्याबरोबरच दिशा देण्याचे कार्य होत आहे. आज युवकांसमोर मोठी आव्हाने असून युवकांनी नैराश्य, भिती आणि न्यूनगंडाची भावना झुगारुन यशाचे उंच शिखर गाठण्यासाठी प्रयत्नाची पराकाष्ठा करण्याचे आवाहन केले.

वक्तृत्व स्पर्धेतील विजयी स्पर्धकाना तहसिलदार रुपेश खंदारे यांच्या हस्ते स्मृतीचिन्ह देवून गौरविण्यात आले. स्पर्धेतील प्रथम अंजली औतकार, द्वितीय राजनंदनी राजपूत, तर तृतीय क्रमांक मयुरी बुडुकले यांनी पटकविला.

प्रा. गणेश बोचरे, प्रा. निशिकांत ढवळे, प्रा. श्री. बावणे यांनी स्पर्धेसंदर्भात युवकांना मार्गदर्शन केले. नेहरू युवा केंद्राचे लेखा व कार्यक्रम पर्यवेक्षक अजयसिंग राजपूत यांनी प्रास्ताविक केले. नितिन शेळके यांनी सूत्रसंचलन केले. उमेश बावस्कर यांनी आभार मानले. कार्यक्रमासाठी नेहरू युवा केंद्राचे धनंजय चाफेकर, विलास सोनोने यांनी पुढाकार घेतला.

00000

 

प्रधानमंत्री आवास योजनेची घरे

31 मार्च पूर्वी पूर्ण करण्याचे आवाहन

बुलडाणा, दि. 24 : प्रधानमंत्री आवास योजना आणि राज्य आवास योजनेतील लाभर्थ्यांची अपूर्ण राहिलेली घरकुल पूर्ण करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. त्यामुळे लाभार्थ्यांनी आपली घेरे दि. 31 मार्च 2023 पूर्वी पूर्ण करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

प्रधान मंत्री आवास योजनेच्या ग्रामीण योजनेंतर्गत जिल्ह्यात 44 हजार 705 घरकुले मंजूर करण्यात आली आहेत. यापैकी 22 हजार 125 घरकुले पुर्ण झाली आहेत. यातील 22 हजार 523 घरकुले अपूर्ण आहेत. या अपुर्ण घरकुलांपैकी 7 हजार 346 लाभार्थी भूमिहीन लाभार्थी वगळता अपूर्ण घरकुलांची संख्या 15 हजार 224 एवढी आहे. यात बुलढाणा 1 हजार 310, चिखली 1 हजार 612,‍ देऊळगावराजा 511, जळगाव जामोद 873, खामगाव 1 हजार 441, लोणार 1 हजार 507,मलाकापूर 671, मेहकर 1 हजार 594, मोताळा 808, नांदुरा 860, संग्रामपूर 2 हजार 532, शेगाव 447, सिंदखेडराजा 1 हजार 58 घरकुले अपूर्ण आहेत.

रमाई आवास योजनेच्या ग्रामीण अंतर्गत जिल्ह्यात 18 हजार 302 घरकुले मंजूर आहेत. यापैकी 10 हजार 581 घरकुले पुर्ण आहेत. यातील 7 हजार 721 घरकुले अपूर्ण आहेत. अपूर्ण घरकुलांची संख्या 7 हजार 721 आहे. यात बुलढाणा 313, चिखली 661, देऊळगावराजा 245, जळगाव जामोद 456, खामगाव 1 हजार 37, लोणार 475, मलकापूर 301, मेहकर 481, मोताळा 1 हजार 686 नांदुरा 737, संग्रामपूर 290, शेगाव 448, सिंदखेडराजा 591 घरकुल अपुर्ण आहेत. ही घरकुले 31 मार्च 2023 पर्यंत कोणत्याही परिस्थितीत पूर्ण करण्याबाबत आदेश देण्यात आले आहे.

पहिला हप्ता देऊनही काम सुरु केले नसलेल्या लाभार्थ्यांबाबत पीडब्ल्यूएलमधील पहिला हप्ता देऊनही काम सुरु केलेला नसलेल्या लाभार्थ्यांची एकूण संख्या 1 हजार 770 आहेञ यात बुलढाणा 133, चिखली 47, देऊळगावराजा 56, जळगाव जामोद 169, खामगाव 102, लोणार 45, मलकापूर 5, मेहकर 59, मोताळा 48, नांदुरा 361, संग्रामपूर 556, शेगाव 92, सिंदखेडराजा 97, तर रमाई आवास योजनेमधील पहिला हप्ता देऊनही काम सुरु न केलेल्या लाभार्थ्यांची एकूण संख्या 2 हजार 560 आहे. यात बुलडाणा 178, चिखली 42, देऊळगावराजा 130, जळगाव जामोद 45, खामगाव 329, लोणार 193, मलकापूर 17, मेहकर 53, मोताळा 747, नांदुरा 408, संग्रामपूर 58, शेगाव 260 आहे.

लाभार्थ्यांना पहिला हप्ता दिलेला असूनही काम सुरु केले नाही, अशा लाभार्थ्यांना काम सुरु करण्यासाठी तात्काळ अंतिम नोटीस देण्यात यावी. त्यानंतर 31 जानेवारी 2023 रोजी ज्या लाभार्थ्यांनी नोटीस देवूनही काम सुरु केले नाही, अशा लाभार्थ्यांचे जागेच्या नमुना आठ वर बोझा चढवून दिलेल्या अनुदानाची रक्कम वसूल करण्यात यावी. याबाबत गटविकास अधिकारी यांनी नियोजन करुन 31 मार्च 2023 पर्यंत मंजूर घरकुले पुर्ण करण्यात यावेत, अशा सूचना देण्यात आल्या आहे. 

000000

माझी कन्या भाग्यश्रीचा 58 मुलींना लाभ

बुलडाणा, दि. 24 : मुलगा आणि मुलगी हा भेद समाजात राहू नये, कोणत्याही जाती व्यवस्थेत विषमता राहू नये, यासाठी माझी कन्या भाग्यश्री योजना राज्यात राबविण्यात येते. या योजनेत आतापर्यंत 58 मुलींना लाभ देण्यात आला आहे. चालू वर्षात 90 अर्ज प्राप्त झाले आहेत. 

भारतातील सन 1991 मधील जनगणनेत मुलींचे प्रमाण हे प्रति हजार मुलांमागे 945 होते. सन 2001 मध्ये हे प्रमाण 927 होते आणि सन 2011 मध्ये 919 होते. दर जनगणनेत मुलींचे लिंग गुणोत्तराचे प्रमाण कमी होत होत असल्याचे दिसून आले आहे. त्यानंतर 22 जानेवारी 2015 पासून ‘बेटी बचाओ बेटी पढाओ’ या कार्यक्रमाची सुरुवात व प्रत्यक्ष अंमलबजावणी केल्याने 2021 मध्ये मुलींचे प्रमाण दर हजार मुलांमागे 933 आढळून आले आहे. जिल्ह्यात मुलींचे प्रमाण वाढलेले आहे. सन 2011 चे मुलींचे प्रमाण 934 होते. तर 2021 मध्ये मिळालेल्या माहितीनुसार सदरचे प्रमाण हे 957 पर्यंत वाढल्याचे दिसून येते.

मुलींचे लिंग गुणोत्तर वाढविणेसाठी स्थानिक लोकल चॅनेलवर प्रसिध्दी देण्यात आली. तसेच ज्या गावामध्ये मुलींचे प्रमाण कमी आहे. त्या निवडक गावामध्ये कलापथकाद्वारे जनजागृतीपर कार्यक्रम घेण्यात आले. बेटी बचाओ बेटी पढाओचे स्टिकर व बॅनर्स  चिकटविण्यात आले. प्रकल्प, अंगणवाडीस्तरावर व शासकीय कार्यालयांच्या भिंतीवर बोलक्या भिंतीद्वारे चित्रकारिता करण्यात आली. माझी कन्या भाग्यश्री योजनेच्या प्रचारासाठी अंगणवाडीमार्फत प्रत्येक गावात प्रसिध्दीपत्रके वितरीत करण्यात आली.

गेल्या काळात मुलींच्या साक्षरतेचे प्रमाण 79.9 इतके वाढल्याचे दिसून येते. मुलींमध्ये शिक्षण घेण्याचे प्रमाण सुध्दा वाढल्याचे दिसून येते. मुलगा व मुलगी हा भेद समाजात व देशात राहू नये. कोणत्याही जाती व्यवस्थेत ही विषमता राहू नये, यासाठी माझी कन्या भाग्यश्री योजना लागू करण्यात आली आहे. या माध्यमातून जिल्हास्तरावर 58 इतक्या मुलींना प्रति लाभार्थी 25 हजार रूपये या प्रमाणात लाभ देण्यात आला आहे. सन 2022-23 या वर्षाकरिता 90 नवीन अर्ज या कार्यालयास प्राप्त झाले आहे. त्यानुसार त्यांना सदर योजनेचा लाभ देण्यासाठी प्रक्रिया सुरु आहे.

0000