अरुणोदय विशेष सिकलसेल तपासणी व जनजागृती मोहीम; 15 जानेवारी ते 7 फेब्रुवारी दरम्यान आयोजन
बुलढाणा, (जिमाका) दि. 14
: जिल्ह्यातील
सर्व आदिवासी प्रकल्प क्षेत्रांमध्ये तसेच जिल्ह्यातील सर्व तालुक्यांमध्ये अरुणोदय
विशेष सिकलसेल तपासणी मोहीम शासनाच्या निर्देशांनुसार राबवली जाणार आहे. ही मोहिम
15 जानेवारी ते 7 फेब्रुवारी 2026 या कालावधीत राबविली जाणार असून या तपासणी शिबिरांचा
लाभ नागरिकांनी, विशेषतः आदिवासी व उच्च जोखमीच्या समूहातील व्यक्तींनी घ्यावा, असे
आवाहन मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी केले आहे.
अरुणोदय विशेष सिकलसेल तपासणी व जनजागृती
मोहीम जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. अमोल गिते व जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. दत्तात्रय बिराजदार
यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हा आरोग्य विभागामार्फत उपजिल्हा रुग्णालये, ग्रामीण रुग्णालये,
प्राथमिक आरोग्य केंद्रे व उपकेंद्र स्तरावर विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.
सिकलसेल आजार हा आनुवंशिक रक्तविकार असून त्याबाबत वेळेवर तपासणी, अचूक निदान व
योग्य उपचार आवश्यक आहेत. नागरिकांमध्ये या आजाराविषयी जागरूकता निर्माण करण्याच्या
उद्देशाने बुलढाणा जिल्ह्यातील सर्व आदिवासी प्रकल्प क्षेत्रे तसेच तालुक्यांमध्ये
ही मोहीम राबविण्यात येणार आहे.
मोहीमेदरम्यान सिकलसेल रक्त तपासणी शिबिरे, कौटुंबिक समुपदेशन, जनजागृती व्याख्याने,
शाळा व महाविद्यालयांमध्ये आरोग्य शिक्षण कार्यक्रम, तसेच फिल्ड स्तरावर घरभेटी, तपासणी
व फॉलोअप करण्यात येणार आहेत. याशिवाय सिकलसेल रुग्णांच्या उपचार व औषध उपलब्धतेबाबत
मार्गदर्शन केले जाणार आहे, अशी माहिती जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. अमोल गिते यांनी
प्रसिद्धीपत्रकाव्दारे दिली.
00000
Comments
Post a Comment