Tuesday 31 October 2023

मतदार यादी विशेष पुनरिक्षण कार्यक्रमाअंतर्गत विशेष ग्रामसभा व शिबीरांचे आयोजन

 

मतदार यादी विशेष पुनरिक्षण कार्यक्रमाअंतर्गत विशेष ग्रामसभा व शिबीरांचे आयोजन

            बुलढाणा दि. 31 (जिमाका):-  निवडणूक आयोगाने दि. 1 जानेवारी 2024 अर्हता दिनांकावर मतदार यादीचा विशेष पुनरिक्षण कार्यक्रम जाहीर केला आहे. कार्यक्रमानुसार जिल्ह्यातील सर्व ग्रामपंचायतमध्ये विशेष ग्रामसभा तसेच मतदार नोंदणीसाठी विशेष शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे, अशी माहिती उपजिल्हा निवडणूक अधिकारी सुहासिनी गोणेवार यांनी दिली आहे.

 

ग्राम विकास व पंचायतराज विभागाच्या सहकार्याने दि. 1 ते 7 नोब्हेंबर या कालावधीत जिल्ह्यातील विशेष ग्रामसभेचे आयोजन केले जाणार आहे. या काळात राज्यभरातील ग्रामसभामध्ये मतदार यादीचे वाचन केले जाईल. त्यांतर्गत नव्याने नाव नोंदणीस पात्र नागरिक, लग्न होऊन गावात आलेल्या स्त्रिया, गावात कायमस्वरूपी नव्याने वास्तव्यास आलेले नागरिक यांची नाव नोंदणी केली जाईल, तसेच दुबार नावे, मृत व्यक्ती, गावातून कायमस्वरूपी स्थलांतरित झालेल्या व्यक्ती, लग्न होऊन अन्य गावात गेलेल्या स्त्रिया यांच्या नावांची मतदार यादीतून वगळणी केली जाईल.

 

युवा मतदारांची नोंदणी वाढवण्यासाठी निवडणूक विभागाव्दारे शनिवार दि. 4 नोव्हेंबर, रविवार दि. 5 नोव्हेंबर, सोमवार दि. 25 नोव्हेंबर आणि रविवार दि. 26 नोव्हेंबर 2023 ह्या चार दिवशी जिल्ह्यातील सर्व मतदान केंद्रांवर, शाळा, महाविद्यालयाचे ठिकाणी, शासकीय,  निमशासकीय कार्यालयांमध्ये विशेष मतदार नोंदणी शिबिरे आयोजित करण्यात येणार आहेत. तसेच पुनरिक्षण कार्यक्रम कालावधीत आठवड्याच्या प्रत्येक बुधवारी जिल्ह्यामध्ये तहसिल व मंडळ स्तरावर मतदार नोंदणीसाठी विशेष शिबीरांचे आयोजन करण्यात येणार आहे.

 

मतदार यादीचा विशेष पुनरिक्षण कार्यक्रमानुसार दि. 27 ऑक्टोंबर रोजी प्रारुप मतदार यादी जिल्ह्यातील सर्व पदनिर्देशित ठिकाणी प्रसिध्द करण्यात आली आहे. त्यानंतर पुनरिक्षण कार्यक्रमाअंतर्गत    दि. 27 ऑक्टोबर ते 9 डिसेंबर 2023 या कालावधीत सर्व विधानसभा मतदार संघ व मतदान केंद्रस्तरीय अधिकारी यांचे स्तरावर दावे व हरकती स्विकारण्यात येणार आहेत. प्राप्त दावे व हरकती निकालात काढून दि. 5 जानेवारी 2024 रोजी अंतिम मतदार यादी प्रसिध्द करण्यात येणार आहे. प्रारूप यादीमध्ये आपले नाव आहे की नाही याची मतदारांनी खात्री करावी. तसेच दि. 1 जानेवारी 2024 रोजी ज्याचे वय 18 वर्ष पुर्ण होईल अशा नागरीकांनी दावे व हरकती स्विकारण्याच्या कालावधीत मतदार यादीमध्ये आपले नाव असल्याची खात्री करावी.

 

युवा मतदारांची नोंदणी वाढवण्यासाठी महाविद्यालयांमध्ये उत्कृष्ट मतदार-मित्र महाविद्यालय पुरस्काराचे आयोजन करण्यात आले आहे. 100 टक्के मतदार नोंदणी केलेल्या आणि मतदार जागृतीचे उपक्रम राबवणाऱ्या महाविद्यालयांना पुरस्कार दिले जाणार आहेत. नागरीकांना मतदार नोंदणीसंदर्भात येणाऱ्या अडचणींचे निराकरण करण्यासाठी जिल्हास्तरावर जिल्हा संपर्क केंद्र (Toll Free) क्रमांक 1950 कार्यान्वित करण्यात आला आहे. या कालावधीमध्ये नागरीकांनी ऑफलाईन पध्दतीने मतदार नोंदणी करण्यासाठी संबंधित तहसिल कार्यालय, मतदान केंद्र अधिकारी यांच्याशी संपर्क साधावा. तसेच ऑनलाईन पध्दतीने मतदार नोंदणी करण्यासाठी Voterportal.in व Voter helpline app चा वापर करुन मतदार नोंदणी, वगळणी व दुरूस्ती करण्याचे आवाहन जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी डॉ. किरण पाटील यांनी केले आहे.

00000

सरदार वल्लभभाई पटेल, इंदिरा गांधी यांना जिल्हाधिकारी कार्यालयात अभिवादन

 




सरदार वल्लभभाई पटेल, इंदिरा गांधी यांना जिल्हाधिकारी कार्यालयात अभिवादन

 

 

बुलढाणा दि. 31 (जिमाका):- सरदार वल्लभभाई पटेल यांची जयंती आणि इंदिरा गांधी यांच्या स्मृतीदिनानिमित्त आज दि. 31 ऑक्टोबर रोजी जिल्हाधिकारी कार्यालयात अभिवादन करण्यात आले. त्यानंतर उपस्थित अधिकारी, कर्मचारी यांना राष्ट्रीय एकात्मतेची शपथ देण्यात आली.

 

तहसिलदार माया माने यांनी सरदार वल्लभभाई पटेल जयंती आणि इंदिरा गांधी यांच्या स्मृती दिनानिमित्त त्यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. यावेळी जिल्हाधिकारी कार्यालयातील अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

00000

विविध योजनाचा लाभ देण्यासाठी मंडळ व तालुकास्तरावर शिबिरांचे आयोजन; नागरिकांनी शिबिराचा लाभ घ्यावा- जिल्हाधिकारी डॉ. किरण पाटील यांचे आवाहन

 

विविध योजनाचा लाभ देण्यासाठी मंडळ व तालुकास्तरावर शिबिरांचे आयोजन;

 नागरिकांनी शिबिराचा लाभ घ्यावा- जिल्हाधिकारी डॉ. किरण पाटील यांचे आवाहन

 

बुलढाणा दि. 31 (जिमाका):- शासनाव्दारे राबविण्यात येणाऱ्या विविध योजनाचा लाभ नागरिकांना मिळावा यासाठी जिल्हा प्रशासनाव्दारे मंडळ व तालुकास्तरावर शिबिरांचे आयोजन करण्यात येत आहे. तालुकास्तरावर तहसिल कार्यालय येथे तर ग्रामीण भागात प्रत्येक महसुल मंडळ मुख्यालयात प्रत्येक महिण्याच्या पहिल्या व तिसऱ्या बुधवारी शिबिराचे आयोजन करण्यात येत आहे. या शिबिराचा शहरी व ग्रामीण भागातील नागरिकांनी लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. किरण पाटील यांनी केले आहे.

 

शासनाच्या विविध विभागाव्दारे विविध योजनाचा लाभ शिबिराच्या माध्यमातून देण्यात येत आहे. यामध्ये अंत्योद्य शिधापत्रिका वितरण, सामाजिक अर्थसहाय योजना, प्रधानमंत्री घरकुल योजना, प्रधानमंत्री जनआरोग्य योजना, ई-श्रम जोडणी, आधार नोंदणी व दुरुस्ती, जातीचे प्रमाणपत्र व इतर प्रमाणपत्राचे वितरण शिबिरामध्ये करण्यात येत आहे. शिबिराचे यशस्वी आयोजन करण्यासाठी संबधित विभागाव्दारे जिल्हा व तालुकास्तरावर नोडल अधिकाऱ्यांची नेमणुक करण्यात आली आहे. तालुकास्तरावर संबधित सर्व विभागाशी समन्वय ठेवुन शिबिर यशस्वी करण्याची जबाबदारी तहसिलदार व उपविभागीय अधिकारी यांना देण्यात आली आहे. तरी संबधित विभागाने आपल्या अधिनस्त विविध योजनाचा लाभ पात्र व गरजवंताना  मिळवून द्या, असे निर्देश जिल्हाधिकारी डॉ. किरण पाटील यांनी संबधित विभागाना दिले आहे.

 

ऑक्टोबर महिण्यात 4 हजार 732 लाभार्थ्यांनी घेतला लाभ

जिल्हा प्रशासनाव्दारे ग्रामिण व तालुकास्तरावर शिबिरांचे आयोजन करण्यात येत आहे. ऑक्टोबर महिण्यात जिल्ह्यातील 13 तालुक्यात झालेल्या शिबिरामध्ये 4 हजार 732 लाभार्थ्यांना शासनाच्या विविध योजनाचा लाभ देण्यात आला. यामध्ये मतदार नोंदणी 406, जातीचे प्रमाणपत्र व दाखल 1651, रेशनकार्ड वितरण 511, संजय गांधी कार्ड वितरण 707, आधार कार्ड नोंदणी व दुरुस्ती 262, ई-श्रम कार्ड वितरण 51, प्रधानमंत्री घरकुल योजना 292 व प्रधानमंत्री जनआरोग्य योजनाचे 852 लाभार्थ्यांना योजनाचा लाभ देण्यात आला.   

प्रत्येक महिण्याच्या पहिल्या व तिसऱ्या बुधवारी ग्रामीण व तालुकास्तरावर घेण्यात येणाऱ्या शिबिरांचे नागरिकांनी लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. पाटील यांनी केले आहे.

00000

Monday 30 October 2023

जिल्हा परिषद सरळसेवा भरती प्रक्रिया; प्रवेशपत्र ऑनलाईन उपलब्ध

 

जिल्हा परिषद सरळसेवा भरती प्रक्रिया; प्रवेशपत्र ऑनलाईन उपलब्ध

 

बुलडाणा,(जिमाका) दि‍.30 :-ग्रामविकास व पंचायतराज विभागातंर्गत जिल्हा परिषदेतील सरळसेवा भरती प्रक्रियेव्दारे गट क संवर्गातील विविध पदासाठी अर्ज मागविण्यात आले होते. कनिष्ठ यांत्रिकी, यांत्रिकी, विस्तार अधिकारी (शिक्षण) व प्रयोगशाळा तंत्रज्ञ या संवार्गातील पदांची परिक्षा गुरुवार    दि. 2 नोव्हेंबर 2023 रोजी होणार असून प्रवेशपत्र ऑनलाईन उपलब्ध करुण देण्यात आले आहे. परिक्षेकरीता प्रवेशपत्र डाऊनलोड करण्यासाठी जिल्हा परिषद बुलडाणाच्या www.zpbuldhana.maharashtra.gov.in  या संकेतस्थळावर लिंक उपलब्ध करुन देण्यात आली आहे. पात्र उमेदवारांनी आपले प्रवेशपत्र डाऊनलोड करुन घ्यावे, असे आवाहन जिल्हा परिषदचे उप मुख्य कार्यकारी अधिकारी आशिष पवार यांनी केले आहे.

00000

Saturday 28 October 2023

येत्या निवडणुकीमध्ये मताधिकार बजावण्यासाठी नवमतदारांनी नाव नोंदणी करा-जिल्हाधिकाऱ्यांचे आवाहन प्रारुप मतदार यादी प्रकाशित करुन विशेष संक्षिप्त पुनरिक्षण कार्यक्रमाला प्रारंभ

 

 

येत्या निवडणुकीमध्ये मताधिकार बजावण्यासाठी नवमतदारांनी नाव नोंदणी करा-जिल्हाधिकाऱ्यांचे आवाहन

प्रारुप मतदार यादी प्रकाशित करुन विशेष संक्षिप्त पुनरिक्षण कार्यक्रमाला प्रारंभ

 

बुलडाणा दि. 28 (जिमाका) : लोकशाही सक्षमीकरणाची पहिली पायरी मतदार नोंदणी करून आपला मताधिकार बजावावा, असे आवाहन जिल्हा निवडणूक अधिकारी तथा जिल्हाधिकारी डॉ. किरण पाटील यांनी केले आहे.

 

निवडणूका पारदर्शक आणि न्याय वातारणात पार पाडण्यासाठी मतदार याद्यांचे अद्यावतीकरण, शुध्दीकरण अत्यंत महत्त्वपूर्ण असते. यासाठी भारत निवडणूक आयोगाकडून दरवर्षी विशेष संक्षिप्त पुनरिक्षण कार्यक्रम राबविल्या जातो. आज दि. 27 ऑक्टोबर 2023 रोजी जिल्ह्यातील सर्व विधानसभा मतदार संघामध्ये मतदार नोंदणी अधिकारी कार्यालयांमध्ये आणि सर्व मतदान केंद्रावर प्रारूप मतदार यादी प्रकाशित करून यंदाचा विशेष संक्षिप्त पुनरिक्षण कार्यक्रमाला सुरुवात करण्यात आली. हा कार्यक्रम दि. 27 ऑक्टोबर ते 9 डिसेंबर 2023 या कालावधीत राबविला जाणार आहे.

 

दि. 1 जानेवारी 2024 रोजी किंवा त्या आधी वयाची 18 वर्षे पूर्ण झालेले नागरिक यांना या कालावधीत आगाऊ मतदार नोंदणी करता येणार आहे. तसेच 2024 च्या एप्रिल, जुलै, ऑक्टोबर या महिन्यांच्या 1 तारखेला 18 वर्षे पूर्ण करणाऱ्या तरूण-तरूणींनाही या कालावधीत आगाऊ मतदार नोंदणी करता येईल, मात्र त्या अर्जावरील प्रक्रिया त्या-त्या तारखेला पूर्ण करण्यात येईल. सन 2024 मध्ये होणाऱ्या लोकसभा आणि विधानसभा निवडणुकांमध्ये मताधिकार बजावण्यासाठी ही महत्त्वाची संधी असल्याने पात्र नवमतदारांनी नाव नोंदणी करण्याचे आवाहन डॉ. पाटील यांनी केले.

           

प्रारूप यादीत आपल्या नावाबाबत खात्री करणे आवश्यक आहे. बरेचदा मतदानाच्या दिवशी आपले नाव मतदार यादीत नाही, अशी तक्रार अनेक मतदारांकडून केली जाते. यासाठी आपले नाव, पत्ता, लिंग, जन्मदिनांक, वय, ओळखपत्र क्रमांक, मतदारसंघ इत्यादी तपशील अचूक आहे का, याची खात्री करणे आवश्यक आहे. ज्या मतदारांना या तपशिलामध्ये दुरुस्त्या करायच्या असतील त्यांनी अर्ज क्र. 8 भरावा. विशेष पुनरिक्षण कार्यक्रमांतर्गत नवीन अर्हता दिनांकावर आगाऊ मतदार नोंदणी करता येते, त्याप्रमाणे एखाद्याच्या नावासंबधी हरकतही घेता येते. एखाद्या मतदारसंघातील मतदार यादीत दिलेल्या पत्यावर राहत नसेल, तर अशा नावाबाबत त्याच मतदारसंघातील अन्य मतदार आक्षेप घेऊ शकतात. त्यामध्ये जर तथ्य आढळून आले तर पडताळणी करून संबंधित मतदाराच्या नावाची वगळणी केली जाते. मतदार याद्यांचे अद्यावतीकरण होण्यासाठी अशा अपात्र मतदारांची वगळणीही महत्त्वाची असते.

 

            समाजातील काही वंचित घटकांतील नागरिकांची मतदार यादीत अल्प प्रमाणात नोंद असल्याने त्यांच्यासाठी विशेष शिबिरांचे आयोजन करण्यात आले आहे. दि. 18 व 19 नोव्हेंबर 2023 या कालावधीत महाविद्यालयीन विद्यार्थी, महिला व दिव्यांग व्यक्ती यांच्यासाठी विशेष शिबिरे राबवली जाणार आहेत. विद्यार्थ्यांच्या मतदार नोंदणीसाठी महाविद्यालयांमधील राष्ट्रीय सेवा योजना व निवडणूक साक्षरता मंडळ यांचे सहकार्य घेतले जाणार आहे. महिलांच्या मतदार नोंदणीसाठी महिला मेळावे, बचतगट, महिला व बाल विकास विभाग यांचे सहकार्य घेण्यात येणार आहे. तर दिव्यांगासाठी कार्य करणाऱ्या सामाजिक संस्थाच्या मदतीने दिव्यांग व्यक्तीची मतदार नोंदणी, त्यांची मतदार यादीतील नोंद चिन्हांकित करणे या गोष्टी केल्या जाणार आहेत. तृतीयपंथी व्यक्ती, शरीर व्यवसाय करणाऱ्या स्त्रिया, भटक्या-विमुक्त जमाती यांच्यासाठी दि. 2 व 3 डिसेंबर 2023 रोजी शिबिरे आयोजित केली जाणार आहेत. ही शिबिरे सामाजिक संस्थाच्या सहकार्याने समाजघटकांना सोयीच्या ठिकाणी आयोजित केली जाणार आहेत. या समाजघटकांकडे वास्तव्य आणि जन्मतारखेच्या कागदपत्रांची कमतरता लक्षात घेऊन निवडणूक आयोगाने त्यांना स्व-घोषणापत्राची सवलत दिलेली आहे, त्यामुळे हे समाजातील व्यक्ती आता कोणतीही कागदपत्रे नसली तर मतदार नोंदणी करू शकणार आहेत.

 

            शनिवार दि. 4 नोव्हेंबर 2023, रविवार दि. 5 नोव्हेंबर, सोमवार दि. 25 नोव्हेंबर आणि रविवार दि. 26 नोव्हेंबर, 2023 ह्या चार दिवशी जिल्ह्यातील सर्व मतदान केंद्रांवर, शाळा, महाविद्यालयाचे ठिकाणी, शासकीय,  निमशासकीय कार्यालयांमध्ये विशेष मतदार नोंदणी शिबिरे आयोजित करण्यात येणार आहेत. तसेच पुनरिक्षण कार्यक्रम कालावधीत आठवड्याच्या प्रत्येक बुधवारी जिल्ह्यामध्ये तहसिल व मंडळ स्तरावर मतदार नोंदणीसाठी विशेष शिबीरांचे आयोजन करण्यात आलेली आहेत. तसेच मतदार नोंदणीबाबतची प्रक्रीया नागरीकांसाठी सोईची व्हावी यासाठी सदरच्या पुनरिक्षण कार्यक्रमाची माहिती देणारे व नोंदणीबाबतच्या टप्प्यांची माहिती देणार फलक जिल्हा कार्यालयाकडून सर्व शासकीय कार्यालयांमध्ये लावण्यात आलेले आहेत. त्यावर माहितीसाठी जिल्ह्यातील मतदार नोंदणी करणा-या सर्व संगणक चालकांचे मोबाईल क्रमांक सुध्दा नमुद करण्यात आलेले आहेत. नोंदणी संदर्भात नागरीकांना काही अडचणी असल्यास त्यावर संपर्क साधून मतदार नोंदणीसंदर्भातील  माहिती घेणे सोपे होईल.

 

            नागरीकांना मतदार नोंदणीसंदर्भात येणाऱ्या अडचणींचे निराकरण करण्यासाठी जिल्हास्तरावर जिल्हा संपर्क केंद्र Toll Free क्रमांक 1950 कार्यान्वित करण्यात आलेला आहे. कालावधीमध्ये नागरीकांनी ऑफलाईन पध्दतीने मतदार नोंदणी करण्यासाठी संबंधित तहसिल कार्यालय, बीएलओ यांचेसोबत संपर्क साधावा. तसेच ऑनलाईन पध्दतीने मतदार नोंदणी करण्यासाठी Voterportal.in Voter helpline app चा वापर करून मतदार नोंदणी, वगळणी, दुरूस्ती करण्याचे आवाहन जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी डॉ. पाटील यांनी केले आहे.

 

            या पार्शभूमीवर प्रारुप मतदार यादीमध्ये आपले नाव समाविष्ट आहे किंवा नाही याची मतदारांनी खात्री करुन घ्यावी. प्रारुप मतदार यादीमध्ये ज्या मतदारांची नावे आढळून आलेली नाही तसेच दिनांक  1 जानेवारी 2024 रोजी ज्याचे वय 18 वर्ष पुर्ण होईल अशा नागरीकांनी दावे व हरकती स्विकारण्याच्या कालावधीत मतदार यादीमध्ये आपले नाव असल्याची खात्री करणे, नाव समाविष्ठ करणे, दुरुस्ती करणे (अस्पष्ट / चुकीचा फोटो, वय, पत्ता, नाव व इतर तपशिल) ई. प्रकारची कामे होणार असल्यामुळे जिल्ह्यातील सर्व नागरीकांनी याबाबतचा लाभ घेण्याचे आवाहन जिल्हाधिकारी तथा जिल्हा  निवडणूक अधिकारी डॉ.किरण पाटील यांनी केले आहे.

 

1 ते 7 नोव्हेंबर कालावधीत विशेष ग्रामसभा

 

            ग्राम विकास व पंचायतराज विभागाच्या सहकार्याने 1 ते 7 नोव्हेंबर या कालावधीत राज्यभर विशेष ग्रामसभेचे आयोजन केले जाणार आहे. या काळात राज्यभरातील ग्रामसभामध्ये मतदार यादीचे वाचन केले जाईल. त्यांतर्गत नव्याने नाव नोंदणीस पात्र नागरिक, लग्न होऊन गावात आलेल्या स्त्रिया, गावात कायमस्वरूपी नव्याने स्तव्यास आलेले नागरिक यांची नाव नोंदणी केली जाईल, तसेच दुबार नावे, मृत व्यक्ती, गावातून कायमस्वरूपी स्थलांतरित झालेल्या व्यक्ती, लग्न होऊन अन्य गावात गेलेल्या स्त्रिया यांच्या नावांची मतदार यादीतून वगळणी केली जाईल.

 

            दि. 5 जानेवारी 2023 च्या अंतिम मतदार यादीमध्ये एकूण मतदारसंख्या 20 लक्ष 31 हजार 7 इतकी होती. ही मतदारसंख्या एकूण लोकसंख्येच्या तुलनेत 69.15 टक्के इतकी होती. त्यानंतर झालेल्या निरंतर अद्ययावतीकरण प्रक्रियेत मतदार नोंदणी, नाव वगळणी या बाबी सुरूच होत्या. आता 27 ऑक्टोबर रोजी प्रकाशित झालेल्या प्रारूप मतदार यादीतील एकूण मतदारसंख्या 20 लक्ष 31 हजार 283 आहे. आणि ही संख्या एकूण अंदाजित लोकसंख्येच्या तुलनेत 67.32 इतकी आहे. तसेच 2023 च्या अंतिम मतदार यादीमध्ये पुरुष मतदारसंख्या 10 लक्ष 67 हजार 862 इतकी होती. तर 27 ऑक्टोबर रोजी प्रकाशित झालेल्या प्रारूप मतदार यादीतील पुरुष मतदारसंख्या 10 लक्ष 67 हजार 843 एवढी आहे. तर स्त्री मतदारांची जानेवारी 2023 मधील मतदार यादीत 9 लक्ष 63 हजार 122 इतकी, तर ऑक्टोबर 2023 मधील संख्या 9 लक्ष 63 हजार 412 एवढी आहे. जानेवारी 2023  मधील यादीमध्ये एक हजार पुरुषांच्या मागे 902 स्त्रिया होत्या, तर 27 ऑक्टोबरच्या यादीत एक हजार पुरुषांच्या मागे 902 स्त्रिया आहेत. तृतीयपंथी समुदायाची जानेवारी 2023 मधील संख्या 23 होती, तर ऑक्टोबर 2023 मध्ये 28 इतकी आहे.

 

            बुलढाणा जिल्हयाच्या (जनगनणा 2011) लोकसंख्येत 18-19 वयोगटाची टक्केवारी 4.02% (1 लक्ष 4 हजार 014) इतकी आहे, पण ऑक्टोंबरच्या मतदार यादीत या वयोगटाची टक्केवारी फक्त 1.10% (22 हजार 344) एवढ़ी आहे. तर 20-29  या वयोगटाची लोकसंख्येतील टक्केवारी 18.15% (4 लक्ष 69 हजार 312) इतकी आहे, पण ऑक्टोंबरच्या मतदार यादीत या वयोगटाची टक्केवारी फक्त 20.09% (4 लक्ष 08 हजार 211) एवढी आहे. भारत हा तरुणांचा देश आहे असं आपण एकीकड़े म्हणतो, पण मतदार यादीतली त्यांची आकडेवारी निराशाजनक आहे. त्यामुळे युवा मतदारांची नोंदणी वाढवण्यासाठी महाविद्यालयांमध्ये विशेष शिबिरांचे आयोजन करण्यात येणार आहे. तसेच उत्कृष्ट मतदार-मित्र महाविद्यालय पूरस्काराचे आयोजनही करण्यात आले आहे. 100 टक्के मतदार नोंदणी केलेल्या आणि मतदार जागृतीचे उपक्रम राबवणा-या महाविद्यालयांना हे पुरस्कार दिले जाणार आहेत.

00000

महर्षी वाल्मिकी यांची जयंतीनिमित्त जिल्हाधिकारी कार्यालयात अभिवादन

 

महर्षी वाल्मिकी यांची जयंतीनिमित्त जिल्हाधिकारी कार्यालयात अभिवादन

 

       बुलडाणा दि. 28 (जिमाका) : महर्षि वाल्मिकी  यांची  जयंती  जिल्हाधिकारी कार्यालयात आज साजरी  करण्यात आली. नायब तहसीलदार संजय बंगाळे, शैलेश गिरी, रामेश्वर शिंदे, नाझर गजानन मोतेकर, दिनकर राठोड इतर अधिकारी  कर्मचारी यांनी महर्षि वाल्मिकी यांच्या प्रतिमेस पुष्पहार व पुष्प अर्पण करून अभिवादन केले.

0000

Friday 27 October 2023

रब्बी हंगामात 3 लक्ष 36 हजार हेक्टर लागवडीचे नियोजन

 

रब्बी हंगामात 3 लक्ष 36 हजार हेक्टर लागवडीचे नियोजन

 

बुलडाणा, (जिमाका)दि‍.27 :- जिल्ह्यामध्ये यावर्षी सरासरी 682.70 मि.मी. पर्जन्यमान झालेले आहे. खरीप हंगामामध्ये प्रत्यक्ष पेरणी 7 लक्ष 35 हजार 831 हेक्टरवर झालेली आहे. तर रब्बी हंगामात पेरणी क्षेत्र 3 लक्ष 36 हजार 453 हेक्टरचे नियोजन आहे, अशी माहिती जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी यांनी दिली.  

 

रब्बी हंगामातील नियोजन याप्रमाणे : गहू 60 हजार 117 हे., हरभरा 2 लक्ष 25 हजार हे., ज्वारी 20 हजार हे., करडई 1 हजार हे., सुर्यफुल 106 हे., मका 30 हजार हे., तीळ 10, जवस 20 हे., इत्तर 200 हेक्टर असे एकूण 3 लक्ष 36 हजार 453 हेक्टर क्षेत्र लागवडीचे नियोजन आहे.

 

जिल्ह्यात जलसंपदा विभागाच्या अहवालानुसार एकुण लघु प्रकल्प 41 असून संकल्पित साठा  467.99 (द.ल.घ.मी) एवढे आहे. आज रोजी 227.567 (द.ल.घ.मी) एवढा पाणी साठा उपलब्ध आहे. या वर्षी अत्यंत कमी पाऊस असल्यामुळे कमीत कमी पाण्यावर येणारे रब्बी पिकांचे नियोजन करण्यात यावे. जसे की, रब्बी ज्वारी, करडई, सुर्यफुल, मका, तीळ, जवस इत्यादी पिकांचे पेरणी नियोजन करण्यात यावे, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ.किरण पाटील यांनी केले आहे.

0000

सिकलसेल रुग्णांनी मोफत तपासणी व औषधोपचाराचा लाभ घ्यावा जिल्हाकाऱ्यांचे आवाहन


 

सिकलसेल रुग्णांनी मोफत तपासणी व औषधोपचाराचा लाभ घ्यावा जिल्हाकाऱ्यांचे आवाहन

 

बुलडाणा, दि‍.27 :- सिकलसेल हा आनुवंशीक आजार असून या आजाराच्या नियंत्रणासाठी प्रत्येक व्यक्तीने लग्नापूर्वी तसेच गर्भवती महिलांनी सिकलसेल तपासणी करणे आवश्यक आहे. जिल्ह्यातील सर्व शासकीय आरोग्य रुग्णालयात मोफत सिकलसेल तपासणी करण्यात येत असून शासनामार्फत विविध लाभ सिकलसेल रुग्णांना दिला जातो. या सुविधाचा सिकलसेल रुग्णांनी लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. किरण पाटील यांनी केले आहे.

 

सिकलसेल आजार हा आनुवंशीक असल्यामुळे या आजारातुन कोणत्याही सिकलसेल ग्रस्त रुग्ण व वाहक रुग्ण मुक्त होवू शकत नाही. वाहक व्यक्ती तसेच वाहकग्रस्त व्यक्तीमध्ये विवाह करु नये, असे विवाह झाल्यास येणारे मूल हे सिकलसेल ग्रस्त असू शकते. अशावेळेस गर्भवती मातांनी 3 महिण्याच्या आत गर्भजल परिक्षण करुन प्रसुतीबाबत डॉक्टरांच्या सल्लाने निर्णय घ्यावा. तसेच प्रत्येक मुलामुलींनी सिकलसेल तपासणी नंतरच विवाह केल्यास या आजारावर नियंत्रण शकतो.  यामुळे पुढील पिढीत हा आजार टाळता येतो.

 

सिकलसेलचे लक्षणे : रुग्णांमध्ये वेळोवेळी हातपाय दुखणे, चक्कर येणे, नेहमी आजारी पडणे, जंतुसंसर्ग होणे अशी लक्षणे दिसून येतात. त्यामुळे या आजाराच्या रुग्णाने भरपूर पाणी पिणे, आहार घेणे व नियमित फॉलिक ॲसिड गोळ्यांचे सेवण करणे गरजेचे आहे. या आजाराच्या रुग्णांनी काळजी न घेतल्यास आजारी पडून मृत्यू होण्याची शक्यता असते. त्यामुळे अशा रुग्णांनी वेळोवेळी डॉक्टरांच्या सल्लाने नियमित औषधोपचार, आरोग्य तपासणी व काळजी घेणे गरजेचे असते.

 

सिकलसेल ग्रस्त रुग्णांना सर्व शासकीय जिल्हा रुग्णालय, जिल्हा स्त्री रुग्णालयात मोफत आरोग्य तपासणी व औषधोपचार दिले जातात. तसेच मोफत दिव्यांग प्रामणपत्र, मोफत रक्तपुरवठा, गर्भजल परिक्षण बाबत माहिती, संजय गांधी निराधार योजनेतंर्गत 1 हजार 500 रुपयांची मदत, महात्मा फुले जीवनदायी आरोग्य योजनेत मोफत उपचार, सिकलसेल ग्रस्त विद्यार्थ्यांना परिक्षेच्या वेळी एका तासाला 20 मिनिटे जास्त वेळेची सवलत, मोफत एसटी प्रवास सुविधा अशा सुविधा शासनामार्फत उपलब्ध देण्यात येते, अशी माहिती जिल्हा आरोग्य अधिकारी यांनी दिली.

00000

लंपी चर्मरोग; प्राण्यांची वाहतुक व बाजार भरविण्यास सशर्त परवानगी - जिल्हाधिकारी डॉ. किरण पाटील यांचे आदेश

 

लंपी चर्मरोग; प्राण्यांची वाहतुक व बाजार भरविण्यास सशर्त परवानगी

जिल्हाधिकारी डॉ. किरण पाटील यांचे आदेश

 

बुलडाणा, दि‍.27 :- जनावरांमधील  लंपी चर्मरोग प्रादुर्भावाच्या अनुषंगाने दि. 28 ऑगस्ट 2023 च्या आदेशान्वये प्राण्यांची वाहतुक व बाजार भरविण्यास प्रतिबंध करण्यात आले होते. तथापि साथ रोग आटोक्यात आली असल्याने लागू असलेले निर्बंध शिथिल करुन प्राण्यांचे वाहतुक व बाजार भरविण्यास सशर्त परवानगीचे आदेश जिल्हाधिकारी डॉ. किरण पाटील यांनी निर्गर्मित केले आहे.

 

  आदेशानुसार ‍जिल्ह्यातील कोणताही प्राण्यांचे बाजार, वाहतुक, जत्रा व प्रदर्शन, प्राण्यांच्या शर्यती आयोजित करण्यास पुढील अर्टीच्या अधिन राहुन परवानगी देण्यात येत आहे.

1.      केंद्र शासनाच्या मार्गदर्शक सुचनानुसार जिल्ह्याअंतर्गत वाहतुक व ने-आण करावयाच्या गोवंश वर्गीय सर्व गुरांचे किमान 28 दिवसापुर्वी लंपी चर्मरोगाचे प्रतिबंधात्मक लसीकरण केले असल्याबाबत पशुवैद्यकीय दवाखान्याचे विहीत नमुन्यातील लसीकरण प्रमाणपत्र तसेच लंपी चर्मरोगाची लक्षणे दिसुन आली नसल्याबाबत पशुधन विकास अधिकारी गट अ यापेक्षा कमी दर्जा नसलेले अधिकारी यांचे आरोग्य प्रमाणपत्र सोबत ठेवणे बंधनकारक राहिल.

2.      प्राण्यांची वाहतुक अधिनियम 2001 मधील वाहतुक नियमांचे पालन करणे बंधनकारक राहील. वाहतुक करणाऱ्या प्राण्यांचे स्वास्थ प्रमाणपत्र व वाहतुक प्रमाणपत्र सोबत असणे आवश्यक राहिल.

3.      वाहतुक करावयाच्या गुरांची ओळख पटविण्यासाठी कानात 12 अंकी टँग व त्यांची इनाफ पोर्टलवर नोंद बंधनकारक राहील.

4.    जिल्ह्यातील पशुंच्या बाजारामध्ये खरेदी व विक्री करतेवेळी कानात टँग व स्वास्थ प्रमाणपत्र सोबत असणे बंधनकारक राहील. तसेच बाजारामध्ये गोचीड व गोमाशा निर्मुलन फवारणी करणे बाजार समितीस तथा तत्सम आयोजकास बंधनकारक राहील.

आदेशाचे अंमलबजावणी संबधित प्रशासकीय विभागाने काटेकोरपणे करावी, असे निर्देश जिल्हाधिकारी डॉ. पाटील यांनी दिले.

00000

Thursday 26 October 2023

मुलींचा जन्मदर वाढविण्यासाठी पीसीपीएनडीटी व एमटीपी कायद्याची कडक अंमलबजावणी करा-जिल्हाधिकारी डॉ. किरण पाटील


 

मुलींचा जन्मदर वाढविण्यासाठी पीसीपीएनडीटी व एमटीपी कायद्याची

कडक अंमलबजावणी करा-जिल्हाधिकारी डॉ. किरण पाटील 


बुलडाणा, दि‍.26 :- जिल्ह्यातील मुलींचा जन्मदर वाढविण्यासाठी पीसीपीएनडीटी व एमटीपी कायद्याची कडक अंमलबजावणी होणे आवश्यक आहे. यासाठी सर्व विभागाच्या सहकार्याने विविध उपक्रमाच्या माध्यमातून समाजामध्ये जनजागृती करावी, असे निर्देश जिल्हाधिकारी डॉ. किरण पाटील यांनी दिले.

 

जिल्हाधिकारी कार्यालयात पीसीपीएनडीटी कार्यक्रमांतर्गत जिल्हा दक्षता समिती सभा जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. यावेळी डॉ. पाटील यांनी निर्देश दिले की, जिल्ह्यामध्ये पीसीपीएनडीटी व एमटीपी कायद्याची कडक अंमलबजावणी करावी. कायद्याचे उल्लंघन करणाऱ्याची माहिती देणाऱ्या खबऱ्यांना खबऱ्या योजनेंतर्गत शासनाकडुन एक लाख रुपये बक्षिस दिले जातात. या योजनेची सर्वसामान्यपर्यंत जनजागृती करावी. तसेच स्वयंसेवी संस्था, महिला बचत गट, नेहरु युवा केंद्र, एनएसएस, महिला बाल विकास कार्यालय, व्यसनमुक्ती केंद्र या सर्व यंत्रणानी एकत्रितपणे कार्यक्रमांचे आयोजन करावे.

जिल्ह्यातील समुचित प्राधिकारी यांनी आपआपल्या कार्यक्षेत्रातील सोनोग्राफी केंद्रांची तपासणी करताना केंद्रामध्ये पीसीपीएनडीटी कायद्यानुसार बोर्ड, कायदा पुस्तिका, केंद्र नोंदणी प्रमाणपत्र, एफ-फॉर्म रजिस्टर, ऑनलाईन एफ-फॉर्म, कलम 9 नुसार गर्भवती महिला नोंदणी रजिस्टर, संमतीपत्र इत्यादी गोष्टींची सोनोग्राफी केंद्रधारक पुर्तता करतात किंवा नाही यांची काटेकोरपणे तपासणी करावी. कायद्याचे उल्लंघन करणाऱ्या केंद्रावर कायदेशिर कारवाई करावी, असे निर्देश डॉ. पाटील यांनी दिले.

 

पीसीपीएनडीटी व एमटीपी संबधी तक्रारी नोंद्रविण्यासाठी शासनाच्या टोल फ्री क्रमांक 18002334475 तसेच चाईल्ड हेल्पलाईन क्रमांक 1098 व पोलीस मदत क्रमांक 100, 112 या क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. पाटील यांनी केले.

000000000

निवृत्ती वेतन धारकांनी हयात प्रमाणपत्रावर 30 नोव्हेबरपर्यंत स्वाक्षरी करावी जिल्हा कोषागार अधिकारी यांचे आवाहन

 

निवृत्ती वेतन धारकांनी हयात प्रमाणपत्रावर 30 नोव्हेबरपर्यंत स्वाक्षरी करावी

जिल्हा कोषागार अधिकारी यांचे आवाहन

 

बुलडाणा,(जिमाका) दि.26: राज्य शासनाकडून जिल्ह्यातील सर्व निवृत्ती वेतन धारक, कुटूंब निवृत्ती धारक, माजी आमदार, इतर राज्य निवृत्ती वेतन धारकांनी 30 नोव्हेंबरपर्यंत बँकेमध्ये जावून विहीत नमुन्यातील हयात प्रमाण पत्रावर स्वाक्षरी करावी. तसेच स्वाक्षरीसोबत पॅन क्रमांक नमुद करावा. संबधीत बँकेत विहीत नमुन्यातील हयात प्रमाणपत्र उपलब्ध करून देण्यात आले आहे.  याबाबत निवृत्ती वेतन धारकांनी नोंद घ्यावी, असे आवाहन जिल्हा कोषागार अधिकारी ऋषिकेश वाघमारे यांनी केले आहे.

*****