मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसाठी आधार प्रमाणीकरण

 


बुलडाणा, (जिमाका) दि. 20 :  राज्यातील महिलांचे आर्थिक स्वातंत्र्य वाढवणे तसेच त्यांच्या आरोग्य व पोषणामध्ये सुधारणा करून कुटुंबातील निर्णायक भूमिका अधिक सक्षम करण्याच्या उद्देशाने राज्य शासनाने मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना सुरू केली आहे.

या योजनेंतर्गत पात्र लाभार्थी महिलांची पडताळणी व प्रमाणीकरणासाठी ई-केवायसी (e-KYC) माध्यमातून आधार प्रमाणीकरणास मान्यता देण्यात आली आहे. योजनेतील लाभार्थ्यांनी 18 नोव्हेंबर 2025 पर्यंत ई-केवायसी करणे आवश्यक होते. ऑनलाईन ई-केवायसी करताना पतीचे किंवा वडिलांचे आधार क्रमांक नोंदवून ओटीपीद्वारे प्रक्रिया पूर्ण करण्यात येत होती. मात्र विधवा, परित्यक्ता, कौटुंबिक हिंसाचारग्रस्त, घटस्फोटीत, एकल महिला तसेच ज्यांचे वडील मृत्यूपावले आहेत, अशा महिलांना ई-केवायसी करताना अडचणी येत होत्या. या पार्श्वभूमीवर ई-केवायसी करण्याची मुदत 31 डिसेंबर 2025 पर्यंत वाढविण्यात आली होती. तसेच पर्याय निवडीत झालेल्या चुका दुरुस्त करण्यासाठी एडिट ऑप्शन देण्यात आला होता.

18 नोव्हेंबर 2025 पर्यंत ऑनलाईन ई-केवायसी करताना पर्याय देण्यात आले होते. यात माझ्या कुटुंबातील सदस्य नियमित कायम कर्मचारी म्हणून सरकारी विभाग, उपक्रम, मंडळ, भारत सरकार किंवा राज्य सरकारच्या स्थानिक संस्थेमध्ये कार्यरत नाही किंवा सेवानंतर निवृत्तीवेतन येत नाहीत. पर्याय: होय/नाही, माझ्या कुटुंबातील केवळ एक विवाहीत व एक अविवाहीत महिला योजनेचा लाभ घेत आहे. पर्याय होय/नाही, या पर्यायापैकी लाभार्थ्यांनी नाही हा पर्याय निवडल्यामुळे लाभाथ्यांचे अर्जामध्ये रिमार्क EKYCGovtEmp1आणि स्टेटस रिजेक्ट दाखवत आहे. त्यामुळे अर्जदाराचे लाभ बंद झाले आहेत.

लाभार्थ्यांनी ऑनलाईन स्टेटस तपासणी करावयाची असल्यास सेतू केंद्र, सायबर कॅफे, बाल विकास प्रकल्प अधिकारी कार्यालय, पंचायत समिती, संबंधीत तालुका, बाल विकास प्रकल्प अधिकारी, नागरी प्रकल्प किंवा जिल्हा महिला व बाल अधिकारी, बुलढाणा येथे तपासणी करु शकतील. त्यासाठी केवळ जिल्हास्तरावरील कार्यालयात येण्याची आवश्यकता नाही. ई-केवायसी प्रक्रीया पुन्हा करण्यासाठी एडीट ऑप्शन पुन्हा उपलब्ध करून देण्यासाठी पाठपुरावा  सुरु असल्याची माहिती जिल्हा महिला व बाल अधिकारी अमोल डिघुळे यांनी दिली आहे.

000000

Comments

Popular posts from this blog

लोकशाहीर अण्णाभाऊ साठे महामंडळाची थेट कर्ज योजना

बुलढाणा जिल्ह्याची महान हो कीर्ती

स्वयं अर्थसहाय्यिता नवीन शाळांना मान्यता व दर्जावाढीची शिफारस; हरकती मागविल्या