Thursday 30 November 2017

news 30.11.2017 dio buldana


ग्रंथालय चळवळ टिकल्याशिवाय नवी पिढी घडणार नाही
                                                    -  पालकमंत्री पांडुरंग फुंडकर
  * जिल्हा ग्रंथोत्सवाचे थाटात उद्घाटन
  •  शतायुशी ग्रंथालयांचा सन्मान
  • दोन दिवसीय ग्रंथोत्सव
       बुलडाणा, दि. 30 :   देशात आणि राज्यात ग्रंथालय चळवळ अतिशय जुनी आहे. हजारो वर्षांपूर्वीचे ग्रंथ आजही कायम आहेत. या ग्रंथांचे संवर्धन करणे काळाची गरज आहे. ग्रंथ पिढी घडविण्याचे, सुसंस्कृत करण्याचे काम करतात. ग्रंथालय चळवळ टिकली नाही तर नव्या पिढील देशाचा इतिहास आणि संस्कृती कळणार नाही.  त्यामुळे ग्रंथालय चळवळ टिकली पाहिजे, अशी अपेक्षा राज्याचे कृषी तथा जिल्ह्याचे पालकमंत्री  पांडुरंग फुंडकर यांनी आज व्यक्त केली. 
    स्थानिक गर्दे वाचनालयाच्या सभागृहात आज दोन दिवसीय जिल्हा ग्रंथोत्सव 2017 चे उद्घाटन कार्यक्रम आयोजित करण्यात आला.  कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जिल्हाधिकारी डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार होत, तर खासदार प्रतापराव जाधव, जि. प. अध्यक्षा श्रीमती उमाताई तायडे, आमदार डॉ. शशिकांत खेडेकर, जि. प. सदस्या श्रीमती ज्योती खेडेकर, माध्यमिक शिक्षणाधिकारी श्रीराम पानझाडे, सहायक ग्रंथालय संचालक ज. सु. पाटील, जिल्हा माहिती सहायक निलेश तायडे, जिल्हा ग्रंथालय संघाचे अध्यक्ष कि.वा. वाघ, जिल्हा ग्रंथालय अधिकारी सतीश जाधव यांची प्रमुख उपस्थिती होती.
     ग्रामीण भागात ज्ञानेश्वरी, संत तुकाराम महाराजांची गाथा, ग्रामगीतेचे सामूहिक वाचन केले जात असल्याचे सांगत पालकमंत्री म्हणाले,  अशा विविध धार्मिक तसेच वैचारीक सामाजिक ग्रंथांचे जतन ग्रंथालय चळवळीने केले आहे. त्यामुळे ग्रामीण भागातील वाचन चळवळ अधिक बळकट होणे गरजेचे आहे. ग्रंथोत्सवाच्या माध्यमातून अशासन स्तरावर ग्रंथालय चळवळ संवर्धनाचे काम केले जात आहे.
   यावेळी खा. प्रतापराव जाधव म्हणाले,  आयुष्यात पुस्तकांचे महत्व मोठे असून ग्रंथ हे गुरु समान आहेत. ग्रंथ जिवनाला दिशा देण्याचे काम करतात. त्यामुळे ग्रंथालय व वाचन संस्कृती टिकणे महत्वाचे असून त्यासाठी ग्रंथोत्सव अत्यंत महत्वपूर्ण असल्याचेही त्यांनी सांगितले.  जि. प. अध्यक्षा श्रीमती उमाताई तायडे यावेळी म्हणाल्या,  प्रत्येक गावात ग्रंथालयाची गरज आहे. त्यामुळे गावागावात ग्रंथालय उभारली पाहिजेत.
    जिल्हाधिकारी डॉ. पुलकुंडवार म्हणाले, ज्या देशात मोठ - मोठी ग्रंथालये आहे. तो देश समृद्ध समजल्या जातो. सध्या मोबाईल युग आहे. सर्वच बाबी मोबाईलवर पाहिल्या जातात, अगदी पुस्तकही मोबाईलवर वाचली जातात.  परंतु प्रत्यक्ष हातात घेऊन पुस्तक वाचनाचा फायदा अधिक होतो. नवीन पिढी पुस्तकांना विसरली तर भविष्यकाळ कठीण राहिल. त्यामुळे वाचन चळवळ वाढविण्यासाठी सर्वांनी पुढाकार घ्यावा, असे आवाहन त्यांनी केले.
   सुरुवातीला जिल्हा ग्रंथपाल सतीश जाधव यांनी प्रास्ताविकातून जिल्हा ग्रंथोत्सवाची माहिती व पार्श्वभूमी विषद केली. वाचन संस्कृती व ग्रंथालय चळवळीचे जतन आणि संवर्धन करण्यासाठी ग्रंथोत्सव आवश्यक असल्याचे त्यांनी सांगितले. यावेळी शंभर वर्षे पूर्ण झालेल्या वाचनालयांना शतायु ग्रंथालय पुरस्काराने सन्मानीत करण्यात आले. या कार्यक्रमाचे संचालन प्रा. निशिकांत ढवळे यांनी, तर आभार कि.वा. वाघ यांनी मानले. कार्यक्रमाला जिल्हाभरातील वाचनालयांचे प्रतिनिधी, वाचकप्रेमी, साहित्य व कलाप्रेमींची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.  विविध पुस्तक प्रदर्शनी विक्रीच्या स्टॉलचेही मान्यवरांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले. 
******* 





                                                            ग्रंथदिंडीत  थिरकली पावले…
  • ग्रंथदिंडीने ग्रंथोत्सवाचा शुभारंभ
बुलडाणा, दि.30 : उच्च  व तंत्र शिक्षण विभाग, ग्रंथालय संचालनालय मुंबई व जिल्हा ग्रंथालय अधिकारी कार्यालयाच्या वतीने आयोजित जिल्हा ग्रंथोत्सव 2017 ला आज 30 नोव्हेंबर रोजी ग्रंथदिंडीने प्रारंभ झाला. ग्रंथदिंडीत साहित्यप्रेमी जनतेची पाऊले थिरकली.
    नगराध्यक्षा नजमुन्नीसा बेगम मो. सज्जाद यांच्या हस्ते ग्रंथपूजन करुन ताराबाई शिंदे यांच्या वाड्यापासून ग्रंथदिंडीला सुरुवात करण्यात आली. जिल्हा कोषागार अधिकारी दिनकर बावस्कर यांच्याहस्ते पालखीचे पूजन झाल्यानंतर ही ग्रंथदिंडी मार्गस्थ झाली. यावेळी जिल्हा ग्रंथालय अधिकारी सतीश जाधव, जिल्हा माहिती सहायक निलेश तायडे, जिल्हा ग्रंथालय संघाचे अध्यक्ष कि.वा. वाघ, नेमीनाथ सातपुते, प्राचार्य डॉ. गोविंद गायकी, हरिभाऊ पल्हाडे यांच्यासह शासनमान्य ग्रंथालयांचे प्रतिनिधी, वाचकप्रेमी नागरिक, पुरुष व महिला भजनी मंडळ, शाहिर हरिदास खांडेभराड यांचा संच तसेच एडेड् महाविद्यालय व राजीव गांधी मिलिटरी स्कूलचे विद्यार्थी या ग्रंथदिंडीत सहभागी झाले होते.
  ग्रंथदिंडी मुख्य बाजार लाईन, जिल्हाधिकारी कार्यालय, स्टेट बॅंक चौक या मार्गे  गर्दे सभागृहात पोहचली. दरम्यान भजनी मंडळांनी विविध भजने, भारुडे सादर केली. पारंपारिक पाऊली आणि फुगडी  कलेचे देखील सादरीकरण करुन नागरिकांचे लक्ष वेधले. फुलांनी सजविलेली पालखी त्यामध्ये भारताचे संविधान, ज्ञानेश्वरी, तुकारामाची गाथा, ग्रामगीता यासह विविध ग्रंथ ठेऊन ही पालखी खांद्यावर घेत दिंडीत फिरविण्यात आली.  साहित्यप्रेमी, कलावंत, महाविद्यालयीन विद्यार्थी, ग्रंथालय चळवळीतील कार्यकर्ते तसेच चोखंदळ वाचकांसाठी ग्रंथोत्सव म्हणजे एक आनंद मेळावाच असतो. स्थानिक गर्दे वाचनालयाच्या सभागृहात 30 नाव्हेंबर व 1 डिसेंबर असे दोन दिवस या ग्रंथोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. या ग्रंथोत्सवाची सुरुवात 9 वाजता ग्रंथदिंडीने करण्यात आली. या निमित्ताने पुस्तक प्रदर्शन व विक्रीसाठी विविध स्टॉल देखील लावण्यात आले असून वाचकांची या स्टॉलवर दिवसभर गर्दी पहावयास मिळाली. जिल्हा माहिती कार्यालयाच्यावतीने लोकराज्य मासिकाचा स्टॉलही उभारण्यात आला आहे. या स्टॉलला नागरिकांनी मोठा प्रतिसाद दिला.
                                                                        ******
शेतीसाठी पाणी देण्याविषयी नियोजन करावे
-       पालकमंत्री
  • पाणी आरक्षण समितीची बैठक
  • खडकपूर्णा प्रकल्पाच्या मृत साठ्यातील पाणी देण्यासाठी कार्यवाही करावी

     बुलडाणा, दि. 30 : यंदाच्या पावसाळ्यात पाऊस समाधानकारक जरी पडला असेल, तरी  जलसाठे ओसंडून वाहतील, असा झालेला नाही. त्यामुळे भविष्यात पाणी टंचाईचे सावट जिल्ह्यात येणार आहे. या संकटाचा सामना करण्यासठी आतापासून पर्यायी व्यवस्था करणे आवश्यक आहे. खडकपूर्णा प्रकल्पाचा मृतसाठा  मोठा असून त्यामधून या प्रकल्पाच्या लाभक्षेत्रातील शेतकऱ्यांची पिके पाण्याअभावी सुकणार नाही. याबाबत काळजी घेवून त्यापद्धतीने पाणी देण्यासाठी नियोजन करावे, अशा सूचना  पालकमंत्री पांडुरंग फुंडकर यांनी आज दिल्या.
  पाणी आरक्षण समितीच्या बैठकीचे जिल्हाधिकारी कार्यालयाच्या नियोजन समिती सभागृहात आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी पालकमंत्री बोलत होते. याप्रसंगी खासदार प्रतापराव जाधव, आमदार सर्वश्री डॉ. शशिकांत खेडेकर, राहूल बोंद्रे,  जिल्हाधिकारी डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार, जि.प मुख्य कार्यकारी अधिकारी एस षण्मुखराज, अप्पर जिल्हाधिकारी ओमप्रकाश दुबे, निवासी उपजिल्हाधिकारी ललीत वराडे,  आदी व्यासपीठावर  आदी उपस्थित होते. तसेच बैठकीला पाटबंधारे विभागाचे अधिक्षक अभियंता श्री. सुपेकर, कार्यकारी अभियंता कैलास ठाकरे उपस्थित होते.
   पालकमंत्री पुढे म्हणाले, खडकपूर्णा प्रकलपातील मृत साठ्यातील पाणी उपयोगात आणल्यास पाणीपुरवठा योजनांवर परिणामाबाबत चाचपणी करावी. तसेच एक पाळी पाणी सिंचनासाठी देता येत असल्यास तात्काळ आठ दिवसात उपसा सिंचनाद्वारे पाणी सोडावे.    खासदार प्रतापराव जाधव, आमदार राहूल बोंद्रे व शशिकांत खेडेकर यांनी खडकपूर्णा प्रकलपातील होत असलेली पाण्याची चोरी, वीज जोडण्या तोडणे, शेतीला सिंचनासाठी उपसा सिंचनाद्वारे पाणी देण्याविषयी मत मांडले. तसेच या भागातील शेतकऱ्यांच्या समस्या मांडल्या. बैठकीला सिंचन, महसूल, पाणी पुरवठा विभागाचे अधिकार व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
                                                                        ******
दिवठाणा येथील गावकऱ्यांना आवास योजनेतंर्गत घरकुले द्यावी
-       पालकमंत्री पांडुरंग फुंडकर

बुलडाणा, दि. 30 : ज्ञानगंगा प्रकल्पातंर्गत येणाऱ्या दिवठाणा गावातील अतिक्रमीत जागेवर काही नागरिकांची घरे आहेत. या अतिक्रमीत जागांवर असलेले नागरिक यांना जवळपास जागा देवून त्यांचे तातडीने पुनर्वसन करावे. त्यासाठी या जागेवर पंतप्रधान आवास योजना (ग्रामीण) अंतर्गत त्यांना घरकुले देण्यात यावी. तसेच अनुसूचित जाती प्रवर्गातील नागरिकांसाठी रमाई घरकूल योजनेमधून घरकुलांचा लाभ द्यावा, अशा सूचना पालकमंत्री पांडुरंग फुंडकर यांनी आज दिल्या.
    ज्ञानगंगा प्रकल्प बाधीत दिवठाणा गावातील अतिक्रमीत जागेवर घरकुलासंदर्भात जिल्हाधिकारी कार्यालयाच्या नियोजन समिती सभागृहात बैठक आयोजित करण्यात आली होती. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी व्यासपीठावर जिल्हाधिकारी डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार, अप्पर जिल्हाधिकारी ओमप्रकाश दुबे आदी उपस्थित होते.
   काळेगांव फाट्यावरील जागेची पाहणी करण्याचे सांगत पालकमंत्री म्हणाले, दिवठाणा गावातील  या गावकऱ्यांचे पुनर्वसन झाल्यानंतर ज्ञानगंगा प्रकलपाचे काम पूर्ण होईल. त्यामुळे अतिक्रमीत जागेवरील नागरिकांचे पुर्नवसन  करणे आवश्यक आहे. याप्रसंगी पुनर्वसन, लघु पाटबंधारे, जलसंपदा विभागाचे अधिकारी व कर्मचारी उपस्थितहोते.
                                                                                    **********
सार्वजनिक बांधकाम मंत्री चंद्रकांत पाटील यांचा दौरा

बुलडाणा, दि. 30 : राज्याचे सार्वजनिक बांधकाम, महसूल, मदत व पुनर्वसन मंत्री चंद्रकांत पाटील दि. 1 व 2 डिसेंबर 2017 रोजी जिल्हा दौऱ्यावर येत आहे. त्यांचा दौरा कार्यक्रम पुढीलप्रमाणे आहे : दि. 1 डिसेंबर रेाजी सायं 7 वाजता औरंगाबाद येथून शासकीय वाहनाने बुलडाणाकडे प्रयाण, रात्री 10 वाजता बुलडाणा शासकीय विश्रामभवन येथे आगमन व मुक्काम, दि. 2 डिसेंबर 2017 रोजी सकाळी 7.50 वाजता शासकीय विश्रामभवन येथून बैठकस्थळी रवाना, सकाळी 8 वाजता शासकीय विश्राम भवन येथे सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांसमवेत आढावा बैठकीस उपस्थिती, सकाळी 10 वाजता विश्राम भवन येथे विविध लोकप्रतिनिधींच्या भेटीसाठी राखीव, सकाळी 11 वाजता शासकीय वाहनाने बुलडाणा येथून अकोलाकडे प्रयाण करतील.
                                                            *********
जिल्हाधिकारी कार्यालयात
 4 डिसेंबर रोजी लोकशाही दिन
  बुलडाणा, दि.2 : नागरिकांच्या तक्रारींचा निपटारा जलदगतीने व्हावा, यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयात प्रत्येक महिन्याच्या पहिल्या सोमवारी लोकशाही दिनाचे आयोजन करण्यात येते. या महिन्याचा सदर लोकशाही दिन सोमवार 4 डिसेंबर 2017 रोजी दुपारी 1 वाजता आयोजित करण्यात आला आहे.  या दिवशी जिल्हाधिकारी व इतर शासकीय अधिकारी,नागरिकांच्या तक्रारींचे निरसन करणार आहेत. तसेच तालुका स्तरावर तहसील कार्यालयात महिन्याच्या तिसऱ्या सोमवारी लोकशाही दिनाचे आयोजन करण्यात येत आहे.
         जिल्ह्यातील शासकीय, निम शासकीय कार्यालयातील अडचणी व तक्रारी संबंधी ज्या नागरिकांना आपली निवेदने लोकशाही दिनी सादर करावयाची आहेत, त्यांनी जिल्हाधिकारी यांच्या नावे विहित नमुन्यात अर्ज करावा. विहित नमुन्यातील अर्ज व सोबत अर्जाची आगाऊ प्रत जोडून लोकशाही दिनाच्या 15 दिवस आधी पाठविणे आवश्यक आहे.
   अर्जदाराने लोकशाही दिनाच्या दिवशी मूळ अर्जासोबत उपस्थित रहावे. जिल्हाधिकारी कार्यालयात लोकशाही दिनी संबंधीत नागरिकांनी उपस्थित राहून दोन प्रतींमध्ये आपली निवेदने जिल्हाधिकारी यांना सादर करावीत. अन्य व्यक्तीमार्फत पाठविलेली निवेदने स्विकारली जाणार नाहीत. तालुका स्तरावरील लोकशाही दिनानंतर 1 महिन्याने जिल्हाधिकारी कार्यालयातील लोकशाही दिनात अर्ज करता येतो. तसेच तक्रारदारांबरोबर त्रयस्थाने येऊ नये. अर्जदाराने एका अर्जात एकच तक्रार सादर करावी. एकापेक्षा जास्त तक्रारी असलेला अर्ज स्विकारला जाणार नाही.
   तक्रार, निवेदन वैयक्तिक स्वरुपाची असावी, त्याचप्रमाणे न्यायप्रविष्ठ प्रकरणे, राजस्व/ अपिल, सेवा व आस्थापना विषयक बाबी, विहित नमुन्यात नसलेले तसेच आवश्यक त्‍या कागदपत्रांच्या प्रती न जोडलेले अर्ज, विविध न्यायालयात प्राधिकाऱ्यां-कडील, लोकआयुक्त यांच्याकडे प्रलंबित असलेल्या प्रकरणांच्या तक्रारी स्विकारल्या जाणार नाहीत, असे अर्ज संबंधित विभागाकडे आवश्यक कार्यवाहीसाठी 8 दिवसात पाठविण्यात येतील. त्याची एक प्रत अर्जदारास पाठविण्यात येईल,  असे जिल्हाधिकारी यांनी कळविले आहे.
                                                                                    *********
शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्कार
ऑनलाईन प्रणालीद्वारे अर्ज करावयाची मुदत वाढ
बुलडाणा, दि. 30 : महाराष्ट्र शासनाच्या क्रीडा विभागामार्फत शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्कार सन 2014-15, 2015-16, 2016-17 या तीन वर्षासाठी जिल्हयातील खेळाडू, संघटक, क्रीडा मार्गदर्शक यांनी ऑनलाईन प्रणालीद्वारे अर्ज करावयाची मुदत दि. 09.12.2017 पर्यंत वाढविण्यास शासनाने मान्यता दिलेली आहे. तसेच अर्जासोबत 100 प्रमाणपत्रची मर्यादा रदद करुन अर्जदाराने सादर केलेल्या सर्व Attachment upload करण्यास शासनाने परवानगी देण्यातआलेली आहे. तरी या मुदतवाढीची जिल्हयातील सर्व खेळाडू, संघटक, क्रीडा मार्गदर्शक यांनी नोंद घेवूनत्यानुसार पुरस्कारासाठीचे आपले अर्ज ऑनलाईन प्रणालीद्वारे सादर करावे असे आवाहन जिल्हा क्रीडा अधिकारी शेखर पाटील यांनी केले आहे.
                                                                                    ****

Thursday 23 November 2017

news 23.11.2017 dio buldana

नवमतदारांना मिळणार स्मार्ट ओळखपत्र…!
·        30 नोव्हेंबर 2017 पर्यंत विशेष मोहिम
·        सहस्त्रक मतदार म्हणून होणार गौरव
बुलडाणा, दि. 23 :   संक्षिप्त पुर्ननिरीक्षण कार्यक्रमातंर्गत जिल्ह्यात 15 ते 30 नोव्हेंबर 2017 दरम्यान विशेष मोहिम राबविण्यात येत आहे. या मोहिमेदरम्यान बीएलओ घरोघरी जावून मतदार यादीत नाव नोंदविणे व अन्य मतदारासंबंधी कामे करणार आहे. सदर बीएलओ घरी आल्यानंतर त्यांना सहकार्य करून आपले नाव मतदार यादीत नसल्यास ते नोंदवावे. तसेच बीएलओ 1 ते 8 नमुन्यांची माहिती संकलीत करून ऑनलाईन मोबाईल ॲपवर अपलोड करणार आहे. या नव मतदारांना स्मार्ट मतदान ओळखपत्र देण्यात येणार आहे.
   या कार्यक्रमादरम्यान 21 व्या शतकाच्या पहिल्या दिवशी म्हणजे 1 जानेवारी 2000 रेाजी जन्म झाला व 1 जानेवारी 2018 रोजी वयाची 18 वर्ष पुर्ण करीत असलेल्या मतदारांना सहस्त्रक मतदार अर्थात मिलेनीयम वोटर्स म्हणून संबोधण्यात येणार आहे. जे मतदार सहस्त्रक मतदार म्हणून नोंदणी करतील अशा मतदारांचा घरोघरी जावून बीएलओ सत्कार करणार आहे. तसेच आगामी राष्ट्रीय मतदार दिनी 25 जानेवारी 2018 रोजी या तरूण मतदारांच्या समवेत त्यांना ‘मी भारताचा सहस्त्रक मतदार आहे, I am Millenium Voter of India’ असे लिहीलेला खास बॅच व प्रमाणपत्र देऊन त्यांचा सत्कार वैयक्तिकपणे जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी यांच्याहस्ते करण्यात येणार आहे. त्या अनुषंगाने 1 जानेवारी 2000 रोजी ज्यांचा जन्म झाला आहे व वयाची 18 वर्ष पुर्ण होत आहेत, अशा सहस्त्रक मतदारांनी जास्त संख्येने मतदार नोंदणी करावी.
   निवडणूक आयोगाने ऑनलाईन मोबाईल ॲप विकसित केले आहे. या ॲप्सच्या माध्यमातून माहिती अपलोड करावयाची आहे. ग्रामीण भागात सकाळी किंवा सायंकाळी आणि शहरी भागात दिवसभरात एकदा बीएलओ घरी येणार आहे. माहिती निवडणूक आयोगाने दिलेल्या नमुना 1 ते 8 मध्ये नोंदवून ऑनलाईन मोबाइल ॲपवर अपलोड करावयाची आहे.  त्याअनुषंगाने बीएलओ आपल्या दारी ही मोहिम राबविण्यात येत आहे. बीएलओला घरी आल्यानंतर संपूर्ण कुटूंबाची माहिती द्यावी. जेणेकरून आपल्या कुटूंबातील कुणीही व्यक्ती मतदार यादीत नाव नोंदणीपासून वंचित राहणार नाही, असे आवाहन जिल्हाधिकारी यांनी केले आहे.
*****
प्रलंबित शिष्यवृत्ती अदा करण्यासाठी ई- स्कॉलरशीप पोर्टल सुरू
  • प्रलंबित अर्ज प्रकरणे महाविद्यालयांनी 30 नोव्हेंबर पर्यंत ऑनलाईन समाजकल्याणकडे सादर करावी
बुलडाणा, दि‍.23 : सामाजिक न्याय विभागामार्फत मागासवर्गीय विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती अथवा शिक्षण शुल्क, परीक्षा शुल्क, निर्वाह भत्ता, विद्यावेतने आदी योजनेच्या माध्यमातून आर्थिक लाभ दिला जातो. सन 2017-18 या वर्षापासून राज्य शासनाने सर्व विभागाच्या सर्व प्रकारच्या शिष्यवृत्त्या ह्या महाडीबीटी पोर्टल मार्फत अदा करण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे सामाजिक न्याय विभागाचे http://mahaeschol.maharashtra.gov.in हे संकेतस्थळ संस्थगित करण्यात आले होते. मात्र काही विद्यार्थ्यांचे या प्रकरणांचे लाभ देण्याचे प्रलंबित असल्यामुळे ते अदा करणेसाठी आता ई-स्कॉलरशीप हे संकेतस्थळ 21 नोव्हेंबर पासून पुन्हा मर्यादीत कालावधीकरीता सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
   प्रथम टप्प्यामध्ये ज्या विद्यार्थ्यांनी सन 2015-16 साठी 31 जून 2016 पर्यंत आणि सन 2016-17 करीता 31 मार्च 2017 पर्यंत ऑनलाईन अर्ज भरलेले आहेत. मात्र ज्यांना अद्याप शिष्यवृत्ती, शिक्षण शुल्क व परीक्षा शुल्कचा लाभ मिळालेला नाही, अशा विद्यार्थ्यांचे महाविद्यालयाकडे प्रलंबित असलेले अर्ज आणि नुतनीकरण करावयाचे प्रस्ताव महाविद्यालयांनी या पुनरूज्जीवीत करण्यात आलेल्या संकेतस्थळावरून 21 नोव्हेंबर ते 30 नोव्हेंबर 2017 या कालावधीत जिल्हा  समाज कल्याण अधिकारी, बुलडाणा यांचेकडे पाठवावीत. याबाबत सविस्तर सुचना असलेले परीपत्रक आणि वेळापत्रक हे विभागाच्या www.sjsa.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात आलेले आहे. त्यामुळे महाविद्यालयांनी त्यांच्याकडे विद्यार्थ्यांचे ऑनलाईन सादर केलेले सन 2015-16 व 2016-17 चे पात्र विद्यार्थ्यांचे प्रलंबित आणि नुतनीकरणाचे प्रस्ताव त्वरीत सादर करावे. कोणताही पात्र मागासवर्गीय विद्यार्थी शिष्यवृत्तीपासून वंचित राहणार नाही, याची महाविद्यालयाच्या प्रचार्यांनी दक्षता घ्यावी, असे आवाहन जिल्हा समाज कल्याण अधिकारी यांनी केले आहे.
                                                            *****
अनुसूचिज जमाती प्रवर्गातील शिष्यवृत्तीच्या अर्जांसाठी महाडीबीटी पोर्टल कार्यान्वीत
·                                                                                                                         http://mahadbt.gov.in या संकेतस्थळावर ऑनलाईन अर्ज करावे
·                                                                                                                         तात्रिक अडचणींकरीता 18001025311 क्रमांकावर संपर्क साधावा
   बुलडाणा, दि. 23  - प्रकल्प अधिकारी कार्यालय अकोला अंतर्गत शासकीय, अनुदानित व विना अनुदानित महाविद्यालय, कनिष्ठ महाविद्यालय, माध्यमिक विद्यालय, प्राथमिक शाळा, जिल्हा परिषद, नगर पालिका शाळांमध्ये शिक्षण घेत असलेल्या अनुसूचित जमाती प्रवर्गातील विद्यार्थ्यांसाठी शिष्यवृत्ती देण्यात येते. त्यांना या शैक्षणिक वर्षापासून शासनाकडून राबविण्यात येणाऱ्या सुवर्ण महोत्सवी पुर्व माध्यमिक शिष्यवृत्ती योजना, इयत्ता 8 ते 12 वी मध्ये शिक्षण घेणाऱ्या अपंग विद्यार्थी शिष्यवृत्ती योजना भारत सरकार मॅट्रीकोत्तर शिष्यवृत्ती योजना, शिक्षण शुल्क व परीक्षा शुल्क या योजनांची अंमलबजावणी http://mahadbt.gov.in पोर्टलच्या माध्यमातून करण्यात येत आहे.
     शैक्षणिक वर्ष 2017-18 पासून राज्य शासनाच्यावतीने सर्व वैयक्तिक लाभाच्या योजना डीबीटी पोर्टल मार्फत (थेट लाभ हस्तांतरण योजना) राबविण्याचे धोरण निश्चित करण्यात आले आहे. सदर पोर्टलवर शिष्यवृत्तीचे ऑनलाईन अर्ज दाखल करण्याची कार्यवाही सुरू आहे. तसेच संस्था, महाविद्यालय, प्राथमिक व माध्यमिक विद्यालयांनी या संकेतस्थळावर नोंदणी करावी.  तरी अनुसूचित जमाती प्रवर्गातील पात्र विद्यार्थ्यांना या शैक्षणिक वर्षात भारत सरकार मॅट्रीकोत्तर शिष्यवृत्ती, शिक्षण शुल्क, परीक्षा शुल्क  योजनेचा लाभ थेट लाभ हस्तांतरण योजनेद्वारे करण्यात येत आहे. या अनुषंगाने भारत सरकार मॅट्रीकोत्तर शिष्यवृत्ती, शिक्षण शुल्क व परीक्षा शुल्क  योजनेचा लाभ मिळविण्यासाठीचे अर्ज वित्तीय वर्ष 2017-18 पासून http://mahadbt.gov.in या संकेतस्थळावर  सादर करावयाचे आहे.
     त्यानुसार सर्व पात्र विद्यार्थ्यांनी त्यांचे अर्ज भरावे. याबाबत काही तांत्रिक अडचणी किंवा शंका उद्भवल्यास डीबीटी टोल फ्री क्रमांक 18001025311 किंवा इमेल mahadbt.helpdesk@maharashtra.gov.in  यावर संपर्क साधावा, असे आवाहन प्रकल्प अधिकारी विनीता सोनावणे यांनी केले आहे.
****
 स्पर्धा परीक्षा अभ्यासासाठी ई-ग्रंथालयात 50 विद्यार्थ्यांना निशुल्क प्रवेश मिळणार
·             जिल्हाधिकारी कार्यालयातील अभ्यासिका
·             27 नोव्हेंबर ते 8 डिसेंबर 2017 दरम्यान अर्ज सादर करावे
   बुलडाणा, दि. 23  - जिल्हास्तरीय सेतु समिती अंतर्गत एमपीएससी व युपीएससी या स्पर्धा परीक्षांचा अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी ई-ग्रंथालयमध्ये 50 विद्यार्थ्यांना निशुल्क प्रवेश देण्यात येणार आहे. त्यासाठी ऑफलाईन अर्ज मागविण्यात येत आहे. अर्जाचा नमुना व अटींची माहिती www.buldhana.nic.in या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आली आहे. अर्जाचा नमुना डाऊनलोड करून अर्जासोबत पदवीचे प्रमाणपत्र जोडून अर्ज ई ग्रंथालय, नियोजन भवन, जिल्हाधिकारी कार्यालय, बुलडाणा येथे सादर करावेत. सदर अर्ज व पदवीचे प्रमाणपत्र स्कॅन करून elibdisbul@gmail.com या ईमेल आयडीवर 27 नोव्हेंबर रोजी सकाळी 10 वाजेपासून  ते 8 डिसेंबर 2017 रोजी सायंकाळी 6 वाजेपर्यंत पाठवावेत. निर्धारीत दिनांकानंतर अर्ज स्वीकारले जाणार नाहीत. तसेच आवश्यकता असल्यास परीक्षेस पात्र ठरलेल्या उमदेवारांची लेखी परीक्षेची दिनांक, यादी व प्रवेशपत्र www.buldhana.nic.in या संकेतस्थळावर 15 डिसेंबर 2017 रेाजी अपलोड करण्यात येईल. सदर प्रवेशपत्र पात्र उमेदवारांनी डाऊनलोड करून सदर प्रवेशपत्र भरून त्यासोबत उमेदवारांनी परीक्षेला येताना छायांकित ओळखपत्र उदा. आधार कार्ड, मतदान कार्ड, चालक परवाना, पॅनकार्ड आदीपैकी एक पुरावा सोबत आणावा, असे जिल्हाधिकारी यांनी कळविले आहे.
                                                            ******



               तूर पिकावरील किडींचे व्यवस्थापन करावे
·                 कृषि विभागाचे आवाहन
बुलडाणा, दि. 23 : तूर पिकावर शेंगा पोखरणाऱ्या किडीमध्ये हिरवी अळी अर्था घाटे अळी, पिसारी पतंग, शेंग माशी या अळ्यांचा प्रादुर्भाव वाढण्याची शक्यता नाकारता येत नाही. शेंगा पोखरणाऱ्या किडीची मादी सरासरी 600 ते 800 अंडी तूरीची कोवळी पाने, देठ अथवा कळ्या, फुले तसेच शेंगांवर वेगवेगळी घालत असते. अंडी अवस्था 3 ते 4 दिवसांची असते. अंडीतून बाहेर पडलेल्या अळ्या सुरूवातीस सुस्त असून प्रिाम कोवळी पाने व देठ कुरतडून खातात. डिसेंबर ते जानेवारी दरम्यान आभाळ आभ्राच्छादीत असल्यास या किडीचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात आढळतो.
पिसारी पतंग  नाजूक निमुळता 12.5 मि.मी लांब करड्या/भुऱ्या रंगाचा असतो. पुढील पंख दुभंगलेले व मागील पंख तीन भागात विभागलेले असतात. त्यांच्या कडांवर नाजूक केसांची दाट लव असते. पुढील पंख खूप लांब असून त्यांचे पाय लांब व बारीक असतात. अंड्यातून बाहेर पडलेली अळी कळ्या, फुले व शेंगांना छिद्रे पाडून खाते.  पुर्ण वाढ झालेली अळ प्रथम शेंगेचा पृष्ठभाग खरडून खाते व नंतर शेंगेला शेंगेच्या बाहेर राहून खाते. शेंगमाशीच्या प्रादुर्भावाने शेंगेवर कोणतेही लक्षण दिसत नाही. मात्र जेव्हा पूर्ण वाढलेली अळी कोषावस्थेत जाण्यापूर्वी शेंगेला छिद्र पाडते. छिद्रातून माशी बाहेर पडते, तेव्हा नुकसानीचा प्रकार आढळून येतो. अपाद अळी शेंगेत शिरून दाणे अर्धवट कुरतडून खाते. त्यामुळे दाण्याची मुकणी होते. त्यावर वाढणाऱ्या बुरशीमुळे दाणे कुजतात.
                                                                        असे करावे नियंत्रण
तृणधान्य व तेलबिया पिकाबरोबर पिकाची फेरपालट करावी, पेरणीपूर्वी मशागत खोल नांगरणी व वखरणी करावी, वेळेवर कोळपणी व खुरपणी करावी, अळ्या वेचून त्यांचा नाश करावा, हेक्टरी 10 कामगंध व 20 पक्षीथांबे पिकात उभारावीत, घाटे अळीच्या नियंत्रणाकरीता त्या अळीचा विषाणू  प्रति हेक्टर 500 रोगग्रस्त अळ्यांचा अर्क फवारावा, शेंगा पोखरणाऱ्या अळीच्या नियंत्रणाकरीता 5 टक्के निंबोळी अर्क फवारावा. तसेच या किडीच्या नियंत्रणाकरीता आर्थिक नुकसानीची पातळी ओलांडल्यास अझाडिरेक्टीन 300 पीपीएम 50 मि.ली किंवा क्लोरानट्रनिलीप्रोल 18.5 एस.सी 3 मिली इमामेक्टीन बेंझोएट 5 एसजी 4.4 ग्रॅम किंवा इथिऑन 50 ईसी 20 मि.ली किंवा फ्लुबेंडामाईड 39.35 एससी 2 मिली किंवा एन्डॉक्सिकार्ब 15.8 ई.सी 6-7 मिली किंवा लॅमडा सायहेलेथ्रीन 5 ई.सी 10 मिली किंवा क्विनॉलफॉस 25 ईसी 28 मिली किंवा स्पिनोसॅड 45 एससी 1.5-1.6 मिली प्रति 10 लीटर पाण्यात मिसळून यापैकी एक घटकाची  फवारणी करावी , असे आवाहन उपविभागीय कृषि अधिकारी संतोष डाबरे यांनी केले आहे.
*******
संपूर्ण डिसेंबर महिनाभर मुख कर्करोग तपासणी मोहिम
बुलडाणा, दि. 23 : तंबाखूजन्य पदार्थांच्या सेवनाने होणारे दुष्परिणाम निदर्शनास आणून 30 वर्षावरील नागरिकांची मौखिक तपासणीची महत्वपूर्ण मोहिम 1 डिसेंबर ते 31 डिसेंबर 2017 या कालावधीत राबविली जाणार आहे. तंबाखू व तंबाखू जन्य पदार्थांच्या सेवनामुळे हृदयरोग, फुफ्फुपासे आजार, कर्करोग यासह अनेक गंभीर आजराचे प्रमाण वाढत आहे. या पदार्थांच्या सेवनामुळे शरीरावर होणाऱ्या दुष्परीणामांची माहिती शेवटच्या घटकापर्यंत पोहोचविण्यासाठी आरोग्य विभागामार्फत जनजागृती केली जाणार आहे.
  या मोहिमेच्या पूर्व तयारीसाठी आरोग्य विभागामार्फत जिल्ह्यातील आरोग्य यंत्रणेचा आढावा घेण्यात येत आहे. मुख कर्करोग तपासणी मोहिमेसाठी विशेष चमुची स्थापना करण्यात आली आहे. तसेच जनजागृतीपर उपक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. या मोहिमेच्या अनुषंगाने जिल्ह्यातील 30 वर्षाव्रील नागरिकांनी डिसेंबर महिन्यात मुख कर्करोग तपासणी करावी व तंबाखुजन्य पदार्थांचे सेवन टाळावे, असे आवाहन जिल्हा शल्य चिकित्सक यांनी केले आहे.
मुख कर्करोगाविषयी थोडेसे..

मुख कर्करोगाची कारणे: तंबाखू गुटखा यांचे सेवन, सुपारी व तत्सम पदार्थ, मुख आरोग्य संबंधी अनास्था, दारूचे नियमित सेवन, पोषक जीवनसत्वांची कमतरता, विषाणू संसर्ग. लक्षणे: तोंडात न बरी होणारी जखम, पांढरा चट्टा (आतून गाल व ओंयावर), तोंडात वाढत जाणारी गाठ, तोंडात न बरा होणारा अल्सर, मानेमध्ये वाढत जाणाऱ्या गाठी, तोंड उघडण्यास, गिळण्यास किंवा चावण्यास त्रास, जीभेची कमी हालचाल आणि तोंडाचा खराब वास येणे. मुख कर्करोगापूर्वी होणारे विकार : तोंड कमी उघडणे, गाल आतून कडक होणे, गाल ओढ आतून पांढरे पडणे, गालावर आतून किंवा लाल चट्टा येणे.

Monday 20 November 2017

news 20.11.2017 dio buldana


वझर येथील बंधाऱ्यातील पक्ष भिंतीजवळील खडकांमधील नैसर्गिक भेगांमधून झिरपा
  • झिरपा पक्ष भिंतीच्या बाहेरील बाजूने नाल्यामध्ये,
  • वझर येथील चारही बंधाऱ्यांमध्ये पाणीसाठा
बुलडाणा, दि.20 -  जलयुक्त शिवार अभियानातंर्गत खामगांव तालुक्यातील वझर येथील पश्चिमेकडील नाल्यावर क्रमांक 1 व 2 बंधारा निर्माण करण्यात आला आहे. तर बोर्डी नदीवर क्रमांक 3 व 4 बंधाऱ्याचे बांधकाम झालेले आहे. अशाप्रकारे एकूण चार बंधारे वझर शिवारात आहे. या चार बंधाऱ्यापैकी क्रमांक 1,2 व 3 चे बांधकाम मार्च 2016 मध्ये आणि बंधारा क्रमांक 4 चे काम नोव्हेंबर 2016 मध्ये पूर्ण झालेले आहे. या सिमेंट नाला बंधाऱ्यांमध्ये पाणीसाठा आलेला आहे.  येथील बंधाऱ्यांची कामे गुणनियंत्रण यंत्रणेकडून झालेल्या संधानकाचे कामाचे चाचणी अहवाल प्राप्त आहेत. जिगांव उपसा सिंचन विभागाच्या अधिकाऱ्यांनी स्थळपाहणी केली असता बंधाऱ्यांच्या भिंतीमधून कुठल्याही प्रकारचा झिरपा येत नसल्याचे निदर्शनास आले. मात्र नाल्यातील झिरपा हा पक्ष भिंतीच्या बाहेरील बाजुने कठीण खडकाला असलेल्या नैसर्गिक भेगांमधून होत असल्याचे निदर्शनास आले आहे.  
    पक्ष भिंतीच्या बाहेरील बाजुने पाणी झिरपून नाल्यामध्ये येत असून त्याचे प्रमाण अत्यल्प आहे. सदर झिरपा होणे हे नैसर्गिक आहे. बंधाऱ्याचे झालेल्या बांधकामातून कोठेही पाण्याचा झिरपा होत नाही. येथे दोन बंधाऱ्याच्या डाव्या बाजुच्या पक्ष भितीच्या बाहेरून होणारा पाण्याचा झिरपा बंद करण्यासाठी मातीचा पुर्नभराव करून घेण्यात येणार आहे. मात्र हा झिरपा खडकातून नैसर्गिकरित्या होत असल्यामुळे भविष्यात हा झिरपा बंद होईलच याची खात्री नाही. सदर खात्यामार्फत करण्यात आलेल्या बंधाऱ्याच्या बांधकामाच्या भिंतीमधून व बांधकामाच्या पायातून झिरपा नाही. त्यामुळे जलयुक्त शिवार योजनेला कीड.. वझर येथील चारही सिमेंट बांध झिरपू लागले.. या तक्रारीत बंधाऱ्याचे काम निकृष्ट दर्जाचे झाले आहे व पाण्याचा झिरपा बंधाऱ्याच्या बांधकामातून होत आहे. असे नमूद आहे, मात्र प्रत्यक्षात तसे नसून तक्रारीत तथ्य नाही, असा खुलासा कार्यकारी अभियंता, जिगांव उपसा सिंचन विभाग, खामगांव यांनी प्रसिद्धी पत्रकान्वये केला आहे.
                                                            ********
सिंदखेड राजा येथे महिला लोकशाही दिनाचे 27 नोव्हेंबर रोजी आयोजन
  बुलडाणा, दि.20 : तहसिल कार्यालयात प्रत्येक महिन्याच्या चवथ्या सोमवारी महिला लोकशाही दिनाचे आयोजन करण्यात येते. सिंदखेड राजा तहसिल कार्यालयात या महिन्यात या महिन्याचा महिला तालुकास्तरीय लोकशाही दिनाचे आयोजन सोमवार, 27 नोव्हेंबर 2017 रोजी सकाळी 11 वाजता होणार आहे.  या दिवशी तहसीलदार व इतर शासकीय अधिकारी,नागरिकांच्या तक्रारींचे निरसन करणार आहेत.
   विहित नमुन्यातील अर्ज व सोबत अर्जाची आगाऊ प्रत जोडून लोकशाही दिनाच्या 15 दिवस आधी पाठविणे आवश्यक आहे. अर्जदाराने लोकशाही दिनाच्या दिवशी मूळ अर्जासोबत उपस्थित रहावे. अन्य व्यक्तीमार्फत पाठविलेली निवेदने स्विकारली जाणार नाहीत. अर्जदाराने एका अर्जात एकच तक्रार सादर करावी. एकापेक्षा जास्त तक्रारी असलेला अर्ज स्विकारला जाणार नाही.
   तक्रार, निवेदन वैयक्तिक स्वरुपाची असावी, त्याचप्रमाणे न्यायप्रविष्ठ प्रकरणे, राजस्व/ अपिल, सेवा व आस्थापना विषयक बाबी, विहित नमुन्यात नसलेले तसेच आवश्यक त्‍या कागदपत्रांच्या प्रती न जोडलेले अर्ज, विविध न्यायालयात,  प्राधिकाऱ्यां-कडील, लोकआयुक्त यांच्याकडे प्रलंबित असलेल्या प्रकरणांच्या तक्रारी स्विकारल्या जाणार नाहीत, असे अर्ज संबंधित विभागाकडे आवश्यक कार्यवाहीसाठी पाठविण्यात येतील. त्याची एक प्रत अर्जदारास पाठविण्यात येईल,  असे तहसलीदार यांनी कळविले आहे.
                                                                        ****
महात्मा फुले मागासवर्ग विकास महामंडळाची व्यवसाय प्रशिक्षण योजना जाहीर
  • 24 नोव्हेंबर पर्यंज अर्ज स्वीकारणार
  • युवकांनी स्वयंरोजगारासाठी योजनेचा लाभ घ्यावा
बुलडाणा, दि.20 -  सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागातंर्गत महात्मा फुले मागासवर्ग विकास महामंडळ यांच्या जिल्हा कार्यालयाला सन 2017-18 आर्थिक वर्षाकरीता उद्दिष्ट प्राप्त झाले  आहे. सदर उद्दिष्ट व्यावसायिक प्रशिक्षण योजनेतंर्गत देण्यात आले आहे. त्यानुसार अनुसूचित जाती व नवबौद्ध घटकातील पात्र उमेदवारांचे व्यावसायिक प्रशिक्षण निवडीकरीता अर्ज आमंत्रित करण्यात आले आहे. अर्ज 24 नोव्हेंबर 2017 रोजी सायं 6 वाजेपर्यंत जिल्हा कार्यालय, महात्मा फुले मागासवर्ग विकास महामंडळ, सामाजिक न्याय भवन, त्रिशरण चौक, बुलडाणा यांच्याकडे सादर करावीत.
   अनुसूचित जाती व नवबौद्ध संवर्गातील पात्र व इच्छूक उमेदवारांची निवड व्यवसाय प्रशिक्षण योजनेतंर्गत करण्यात येणार आहे. या योजनेसाठी मात्र मातंग व चर्मकार संवर्गातील सर्व जाती व त्यामध्ये येणारे सर्व उपजातीचे लाभार्थी पात्र असणार नाही.  योजनेसाठी अर्जदार हा जिल्ह्याचा रहीवासी असावा, अर्जासोबत जातीचा दाखला, उत्पन्नाचा तहसिलदाराचा दाखला, रेशन कार्ड, मतदान ओळखपत्र, आधार कार्ड, शाळा सोडल्याचा दाखल्याची झेरॉक्स, पासपोर्ट फोटो सादर करावे. तरी गरजू व इच्छूक सुशिक्षीत बेरोजगार युवकांनी अर्ज सादर करावे, असे आवाहन जिल्हा व्यवस्थापक संजय लातूरकर  यांनी केले आहे.
                                                                        ********
  विधी सेवा प्राधिकरणाच्यावतीने अपंग शाळेत बालक दिन साजरा
बुलडाणा, दि.20 -  स्थानिक अपंग विद्यालयात 14 नोव्हेंबर रेाजी जिल्हा विधी सेवा प्राधिकरण तथा वकील संघ बुलडाणा यांचे संयुक्त विद्यमाने बालक दिन साजरा करण्यात आला. या वेळी शिबिर घेण्यात आले. या शिबिराचे अध्यक्षस्थानी जिल्हा विधी सेवा संघाच्या अध्यक्षस्थानी श्रीमती सुरेखा कोसमकर, सचिव शैलेश बाफना उपस्थित होते.
  याप्रसंगी शालेय विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप करण्यात आले.   कार्यक्रमाच्या सुरूवातीला अपंग विद्यार्थ्यांनी स्वागत गीत सादर केले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी अपंग शाळेचे संचालक डॉ. गुप्ता, जिल्हा वकील संघाचे अध्यक्ष ॲड देवकर, सचिव ॲड दाभाडे, विक्रांत मारोडकर, अधिक्षक डी. सी तोमर, कर्मचारी एस.एस अवचार,  आर. आर इंगळे, एम. एम भारसाकळे, एस. एन मुळे, एच.ए देशमुख व अपंग शाळेचे कर्मचारी यांनी प्रयत्न केले.
                                                                        ***
प्राधान्य कुटूंबातील लाभार्थ्यांचे गहू व तांदुळाचे मासिक नियतन जाहीर
* 30 नोव्हेंबर 2017 पर्यंत करावी लागणार धान्याची उचल
बुलडाणा, दि‍ 20 -  राष्ट्रीय  अन्न सुरक्षा अधिनियम, 2013 अंतर्गत प्राधान्य कुटूंबातील लाभार्थ्यांकरिता माहे सप्टेंबर  2017 चे नियतनातील  गहू व तांदुळ धान्याची शासकीय गोदामात  वाहतूक करण्याचे आदेश पारित करण्यात आले आहे. या धान्याची उचल भारतीय अन्न महामंडळाच्या ब्लॅक स्टोन लॉजिस्टीक्स प्रा. लि, टेंभुर्णा फाटा, खामगांव यांचे गोदामातून 30 नोव्हेंबर 2017 पर्यंत धान्याची उचल करावी लागणार आहे.
     गोदामनिहाय धान्याची वाहतूक खालीलप्रमाणे करावी.  बुलडाणा गहू  4951 क्विंटल व तांदूळ 3309,  चिखली गहू 4086 व तांदुळ 2724, अमडापूर गहू 1264 व तांदूळ 843,  दे.राजा गहू 2167 व तांदूळ 1445, मेहकर गहू 3785 व तांदूळ 2523, डोणगांव गहू 1205 व तांदूळ 803, लोणार गहू 2403 व तांदूळ 1602,  सिं.राजा गहू 1957 व तांदूळ 1305, साखरखेर्डा गहू 1276 व तांदूळ 851, मलकापूर गहू 3007 व तांदूळ 2005, मोताळा गहू 2947 व तांदूळ 1964, नांदूरा गहू 2891 व तांदूळ 1927, खामगांव गहू 5796 व तांदूळ 3864, शेगांव गहू 2644  व तांदूळ 1762, जळगांव जामोद गहू 2687 व तांदूळ 1791, संग्रामपूर गहू 2314 व तांदूळ 1542 क्विंटल आहे. अशाप्रकारे गहू 45 हजार 380 व तांदूळ 30 हजार 260  क्विंटल पूरवठा करण्यात येणार  आहे, असे जिल्हा पुरवठा अधिकारी यांनी कळविले आहे.
****




विद्यार्थ्यांच्या भोजन, निवासाचा खर्च शासन उचलणार
·        डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजना
·        31 नोव्हेंबर 2017 पर्यंत अर्ज सादर करावेत
·        वसतिगृहात न राहणाऱ्या विद्यार्थ्यांचा वार्षिक खर्चाची रक्कम विद्यार्थ्यांच्या थेट बँक खात्यात
·        विद्यार्थ्यांचे आधार क्रमांक संलग्न असणारे बँक खाते आवश्यक
बुलडाणा, दि. 20 : अनुसूचित जाती व नवबौद्ध प्रवर्गातील विद्यार्थ्यांना मॅट्रीकोत्तर शिक्षण घेता यावे म्हणून भेजन, निवास व इतर शैक्षणिक सुविधा विद्यार्थ्यांना स्वत: खर्च करून घ्याव्या लागतात. महाविद्यालयांची संख्या व तेथे प्रवेश घेणाऱ्या मागासवर्गीय विद्यार्थ्यांच्या संख्येच्या प्रमाणात शासकीय वसतीगृहांची सुविधा उपलब्ध नाही. शासकीय वसतिगृहात प्रवेश न मिळालेल्या विद्यार्थ्यांना तात्काळ वसतीगृह सुरू करून तेथे प्रवेश देण्यावर, जागेची उपलब्धता व बांधकामासाठी लागणारा कालावधी लक्षात मर्यादा येतात. त्यसाठी राज्य शासनाने अनूसुचित जाती व नवबौद्ध प्रवर्गाच्या विद्यार्थ्यांसाठी डॉ. बाबासाहेब आंबेडर स्वाधार योजना सुरू केली आहे. या योजनेत अनुसूचित जाती प्रवर्गातील  शासकीय वसतिगृहामध्ये प्रवेश न मिळालेला विद्यार्थ्यांना मॅट्रीकोत्तर शिक्षण घेण्यासाठी त्यांच्या आधार क्रमांकाशी संलग्न असलेल्या  बँक खात्यात  रक्कम जमा करण्यात येणार आहे. योजनेच्या लाभासाठी अर्ज 31 नोव्हेंबर 2017 पर्यंत स्वीकारण्यात येणार आहे.
वसतिगृहात प्रवेश मिळालेला नसलेल्या विद्यार्थ्यांना शिक्षण घेता यावे, यासाठी भोजन, निवास आणि इतर शैक्षणिक सुविधा विद्यार्थ्यांना स्वत: उपलब्ध करून घेण्यासाठी ती रक्कम संबंधित विद्यार्थ्यांच्या आधार संलग्न बँक खात्यामध्ये थेट उपलब्ध करून देण्यात येणार आहे. ही वार्षिक रक्कम असणार आहे.  या योजनेचा लाभ घेण्यासाठी विद्यार्थ्याला इयत्ता १० वी, १२ वी, पदवी व पदविका परीक्षेमध्ये किमान 60 टक्के गुण असणे आवश्यक आहे. याच प्रवर्गातील दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी गुणांची अट ५० टक्के आहे.

या योजनेच्या निकष, अटी अर्ज www.maharashtra.gov.in, www.sjsa.maharashtra.gov.in,  या संकेतस्थळावर उपलब्ध आहे. सदर अर्ज डाऊनलोड करून भरावे लागणार आहे किंवा सहायक आयुक्त समाज कल्‍याण यांच्या कार्यालयातून विद्यार्थ्यांस उपलब्ध होणार आहे. जिल्हानिहाय अनुसूचित जाती प्रवर्गातील लोकसंख्येच्या प्रमाणात विद्यार्थ्यांची संख्या निश्चित केली असून त्यापेक्षा जास्त अर्ज प्राप्त झाल्यास गुणवत्तेवर निवड करण्यात येणार आहे. निवड यादी समाज कल्याण कार्यालयामार्फत प्रसिद्ध करण्यात येणार आहे. निवड न झालेल्या विद्यार्थ्यांना वेगळे कळविण्यात येणार नाही.  या योजनेच्या अर्ज स्वीकारण्यास मुदतवाढ देण्यात आली असून अर्ज 30 नोव्हेंबर 2017 पर्यंत समाज कल्याण कार्यालयास सादर करावे लागणार आहे. अर्ज डाकेने, समक्ष किंवा swadhar.swbuldhana@gmail.com या ईमेल आयडीवर पाठवावे.  यासाठी पात्र असणाऱ्या विद्यार्थ्यांनी लाभ घ्यावा, असे आवाहन सहायक आयुक्त मनोज मेरत यांनी केले आहे.

Saturday 18 November 2017

news 18.11.2017 dio buldana

महात्मा फुले मागासवर्ग विकास महामंडळाची व्यवसाय प्रशिक्षण योजना जाहीर
  • 24 नोव्हेंबर पर्यंज अर्ज स्वीकारणार
  • युवकांनी स्वयंरोजगारासाठी योजनेचा लाभ घ्यावा
बुलडाणा, दि.18 -  सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागातंर्गत महात्मा फुले मागासवर्ग विकास महामंडळ यांच्या जिल्हा कार्यालयाला सन 2017-18 आर्थिक वर्षाकरीता उद्दिष्ट प्राप्त झाले  आहे. सदर उद्दिष्ट व्यावसायिक प्रशिक्षण योजनेतंर्गत देण्यात आले आहे. त्यानुसार अनुसूचित जाती व नवबौद्ध घटकातील पात्र उमेदवारांचे व्यावसायिक प्रशिक्षण निवडीकरीता अर्ज आमंत्रित करण्यात आले आहे. अर्ज 24 नोव्हेंबर 2017 रोजी सायं 6 वाजेपर्यंत जिल्हा कार्यालय, महात्मा फुले मागासवर्ग विकास महामंडळ, सामाजिक न्याय भवन, त्रिशरण चौक, बुलडाणा यांच्याकडे सादर करावीत.
   अनुसूचित जाती व नवबौद्ध संवर्गातील पात्र व इच्छूक उमेदवारांची निवड व्यवसाय प्रशिक्षण योजनेतंर्गत करण्यात येणार आहे. या योजनेसाठी मात्र मातंग व चर्मकार संवर्गातील सर्व जाती व त्यामध्ये येणारे सर्व उपजातीचे लाभार्थी पात्र असणार नाही.  योजनेसाठी अर्जदार हा जिल्ह्याचा रहीवासी असावा, अर्जासोबत जातीचा दाखला, उत्पन्नाचा तहसिलदाराचा दाखला, रेशन कार्ड, मतदान ओळखपत्र, आधार कार्ड, शाळा सोडल्याचा दाखल्याची झेरॉक्स, पासपोर्ट फोटो सादर करावे. तरी गरजू व इच्छूक सुशिक्षीत बेरोजगार युवकांनी अर्ज सादर करावे, असे आवाहन जिल्हा व्यवस्थापक संजय लातूरकर  यांनी केले आहे.
                                                                        ********
विधी सेवा प्राधिकरणाच्यावतीने विधी सेवा सप्ताह साजरा
बुलडाणा, दि.18 -  राष्ट्रीय विधी सेवा प्राधिकरण, नवी दिल्ली तसेच महाराष्ट्र राज्य विधी सेवा प्राधिकरण मुंबई यांचे आदेशान्वये जिल्हा विधी सेवा प्राधिकरण तथा वकील संघ बुलडाणा यांचे संयुक्त विद्यमाने जिल्ह्यात विधी सेवा सप्ताह साजरा करण्यात आला. सदर सप्ताह जिल्ह्यात 9 ते 18 नोव्हेंबर दरम्यान साजरा करण्यात आला.  सप्ताहादरम्यान जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाच्या सभागृहात ‘मध्यस्ती काळाची गरज’ या विषयावर निबंध स्पर्धा घेण्यात आली. या स्पर्धेमध्ये जिल्हा वकील संघाचे ॲड किरण राठोड, ॲड विनोद बनकर, ॲड अमोल देशमुख, ॲड संतोष राठोड, ॲड एस.ए झिने, ॲड संतोष नरवाडे, ॲड सै. हारूण, ॲड संदीप टेकाळे, ॲड विक्रांत मारोडकर, ॲड वर्षा पालकर, ॲड आरीफ सैय्यद, ॲड अनुराधा वावगे या विधीज्ञांनी स्पर्धक म्हणून सहभाग घेतला.
   या स्पर्धेसाठी जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे शै. अ बाफना, कर्मचारी डि. सी तोमर, अधिक्षक एस. एस अवचार, आर. आर इंगळे, एम. एम भारसाकळे, सुनील मुळे, हेमंत देशमुख आदींनी प्रयत्न केले.
*****
महिला लोकशाही दिनाचे 20 नोव्हेंबर रोजी आयोजन

बुलडाणा, दि‍. 18 : प्रत्येक महिन्याच्या तिसऱ्या सोमवारी आयोजित होणाऱ्या जिल्हास्तरीय महिला लोकशाही दिनाचे आयोजन 20 नोव्हेंबर 2017 रोजी निवासी उपजिल्हाधिकारी कार्यालयात सकाळी 11 वाजता करण्यात आले आहे.  तक्रारी असणाऱ्या महिला तक्रारदारांनी यावेळी उपस्थित रहावे, असे आवाहन जिल्हा महिला व बालविकास अधिकारी यांनी केले आहे.

Monday 6 November 2017

jalyukt shivar succes story

          यशकथा :

जलयुक्त पावले… ‘साखरखेर्ड्या’चे शिवार फुलले
  • भूजल पातळीत वाढ
  • तलांवामधील गाळ काढून जलसाठ्याचे निर्माण
    बुलडाणा, दि. 6 : जिल्ह्यातील अर्वषण ग्रस्त तालुका असलेला सिंदखेड राजा. कायम पाणीटंचाईने ग्रासलेला.. त्यातही साखरखेर्डा परीसर कायम पाणीटंचाईग्रस्त. अशा टंचाईग्रस्त भागाला सुजलाम सुफलाम बनविण्यासाठी या भागात जलयुक्त शिवार अभियान राबविण्यात आले. 26 हजार लोकसंख्येचे मोठे गाव असलेल्या साखरखेर्डा गावाचा समावेश जलयुक्त शिवार अभियानात करण्यात आला. गावच्या शिवारात मोठ्या प्रमाणावर जलयुक्त शिवारची कामे करण्यात आली. या कामांमुळे परिसरात पडून वाहत जाणाऱ्या पावसाचे पाणी जमिनीत मुरत आहे. परिणामी विहीरींची पाणी पातळी वाढून रब्बी हंगाम शेतकरी घेत आहे.
   एवढ्या मोठी लोकसंख्या असलेल्या गावच्या पाणी पुरवठ्याची समस्या जलयुक्त शिवार अभियानामुळे भूजल पातळीत वाढ झाल्यामुळे निकाली निघण्यास यश मिळाले आहे. गावाला ऐतिहासिक व पौराणिकदृष्ट्या महत्वसुद्धा लाभलेले आहे. गावाच्या अवती भवती महालक्ष्मी, गायखेडी व काळ्या पाण्याचे असे तीन तलाव आहे. गावाला कोराडी प्रकल्पातून पाणी पुरविल्या जाते. गाव शिवारात 90 कामे मंजूर करण्यात आली, तर 79 कामे करण्यात आली आहे. या संपूर्ण कामांची माहिती सिमनीक संकेतस्थळावर अपलोड करण्यात आली आहे.
   साखरखेर्डा गावच्या शिवारात या अभियानातंर्गत सिमेंट नाला बांधातील गाळ काढणे व खोलीकरण यासह ढाळीच्या बांधाच्या कामांना शेतकऱ्यांनी उत्स्फुर्त प्रतिसाद मिळाला आहे. अभियानाच्या पहिल्या वर्षी साखरखेर्डा गावाची निवड झाली आहे. त्याचप्रमाणे परिसरात 17 बंधाऱ्यांचे खोलीकरण व रूंदीकरणाचे काम पूर्ण झाले आहे. त्यामुळे परिसरातील विहीरींना जलसंजीवनी मिळाली आहे. त्याचप्रमाणे गावाच्या आसपास असलेल्या महालक्ष्मी, गायखेडी व काळ्या पाणी असलेल्या तलावातील लोकसहभागातून मोठ्या प्रमाणावर गाळ काढण्यात आला.
   सिंदखेड राजा तालुक्यात साखरखेर्डा येथे 13 ठिकाणी नाल्यांचे खोलीकरण करण्यात आले. सिमेंट नाला बांध, महालक्ष्मी व गायखेडी तलावांमधील अंदाजे 2 लाख 30 हजार ट्रॉली गाळ काढण्यात  आला आहे. त्यामुळे मागील 10 ते 15 वर्षात न दिसणाऱ्या विहीरींना पाणी आले आहे. तसेच कमी पाणी असणाऱ्या विहीरींची पाणी पातळी वाढली आहे. गावाची जलयुक्त शिवार अभियानातंर्गत निवड झाल्यानंतर गावात दिंडी, भजन अशा पारंपारिक माध्यमांतून जलजागृती करण्यात आली. तसेच शिवार फेरी काढून गाव शिवारातील जलसंधारण कामांचे ठिकाण निश्चित करण्यात आले. त्यानुसार जलयुक्त शिवारची कामे करण्यात आली. जलयुक्त शिवारच्या कामांमुळे अवर्षण पट्ट्यातील शेतकरी फळबागेकडे वळला आहे. डाळींब फळपिक शेतकरी घेत आहे. तसेच फुलशेतीकडे शेतकरी वळत पारंपारिक शेतीतून आधुनिक शेतीकडे वळला आहे. हा बदल सर्व भूजल पातळी वाढल्यामुळे झाला असून साखरखेर्डा गावचे शिवार पाणीदार झाले आहे. भूजल पातळी जलयुक्त शिवार अभियानामध्ये जलसंधारण व मृद संधारणाची  कामे प्रभावीरित्या झाल्यामुळे निश्चितच वाढली आहे.
                                                                        **********   
    




लोकशाही दिन कार्यवाहीतून न्याय मिळवून द्यावा
-         जिल्हाधिकारी
·        लोकशाही दिन कार्यवाहीत 5 तक्रारी प्राप्त
·        दोन तक्रारी निकाली

     बुलडाणा, दि.4 : सामान्य नागरिकांच्या तक्रारी निवारणासाठी लोकशाही दिन एक सशक्त माध्यम आहे. त्यामुळे लोकशाही दिन कार्यवाहीला नागरिक विविध विभागांच्या संबंधीत तक्रारी दाखल करीत असतात.  या तक्रारींवर विहीत कालावधीत कार्यवाही होवून तक्रारदाराला उत्तर मिळायला पाहिजे. तरी विभागांनी तक्रारींचे निसरन करून तक्रारदाराला समाधान द्यावे, अशा सूचना जिल्हाधिकारी डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार यांनी आज दिल्या. 
   जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात लोकशाही दिनाच्या कार्यवाहीचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी ते बोलत होते. याप्रसंगी मुख्य कार्यकारी अधिकारी षण्मुखराज, अप्पर जिल्हा पोलीस अधिक्षक संदीप डोईफोडे, जिल्हा समाज कल्याण अधिकारी मनेाज मेरत, निवासी उपजिल्हाधिकारी ललीत वराडे, भूमि अभिलेख अधिक्षक श्री. जधवर, तहसीलदार शैलेश काळे आदींसह विविध विभागांचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.
     या लोकशाही दिनामध्ये एकूण 5 तक्रारी प्राप्त झाल्या आहेत. तसेच दोन तक्रारी निकाली काढण्यात आल्या आहेत. निकाली काढण्यात आलेल्या तक्रारी जिल्हा पोलीस अधिक्षक व मुख्य कार्यकारी अधिकारी जि.प बुलडाणा यांच्या संबंधित तक्रारींचा समावेश आहे. लोकशाही दिन कार्यवाहीला संबंधित यंत्रणांचे अधिकारी व जिल्हाधिकारी कार्यालयातील कर्मचारी उपस्थित होते.
******
जलयुक्त शिवार अभियानातील पुरस्कारांचे 8 नोव्हेंबर रोजी वितरण
  • अकोला येथे जलसंधारण मंत्री प्रा. राम शिंदे यांच्याहस्ते वितरण
    बुलडाणा, दि. 6 : जलयुक्त शिवार अभियानात 2015-16 मध्ये उल्लेखनिय कामे केलेली गावे, तालुक यांना मृद व जलसंधारण मंत्री प्रा. राम शिंदे यांच्याहस्ते पुरस्कार वितरण 8 नोव्हेंबर 2017 रोजी दुपारी 3.30 वाजता अकोला येथे जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात आयोजित कार्यक्रमात देण्यात येणार आहे. पुरस्कारांमध्ये जिल्ह्यात येऊलखेड ता. शेगांव या गावाने प्रथम क्रमांक पटकाविला असून साखरखेर्डा ता. सिं.राजा गावाने द्वितीय क्रमांक मिळविला आहे. तसेच आंबेटाकळी , अटाळी व फत्तेपूर ता. खामगांव गावांना अनुक्रमे तृतीय, चतुर्थ व पाचव्या क्रमांकाचा पुरस्कार मिळाला आहे.
    तसेच तालुक्यांमध्ये खामगांव तालुक्याला प्रथम आणि दे.राजा तालुक्याला द्वितीय पुरस्कार मिळाला आहे.  सदर पुरस्कार स्वीकारण्यासाठी सरपंच, ग्रामसेवक, तलाठी, कृषी सहाय्यक व जलयुक्त शिवार अभियानात सक्रीय सहभाग असलेली एक महिला प्रतिनिधी यांना निमंत्रीत करण्यात आले आहे. तसेच तालुका स्तरावरील पुरस्कार स्वीकारण्यासाठी उपविभागीय अधिकारी (महसूल), तहसिलदार, तालुका कृषी अधिकारी व गटविकास अधिकारी यांना निमंत्रीत करण्यात आले आहे, असे जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी यांनी कळविले आहे.

                                                                              ***********