Thursday 31 March 2022

आला उन्हाळा.. तब्येत सांभाळा

आला उन्हाळा.. तब्येत सांभाळा

• उष्णतेच्या लाटेपासून संरक्षण करण्याचे नागरीकांना आवाहन

बुलडाणा,(जिमाका) दि.31 : राज्यात मागील काही दिवसांपासून असलेल्या उष्णतेच्या लाटेमुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे. या लाटेपासून व उष्माघातापासून बचाव करण्याकरीता करावयाच्या उपाययोजनांबाबत जिल्हा प्रशासनाने जनतेला आवाहन केले आहे. भारतीय हवामान खाते, नागपूर अंदाजानुसार 2 एप्रिल 2022 पर्यंत उष्णतेच्या लाटेचा प्रभाव अधिक असणार आहे.

   सर्वसाधारणपणे प्रामुख्याने प्रत्येक वर्षी एप्रिल मध्य, मे, जून या महिन्यामध्ये उष्माघाताचा प्रभाव जाणवत असतो. तसेच त्यामुळे मृत्यू होण्याची संभावना असते. मात्र जिल्ह्यात वाढत्या उष्णतेचा परिणाम आताच जाणवू लागला आहे. उष्माघाताचा परिणाम होऊ नये,यासाठी सर्व जनतेनी आतापासूनच जागृत राहीले पाहीजे, रुग्णांना तातडीने औषधोपचार मिळण्यासाठी अगोदरच तयारी करुन ठेवणे आवश्यक आहे.

 उष्माघातापासून बचावासाठी काय करावे : पुरेसे पाणी पित रहावे, तहान लागलेली नसली तरी जास्तीत जास्त पाणी पिण्यात यावे, केवळ हलक्या रंगाचे सुती कपड्यांचा वापर करावा, हलकी, पातळ व सच्छिद्र सुती कपडे वापरावे, बाहेर जाताना गॉगल्स, छत्री, टोपी, बुट व चपलाचा वापर करण्यात यावा, प्रवास करताना पाण्याची बाटली सोबत घ्यावी, उन्हात काम करीत असलेल्या व्यक्तींनी डोक्यावर टोपी किंवा छत्रीचा वापर करण्यात यावा. तसेच ओल्या कपड्यांनी डोके, मान व चेहरा झाकण्यात यावा. चक्कर येत असल्यास किंवा आजारी वाटल्यास त्वरित डॉक्टराकडे जावे. शरीरातील पाण्याचे प्रमाण कमी होत असल्यास ओआरएस, घरी बनविण्यात आलेली लस्सी,  तोरणी, लिंबुपाणी, ताक आदींचा नियमित वापर करण्यात यावा.

 अशक्तपणा, स्थुलपणा, डोकेदुखी, सतत येणारा घाम आदी उन्हाचा झटका बसण्याची चिन्हे ओळखावीत व तात्काळ डॉक्टरांचा सल्ला घेण्यात यावा. गुरांना अथवा प्राण्यांना सावलीत ठेवण्यात यावे. तसेच त्यांना पुरेसे पिण्याचे पाणी द्यावे. घरे ठंड ठेवण्यासाठी पडदे, शटर व सनशेडचा वापर करण्यात यावा. रात्री खिडक्या उघड्या ठेवण्यात याव्यात. पंखे, ओले कपडे यांचा वापर करण्यात यावा. तसेच थंड पाण्याचे वेळोवेळी स्नान करण्यात यावे. कामाच्या ठिकाणी जवळच थंड पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करण्यात यावी. पहाटेच्या वेळी जास्तीत जास्त कामाचा निपटारा करण्यात यावा. बाहेर कामकाज करीत असताना मध्ये नियमित आराम करण्यात यावा. गरोदर महिला कामगार व आजारी कामगारांची अधिकची काळजी घेण्यात यावी.  

काय करू नये :  शिळे अन्न खाणे टाळावे, तीव्र उन्हात मुख्यत: दुपरी 12 ते 3.30 या कालावधीत उन्हात बाहेर जाणे टाळावे, गडद, घट्ट व जाड कपडे घालण्याचे टाळावे, लहान मुले व पाळीव प्राण्यांना बंद असलेल्या व पार्क केलेल्या वाहनात ठेवू नये, बाहेर तापमान अधिक असल्यास शारिरीक श्रमाची कामे टाळावीत. उनहाच्या कालावधीत स्वयंपाक करण्याचे टाळण्यात यावे. तसेच मोकळ्या हवेसाठी स्वयंपाक करण्याचे टाळण्यात यावे. तसेच मोकळ्या हवेसाठी स्वयंपाक घराची दारे व खिडक्या उघडी ठेवण्यात यावी, असे आवाहन निवासी उपजिल्हाधिकारी दिनेश गिते यांनी केले आहे.

                                                            *****

तृतीय पंथीय ओळख दिनानिमीत्त मतदार नोंदणीची विशेष शिबीरे

           बुलडाणा,(जिमाका) दि.31 : आंतरराष्ट्रीय तृतीय पंथी ओळख दिन 31 मार्च रोजी जगभर साजरा करण्यात येतो. या दिनाचे औचित्य  साधून  महाराष्ट्रातील मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयामार्फत तृतीय पंथीयांच्या मतदार नोंदणी साठी विशेष शिबीरांचे आयोजन करण्यात येत आहे. ही शिबिरे 2 एप्रिल 2022 पर्यंत घेतली जाणार आहेत.

            तृतीय पंथीयांकडे मतदार नोंदणीसाठी आवश्यक कागदपत्रांची असलेली कमतरता लक्षात घेऊन भारत निवडणूक आयोगाने त्यांना कागदतत्रांबाबत सवलत देऊ केली आहे. तृतीय पंथीय 18 ते 21 वयोगटातील ज्यांच्याकडे वयाचा कोणताही पुरावा नसेल, तर त्यांच्या गुरू मॉ ने दिलेले प्रमाणपत्रही पुरावा म्हणून ग्राह्य धरले जाते. तसेच 21 वर्षां वरील तृतीय पंथीयाने वयाचा पुरावा म्हणून स्वतःच वय सांगणारे प्रमाणपत्र दिल्यास अधिकृत मानले जाते. पत्त्याचा पुरावा म्हणून संबंधित व्यक्तीच्या सध्याच्या निवासस्थानी आलेले टपाल सुद्धा पुरावा म्हणून ग्राह्य धरले जाते. या कागदपत्रानुसार नोव्हेंबर 2021 मध्ये झालेल्या विशेष संक्षिप्त पुर्ननिरीक्षण कार्यक्रमातंर्गत म्हणजे मतदार नोंदणीच्या माहिमेमध्ये राज्यभरातून मोठ्या प्रमाणात तृतीय पंथीयांची नोंदणी करून घेण्यात आली होती.

            महाराष्ट्रातील सर्व पात्र तृतीय पंथीय नागरीकांची मतदार यादीत नोंदणी करणे हे मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयाचे उद्दिष्ट आहे. तेव्हा यंदाच्या तृतीय पंथी ओळख दिनाच्या निमित्ताने तृतीय पंथीयांसाठी कार्यरत सामाजिक संस्थांनी आणि व्यक्तींनी या मोहिमेला सहकार्य करून अधिकाधिक तृतीय पंथीयांनी या विशेष सप्ताहात मतदार नोंदणी करावी, असे आवाहन जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी एस.रामामूर्ती व उप जिल्हा निवडणूक अधिकारी श्रीमती गौरी सावंत बुलडाणा यांनी केले आहे. 

Wednesday 30 March 2022

DIO BULDANA NEWS 30.3.2022,1

 खडकी येथे श्रमसंस्कार शिबिर उत्साहात

बुलडाणा, (जिमाका) दि‍. 30 : मोताळा तालुक्यातील खडकी येथे राष्ट्रीय सेवा योजना अंतर्गत शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था, बुलडाणा व्दारा अंतर्गत श्रमसंस्कार शिबीर नुकतेच उत्साहात पार पडले. या शिबिरात 70 विद्यार्थी सहभागी झाले होते. दरम्यान, या शिबीरामध्ये ग्रामस्वच्छता, अंधश्रध्दा, कौशल्यातुन समृध्द जीवन, महिलांचे सक्षमीकरण, अधिकार व कायदे, व्यसनमुक्ती अशा विविध विषयांवर समाजप्रबोधनाबरोबरच गा्रमस्वच्छता, शोषखडयांची निमिर्ती, जि.प. प्राथमिक शाळेची संपूर्ण रंगरंगोटी, प्लंबिंग ची कामे, मंदिराचे वायरींगची कामे, ग्रामस्थांच्या घरातील विद्युत दुरुस्तीचे काम, स्मशान भुमीचे सुशोभिकरण व वृक्षारोपण यासारखी समाज उपयोगी कामासोबत वनराई बंधाऱ्यांची निर्मिती करण्यात आली.

 शिबिरानिमीत्त दररोज सायंकाळी विविध सांस्कृतिक कार्यक्रम घेण्यात आले. यात ग्रामवासी मोठया संख्येने सहभागी झाले. सदर श्रमसंस्कार शिबिराचे उद्घाटन जिल्हा व्यवसाय शिक्षण व प्रशक्षिण अधिकारी व्ही. बी बचाटे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी औ.प्र.संस्था प्राचार्य प्रकाश खुळे उपस्थित होते. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी रासेयाचे कार्यक्रम अधिकारी भूजंग राठोड, एन.टी वरोकार, दिपक वाहेकर, राहूल कापसे, अविनाश गवई, रामेश्वर मूळे, अंजली कापसे, पल्ल्वी कोलते, संदिप राठोड, किशोर होनाळे, अरुण राठोड गावातील महिला व तरुण मंडळीनी विशेष सहकार्य केले.

*******

विभागीय रोजगार मेळाव्याचे आयोजन

बुलडाणा, (जिमाका) दि‍. 30 :  कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता, विभागीय आयुक्तालय, अमरावती यांच्या विद्यमाने विभागीय रोजगार मेळाव्याचे आयोजन 31 मार्च रोजी करण्यात आलेले आहे. सदर मेळाव्यामध्ये नामांकीत खासगी उद्योजक/कंपनी/त्यांचे प्रतिनिधी विविध पदासाठी ऑनलाईन भरती प्रक्रिया राबवतील. दहावी, बारावी, आय.टी.आय, पदवीका अथवा पदवी धारक पात्र पुरुष व महिला उमेदवारांना ऑनलाईन अप्लॉय करुन या ऑनलाइन रोजगार मेळाव्यात सहभागी होता येईल.

            कौशल्य विकास व उद्योजकता विभागाच्या www.mahaswayam.gov.in   या संकेतस्थळावर नांव नोदणी केलेल्या दहावी, बारावी, आय.टी.आय, पदवीका अथवा पदवी धारक पात्र पुरुष व महिला उमेदवारांनी आपल्या सेवायोजन कार्ड (Employment card) चा युजर व पासवर्ड वापर करुन आपल्या लॉगीन मधुन ऑनलाइन अप्लॉय करु शकतात. ऑनलाईन अप्लाय केलेल्या उमेदवारांच्या कंपनी, उद्योजक, एच.आर. प्रतिनिधी यांचे कडून ऑनलाईन मुलाखती घेवुन निवड प्रक्रिया राबवतील. तरी जास्तीत जास्त उमेदवारांनी आपल्या शैक्षणिक पात्रतेच्या आधारे प्रस्तुत रोजगार मेळाव्याला ऑनलाईन अप्लाय करण्याचे आवाहन सहायक आयुक्त श्रीमती प्रा.यो.बारस्कर यांनी केले आहे.

*****

दुकानांचे नामफलक मराठी भाषेत असणे अनिवार्य

·         दारुच्या दुकानांवर महापुरूषांचे व किल्ल्यांचे नावे टाकण्यास बंदी

बुलडाणा, (जिमाका) दि‍. 30 : प्रत्येक दुकानाचे नामफलक सुरूवातीला मराठी भाषेत नाव असणे बंधनकारक असल्याची तरतुद महाराष्ट्र दुकाने व आस्थापना नोकरीचे व सेवाशर्तीचे विनयिम अधिनियम, 2017 मध्ये सुधारणेद्वारे करण्यात आली आहे. उक्त अधिनियमाच्या कलम 7 अन्वये ज्या आस्थापनेत 10 पेक्षा कमी कामगार आहे. अशा सर्व आस्थापनांना कलम 36 क (1), कलम 6 अन्वये नोंदणी केलेल्या प्रत्येक आस्थापनेत 10 पेक्षा अधिक कामगार आहे. अशा सर्व आस्थापनेच्या नामफलक देवनागरी लिपीतील मराठी भाषेमध्ये असणे बंधनकारक राहील. मात्र अशा आस्थापनेच्या नियोक्त्याकडील देवनागरी लिपीतील मराठी भाषे व्यतिरिक्त इतर कोणत्याही भाषेतील व लिपीतील नामफलक देखील असू शकतात. मराठी भाषेतील अक्षरलेखन नामफलकावर सुरूवातीलाच लिहीणे आवश्यक असेल व मराठी भाषेतील अक्षराचा टंक अर्थात फाँट, आकार इतर कोणत्याही भाषेतील अक्षरांच्या आकारापेक्षा लहान असणार नाही याची दक्षता घ्यावी. ज्या आस्थापनांमध्ये मद्य पुरविले जाते किंवा विकले जाते. अशी दुकाने नामफलकावर महान व्यक्तींची किंवा गड किल्यांची नावे लिहीणार नाही, असा बदल शासनाने 17 मार्च 2022 रोजी सदर अधिनियमात केला आहे. जिल्हयातील सर्व अस्थापना मालकांनी उक्त तरतुदींचे तंतोतंत पालन करावे. सदर तरतुदीचे भंग करणाऱ्या आस्थापना मालका विरुध्द करवाई करण्यात येईल. याची नोंद घेण्यात यावी, असे आवाहन सरकारी कामगार अधिकारी आ.शि. राठोड यांनी केले आहे.

******


DIO BULDANA NEWS 30.3.2022

 माजी सैनिकांकरीता पुणे येथे सदनिका राखीव

·                     15 एप्रिल 2022 अर्ज करण्याची अंतिम मुदत

बुलडाणा, (जिमाका) दि‍. 30 : संरक्षण दलातील किंवा सिमा सुरक्षा दलातील लढाईत मृत झालेल्या व्यक्तींचे कुटूंबिय अथवा लढाईत जखमी होवून अपंग झालेले माजी सैनिक यांच्या करिता सदनिका पुणे येथे राखीव ठेवण्यात आल्या आहे. यामध्ये अपंग झालेल्या माजी सैनिकांकरीता 15 सदनिका, माजी सैनिक व त्यांच्यावर अवलंबून असणाऱ्या व्यक्ती यांच्याकरिता 16 सदनिका अशा 31 सदनिका राखीव ठेवण्यात आलेल्या आहे. पुणे गृहनिर्माण व क्षेत्रविकास मंडळामार्फत बांधण्यात आलेल्या सदनिकांच्या विक्रीकरिता सोडत काढण्यात येत आहे. ताथवडे, पुणे येथे पुणे गृहनिर्माण व क्षेत्रविकास मंडळाकडून बांधण्यात आलेल्या 680 मध्यम उत्पन्न गटाच्या सदनिकांची जाहिरात प्रसिध्दी करण्यात आलेली आहे. सदर योजना मुंबई- बंगलोर हायवे लगत आहे. सदर योजने अंतर्गत सदनिकांचे चटई क्षेत्र फळ 851.00चौ. फुट इतके असून या गाळयांची किंमत रु 68.00 लक्ष (कार पार्किंगसहित) आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 15 एप्रिल 2022 आहे.  म्हाडाचे ऑनलाईन अर्जाकरिता संकेतस्थळ :https://lottery.mahada.gov.in आहे. तसेच  हेल्पलाईन नं. 020-26592692,26592693 भ्रमणध्वनी क्रमांक 9869988000 असून बँकेचा हेल्पलाईन क्रमांक 020-26151215 आहे.  ऑनलाईन पेमेंटच्या अधिक माहितीसाठी संपर्क 8806110088 असून ई-मेल kalpesh.lawanghare@payu.in असा आहे, असे सहा. जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी यांनी कळविले आहे.

*****

  


महिलांच्या लैंगिक छळास प्रतिबंध

करण्यासाठी अंतर्गत तक्रार निवारण समिती स्थापन करावी

-          जिल्हाधिकारी एस रामामूर्ती

·                     कामाच्या ठिकाणी महिलांच्या लैंगिक छळास प्रतिबंध करणे या विषयावर कार्यशाळा

बुलडाणा, (जिमाका) दि‍. 30 : ज्या संस्थेत 10 पेक्षा जास्त कर्मचारी आहे, त्या ठिकाण अंतर्गत तक्रार निवारण समिती गठीत करणे बंधनकारक केले आहे. अंतर्गत समिती स्थापन न करणाऱ्या कार्यालयांचे परवाना रद्द किंवा व्यवसाय पुढे सुरू ठेवण्यास मनाई करण्यात येईल. सदर अधिनियमाची प्रभावी अंमलबजावणी व कार्यवाही सर्व कार्यालय प्रमुखांनी करावी, अशा सूचना जिल्हाधिकारी एस रामामूर्ती यांनी दिल्या आहे.

   कामाच्या ठिकाणी महिलांच्या लैंगिक छळास प्रतिबंध करणे या विषयावर एक दिवसीय कार्यशाळेचे आयोजन 29 मार्च रोजी जिल्हाधिकारी कार्यालयाच्या नियोजन समिती सभागृहात करण्यात आले. कार्यशाळेचे आयोजन जिल्हाधिकारी कार्यालय व जिल्हा महिला व बालविकास अधिकारी कार्यालय यांचे संयुक्त विद्यमाने करण्यात आले. कार्यशाळेचे उद्घाटन जिल्हाधिकारी एस रामामूर्ती यांच्याहस्ते करण्यात आले. यावेळी प्रमुख उपस्थितीत नारी शक्ती पुरस्कार प्राप्त कु. वनिता बोराडे, महिला व बालविकास अधिकारी  अशोक मारवाडी, प्रा. सौ. अनुजा सावळे, विष्णू आव्हाळे आदी उपस्थित होते.  

   सदर कार्यशाळेचे आयोजन जिल्ह्यातील सर्व शासकीय, निमशासकीय कार्यालयात व इतर खाजगी क्षेत्र, एंटरप्रायजेस, सहकारी संस्था, क्रीडा संकुले, प्रेक्षागृहे, मॉल्स, अशासकीय संघटना, ट्रस्ट, रूग्णालये, सुश्रुषालये, क्रीडा संस्था, वाणिज्य, शैक्षणिक, औद्योगिक कार्यालयांसाठी करण्यात आले.  याप्रसंगी सर्पमित्र कु. वनिता बोराडे यांना नारी शक्ती पुरस्कार प्राप्त झाल्यामुळे त्यांचा सत्कार करण्यात आला. प्रा. सौ. अनुजा सावळे यांनी पॉस्को ॲक्टची प्रभावी अंमलबजावणी करण्याचे मनोगत व्यक्त केले. कामाच्या ठिकाणी महिलांचे लैंगिक छळापासून संरक्षण (प्रतिबंध, मनाई व निवारण) अधिनियम 2013 मधील कलम 26 नुसार जर एखाद्या मालकाने (अ) अंतर्गत तक्रार समिती स्थापन केली नाही, कलम 13, 14, 22 नुसार कारवाई केली नसल्यास कायद्यातील व नियमातील विविध तरतुदींचे व जबाबदाऱ्यांचे पालन न केल्यास मालकाला 50 हजार रूपयापर्यंत दंड करण्यात येणार आहे. हाच प्रकार पुन्हा घडल्यास परवाना रद्द, दुप्पट दंड अशी तरतूद आहे. याबाबत कार्यशाळेत प्रशिक्षण तालुका संरक्षण अधिकारी रामेश्वर वसु यांनी दिले.  कार्यशाळेला महात्मा फुले समाजकार्य महाविद्यालयाचे विद्यार्थी, गणराज फाऊंडेशनचे पदाधिकारी आदींसह विविध कार्यालयातील महिला अधिकारी, कर्मचारी उपस्थित होत्या. संचलन श्रीमती तायडे यांनी तर आभार प्रदर्शन दादाराव चव्हाण यांनी केले.

 


एच.आय.व्ही संसर्गित व्यक्तींना शासकीय योजनांचा लाभ देण्याची कार्यवाही करावी

-          अप्पर जिल्हाधिकारी

 

बुलडाणा, (जिमाका) दि‍. 30 : एच.आय.व्ही संसर्गित व्यक्ती व अतिजोखमीच्या व्यक्तींना विविध शासकीय योजनांचा लाभ देण्यासाठी जिल्हा प्रशासन कटिबध्द आहे. यामध्ये अशासकीय संस्थांनी आपले काम वाढवावे. रक्त संकलन शिबीरांमध्ये विविध शासकीय विभागांतील अधिकारी व कर्मचारी यांनी एकत्र येऊन रक्तदान करावे जेणेकरुन जिल्हयामध्ये रुग्णांकरीता रक्तसाठा उपलब्ध राहील, अशा सूचना अप्पर जिल्हाधिकारी धनजंय गोगटे यांनी आज दिल्या. जिल्हाधिकारी कार्यालयाच सभागृहात जिल्हा एड्स प्रतिबंध व नियंत्रण समिती, एचआयव्ही टि. बी समन्वय समितीची सभेचे आयोजन 30 मार्च रोजी करण्यात आले. त्यावेळी ते बोलत होते.

   या सभेला अति. जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.मिनाक्षी बनसोड, जिल्हा क्षयरोग अधिकारी डॉ.ए.व्हि. खिरोडकर, निवासी वैद्यकीय अधिकारी डॉ. यस्मीन चौधरी, वैद्यकीय अधिकारी (टिबीएस) डॉ.आनंद कोठारी, जिल्हा कार्यक्रम अधिकारी  प्रमोद टाले, वैद्यकीय अधिकारी ( एआरटी), डॉ.सुनिल राजपुत, अशासकिय संस्थेचे कर्मचारी, डापकु व एआरटी कर्मचारी यांची उपस्थिती होती. जिल्हा कार्यक्रम अधिकारी प्रमोद टाले यांनी माहे जानेवारी ते मार्च च्या एच.आय.व्ही तपासणीचा व उपचाराचा आढावा दिला. सभेमध्ये रक्तपेढी, गुप्त आजार तपासणी केंद्र, टिबी, अशासकीय संस्था यांच्या कामाचा आढावा घेतला. सभेला संबंधित विभागांचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

                                                                                *********

 

Tuesday 29 March 2022

DIO BULDANA NEWS 29.3.2022

 


समृद्धी महामार्गाच्या कामाची सार्वजनिक बांधकाम मंत्री

एकनाथ शिंदे यांच्याकडून पाहणी

बुलडाणा, (जिमाका) दि. 29 : राज्याचे नगर विकास व सार्वजनिक बांधकाम (सार्वजनिक उपक्रम) मंत्री एकनाथ शिंदे यांनी आज मेहकरजवळील फर्दापूर इंटरचेंजजवळ हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे समृद्धी महामार्गाची पाहणी केली. यावेळी केंद्रीय ग्रामविकास समिती अध्यक्ष तथा खासदार प्रतापराव जाधव, माजी वनमंत्री संजय राठोड, आमदार संजय गायकवाड, तहसिलदार संजय गरकल, तसेच सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकारी उपस्थित होते. पाहणी दरम्यान मंत्री श्री. शिंदे यांनी उर्वरित कामे तातडीने पूर्ण करण्याच्या सूचना दिल्या.

************

बुलडाणा महसूल विभागाला विविध प्रकारात मिळाले बक्षीस

  • अमरावती विभागीय महसूल क्रिडा व सांकृतिक स्पर्धा

  बुलडाणा, (जिमाका) दि. 29 : महसूल विभागाच्या अमरावती विभाग स्तरीय क्रिडा व सांस्कृतिक स्पर्धा बुलडाणा येथे पार पडल्या. ज्यामध्ये अमरावती महसूल विभागातील अमरावती, अकोला, यवतमाळ, वाशिम व  जिल्हयासहीत विभागीय आयुक्त कार्यालय अमरावती यांनी सहभाग घेतला होता. यामध्ये जिल्हयाने  समुह नृत्य, गायन,  वादन , नाटक, एकल नृत्य, समुह गीत, यांसारख्या विविध कलाप्रकराचे प्रदर्शन बुलढाणा THE FIRE रुकेगा नही या शिर्षकाखाली केले. ज्यामध्ये जिल्हयातील महसूल अधिकारी व कर्मचारी यांनी उस्फूर्त सहभाग घेतला.

   निवासी उपजिल्हाधिकारी दिनेश गीते यांनी आपल्या दमदार आवाजात खैके पान बनारस वाला हे गीत सादर केले. या गीताने उपस्थित रसिकांची मने जिंकली. विभागातील उत्कृ‌ष्ट गायक म्हणून दिनेश गीते यांना गौरविण्यात आले. याचबरोबर 

उत्कृष्ट युगल नृत्य प्रकारात शिवराज्याभिषेक, उत्कृष्ट नक्कलमध्ये किशोर जाधव, उत्कृष्ट वादन  सारंग फाळके, उत्कृष्ट रंगभुषा  विजय पाटील (नायब तहसिलदार), उत्कृष्ट युगल गीत गायक  अतुल गवई व अश्विनी जवंजाळ, उत्कृष्ट सांस्कृतीक कला सादरीकरणामध्ये अमरावती विभागात बुलढाणा जिल्हयाने व्दितीय क्रमांक पटकाविला. 

       याचबरोबर अमरावती महसूल विभागाची GENERAL CHAMPIONSHIP जिल्हयाला मिळाली.  क्रिडा स्पर्धेतही क्रिकेट विजेते पदाचा बहुमान जिल्ह्याला मिळाला.   जिल्हाधिकारी एस. रामामुर्ती यांना  लॉन टेनिस, तहसिलदार आश्विनी जाधव बॅडमिंटन, तहसिलदार संजय गरकल लॉन टेनिस, तहसिलदार रुपेश खंडारे बुध्दीबळ, तहसिलदार सैफन नदाफ   क्रिकेट मॅन ऑफ द सिरिज, तहसिलदार शितल सोलाट  ॲथेलेटिक्स क्रीडा प्रकारात  विजेते पद मिळवून दिले.

  या स्पर्धेचे बक्षीस वितरण  26 मार्च 2022 रोजी गर्दे सभागृह येथे  विभागीय आयुक्त पीयूष सिंह यांचे अध्यक्षतेखाली मुख्य कार्यकारी अधिकारी श्रीमती भाग्यश्री विसपुते यांचेहस्ते झाले.  सांकृतिक कार्यक्रमाची परिक्षण नाटय दिग्दर्शन जयंत दलाल, तसचे नृत्य निपुण सौ. रोहिणी देशमुख  व गायक अरविंद तळणीकर यांनी केले. 

  या कार्यक्रमास जिल्हाधिकारी एस. रामामुर्ती,  अपर जिल्हाधिकारी धनंजय गोगटे यांचे मार्गदर्शन लाभले.  कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन निवासी उपजिल्हाधिकारी दिनेश गिते यांनी केले. सांकृतिक कार्यक्रमाचे निवेदन शिवानंद वाकदकर यांनी  हेमंत पाटील यांनी आपल्या तडफदार शैलीत केले.   हा कार्यक्रम अमरावती विभागातील सर्व जिल्हाधिकारी, महसूल अधिकारी , कर्मचारी, यांचे उपस्थितीत पार पडला.

                                                                                ******

Monday 28 March 2022

DIO BULDANA NEWS 28.3.2022

 




विकेल ते पिकेल अभियानातून शेतमालाची मूल्यसाखळी विकसित होईल

-         किसन मुळे

  • जिल्हास्तरीय कृषि महोत्सवाचे जिल्हाधिकारी यांच्याहस्ते उद्घाटन
  • कृषि महोत्सवात अन्नधान्य प्रदर्शनी व विक्री

बुलडाणा, (जिमाका) दि. 28 : राज्य शासन शेतकऱ्यांचे उत्पादन वाढविण्यासाठी विविध पातळ्यांवर प्रयत्न करीत असते. वाढत्या उत्पादकतेतून शेतमालाचा दर्जा चांगला ठेवत शेतमालाची मूल्यसाखळी विकसित होणे काळाची गरज आहे. ग्राहकाभिमुख विचार करीत जे विकेल ते पिकविले पाहिजे. राज्य शासन यासाठी विकेल ते पिकेल अभियान राबवित आहे. या अभियानातून शेतमालाची मूल्यसाखळी विकसित होत आहे, असे प्रतीपादन अमरावती विभागाचे कृषि सहसंचालक किसन मुळे यांनी आज केले.

   स्थानिक जिजामाता महाविद्यालयाच्या प्रांगणात जिल्हास्तरीय एकदिवसीय कृषि महोत्सव प्रदर्शनी व विक्रीचे आयोजन करण्यात आले आहे. या महोत्सवाचे उद्घाटन फित कापून जिल्हाधिकारी एस रामामूर्ती यांच्याहस्ते करण्यात आले. या उद्घाटनीय कार्यक्रमाचे आयोजन 28 मार्च रोजी करण्यात आले. त्यावेळी विभागीय कृषि सहसंचालक श्री. मुळे बोलत होते. याप्रसंगी व्यासपीठावर जिल्हाधिकारी एस रामामूर्ती, जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी नरेंद्र नाईक, बुलडाणा कृषि विज्ञान केंद्राचे वरिष्ठ शास्त्रज्ञ डॉ. सी. पी जायभाये, डॉ. पंजाबराव देशमुख कृषि विद्यापीठाचे संशोधन अभियंता डॉ. प्रमोद बकाने, कृषि विकास अधिकारी श्रीमती अनिसा महाबळे, कृषी उपसंचालक श्री. बेतीवार, उपविभागीय कृषि अधिकारी सर्वश्री संतोष डाबरे, श्री. पटेल, श्री. मिसाळ, डॉ. पीडीकेव्ही समिती सदस्य विनायक सरनाईक, कृषि विज्ञान केंद्र जळगांव जामोदचे प्रमुख विकास जाधव, जिजामाता महाविद्यालयाचे प्राचार्य श्री. कोटे आदी उपस्थित होते. उद्घाटनांनतर जिल्हाधिकारी यांनी प्रत्येक स्टॉल ला भेट देत पाहणी केली.

    शेतमालाच्या जास्तीत जास्त विक्रीसाठी ग्राहकाभिमुख विपणन व्यवस्था उभारण्याचे आवाहन करीत विभागीय कृषि सहसंचालक श्री. मुळे म्हणाले, शेतमालाचा दर्जा चांगला ठेवण्यात यावा. शेतकरी उत्पादक कंपन्या, शेतकरी गट यांनी शेतमालाच्या मूल्यवर्धनासाठी प्रयत्न करावे. शेतमाल जागतिक स्तरावर पोहोचविण्यासाठी शेतमालाला भौगोलिक मानांकन मिळविण्यासाठी प्रयत्न करण्यात येत आहे. राज्य शासनाच्या स्मार्ट उपक्रमात शेतकरी उत्पादक कंपनीला 60 टक्के अनुदान देण्यात येते. त्यामुळे या उपक्रमाचा शेतकऱ्यांनी लाभ घ्यावा.

    प्रास्ताविकात जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी श्री. नाईक म्हणाले, कृषि महोत्सवातून विचारांची देवाण – घेवाण होते. तसेच शेतीतील नवनवीन प्रयोग, उपक्रम व तंत्रज्ञानाचीही देवाण घेवाण होते. मागील दोन वर्षात कोरोनामुळे अशाप्रकारचे आयोजन करता आले नाही. आता परिस्थिती सुधारत असल्यामुळे कृषि क्षेत्रातील ज्ञानोत्सवाचे आयोजन करण्यात आले.

   यावेळी नांद्राकोळी गावचे शेतकरी तथा माजी सरपंच संजय काळवाघे यांनी पोकरा योजनेचे लाभ सांगितले. कार्यक्रमादरम्यान मान्यवरांच्याहस्ते कृषि विभागाच्या योजनांची माहिती देणाऱ्या पॉकेट डायरी व हस्तपत्रकाचे विमोचन करण्यात आले. त्यानंतर मागील काळात राज्य शासनाचे विविध पुरस्कार प्राप्त व पिक स्पर्धेतील विजेत्या शेतकऱ्यांचा सत्कार करण्यात आला. यामध्ये बाळकृष्ण वासुदेव पाटील कंडारी ता. नांदुरा, विठोबा दंदाळे खल्याळगव्हाण ता. दे.राजा, प्रल्हाद संपत गवते मंगरूळ ता. चिखली, सौ. अनिता रामसिंग पवार, मलगी ता. चिखली, संजय ज्ञानेश्वर चिबळे, भगवान आश्रुजी काकडे टिटवी ता. लोणार, विमलताई विजयराव टापरे, वच्छला नारायण कोकाटे, सौ. वसुधा विजय चांगडे, श्रीकांत पवार पाडळी, विजय भुतेकर सवणा ता. चिखली, जयश्री संजय पाखरे रोहीणखेड ता. मोताळा, महेश उन्हाळे तांदुळवाडी ता. मलकापूर, रूपेश थोरात धानोरा ता. नांदुरा, अनिल मेटांगे येऊलखेड ता. शेगांव, ताराबाई गजानन करळे मडाखेड ता. जळगांव जामोद, मोहन आगरकर बोडखा ता. संग्रामपूर, खासदार प्रतापराव गणपतराव जाधव मादनी ता. मेहकर, प्रकाश विठोबा नरवाडे बागुलखेड ता. लोणार, प्रदीप जायभाये रूमणा ता. सिं.राजा, विकास चेके सरंबा ता. दे.राजा, अमद घट्टे सायखेड ता. संग्रामपूर, रामेश्वर रिंढे मेहकर आदींचा समावेश होता.  संचलन उमेश जाधव यांनी तर आभार प्रदर्शन उपसंचालक श्री. बेतीवार यांनी केले. कार्यक्रमाला शेतकरी उत्पादक कंपनीचे पदाधिकारी, शेतकरी गट, शेतकरी बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.

                                                            **********   

नगर विकास व सार्वजनिक बांधकाम मंत्री एकनाथ शिंदे यांचा दौरा

बुलडाणा, (जिमाका) दि. 28 : राज्याचे नगर विकास व सार्वजनिक बांधकाम (सार्वजनिक उपक्रम) मंत्री एकनाथ शिंदे दिनांक 29 मार्च 2022 रोजी जिल्हा दौऱ्यावर येत आहे. त्यांचा दौरा कार्यक्रम पुढीलप्रमाणे आहे : दिनांक 29 मार्च रोजी दु. 2 वाजता समृद्धी महामार्ग नजिक फर्दापूर ता. मेहकर येथील हेलिपॅडवर आगमन व मोटारीने मेहकरकडे प्रयाण, दु 2.30 वा आकाशवाणी टॉवर, रामनगर, मेहकर येथे आगमन,  चि. अभिषेक व चि. सौ. का डॉ. नयन यांचे शुभ विवाहास उपस्थिती, दु 3 वाजता मेहकर येथून फर्दापूरकडे मोटारीने प्रयाण, दु. 3.30 वा फर्दापूर येथे आगमन व हेलिपॅडवरून खाजगी हेलिकॉप्टरने ठाणेकडे प्रयाण करतील

Sunday 27 March 2022

DIO BULDANA NEWS 27.3.2022

 छत्तीसगडचे  मुख्यमंत्री भूपेष बघेल यांचा दौरा

बुलडाणा, (जिमाका) दि. २७ :  छत्तीसगड चे मुख्यमंत्री भुपेष बघेल दिनांक २८ मार्च २०२२ रोजी जिल्हा दौऱ्यावर येत आहे. त्यांचा दौरा कार्यक्रम पुढील प्रमाणे आहे : दिनांक २८ मार्च रोजी  सकाळी १०.३० वाजता रायपूर येथून विमानाने अकोलाकडे प्रयाण, दुपारी १२ वाजता अकोला विमानतळ येथे आगमन व मोटारीने शेगाव कडे प्रयाण, दुपारी १२.३० वाजता शेगाव येथे आगमन संत गजानन महाराज मंदिर दर्शन, दुपारी १ वाजता ओबिसी समाज अधिकार संमेलनास उपस्थिती, दुपारी २.३० वाजता शेगाव येथून मोटारीने अकोला कडे प्रयाण, दुपारी ३ वाजता अकोला विमानतळ येथे आगमन व विमानाने स्वामी विवेकानंद विमानतळ रायपूर (छत्तीसगड) येथे आगमन करतील. 
*****
महिला व बालविकास मंत्री अॅड यशोमती ठाकूर यांचा दौरा
बुलडाणा, (जिमाका) दि. २७ :  राज्याचे महिला व बालविकास मंत्री अॅड यशोमती ठाकूर दिनांक २८ मार्च रोजी सकाळी ५.१० वाजता मलकापूर रेल्वे स्टेशन येथे आगमन व बुलडाणा कडे प्रयाण, सकाळी ६.१५ वाजता रेसिडेन्सी क्लब, बुलडाणा येथे आगमन व राखीव, सकाळी ८ वाजता बुलडाणा रेसिडेन्सी क्लब येथे जिल्हाधिकारी व जिल्हा पोलिस अधीक्षक यांच्यासमवेत चर्चा, सकाळी ८.३० वाजता माजी आमदार हर्षवर्धन सपकाळ यांच्या निवास स्थानी कोरोना एकल महिला पुनर्वसन समिती, बुलडाणा मंडळास भेट, सकाळी ८.४५ वाजता माजी आमदार हर्षवर्धन सपकाळ यांच्या निवास स्थानी  मोताळा नगर पंचायत चे नवनिर्वाचित नगराध्यक्ष व सदस्य यांच्या समवेत भेट आणि चर्चा, सकाळी ९.३० वाजता बुलडाणा येथून पळसखेडकडे प्रयाण, सकाळी १०.१५ वाजता पळसखेड सपकाळ येथे नंदकुमार पालवे व आरती पालवे यांच्या सेवा संकल्प संस्थेला भेट, सकाळी १०.४५ वाजता पळसखेड सपकाळ येथून शेगावकडे प्रयाण, दुपारी १२ वाजता शेगाव येथे आगमन व स्व. गजाननदादा पाटील मार्केट वॉर्ड मध्ये आयोजित ओबीसी समाज अधिकार संमेलनास उपस्थिती, सोयीनुसार शासकीय वाहनाने अमरावती कडे प्रयाण करतील. 
******
जिल्हास्तरीय कृषी महोत्सवाचे २८ मार्च रोजी आयोजन
बुलडाणा, (जिमाका) दि. २७ :  कृषि विभाग व कृषी तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणा यांच्या संयुक्त विद्यमाने २८ मार्च रोजी सकाळी १० वाजता जिल्हास्तरीय कृषी महोत्सवाचे आयोजन जिजामाता महाविद्यालय क्रीडांगण, मोठी देवी मंदिराच्या मागे, बुलडाणा या ठिकाणी करण्यात येत आहे. शेतकऱ्यांना विविध तंत्रज्ञानाची माहिती मिळावी व शेतकऱ्यांनी उत्पादीत केलेल्या मालाची विक्री व्हावी हा उद्देश या प्रदर्शनीचा असून या महोत्सवात शेतकऱ्यांना शेती क्षेत्रातील विविध तंत्रज्ञान, विज्ञान, योजना, मार्केटिंग इत्यादी बाबत मार्गदर्शन करण्यात येणार आहे. तसेच धान्य महोत्सवात आपण विविध प्रकारचे धान्य थेट शेतकऱ्यांकडून खरेदी करू शकणार आहात. यामध्ये सेंद्रिय भाजीपाला, फळे, धान्य याचा प्रामुख्याने समावेश राहणार आहे. ही प्रदर्शनी सर्वांसाठी सकाळी १० ते रात्री ८ वाजेपर्यंत खुली असणार आहे.  आपण सर्वांनी प्रदर्शनीस अवश्य भेट देऊन शेतकऱ्यांकडील उत्पादीत सेंद्रीय माल खरेदी करावा. तसेच कोरोना नियमांचे पालन करावे,  असे आवाहन जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी नरेंद्र नाईक यांनी केले आहे.

Friday 25 March 2022

DIO BULDANA NEWS 25.3.2022

 जागृती ॲग्रो फुड्स इंडिया कंपनीने फसवणूक केली असल्यास संपर्क साधावा

• आर्थिक गुन्हे शाखेचे आवाहन

बुलडाणा,(जिमाका) दि. 25 : जागृती ॲग्रो फुड्स इंडिया प्रा.लि. मार्केट यार्ड, चेंबर भवन, सांगली या कंपनीने गुंतवणूकी वरील परताव्याचे पैसे परत न करता विश्वासघात करून फसवणूक केली आहे. अशी फिर्याद 16.9.2015 रोजी बुलडाणा शहर पोलीस स्टेशन येथे दिली आहे. त्यानुसार पोलीसांनी राज गणपत गायकवाड व इतर 11 आरोपीविरूद्ध कलम 420, 406, 34 भादंवि प्रमाणे गुन्हा दाखल केला आहे.

   कंपनीकडे 5000 रूपये जमा केल्यास कंपनी एक शेळी खरेदी करणार होती. शेळी 7 महिन्यामध्ये एकवेळ 2 पिल्लांना जन्म देते. एक शेळी 14 महिन्यात 4 पिल्लांना जन्म देते, तसेच 14 महिन्यात एक पिल्लू किंवा 4 हजार रूपये ग्राहकाला परतावा म्हणून देणार व शेळीची रक्कम कंपनीकडे तशीच जमा राहणार. दरवर्षी शेळीचा घसारा 20 टक्के अर्थात 1 हजार रूपये कपात होणार, परतावामध्ये 14 महिन्यांची एक टर्म धरण्यात आली होती. तसेच 5 टर्म पूर्ण केल्यानंतर व दरवर्षी परतावा परत न घेतल्यास कंपनीकडे ग्राहकाने विश्वास दाखविला म्हणून एकदम 10 शेळीचे पिल्ले परत करणार व रोख रक्कम हवी असल्यास त्या 10 पिल्लांचा दर प्रत्येकी 5 हजार रूपये गृहीत धरण्यात येईल, असे एकूण 50 हजार रूपये ग्राहकास देण्यात येतील. अशी कंपनीची परतावा पॉलीसी होती. जागृती ॲग्रो फुड्स इंडिया प्रा. लि. या कंपनीने व त्याचे मालक तसेच संचालक मंडळ यांनी मल्टी मार्केटींग पद्धतीने गुंतवणूकदारांकडून पैसे घेवून ते मुदतीत परत न करता गुंतवणूकदारांचा विश्वासघात करून फसवणूक केली आहे.  

   तरी राज गणपत गायकवाड व इतर 11 आरोपींनी अन्य जनतेची देखील अशा प्रकारची फसवणूक केल्याची शक्यता आहे. अशा प्रकारची फसवणूक झालेले आणखी जिल्ह्यातील काही व्यक्ती असल्यास त्यांनी आर्थिक गुन्हे शाखा, बुलडाणा येथे संपर्क साधावा किंवा स्वत: आपला जबाब नोंदविणे कामी आपल्याजवळ असलेल्या मूळ कागदपत्रांसह आर्थिक गुन्हे शाखा, भारत शाळेचे समोर, पोलीस स्टेशन, बुलडाणा शहरचे आवार, बुलडाणा येथे उपस्थित रहावे किंवा मोबाईल क्रमांक 9823327105, 7972571699 व 07262-245989 वर संपर्क साधावा, असे आवाहन पोलीस निरीक्षक अनिल बेहरानी आर्थिक गुन्हे शाखा, बुलडाणा यांनी केले आहे.

                                                            ***********

   


पोषण पंधरवडा अंतर्गत दहीद बु येथे सायकल रॅली

बुलडाणा,(जिमाका) दि. 25 : तालुक्यातील दहीद बु येथे अंगणवाडी केंद्रातमार्फत पोषण पंधरवडा निमित्ताने गावातील मुल मुलींकारिता सायकल रॅलीचे आयोजन करण्यात आले होते. पोषण अभियाना अंतर्गत पोषण पंधरवडा दिनांक 21 मार्च ते 4 एप्रिल अंतर्गत राबविण्यात येत आहे. त्यानुसार दहीद बु येथे सायकल रॅलीचे आयोजन करण्यात आले होते. रॅलीत गावातील विद्यार्थी, अंगणवाडी केंद्रातील लाभार्थी तसेच किशोरवयीन मुलींनी उस्फूर्त पणे सहभाग नोंदविला.

    सायकल चालविल्यामुळे बालकांचा व्यायाम होऊन शारीरिक व मानसिक आरोग्य सुधारण्यास मदत होऊन सायकल चालविण्यामुळे पर्यावरणाचे रक्षण होते. सायकलिंग साठी कुठल्याही इंधनाची आवश्यकता नसल्याने परिणामी हवेचे प्रदूषण होत नाही. सायकलमुळे कुठलेही रस्ते खराब होत नसल्याने एकप्रकारे राष्ट्रीय संपतीची काटकसरच होते. अशाप्रकारे सर्वच वयोगटातील मुलां- मुलींसाठी सायकल चालवणे हा एक उत्तम व्यायाम प्रकार आहे. आजची बालके ही देशाचे भविष्य आहेत. त्यामुळे बालक स्वस्थ तर देश सशक्त हा संदेश पोषण पंधरवडयातील आयोजित सायकल रॅलीतुन ग्रामीण भागातील जनतेला देण्यात आला आहे.

   सायकल रॅलीचे आयोजनासाठी पर्यवेक्षिका श्रीमती आशा खरे, दहीद बू येथील अंगणवाडी सेविका पदमा राऊत, मीना राऊत, जिजा जाधव, नंदा जाधव, अंगणवाडी मदतनीस वृषाली राऊत, मनीषा गायकवाड, सुमन यंगड, चंद्रप्रभा धंदर यांनी प्रयत्न केले. सदर सायकल रॅलीला बालविकास प्रकल्प अधिकारी गजानन शिंदे यांचे मार्गदर्शन लाभले.

DIO BULDANA NEWS 25.3.2022



 खरीप हंगामासाठी जिल्ह्याला 1.77 लाख मे. टन खताचे आवंटन मंजूर

बुलडाणा, (जिमाका) दि. 25 : खरीप हंगामामध्ये जिल्ह्याचे 7.32 लाख हेक्टर क्षेत्रावर खरीप पिकांचे नियोजन करण्यात आले आहे. सोयाबीन, तूर, कापूस, ऊस, ज्वारी, मका, मुग, उडीद आदी पिके जिल्ह्यात घेण्यात येतात. जिल्ह्याला खरीप हंगाम 2022 करीता कृषि आयुक्तालयाकडून 1.77 लाख मेट्रीक टन रासायनिक खताचे आवंटन मंजूर करण्यात आले आहे.

  पुढील खरीप हंगाम दोन महिन्यावर आला असून खरीप पिकाची पेरणी झाल्यानंतर खताची मागणी मोठ्या प्रमाणात वाढते. तसेच सध्या रशिया व युक्रेन या दोन देशांमधील युद्धामुळे खताची दरवाढ व रासायनिक खताची टंचाई निर्माण होण्याची शक्यता नाकारता येत नाही. जिल्ह्यात आजरोजी खत विक्रेत्यांकडे  युरीया 7468 मे. टन, डिएपी 1699 मे.टन,एमओपी 149 मे.टन, संयुक्त खते 7912 मे. टन, एसएसपी 19,470 मे.टन साठा उपलब्ध आहे. तरी शेतकरी, शेतकरी गट, शेतकरी उत्पादक कंपनी यांनी खरीप हंगाम 2022 साठी खते खरेदी करावी, असे आवाहन कृषि विकास अधिाकरी, जिल्हा परिषद, बुलडाणा यांनी केले आहे.

                                                            *******  

डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजनेअंतर्गत

अर्ज करण्यास 31 मार्च पर्यंत मुदतवाढ

बुलडाणा,(जिमाका) दि.25 : शासकीय वसतिगृहात प्रवेश न मिळू शकलेल्या अनुसुचित जाती नव बौद्ध घटकातील इयता दहावी नंतरचे शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना भोजन, निवास व शैक्षणिक साहित्य स्वतः उपलब्ध करुन घेण्यासाठी सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाने भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजना सुरु केली आहे. या योजनेचा लाभ घेण्यासाठी पात्र विद्यार्थी विद्यार्थिनींना अर्ज करण्यासाठी दि. 31 मार्चपर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे, अशी माहिती सहाय्यक आयुक्त समाज कल्याण यांनी दिली आहे.

    या योजनेअंतर्गत बुलडाणा नगर पालिका हद्दीपासुन 5 कि. मी. च्या परिसरात असलेली महाविद्यालये/ शैक्षणिक संस्थेत इयत्ता 11 वी, 12 वी तसेच इयत्ता 12 वी नंतरच्या व्यावसायीक तसेच बिगर व्यावसायीक अभ्यासक्रमांमध्ये शिक्षण घेत असलेल्या व मागासवर्गीय शासकीय वसतिगृहात प्रवेश न मिळालेल्या तथा शासकीय वसतिगृहात प्रवेश न घेतलेल्या विद्यार्थ्यांना शिक्षण घेता यावे म्हणुन, भोजन, निवास व इतर शैक्षणिक सुविधा या विद्यार्थ्यांना स्वत: उपलब्ध करून घेण्यासाठी आवश्यक रक्कम विद्यार्थ्यांच्या आधार संलग्नीत बॅंक खात्यात थेट जमा करण्यात येते.

  भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजनेसाठी विद्यार्थ्यांचे अर्ज स्विकारण्याबाबत 3 जानेवारी 2022 च्या शासन पत्रान्वये 28 फेब्रुवारी 2022 पर्यंत मुदत देण्यात आली होती. तथापि सन 2021-22 या शैक्षणिक वर्षातील वैद्यकीय अभ्यासक्रमाची प्रवेश प्रक्रिया अजुनही सुरू असल्याने या योजनेतंर्गत लाभार्थी वंचित राहू नये, यासाठी भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजनेचे अर्ज सहाय्यक आयुक्त, समाज कल्याण, बुलडाणा या कार्यालयास सादर करावे. हे अर्ज स्विकारण्यास दि. 31 मार्च 2022 पर्यंत मुदत वाढविण्यात आली आहे. तरी दिलेल्या मुदतीमध्ये अर्ज सादर करावे, असे आवाहन सहाय्यक आयुक्त डॉ. अनिता राठोड यांनी केले आहे.

                                                                                    ********

लोककलावंताची साथ..

शासकीय योजनांचा प्रचारातून लाभार्थ्यांना मदतीचा हात..

     बुलडाणा,(जिमाका) दि.25 : लोककलावंतांच्या पारंपारिक लोककलेतून सर्वसामान्य नागरिकांना शासनाच्या लोक कल्याणकारी योजनांची माहिती व्हावी, यासाठी माहिती व जनसंपर्क महासंचालनालय व जिल्हा माहिती कार्यालयांमार्फत विशेष कार्यक्रम जिल्ह्यात राबविण्यात आला. लोक कलावंतांच्या साथीने शासकीय योजनांचा प्रचार – प्रसार करण्यात आला. योजनांच्या माहितीमुळे पात्र लाभार्थ्यांना योजनांचा लाभ मिळण्यास मदत होणार आहे. त्यामुळे निश्चितच या प्रचारातून शासकीय योजनांची माहिती झाल्यामुळे पात्र लाभार्थ्यांना लाभ मिळेल. जिल्ह्यात 63 गावांमध्ये लोकलावंताच्या माध्यमातून कलापथक कार्यक्रम घेण्यात आले. या कार्यक्रमांना प्रत्येक गावात गावकऱ्यांचा उत्स्फुर्त प्रतिसाद मिळाला.

   स्थानिक भाषेतून शाहिरी, लोकगीत, पोवाडा, वासुदेव आदी पारंपारिक लोककलांच्या माध्यमातून गावकऱ्यांपर्यंत राज्य शासनामार्फत राबविण्यात येत असलेल्या योजनांची माहिती जिल्हा माहिती कार्यालयामार्फत पोहचविण्यासाठी आली. गावकऱ्यांचे मनोरंजनात्मक पद्धतीने प्रबोधन करुन त्यांना शासकीय योजनांचा लाभ घेण्यासाठी प्रोत्साहित करण्यात आले. जिल्ह्यात लोककला पथकांच्या माध्यमातून गावोगावी, खेडोपाडी जनजागृतीपर कार्यक्रम घेण्यात आले.

   राज्य शासनाने दोन वर्षात विविध लोककल्याणकारी योजना प्रभावीपणे राबविल्या आहेत. या लोककल्याणकारी योजनांची माहिती सर्वसामान्य नागरिकांना व्हावी आणि ते शासनाच्या योजनांचा लाभ घेण्यासाठी पुढे यावेत, हा या मोहिमेचा उद्देश होता.  गत दोन वर्षात महाविकास आघाडी शासनाने घेतलेले निर्णय, त्यांची अंमलबजावणी, विविध योजना, उपक्रम, कोरोना काळात राबविण्यात आलेले विविध उपक्रम, शिवभोजन थाळी, महात्मा ज्योतिराव फुले कर्ज मुक्ती योजना, महिला व बाल विकास योजनेसाठी राखीव निधीची तरतूद, विद्यार्थी, शेतकरी बांधव, आरोग्यसेवा, कोरोना प्रतिबंधक लसीकरण मोहिम आदी योजना व उपक्रमांची माहिती लोककला पथकांच्या माध्यमातून जिल्ह्यात सर्वत्र पोहोचवण्यात आली.

 लोककवी वामन कर्डक बहुउद्देशीय प्रतिष्ठाण, कृषिसमृद्धी मल्टीपर्पज फाऊंडेशन व श्री. संत सेना महाराज ग्रामविकास बहु. संस्था या लोककलापथकामार्फत जिल्ह्यात 63 प्रबोधनात्मक कार्यक्रम घेण्यात आले. जिल्ह्यातील सर्वच तालुक्यात कलापथकाच्या माध्यमातून विविधरंगी मनोरंजनात्मक आणि प्रबोधनात्मक कार्यक्रम राबविण्यात आले.

     जिल्हा माहिती कार्यालयाचा लोककलापथकामार्फत शासकीय योजनांच्या प्रसिद्धीसाठी राबविण्यात आलेला उपक्रम स्पृहणी आहे.  लोककलेच्या माध्यमातून आमच्यासाठी शासन राबवित असलेल्या योजनांची माहिती आम्हाला सोप्या भाषेत सांगण्यात आली. आता शासनाच्या कोणत्या योजना आहेत, ते समजल्यामुळे आम्ही या योजनांचा अवश्य लाभ घेणार आहे, अशा प्रतिक्रियाही उपस्थित ग्रामस्थांनी व्यक्त केल्या.      

                                                                                    *********

Thursday 24 March 2022

DIO BULDANA NEWS 24.3.2022

पावणे तीन लाख शेतकऱ्यांना 820 कोटी रूपयांचे अनुदान वितरीत

  • कृषि विभागाच्या योजनांचा मिळतोय गतीने लाभ
  • एक शेतकरी एक अर्ज उपक्रम अल्पावधीत यशस्वी

बुलडाणा, (जिमाका) दि. 24 : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी कृषि विभागाचा कार्यभार सोपविल्यानंतर कृषि मंत्री दादाजी भुसे यांनी कृषि विभागामध्ये अनेक नविन उपक्रम व योजना सुरु केल्या आहेत. त्याचे दृश्य परिणाम आता दिसू लागले आहेत, त्यापैकीच एक म्हणजे; एक शेतकरी - एक अर्ज ; आतापर्यंतच्या अनुभवावरून असे निदर्शनास आले होते की, शेतकऱ्यांना कृषि विभागाच्या वेगवेगळ्या योजनांचा लाभ घेण्यासाठी प्रत्येक वेळी नव्याने अर्ज करावा लागत होता. तसेच प्रत्येक अर्जासोबत सारखीच कागदपत्रे जोडावी लागत होती. यासाठी शेतकऱ्यांचा वेळ व पैसाही खर्च होत होता. शिवाय बऱ्याच वेळा मागणी केलेल्या घटकाचा लाभही मिळत नव्हता. शिवाय, असाही अनुभव होता की लाभार्थी निवडतांना विविध स्तरावरच्या हस्तक्षेपामुळे योजना गरजू लाभार्थीपर्यंत पोहचत नाही व त्यामुळे शेतकऱ्यांची नाराजी असते.  मात्र या उपक्रमामुळे राज्यात पावणे तीन लाख शेतकऱ्यांना 820 कोटी रूपयांचे अनुदान थेट बँक खात्यात वितरीत करण्यात आले आहे.

    यावर उपाय शोधत असतांना कृषि विभागाने माहिती व तंत्रज्ञानाचा वापर करुन महाडीबीटी प्रणाली विकसित करुन एक शेतकरी- एक अर्ज ही संकल्पना अमलात आणली. या प्रणालीमुळे केवळ एकाच अर्जाद्वारे शेतकऱ्यांना कृषि विभागाच्या विविध योजनांचे लाभ घेता येऊ लागले आहे. शिवाय चालू आर्थिक वर्षात निवड झाली नाही तर हाच अर्ज पुढील आर्थिक वर्षात ग्राहय धरण्याची सुविधा देखील आहे. कृषि विभागाच्या विविध योजनांसाठी या प्रणालीव्दारे शेतकरी घरबसल्या अर्ज करु शकतो. त्याचप्रमाणे, आपल्या अर्जाची सद्यस्थिती मोबाईल अॅपद्वारे पाहू शकतात. तसेच, योजनेसाठी लागणारी सर्व कागदपत्रे देखील अपलोड करू शकतात. लक्षांकापेक्षा जास्त अर्ज आल्यास संगणकीय सोडतीद्वारे प्रत्येक तालुका निहाय लाभार्थी शेतकऱ्यांची पारदर्शी निवड केली जाते. अर्ज करण्यापासून अनुदान मिळेपर्यंतचा प्रवास मानवी हस्तक्षेपाशिवाय पूर्णतः संगणकीकृत करून विकासाच्या योजना ऑनलाईन सोडत पद्धतीने राबविणारा कृषि विभाग राज्यातील पहिलाच विभाग असून विभागाच्या सर्व प्रमुख योजनांची अंमलबजावणी आता महाडीबीटी प्रणालीद्वारे करण्यात येत आहे.

   वर्षभरात 22 लक्ष शेतकऱ्यांनी महाडीबीटी प्रणालीवर नोंदणी केली असून वेगवेगळ्या योजनांतर्गत 55 लक्ष घटकांची मागणी करून कृषि विभागाच्या या उपक्रमास उदंड प्रतिसाद दिला आहे. वर्षभराच्या कालावधीत राज्यातील शेतकऱ्यांनी ही प्रणाली आत्मसात केली आहे ही समाधानाची बाब आहे. दि. 23 मार्च, 2021 रोजी या प्रणालीव्दारे पहिल्या शेतकऱ्यास अनुदान वितरित झाले होते व आज वर्षभरानंतर 3 लक्ष 70 हजार शेतकऱ्यांनी विविध घटकांची अंमलबजावणी पूर्ण केली असून कृषि विभागाने 2 लक्ष 76 हजार शेतकऱ्यांच्या आधार संलग्न बँक खात्यावर रु. 820 कोटी अनुदान प्रत्यक्ष डीबीटीव्दारे वर्ग केलेले आहे आणि उर्वरित रु. 400 कोटी चे अनुदान शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा करण्याची प्रक्रिया सुरु असून मार्च 2022 अखेर ही प्रक्रिया पुर्ण होईल. एका वर्षात डीबीटीव्दारे रु. 1200 कोटींचे अनुदान यशस्विरित्या शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होईल.  ही प्रणाली नाविन्यपूर्ण असल्यामुळे सुरुवातीला कृषि विभागाच्या अधिकारी कर्मचाऱ्यांना ही प्रणाली समजून घेऊन कार्यवाही करण्यास थोडा वेळ लागला. परंतु, सदर प्रणाली समजावून सांगण्याकरिता वेळोवेळी ऑनलाईन प्रशिक्षणे आयोजित करण्यात आली. त्याचप्रमाणे, सर्व शेतकऱ्यांना वेळीच योजनांचा लाभ मिळावा म्हणून कृषि मंत्री, प्रधान सचिव (कृषि) व आयुक्त (कृषि) यांच्या स्तरावरून आढावा बैठका घेण्यात आल्या व त्यामुळे सदर

प्रणाली वर्षभरातच सुरळीतपणे मार्गस्थ झालेली आहे.

   या प्रणालीमध्ये वापरकर्त्यांच्या गरजेनुरूप वरचेवर सुधारणा करण्यात आल्या असून महाडीबीटी प्रणाली अधिकाधिक शेतकरी व कर्मचाऱ्यांसाठी सुलभ करण्यात येत आहे. महाडीबीटी प्रणालीस शेतकऱ्यांनी दिलेला मोठा प्रतिसाद आणि वर्षभरातील अनुदान वितरणामध्ये कृषि विभागाच्या कर्मचाऱ्यांनी दिलेले उल्लेखनीय योगदान पाहता शेतकऱ्यांनी कृषि खात्याच्या या स्तुत्य उपक्रमाचे स्वागत केले आहे आणि अल्पावधीत एक शेतकरी एक अर्ज हा उपक्रम व महाडीबीटी प्रणाली लोकप्रिय झाली आहे. असेच म्हणावे लागेल. या प्रणालीमुळे कृषि विभागाच्या योजनांचा लाभ पारदर्शक पद्धतीने व सुलभरीत्या तळागाळातील शेतकऱ्यांपर्यंत पोहचविण्यात कृषि विभाग यशस्वी झाला आहे.

                                                            ********

 

बालकांच्या शैक्षणिक खर्चासाठी प्रती बालक 10 हजार रूपयास अर्थसहाय्यास मान्यता

  • कोविडमुळे पालक गमावलेल्या बालकांना मिळणार लाभ
  • बालकाचे वय 3 ते 18 वर्ष वयोगटातील असावे
  • अर्ज सादर करण्याचे आवाहन

 बुलडाणा, (जिमाका) दि. 24 : मा. सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशान्वये बाल निधीची रक्कम राज्याच्या महिला व बाल विकास विभागाच्या बाल न्याय निधीमध्ये उपलब्ध करून देण्यात आलेली आहे. सदर रकमेचा विनियोग कोविडमुळे एक वा दोन्ही पालक गमावलेल्या बालकांच्या शैक्षणिक खर्चासाठी प्रति बालक कमाल मर्यादा 10 हजार रूपये इतकी वापरण्यास जिल्हाधिकारी तथा अध्यक्ष जिल्हाकृती दल यांना मान्यता देण्यात आली आहे.

   जिल्ह्यातील कोविडमुळे एक वा दोन्ही पालक गमावलेल्या वयोगट 3 ते 18 मधील बालकांच्या शैक्षणिक खर्चासाठी प्रति बालक कमाल मर्यादा 10 हजार रूपये वितरीत करावयाचा आहे.  पात्र लाभार्थ्यांनी अर्जाचा नमुना सबंधित तालुक्यातील एकात्मिक बाल विकास प्रकल्प अधिकारी कार्यालय अथवा संरक्षण अधिकारी कार्यालय, जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी कार्यालय, बस स्टँड च्या पाठीमागे, डॉ जोशी नेत्रालय जवळ, मुठठे ले आउट, बुलडाणा यांचे कार्यालयात उपलब्ध करून घ्यावे.  मूळ अर्जासह आवश्यक त्या कागदपत्रांसह प्रस्ताव वरील कार्यालयांपैकी एका कार्यालयास जमा करावे.

  अधिक माहितीसाठी संर्पक अधिकारी संरक्षण अधिकारी (संस्था अंतर्गत) गजानन कुसुंबे यांच्या 9764008894 मोबाईल क्रमांकासह संपर्क करावा.  अर्थसाह्य मिळण्याकरिता अर्जासोबत बालकांचे शाळा बोनाफाईड, आई – वडील मृत्यू प्रमाणपत्र छायांकित प्रत, वडील यांचे कोविड 19 पॉझिटिव्ह असल्याबाबतचा पुराव्याची छायांकित प्रत, बालकाचे आधार कार्डची छायांकित प्रत, तसेच बालक अथवा पालक संयुक्त राष्ट्रीय बँकेच्या पासबुकची छायांकित प्रत जोडणे आवश्यक आहे.  तरी पात्र लाभार्थ्यांनी अर्ज सादर करावे, असे आवाहन जिल्हा महिला व बालविकास अधिकारी अशोक मारवाडी यांनी केले आहे.   

                                                            ********



पोषण पंधरवड्यातंर्गत सव येथे कार्यक्रम

बुलडाणा, (जिमाका) दि. 24 : जिल्ह्यात पोषण अभियाना अंतर्गत पोषण पंधरवाड्याचा शुभारंभ करण्यात आला आहे.    जिल्ह्यातील बुलडाणा प्रकल्प ग्रामीणमध्ये पोषण पंधरवाडा अंतर्गत बुलडाणा तालुक्यातील सव येथे विविध उपक्रमांतून पंधरवड्याचा शुभारंभ कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. या कार्यक्रमाला बाल विकास प्रकल्प अधिकारी गजानन शिंदे, विस्तार अधिकारी सौ. सुकेशीनी वानखेडे, साखळी बिटचे पर्यवेक्षिका सौ. सुनीता रिंढे, वैद्यकीय अधिकारी व इतर गावातील अंगणवाडी सेविका, मदतनीस व गरोदर माता, स्तनदा माता अंगणवाडीतील लाभार्थ्यांचे पालक वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होते. 

    सदर उपक्रमात माता बैठक, प्रभात फेरी, परिसर स्वछता, हात धुणे, 0 ते 6 वयोगटातील बालकांची वजन उंची नोंदविण्यात आली. तसेच आवश्यक घटकांना अंगणवाडी सेविका, एएनएम, आशा वर्कर यांचेमार्फत गृहभेटी पंधरवड्यात देण्यात येणार आहे. तसेच किशोरी मुलींची रक्ताशय चाचणी ग्राम आरोग्य स्वछता, पोषणाचे महत्व रानमेवाचे महत्व, 6 महिने पूर्ण झालेल्या बालकांना वरच्या आहाराचे महत्व, दिव्यांग घटकांकारिता शासकीय योजनांच्या महिती सत्राचे आयोजन करण्यात येणार आहे. तसेच पाणी अडवा, पाणी जिरवा बद्दल महत्व, सांडपाणी व्यवस्थापन, बाळाचे पहिले 1000 दिवस बद्दल जनजागृती, गरोदर मातेचा सकस आहाराचे महत्व, मुलीच्या नावे झाडे लावणे, संपूर्ण पोषण आहार प्रात्यक्षिक आदी उपक्रमाचे आयोजन करण्यात येणार आहे.  

   पोषण पंधरवडा उपक्रमात जास्तीत जास्त लोकांचा सहभाग प्राप्त करून घेणेच्या दृष्टीने सर्वच अंगणवाडी सेविका मार्फत जनजागृती करण्यात येणार आहे. राबविण्यात आलेल्या उपक्रमाची जनंआन्दोलन डॅशबोर्डवर दैनंदिन नोंद घेण्यात येणार आहे.

                                                                        ***********

जिल्ह्यात 4 एप्रिलपर्यंत पोषण पंधरवड्याचे आयोजन

  • 14 प्रकल्प, 2712 अंगणवाडी केंद्रात कार्यक्रमांचे आयोजन

 बुलडाणा, (जिमाका) दि. 24 : बुलडाणा जिल्हात पोषण अभियाना अंतर्गत पोषण पंधरवड्याला सुरुवात करण्यात आली आहे. जिल्ह्यातील 14 प्रकल्पांमध्ये पोषण पंधरवडा दिनांक 21 मार्च ते 4 एप्रिलअंतर्गत विविध उपक्रमाचे आयोजन करण्यात येणार आहे.  पोषण पंधरवडाची शुभारंभ एकात्मिक बालविकास सेवा योजना कक्ष, जिल्हा परिषद, बुलडाणा यांचे करण्यात आला असून जिल्ह्यातील एकूण 2712 अंगणवाडी केंद्रात विविध उपक्रमांचे आयोजन दैनंदिनीनुसार  करण्यात येणार आहे.

    पंधरवड्यात माता बैठक, प्रभात फेरी, परिसर स्वछता, हात धुणे, 0 ते 6 वयोगटातील बालकांची वजन उंची नोंदविणे, आवश्यक घटकांना अंगणवाडी सेविका, एएनएम, आशा वर्कर यांचे मार्फत गृहभेटी आदी उपक्रम पंधरवड्यात राबविण्यात येणार आहे.  तसेच किशोरवयीन मुलींची रक्ताशय चाचणी, ग्राम आरोग्य स्वछता, पोषणाचे महत्व, रानमेवाचे महत्व, 6 महिने पूर्ण झालेल्या बालकांना वरच्या आहाराचे महत्व,  दिव्यांगाकरिता असणाऱ्या विविध शासकीय योजनांच्या माहिती सत्राचे आयोजन, पाणी अडवा, पाणी जिरवा बद्दल महत्व, सांडपाणी व्यवस्थापन, बाळाचे पहिले 1000 दिवस बद्दल जनजागृती, गरोदर मातेचा सकस आहाराचे महत्व, मुलीच्या नावे झाडे लावणे, संपूर्ण पोषण आहार प्रात्यक्षिक आदी उपक्रमांचे आयोजनही करण्यात येणार आहे.

   पोषण पंधरवडा उपक्रमात जास्तीत जास्त लोकांचा सहभाग प्राप्त करून घेण्याच्या दृष्टीने सर्वच अंगणवाडी सेविकांमार्फत जनजागृती करण्यात येणार आहे. राबविण्यात आलेल्या उपक्रमाची जन आंदोलन डॅशबोर्ड वर दैनंदिन नोंद घेण्यात येणार आहे. तरी सदर पंधरवड्यामध्ये ग्रामीण भागातील नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभाग नोंदवावा तसेच अंगणवाड्या मार्फत पुरविण्यात येणाऱ्या सेवांचा लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हा कार्यक्रम अधिकारी तथा उपमुख्य कार्यकारी अधिकारी अरविंद रामरामे यांनी केले आहे.

                                                                                    **********

नोंदणीकृत व मान्यता प्राप्त संस्थांच्या तपासणीसाठी समिती गठीत

  • अशासकीय सदस्यासाठी 1 एप्रिलपर्यंत अर्ज सादर करावे

 बुलडाणा, (जिमाका) दि. 24 : बाल न्याय (मुलांची काळजी व संरक्षण) अधिनियम 2015 हा राज्यात लागू करण्यात आला आहे. या अधिनियमाच्या कलम 54 नुसार नोंदणीकृत तसेच मान्यता प्राप्त संस्थेच्या तपासणीसाठी राज्य व जिल्हा स्तरावर तपासणी समिती गठीत करण्यात आलेली आहे. त्याअनुषंगाने जिल्ह्यातंर्गत स्थापन करण्यात आलेल्या जिल्हा समितीचे अध्यक्ष जिल्हादंडाधिकारी असून जिल्हा महिला व बालविकास अधिकारी हे सदस्य सचिव आहे. सदर शासन निर्णयानुसार समितीचे एकूण पाच सदस्य आहे. त्यापैकी बाल हक्क, संगोपन, संरक्षण व कल्याण या क्षेत्रात कार्यरत असलेल्या नागरी समुहाचा एक सदस्य आवश्यक आहे.

   जिल्हास्तरीय तपासणी समितीमधील अशासकीय सदस्याचा तीन वर्षांचा कालावधी संपलेला असून नव्याने अशासकीय सदस्य पदासाठी बालकांच्या क्षेत्रात अनुभव असलेल्या इच्छुक व्यक्तींनी अर्ज सादर करावे. अर्जदार हा किमान पदवीधर असावा, बाल हक्क, काळजी, संरक्षण आणि कल्याण क्षेत्रातील किमान 10 वर्षाचा अनुभव असावा, वयोमर्यादा 35 पेक्षा कमी व 65 पेक्षा जास्त नसावी, अशासकीय सदस्याचा कालावधी हा नेमणूकीपासून 3 वर्षांचा राहील, इच्छूक उमेदवारांनी अर्ज जिल्हा महिला व बालविकास अधिकारी कार्यालय,बस स्टँड मागे, मुठ्ठे ले आऊट, जोशी नेत्रालयाजवळ, बुलडाणा येथे 1 एप्रिल 2022 पर्यंत अर्ज सादर करावे, असे आवाहन जिल्हा महिला व बालविकास अधिकारी अशोक मारवाडी यांनी केले आहे.

                                                                        **********


--

 

Tuesday 22 March 2022

DIO BULDANA NEWS 22.3.2022




 जल सिंचनामध्ये 10 टक्के क्षेत्र वाढविण्याचे उद्दिष्ट ठेवावे

-         प्रशांत संत

  • जलजागृती सप्ताहाचा समारोपीय समारंभ

बुलडाणा, (जिमाका) दि. 22 :  जिल्ह्यात शासनाच्या आदेशानुसार 16 ते 22 मार्च 2022 या कालावधीत जलजागृती सप्ताह विविध कार्यक्रम घेवून राबविण्यात आला. या कार्यक्रमांमधून जलजागृती करण्याचा प्रयत्न विभागाच्यावतीने झाला. जल हेच जीवन आहे, हा संदेश देत प्रत्येकाने जलसंवर्धनाच्या या लोकचळवळीत सहभागी व्हायला पाहिजे. पाण्याची बचत हीच पाण्याची निर्मिती आहे, समजून पाण्याचा काटकसरीने वापर केला पाहिजे. या वर्षीच्या जलजागृती सप्ताहाचे फलीत म्हणून पुढील वर्षात किमान उपलब्ध पाण्यातून सिंचन क्षेत्र 10 टक्के वाढविण्याचे उद्दिष्ट ठेवावे, असे प्रतीपादन कार्यक्रमाचे अध्यक्ष तथा कार्यकारी अभियंता प्रशांत संत यांनी केले.

   जागतिक जलदिनाच्या पार्श्वभूमीवर शासन निर्देशानुसार आयोजित जलजागृती सप्ताहाचा आज 22 मार्च रोजी समारोपीय कार्यक्रमाचे आयोजन स्थानिक लघु पाटबंधारे विभागाच्या कार्यालय परीसरात करण्यात आले. या समारोप समारंभाचे अध्यक्षस्थानी कार्यकारी अभियंता प्रशांत संत होते, तर कार्यक्रमास कार्यकारी अभियंता श्रीराम हजारे, सुदर्शन राळेकर, सुधीर सोळंके, अमोल चोपडे उपस्थित होते. अधीक्षक अभियंता सुनिल चौधरी यांचे मार्गदर्शनात जलजागृती सप्ताह जिल्ह्यात राबविण्यात आला.

    सप्ताहा दरम्यान सिंचन क्षेत्रात उल्लेखनीय कामगीरी करणाऱ्या खडकपुर्णा प्रकल्पावरील वसुंधरा पाणीवापर संस्था दे.घुबे, पेनटाकळी प्रकल्पावरील पेनटाकळी पाणीवापर महासंघ मेहकर, नळगंगा प्रकल्पावरील जय बजरंग पाणीवापर संस्था शेलापुर ता. मोताळा, तसेच जलतज्ज्ञ रामकृष्ण पांडुरंग पाटील यांचा प्रमाणपत्र व सन्मानचिन्ह देवुन यावेळी सत्कार करण्यात आला. तसेच जलजागृती सप्ताहामध्ये आपले योगदान देणाऱ्या अधिकारी व कर्मचाऱ्यांमध्ये अभियंता- अधिकारी तुषार मेतकर, रविंद्र विश्वकर्मा, विजय चोपडे, कल्याणी यमाजी, क्षितीजा गायकवाड, चंद्रशेखर देशमुख, संजय चांदोडकर, संदीप कंकाळ, सलीम शेख यांचा व कर्मचारी भरत राऊत, करण उमाळे, जानकीराम आव्हाळे, केशव जवादे, दादाराव शेगोकार, उत्तम जाधव, शत्रुघ्न धोरण व मंजीतसिंग राजपुत यांचाही या प्रसंगी सत्कार करण्यात आला.

      सदर कार्यक्रमात वसुंधरा पाणीवापर संस्थचे अध्यक्ष शेनफडराव घुबे, रामकृष्ण पाटील, कार्यकारी अभियंता श्रीराम हजारे, अमोल चोपडे यांनीही आपले विचार मांडले. जलसंवर्धन ही काळाची गरज असल्याचे मत त्यांच्या विचारातून प्रकट झाले.  यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष प्रशांत संत यांनी जलप्रतिज्ञेचे वाचन केले. कार्यक्रमाचे संचालन मंजीतसिंग राजपुत यांनी केले. समारंभास जिल्हयातील जलसंपदा विभागाचे कार्यकारी अभियंता, उपविभागीय अभियंता, अधिकारी तसेच कर्मचारी बहु संख्येने उपस्थित होते. आभार प्रदर्शन दादाराव शेगोकार यांनी केले.

*********

भुसावळ येथे 10 एप्रिल रोजी माजी सैनिक मेळाव्याचे आयोजन

बुलडाणा, (जिमाका) दि. 22 : स्टेशन हेडक्वार्टर, भुसावळ जि. जळगांव येथे 10 एप्रिल 2022 रोजी सकाळी 8 ते सायंकाळ 5 वाजे पर्यंत, बुलडाणा व जळगांव जिल्हयातील माजी सैनिकांसाठी मेळावा अयोजित करण्यात आला आहे.  सदर मेळाव्यामध्ये विविध अभिलेखा कार्यालयाचे व सी.पी.पी.चे अधिकारी व कर्मचारी येणार आहेत. ते पेन्शन संबंधित अडी अडचणी सोडविण्यासाठी उपलब्ध असणार आहेत. जिल्हयातील सर्व माजी सैनिकांनी पेंन्शन व इतर अडचणी बाबत सर्व कागद पत्रांसह 10 एप्रिल रोजी स्टेशन हेडक्वार्टर, भुसावळ येथे दिलेल्या वेळेवर जास्तीत जास्त माजी सैनिकांनी आपल्या अडी अडचणी सोडविण्यासाठी उपस्थित रहावे. जिल्हयातील विरपत्नी, विरमाता, विरपिता, माजी सैनिक, माजी सैनिक विधवा व अवलंबित यांनी नोंद घ्यावी, असे आवाहन सहा. जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी भास्कर निंबाजी पडघान यांनी केले आहे.

************




जलजागृती सप्ताह : रांगोळी स्पर्धा व महिला मेळावा

बुलडाणा, (जिमाका) दि. 22 :  जलसंपदा विभागामार्फत जिल्हाभर 16 ते 22 मार्च या कालावधीत जलजागृती सप्ताह आयोजित करण्यात आला आहे. या सप्ताहानिमित्त 21 मार्च रोजी महिला मेळावा व रांगोळी स्पर्धेचे आयोजन जलसंपदा विभागाच्या कार्यालय परीसरात करण्यात आले. सदर कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी उपकार्यकारी अभियंता क्षितिजा गायकवाड, प्रमुख पाहुणे म्हणून जिल्हा परिषद सदस्य जयश्रीताई  शेळके व मोताळा  तहसीलदार सारिका भगत  उपस्थित होत्या.  महिला मेळाव्या दरम्यान जलजागृती उपदेशात्मक रांगोळी स्पर्धेचे आयोजन करण्यात आले. यावेळी उपस्थित मान्यवरांनी महिलांना जलजागृतीविषयी मार्गदर्शन केले. प्रत्येक महिलेने जलसंवर्धनाची सुरूवात आपल्या घरापासून केल्यास तीचा आदर्श समाज घेईल. महिलांनी केलेले कोणतेही कार्य समाज मनावर चांगल्या प्रकारे बिंबवल्या जाते. यावेळी महिलांनी जलसंवर्धन करण्याचे आवाहन करण्यात आले. जलजागृतीवर काढलेल्या रांगोळीची पाहणीही मान्यवर महिलांनी केली. कार्यक्रमाला महिलांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.

                                                                        **********


जलजागृती सप्ताह : विद्यार्थ्यांनी घेतली जल प्रतिज्ञा

बुलडाणा, (जिमाका) दि. 22 :  जलसंपदा विभागामार्फत जिल्हाभर 16 ते 22 मार्च या कालावधीत जलजागृती सप्ताह आयोजित करण्यात आला आहे. या सप्ताहानिमित्त आज 22 मार्च रोजी विद्या विकास विद्यालय, कोलवड तसेच जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा कोलवड येथे विद्यार्थ्यांना जलप्रतिज्ञा घेऊन पाण्याचे महत्व, बचत, पाण्याचा योग्य प्रकारे वापर करणे आदी विषयावर मार्गदर्शन व प्रबोधन करण्यात आले. उपस्थित विद्यार्थ्यांना पाण्याचे महत्व पटवून देण्यात आले. जल संवर्धनासाठी जलसंस्कार लहान वयापासूनच झाले पाहीजे. पाणी हा सृष्टीचा अमूल्य ठेवा आहे. त्याचे संरक्षण, संवर्धन करणे प्रत्येकाची जबाबदारी आहे. त्यामुळे प्रत्येकाने जलसंवर्धनाची प्रतिज्ञा घेवून कार्य करावे, असे आवाहनही विद्यार्थ्यांना करण्यात आले. कार्यक्रमाला  उपकार्यकारी अभियंता क्षितिजा गायकवाड, प्राचार्य सुनील जवंजाळ, सहाय्यक अभियंता  श्रेणी-2 योगेश तरंगे, शाखा अभियंता विजयसिंह राजपूत, श्री. कांबळे व प्रभाकर राऊत, विद्यार्थी उपस्थित होते.

                                                            ********