शेतकरी परदेश अभ्यास दौरा योजनेअंतर्गत शेतकऱ्यांचा पहिला गट परदेशात रवाना
बुलढाणा, (जिमाका) दि. 19 : कृषी
विभागाव्दारे शेतकऱ्यांच्या ज्ञानवृद्धी व आधुनिक शेती तंत्रज्ञानाचा अभ्यास
करण्याच्या उद्देशाने शेतकरी परदेश अभ्यास दौरा योजना राबविण्यात येत आहे.
योजनेअंतर्गत दि. 17 जानेवारी 2026 रोजी मलेशिया, व्हिएतनाम व फिलिपाईन्स या तीन
देशांचा परदेश अभ्यास दौरासाठी शेतकऱ्यांचा पहिला गट रवाना झाला.
सन 2025-26 या वर्षात तीन अभ्यास दौरे नियोजित आहेत. त्यामध्ये
युरोप, इस्राएल आणि मलेशिया, व्हिएतनाम, फिलिपाईन्स या देशांचा समावेश आहे.
दौऱ्यातील सहभागी शेतकऱ्यांनी पुणे येथून मुंबई मार्गे पुढे प्रस्थान केले असून,
या दौऱ्यामध्ये राज्यातील 15 प्रगतशील शेतकरी, 1 कृषी विभागाचा अधिकारी तसेच 1
प्रवासी कंपनीचा प्रतिनिधी सहभागी झाले आहेत.
शेतकरी परदेशी दौरा निघताना कृषीमंत्री दत्तात्रय भरणे यांनी व्हिडिओ कॉलच्या माध्यमातून
सहभागी शेतकऱ्यांशी संवाद साधून त्यांना शुभेच्छा दिल्या. यावेळी त्यांनी
परदेशातील आधुनिक शेती तंत्रज्ञानाचा अभ्यास करून तो अनुभव राज्यातील
शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवावा, असे आवाहन केले.
या अभ्यास दौर्यामध्ये सहभागी शेतकऱ्यांना आधुनिक शेती
पद्धती, संरक्षित शेती, कृषी प्रक्रिया उद्योग, निर्यातक्षम उत्पादन तंत्रज्ञान,
तसेच विविध देशांतील कृषी व्यवस्थापन व विपणन व्यवस्था यांचा प्रत्यक्ष अभ्यास
करण्याची संधी मिळणार आहे. या अनुभवाचा उपयोग करून राज्यातील शेती अधिक
उत्पादनक्षम व शाश्वत करण्यास मदत होणार आहे.
विशेष बाब म्हणजे, सन 2019 नंतर आयोजित करण्यात आलेला हा
पहिलाच परदेश अभ्यास दौरा असून कृषी विभागाने पुन्हा एकदा ही महत्वाकांक्षी योजना
प्रभावीपणे राबविण्यास सुरुवात केली आहे. त्यामुळे कृषी विभाग या उपक्रमाबाबत
सकारात्मक आहे. कृषी विभागाच्या या उपक्रमामुळे शेतकऱ्यांना आंतरराष्ट्रीय
स्तरावरील शेती तंत्रज्ञानाची माहिती मिळून राज्यातील शेती विकासाला नवी दिशा
मिळेल, असा विश्वास विभागाने व्यक्त केला आहे.
00000
Comments
Post a Comment