मराठा समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी अण्णासाहेब पाटील महामंडळ कटिबद्ध

 


Ø    नागरिकांनी अफवांवर विश्वास ठेवू नये

Ø   निवडणूक क्षेत्रात  नवीन पात्रता प्रमाणपत्र  प्रक्रिया तात्पुरती स्थगित

Ø   उर्वरित राज्यात कार्यवाही नियमितपणे सुरू 

 

मुंबई / बुलढाणा, (जिमाका) दि. 19 : अलीकडच्या कालावधीत काही समाजमाध्यमांवर तसेच काही व्यक्तींकडून अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळ यांच्या कार्यपद्धतीविषयी अपूर्ण व दिशाभूल करणारी माहिती प्रसारित होत असल्याचे निदर्शनास आले आहे. या अपप्रचारामुळे महामंडळाची बदनामी होत असून मराठा समाजासह सर्वसामान्य नागरिकांमध्ये संभ्रम निर्माण होण्याची शक्यता असल्याने महामंडळामार्फत वस्तुस्थिती स्पष्ट करण्यात आली आहे.

महामंडळाने दिलेल्या माहितीनुसार, महाराष्ट्र शासनामार्फत दरवर्षी अर्थसंकल्पीय अंदाजपत्रकाद्वारे विविध शासकीय विभाग, महामंडळे व शासन अंगीकृत उपक्रमांसाठी आर्थिक तरतूद निश्चित करण्यात येते. या अंदाजपत्रकास विधीमंडळाची मान्यता मिळाल्यानंतर त्याची अंमलबजावणी केली जाते. त्या अनुषंगाने प्रत्येक महामंडळास वार्षिक इष्टांक निश्चित करणे आवश्यक असून, त्या वित्तीय मर्यादेतच कार्यवाही करणे हे नियमानुसार बंधनकारक आहे. इतर आर्थिक विकास महामंडळांप्रमाणेच अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळामार्फतही ही प्रक्रिया नियमितपणे राबविण्यात येते.

सध्या राज्यातील महानगरपालिकांच्या निवडणुका जाहीर झाल्या असून काही नगरपालिका व नगरपरिषदांच्या निवडणुका पुढे ढकलण्यात आल्या आहेत. या कालावधीत राज्य निवडणूक आयोगामार्फत आदर्श आचारसंहिता लागू करण्यात आली आहे. ही आचारसंहिता सर्व शासकीय व निमशासकीय कार्यालये, महामंडळे आणि शासन अंगीकृत उपक्रमांवर बंधनकारक आहे.

त्यामुळे आदर्श आचारसंहितेच्या पालनाच्या अनुषंगाने फक्त महानगरपालिका क्षेत्रे तसेच निवडणुका प्रलंबित असलेल्या नगरपालिका व नगरपरिषदांच्या हद्दीतच नवीन पात्रता प्रमाणपत्र  देण्याची कार्यवाही तात्पुरत्या स्वरूपात स्थगित करण्यात आली आहे.उर्वरित राज्यामध्ये मात्र  नवीन पात्रता प्रमाणपत्र देण्याची प्रक्रिया नियमितपणे सुरू आहे, असे महामंडळाने स्पष्ट केले आहे.

आदर्श आचारसंहितेचा कालावधी संपल्यानंतर व निवडणूक प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर, वरील नमूद क्षेत्रांमध्येही पात्रता प्रमाणपत्र देण्याची कार्यवाही नियमानुसार पूर्ववत सुरू करण्यात येणार आहे.

दरम्यान, महामंडळाविषयी समाजमाध्यमांवर प्रसारित होत असलेल्या कोणत्याही अफवा किंवा चुकीच्या माहितींवर मराठा बांधवांनी व सर्वसामान्य नागरिकांनी विश्वास ठेवू नये, असे आवाहन महामंडळामार्फत करण्यात आले आहे. मराठा समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी महामंडळ कटिबद्ध असून योजनांची अंमलबजावणी नियमानुसार व पारदर्शक पद्धतीने सुरू असल्याचेही व्यवस्थापकीय संचालक यांनी  स्पष्ट केले आहे.   

00000


Comments

Popular posts from this blog

लोकशाहीर अण्णाभाऊ साठे महामंडळाची थेट कर्ज योजना

बुलढाणा जिल्ह्याची महान हो कीर्ती

स्वयं अर्थसहाय्यिता नवीन शाळांना मान्यता व दर्जावाढीची शिफारस; हरकती मागविल्या