मॅट्रिकोत्तर शिष्यवृत्तीच्या प्रलंबित अर्जांवर कार्यवाही करा सहायक आयुक्त मनोज मेरत यांचे महाविद्यालयांना निर्देश
बुलढाणा, (जिमाका) दि. 12 : सामाजिक न्याय विशेष सहाय्य विभागामार्फत मागासवर्गीय विद्यार्थ्यांसाठी महाडीबीटी प्रणालीवर मॅट्रिकोत्तर शिष्यवृत्तीच्या विविध योजना राबविण्यात येतात. त्याअनुषंगाने सन 2025-26 या शैक्षणिक सत्रात मॅट्रिकोत्तर शिष्यवृत्तीसाठी नोंदणी केलेल्या महाविद्यालय स्तरावरील प्रलंबित शिष्यवृत्ती अर्जांवर कार्यवाही करण्याचे निर्देश सहाय्यक आयुक्त मनोज मेरत यांनी महाविद्यालयांना दिले आहे.
या विभागामार्फत अनुसूचित जातीच्या विद्यार्थ्यांना भारत सरकार मॅर्टिकोत्तर शिष्यवृत्ती योजना, शिक्षण शुल्क परिक्षा शुल्क प्रतिपुर्ती योजना, राजर्षि शाहू महाराज गुणवपत्ता पुरस्कार तसेच व्यावसायिक अभ्यासक्रमास शिकत असणाऱ्या विद्यार्थ्यांना निर्वाह भत्ता इ. योजनेअंतर्गत मॅट्रिकोत्तर शिष्यवृत्तीचा लाभ दिला जातो. मॅट्रिकोत्तर शिष्यवृत्ती साठी सन 2025-26 या शैक्षणिक सत्रात एकूण नोंदणी केलेल्या अर्जामधून अद्यापही 3769 अर्ज महाविद्यालय स्तरावर प्रलंबित आहेत. हे प्रलंबित अर्ज संबंधित महाविद्यालयांनी तात्काळ ऑनलाईन प्रणालीवरून सहायक आयुक्त, समाज कल्याण कार्यालयाकडे वर्ग (फॉरवर्ड) करावेत. तसेच यापूर्वीच सन 2024-25 या सत्रातील प्रलंबित असलेले अर्ज सुध्दा तात्काळ वर्ग (फॉरवर्ड) करावेत, असे निर्देश देण्यात आले आहेत.
याबाबत वारंवार सुचना तसेच पत्रव्यवहार करूनही संस्था स्तरावर फार मोठ्या प्रमाणावर अर्ज संख्या प्रलंबित असल्याने संबंधित महाविद्यालयाचे प्राचार्य यांनी ऑनलाईन प्रणालीवर प्रलंबित अर्जाबाबत वेळीच कार्यवाही करावी. ही कार्यवाही न केल्यास व मागासवर्गीय पात्र विद्यार्थी शिष्यवृत्तीपासून वंचित राहील्यास त्यास प्राचार्य हे व्यक्तीशः जबाबदार राहतील, याची गांभीर्याने नोंद सर्व प्राचार्यांनी घ्यावी व तात्काळ कार्यवाही करावी, असे आवाहन समाज कल्याणचे सहाय्यक आयुक्त मनोज मेरत यांनी केले आहे.
00000
Comments
Post a Comment