वसाडी प्राथमिक आरोग्य केंद्र प्रकरणाची चौकशी पूर्ण; औषध विल्हेवाटीत त्रुटी आढळल्याने संबंधित अधिकाऱ्यांना नोटीस

 


 बुलढाणा (जिमाका), दि. 23 : प्राथमिक आरोग्य केंद्र वसाडी येथे मुदतबाह्य नसलेली औषधे जाळल्याचे तसेच वैद्यकीय अधिकारी अनुपस्थिती प्रकरणी सक्षम प्राधिकाऱ्यांच्या आदेशानुसार प्रत्यक्ष भेट देऊन सखोल व वस्तुनिष्ठ चौकशी करण्यात आली.  या प्रकरणी संबंधित तालुका आरोग्य अधिकारी, वैद्यकीय अधिकारी व औषध निर्माण अधिकारी यांना कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली असून प्रशासकीय कारवाई प्रस्तावित करण्यात आले असल्याची माहिती जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. अमोल गिते यांनी दिली.

प्राथमिक आरोग्य केंद्र वसाडी येथे मुदतबाह्य नसलेली औषधे जाळण्यात आल्याचा तसेच वैद्यकीय अधिकारी अनुपस्थित असल्याचा आरोप करणारी बातमी प्रसारित झाली होती. सदर बातमीच्या अनुषंगाने सक्षम प्राधिकाऱ्यांच्या आदेशानुसार दिनांक 18 डिसेंबर 2025 रोजी प्राथमिक आरोग्य केंद्र वसाडी येथे भेट देऊन सखोल व वस्तुनिष्ठ चौकशी करण्यात आली.  चौकशीत असे आढळून आले की, प्राथमिक आरोग्य केंद्र वसाडी हे मार्च 2024 पासून कार्यरत असून मंजूर 15 पदांपैकी 2 वैद्यकीय अधिकारी कंत्राटी स्वरूपात कार्यरत आहेत व 8 पदे बाह्य स्रोताद्वारे भरलेली आहेत. काही पदे सध्या रिक्त आहेत. वैद्यकीय अधिकारी सोनाळा येथे वास्तव्यास असून वसाडी येथे निवासाची सुविधा उपलब्ध नाही. ई-औषधी लॉगिन उपलब्ध नसल्यामुळे औषध पुरवठा प्राथमिक आरोग्य केंद्र सोनाळा येथून ऑफलाईन पद्धतीने करण्यात येत आहे. एप्रिल ते डिसेंबर 2025 या कालावधीत एकूण 5,417 बाह्यरुग्णांनी उपचार घेतले आहेत.

चौकशीदरम्यान Calcium गोळ्या, Dexamethasone, Pheniramine, Gentamycin इंजेक्शन तसेच Metronidazole सिरप ही औषधे जाळण्यात आल्याचे निदर्शनास आले. सदर औषधांची एकूण किंमत 2 हजार 532 रुपये असून त्यापैकी फक्त 160 रुपये किंमतीची औषधे मुदतबाह्य होती. उर्वरित औषधांच्या विल्हेवाट प्रकरणी संबंधित औषध निर्माण अधिकाऱ्याकडून रक्कम वसूल करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.

या प्रकरणी संबंधित तालुका आरोग्य अधिकारी, वैद्यकीय अधिकारी व औषध निर्माण अधिकारी यांना कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली असून प्राप्त खुलाशांच्या आधारे पुढील प्रशासकीय कारवाई प्रस्तावित आहे. भविष्यात अशा प्रकारची चूक आढळल्यास कठोर कारवाई करण्यात येईल, असे स्पष्ट निर्देश देण्यात आले आहेत. तसेच तालुकास्तरावरील नियंत्रणाबाबत वरिष्ठ स्तरावर आवश्यक ती कारवाई प्रस्तावित आहे. औषध विल्हेवाट प्रक्रियेमध्ये त्रुटी व नियंत्रणाचा अभाव आढळून आल्याने संबंधित अधिकाऱ्यांना सुधारणा करण्याच्या सूचना देण्यात आल्या असून प्रशासकीय कारवाई सुरू आहे, अशी माहिती जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. अमोल गिते यांनी दिली आहे.

00000

Comments

Popular posts from this blog

लोकशाहीर अण्णाभाऊ साठे महामंडळाची थेट कर्ज योजना

बुलढाणा जिल्ह्याची महान हो कीर्ती

स्वयं अर्थसहाय्यिता नवीन शाळांना मान्यता व दर्जावाढीची शिफारस; हरकती मागविल्या