नववर्षाच्या पार्श्वभूमीवर अन्न व्यवसाय चालकांसाठी अन्न सुरक्षा मार्गदर्शक सूचना; सूचनांचे काटेकोर पालन करा-अन्न सुरक्षा विभागाचे आवाहन

 


बुलढाणा (जिमाका), दि. 29 : नववर्षाच्या स्वागतासाठी दिनांक 31 डिसेंबर रोजी हॉटेल, रेस्टॉरंट, ढाबे, फार्महाऊस, रिसॉर्ट तसेच इतर अन्न आस्थापनांमध्ये मोठ्या प्रमाणावर नागरिकांची गर्दी होण्याची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर नागरिकांना स्वच्छ, सुरक्षित व दर्जेदार अन्न मिळावे, यासाठी सर्व अन्न व्यवसाय चालकांनी अन्न सुरक्षा व मानके कायदा, 2006 अंतर्गत दिलेल्या मार्गदर्शक सूचनांचे काटेकोर पालन करावे, असे आवाहन अन्न सुरक्षा विभागामार्फत करण्यात आले आहे.

अन्न व औषध प्रशासनातर्फे नववर्ष प्रण-सुरक्षित अन्न मोहीम राबविण्यात येत असून, या कालावधीत अन्न आस्थापनांची तपासणी करण्यात येणार आहे. अन्न व्यवसाय चालकांनी अन्न तयार करण्यासाठी वापरण्यात येणारी भांडी, उपकरणे, काउंटर व स्वयंपाकघर परिसर स्वच्छ व निर्जंतुक ठेवावा. कच्चे अन्नपदार्थ व शिजवलेले अन्न वेगवेगळ्या व स्वच्छ ठिकाणी साठवावे. स्टोअर रूम, कोल्ड स्टोरेज व कचरा साठवणूक क्षेत्र स्वच्छ ठेवून योग्य वायु वीजनाची व्यवस्था करावी.

अन्नपदार्थ विक्रीसाठी वृत्तपत्र, छापील किंवा वापरात आलेला कागद वापरू नये. केवळ अन्नासाठी योग्य साहित्यच वापरणे बंधनकारक आहे. तेलाचा वारंवार अथवा अतिवापर टाळावा. खराब, जळलेले किंवा वारंवार वापरलेले तेल अन्न तयार करण्यासाठी वापरणे आरोग्यास घातक असल्याचे अन्न सुरक्षा विभागाने स्पष्ट केले आहे. अन्न तयार व विक्री करणाऱ्या कर्मचाऱ्यांनी स्वच्छ कपडे, एप्रन, हेडकॅप व आवश्यकतेनुसार हातमोजे वापरणे आवश्यक आहे.

पाणी शुद्ध व पिण्यायोग्य असावे तसेच त्याची नियमित तपासणी करावी. कीड, उंदीर, माशा यांचा प्रादुर्भाव होणार नाही याची दक्षता घ्यावी. अन्न सुरक्षा परवाना किंवा नोंदणी प्रमाणपत्र आस्थापनेच्या दर्शनी भागात लावणे बंधनकारक आहे. पनीरच्या जागी चीज अॅनलॉग तसेच आइसक्रीमच्या नावाखाली ‘फ्रोजन डेसर्ट’ची विक्री करू नये. कच्च्या अन्नपदार्थांच्या खरेदीची बिले तपासणीदरम्यान अन्न सुरक्षा अधिकाऱ्यांना सादर करावी. शिळे, एक्स्पायर, कमी दर्जाचे किंवा मानवी सेवनास असुरक्षित अन्न पदार्थांची विक्री करू नये.

अन्न सुरक्षा व मानके कायदा तसेच त्याअंतर्गत नियमांचे उल्लंघन आढळून आल्यास संबंधित अन्न व्यवसाय चालकांवर कठोर कारवाई, दंड तसेच परवाना निलंबन किंवा रद्द करण्याची कारवाई करण्यात येईल, असा इशाराही देण्यात आला आहे. तपासणीनुसार ग्राहकांना स्वच्छ व दर्जेदार अन्न विक्री करणाऱ्या अन्न व्यवसाय चालकांचा पालकमंत्री यांच्याहस्ते प्रमाणपत्राद्वारे गौरव करण्यात येणार आहे.

दरम्यान, नागरिकांनाही आवाहन करण्यात आले असून, अस्वच्छ, उघड्यावरील, शिळे तसेच वृत्तपत्रात विक्री होणारे अन्न पदार्थ खरेदी करू नये. अति रंगयुक्त अन्न पदार्थांचे सेवन टाळावे. अन्न पदार्थ कोणत्या माध्यमातून तयार करण्यात आले आहेत, याबाबत विक्रेत्याकडे विचारणा करून खरेदीचे बील घ्यावे, असे अन्न सुरक्षा विभागाने कळविले आहे.

00000

Comments

Popular posts from this blog

लोकशाहीर अण्णाभाऊ साठे महामंडळाची थेट कर्ज योजना

बुलढाणा जिल्ह्याची महान हो कीर्ती

स्वयं अर्थसहाय्यिता नवीन शाळांना मान्यता व दर्जावाढीची शिफारस; हरकती मागविल्या