अकोल्यात शनिवारपासून ‘अॅग्रोटेक’ राज्यस्तरीय कृषी प्रदर्शन
Ø
शेतकऱ्यांसाठी कृषी तंत्रज्ञानाचे
व्यासपीठ
Ø
शेतकऱ्यांनी कृषी प्रदर्शनाचा लाभ घ्यावा: डॉ. अमोल झापे
बुलढाणा (जिमाका), दि. 24 : डॉ.
पंजाबराव देशमुख यांच्या १२७ व्या जयंतीनिमित्त डॉ. पंजाबराव देशमुख कृषी
विद्यापीठ, अकोला, कृषी विभाग, महाराष्ट्र शासन व आत्मा अकोला यांच्या संयुक्त
विद्यमाने “अॅग्रोटेक–२०२५” या राज्यस्तरीय भव्य कृषी
प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले आहे. हे तीन दिवसीय कृषी प्रदर्शन दि. २७ ते २९
डिसेंबर २०२५ या कालावधीत डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ, कृषीनगर, अकोला
येथील क्रीडांगणावर होणार आहे. या प्रदर्शनाचा शेतकऱ्यांनी मोठ्या संख्येने लाभ
घ्यावा, असे आवाहन कृषी विज्ञान केंद्र, बुलढाणा येथील वरिष्ठ शास्त्रज्ञ तथा
प्रमुख डॉ. अमोल झापे यांनी केले आहे.
या राज्यस्तरीय कृषी प्रदर्शनात नवोन्मेषी कृषी तंत्रज्ञानाचे
विस्तृत व्यासपीठ शेतकऱ्यांसाठी खुले राहणार आहे. हवामान बदलामुळे निर्माण होत
असलेल्या आव्हानांना सामोरे जाण्यासाठी तसेच शेती शाश्वततेकडे नेण्यासाठी हे
प्रदर्शन उपयुक्त ठरणार आहे. तीन दिवस चालणाऱ्या या प्रदर्शनात लाखो शेतकरी सहभागी
होण्याची अपेक्षा आहे.
या “अॅग्रोटेक–२०२५” कृषी प्रदर्शनात कृषी विद्यापीठ व
संलग्न कृषी संस्थांची दालने, विद्यापीठ शास्त्रज्ञांसोबत विविध विषयांवर दररोज
चर्चासत्र, कृषी अवजारे व उत्पादनांची दालने, कृषी व कृषी संलग्नित योजनांची
माहिती, पशुसंवर्धन व दुग्ध व्यवसाय विकास विभागाची दालने, मत्स्य व्यवसाय विभागाची
दालने, कृषी व ग्रामीण उद्योगांची माहिती, फुले, फळे व भाजीपाला प्रदर्शन, बचत
गटांचा सहभाग तसेच विद्यापीठ प्रकाशनांचे दालन यांचा समावेश राहणार आहे.
या राज्यस्तरीय कृषी प्रदर्शनाच्या माध्यमातून कृषी
तंत्रज्ञानाचा जागर होणार असून शेतकऱ्यांनी या पर्वणीचा आवर्जून लाभ घ्यावा.
प्रदर्शनातील अत्याधुनिक कृषी तंत्रज्ञानाचा आपल्या पंचक्रोशीत प्रसार करून शेती
सुजलाम-सुफलाम करण्यासाठी जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी “अॅग्रोटेक–२०२५” राज्यस्तरीय भव्य कृषी प्रदर्शनास
मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन डॉ. अमोल झापे यांनी केले आहे.


Comments
Post a Comment