सशस्त्र सेना ध्वज दिन निधी संकलनाचा उत्साहात शुभारंभ

 


बुलडाणा, (जिमाका) दि. 8:   सशस्त्र सेना ध्वज दिन निधी संकलनाचा शुभारंभ सैनिकी सभामंडप, बुलढाणा येथे रविवार, 7 डिसेंबर रोजी उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला.

या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान पोलीस अधीक्षक निलेश तांबे यांनी भूषविले. यावेळी जिल्हा पुनर्वसन अधिकारी सदाशिव शेलार, राज्य उत्पादन शुल्कचे विभागीय उप आयुक्त डॉ.पराग नवलकर, बुलढाणा अर्बन बँकेचे संस्थापक अध्यक्ष राधेश्यामजी चांडक,  तसेच स्क्वॉड्रन लीडर डॉ. रुपाली गणेश मानमोडे, जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी उपस्थित होते. यावेळी ध्वजारोहण करून ध्वज दिन निधी संकलनाचे औपचारिक उद्घाटन करण्यात आले.

अध्यक्षीय भाषणात पोलीस अधीक्षक निलेश तांबे यांनी सांगितले की, माजी सैनिकांनी पोलिस भरतीतील आरक्षणाचा जास्तीत जास्त लाभ घ्यावा. सीमेवर सैनिक पहारा देतात म्हणूनच पोलीस दल आंतरिक सुरक्षा सक्षमपणे सांभाळू शकते, असे त्यांनी नमूद केले. तसेच जिल्हा पोलीस दल राष्ट्रीय कार्यासाठी नेहमी तत्पर राहील, अशी ग्वाही त्यांनी दिली.

राधेश्यामजी चांडक यांनी बुलढाणा जिल्ह्यातील ध्वज दिन निधी संकलन 2 कोटींपेक्षा जास्त करण्याचा निर्धार व्यक्त केला. तर जिल्हा पुनर्वसन अधिकारी सदाशिव शेलार यांनी सर्व विभागांनी एकत्रित येऊन या राष्ट्रीय कार्यात हातभार लावण्याचे आवाहन केले. ध्वज दिन निधी मागील देशभक्तीपर भावना नागरिकांनी समजून घेणे आवश्यक असल्याचेही त्यांनी सांगितले.

ध्वज दिनाचे महत्त्व

7 डिसेंबर हा दिवस देशभर ध्वज दिन म्हणून पाळण्यात येतो. 7 डिसेंबरपासून ते पुढील वर्षाच्या नोव्हेंबर अखेरपर्यंत निधी संकलन केले जाते. या निधीचा उपयोग शहीद जवानांच्या कुटुंबियांच्या सहाय्यासाठी, युद्धातील अपंग सैनिकांच्या पुनर्वसनासाठी व  निवृत्त सैनिकांच्या कल्याणकारी योजनांसाठी केला जातो.

बुलढाणा जिल्ह्याची उल्लेखनीय कामगिरी

मागील वर्षी बुलढाणा जिल्ह्याला ₹59,50,000 इतका इष्टांक देण्यात आला होता; मात्र जिल्ह्यातील नागरिकांच्या उत्स्फूर्त सहभागामुळे ₹66,35,000 (111.51%) इतके भरीव संकलन करण्यात आले.
यंदाही बुलढाणा जिल्हा अधिक मोठ्या प्रमाणावर निधी संकलन करण्यास सज्ज झाला आहे.

सशस्त्र सेना ध्वज दिनाच्या औचित्याने देशरक्षकांच्या कार्याचा सन्मान करत जिल्ह्यातील विविध विभाग व नागरिकांनी या राष्ट्रीय उपक्रमात सक्रियपणे सहभागी व्हावे, असे आवाहन यावेळी करण्यात आले.

000000

Comments

Popular posts from this blog

लोकशाहीर अण्णाभाऊ साठे महामंडळाची थेट कर्ज योजना

बुलढाणा जिल्ह्याची महान हो कीर्ती

स्वयं अर्थसहाय्यिता नवीन शाळांना मान्यता व दर्जावाढीची शिफारस; हरकती मागविल्या