खातेदारांना त्यांच्या ठेवी मिळण्यासाठी बॅंकांनी व्यापक जनजागृती करावी - जिल्हाधिकारी डॅा. किरण पाटील
Ø
जिल्हाधिकाऱ्यांच्या हस्ते
विशेष मोहिमेचा शुभारंभ ; ३२ खातेदारांना प्रमाणपत्र
प्रदान
Ø
उद्गम पोर्टल, बॅंकांमध्ये
माहिती उपलब्ध
बुलढाणा (जिमाका), दि. 30 : जिल्ह्यातील बँकांमध्ये दीर्घकाळ दावा न झालेल्या १.३६ लाख खातेदारांच्या
४८. ७२ कोटींच्या ठेवी संबंधित खातेदारांना किंवा त्यांच्या कायदेशीर वारसांना परत
मिळण्यासाठी बॅंकांनी व्यापक जनजागृती करावी, तसेच नागरिकांनीही आपल्या बॅंकिंग व्यवहाराबाबत
जागरुक राहावे, असे आवाहन जिल्हाधिकारी डॅा. किरण पाटील यांनी केले.
रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया यांच्या मार्गदर्शनानुसार
बँकांमध्ये दीर्घकाळ दावा न झालेल्या ठेवी संबंधित खातेदारांना किंवा त्यांच्या कायदेशीर
वारसांना परत मिळण्यासाठी जिल्ह्यात विशेष मोहीम राबविण्यात येत आहे. या मोहिमेचा जिल्हाधिकाऱ्यांच्या
हस्ते जिल्हा नियोजन भवन येथे शुभारंभ सोमवारी करण्यात आला. यावेळी ३२ खातेदारांना
४ लाख ७० हजार रुपयांच्या ठेवी परत करण्यात आल्याबाबतचे प्रमाणपत्र प्रातिनिधीक स्वरुपात
देण्यात आले. या कार्यक्रमाला जिल्हा पुनर्वसन अधिकारी सदाशीव शेलार, सेंट्रल बॅंकेचे
क्षेत्रीय प्रमुख पंकज कुमार, स्टेट बॅंकेचे क्षेत्रीय प्रमुख नीरज कुमार, जिल्हा अग्रनी
बॅंकेचे व्यवस्थापक के.के सिंग आणि खातेदार मोठ्यासंख्येने उपस्थित होते.
जिल्हाधिकारी किरण पाटील पुढे म्हणाले, बॅंकांनी
या मोहिमेची व्यापक जनजागृती करावी. या जनजागृती मोहिमेते जिल्ह्यातील युवकांनीही सहभाग
घ्यावा. खातेदारांनी आपल्या बॅंक खात्यातील व्यवहारांबाबत निष्काळजीपणा, दुर्लक्षितपणा
न करता जागरुक राहून लक्ष ठेवावे. बॅंकिंग व्यवहारांबाबत नागरिकांनीही सजग राहावे.
बॅंक खाते अद्ययावत करण्यासाठी बॅंकांच्या सुचनांनुसार ईकेवायसी, वारस नोंदणी, पत्ता,
संपर्क क्रमांक आदी आवश्यक माहिती अद्ययावत करुन घ्यावी. बॅंकांनी खातेदारांना लोकसेवा
हक्क कायद्यानुसार सहज आणि सुलभ पद्धतीने सेवासुविधा उपलब्ध कराव्या. जिल्ह्यातील १.३६
लाख दावे न झालेल्या ४८.७२ कोटींच्या ठेवी खातेदारांना किंवा त्यांच्या वारसांना मिळण्यासाठी
बॅंकांनी जनजागृती करावी, अशा सूचना जिल्हाधिकारी किरण पाटील यांनी यावेळी दिल्या.
बॅंकामधील पडित रक्कम खातेदारांना किंवा त्यांच्या वारसांना देवून ही रक्कम व्यवहाराच्या मुख्य प्रवाहात यावी यासाठी रिझर्व बॅंकेचा निर्देशानुसार ही मोहीम राबविली जात आहे. या मोहिमेची मुदत ३१ डिसेंबरपर्यंत असली तरी ही मोहीम बॅंकांमध्ये सुरु राहणार आहे. दावे न झालेल्या खातेदारांची माहिती रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया यांच्या https://udgam.rbi.org.in/unclaimed-deposits/#/login उद्गम पोर्टलवर आणि बॅंकामध्येही उपलब्ध करण्यात आली आहे. खातेदारांना बॅंकांचे सहकार्य राहणार आहे, त्यामुळे खातेदारांनी या योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहन पंकज कुमार यांनी केले आहे.
यावेळी स्टेट बॅंकेचे क्षेत्रीय प्रमुख नीरज कुमार
यांनी मोहिमेची माहिती दिली.
४८० खातेदारांचे ११.२८ कोटींचे दावे निकाली
जिल्हा अग्रणी बॅंक व्यवस्थापक के. के. सिंग यांनी
दिलेल्या माहितीनुसार सोमवारी जिल्ह्यातील ४८० खातेदारांचे सुमारे ११.२८ कोटी रुपयांचे
दावे निकाली काढण्यात आले असून उर्वरित दावे निकाली काढण्यासाठी मोहीम प्रभावीपणे राबविण्यात
येत आहे.
०००००




Comments
Post a Comment