परिवहन सेवांसाठी अधिकृत संकेतस्थळांचा वापर करावा
Ø परिवहन विभागाचे नागरिकांना आवाहन
बुलढाणा, (जिमाका) दि. 15: परिवहन विभागाच्या नावाखाली सुरू असलेल्या बनावट वेबसाईट्स, फसव्या मोबाईल अॅप्स (एपीके), एसएमएस, व्हॉट्सॲप मॅसेज व खोट्या ई-चलन लिंकद्वारे नागरिकांची मोठ्या प्रमाणात फसवणूक होत असल्याचे निदर्शनास आले आहे. या पार्श्वभूमीवर परिवहन विभागाने नागरिकांना अधिक सतर्क राहून परिवहन सेवांसाठी विभागाच्या अधिकृत शासकीय संकेतस्थळांचा वापर करण्याचे आवाहन केले आहे.
ड्रायव्हिंग लायसन्स, वाहन नोंदणी, पत्ता बदल, ई-चलन भरणा यांसारख्या सेवांसाठी नागरिकांना सहजतेने ऑनलाइन सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. मात्र याच सुविधांचा गैरफायदा घेत सायबर गुन्हेगार नागरिकांना आमिष दाखवून आर्थिक फसवणूक करत आहेत. अनेक वेळा “चलन प्रलंबित आहे, त्वरित भरा अन्यथा कारवाई होईल” किंवा “ड्रायव्हिंग लायसन्स रद्द/सस्पेंड होणार आहे” अशा भीतीदायक संदेशांद्वारे नागरिकांना खोट्या लिंकवर क्लिक करण्यास भाग पाडले जाते.
याबाबत परिवहन विभागाने स्पष्ट केले आहे की, विभागाकडून कधीही एसएमएस किंवा व्हॉट्सॲप मॅसेजद्वारे पेमेंट लिंक पाठवली जात नाही. तसेच कोणतेही एपीके स्वरूपातील अॅप डाऊनलोड करण्यास सांगितले जात नाही. त्यामुळे “RTO Services.apk”, “mParivahan_Update.apk”, “eChallan_Pay.apk” यांसारखी अॅप्स डाऊनलोड करणे धोकादायक ठरू शकते. या अॅप्समधून ओटीपी, बँक खात्याची माहिती, युपीआय तपशील तसेच मोबाईलमधील इतर वैयक्तिक माहिती चोरीला जाण्याची शक्यता असल्याचेही विभागाने नमूद केले आहे.
नागरिकांनी केवळ केंद्र शासनाच्या .gov.in
या डोमेनवर असलेल्या अधिकृत संकेतस्थळांचाच वापर करावा. यामध्ये वाहन नोंदणीसाठी http://vahan.parivahan.gov.in
ड्रायव्हिंग लायसन्ससाठी http://sarathi.parivahan.gov.
कोणताही संशयास्पद कॉल, संदेश किंवा लिंक प्राप्त झाल्यास नागरिकांनी तात्काळ त्याकडे दुर्लक्ष करावे व तक्रार नोंदवावी, असे आवाहन करण्यात आले आहे. सायबर फसवणुकीसंदर्भात तक्रारींसाठी नॅशनल सायबर क्राईम पोर्टल http://www.cybercrime.gov.in , तसेच सायबर फसवणूक हेल्पलाईन क्रमांक 1930 उपलब्ध करण्यात आला आहे. याशिवाय जवळच्या जिल्हा सायबर पोलीस स्टेशनमध्येही थेट तक्रार दाखल करता येणार आहे, अशी माहिती प्रभारी उप प्रादेशिक परिवहन अधिकारी हेमंत खराबे यांनी दिली आहे.
0000
Comments
Post a Comment