आधुनिक संसाधनाच्या माध्यमातून नागरिकांपर्यंत शासकीय सेवा पोहोचवा - जिल्हाधिकारी डॅा.किरण पाटील

 



Ø  जिल्हाधिकारी कार्यालयात सुशासन सप्ताह कार्यशाळा

 

बुलढाणा (जिमाका), दि. 23 : आजच्या युगात कृत्रिम बुद्धीमत्ता, समाजमाध्यमांसारख्या आधुनिक संसाधनांचा प्रभावी वापर सुरु आहे. या आधुनिक संसाधनाच्या माध्यमातून केंद्र व राज्य शासनाच्या योजना, उपक्रम आणि सेवा नागरिकांपर्यंत पोहोचवा, असे निर्देश जिल्हाधिकारी डॅा. किरण पाटील यांनी अधिकाऱ्यांना दिले.

बुलढाणा जिल्ह्यात १९ ते २५ डिसेंबर या कालावधीत सुशासन सप्ताह राबविण्यात येत आहे. त्यानुषंगाने जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली विविध विभागांची कार्यशाळा मंगळवारी जिल्हाधिकारी कार्यालयात घेण्यात आली. त्यावेळी ते बोलत होते. या कार्यशाळेला जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी गुलाबराव खरात, मुख्य वनसंरक्षक सरोज गवस, निवासी उपजिल्हाधिकारी सुरेश कव्हळे, उपजिल्हाधिकारी समाधान गायकवाड व इतर विभागाचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

जिल्हाधिकारी डॅा.किरण पाटील यांनी मार्गदर्शन करतांना सांगितले की, आपल्या विभागाच्या प्रशासकीय कामकाजात अमुलाग्र बदल घडवून आणण्यासाठी आत्मनिर्भर होवून सकारात्मक दृष्टीकोण बाळगणे गरजेचे आहे. तसेच कामकाजात डिजिटल तंत्रज्ञानाचा वापर, प्रभावीपणा, पारदर्शकता, कालबद्धता आणि कमी खर्चिक व सहज उपलब्ध होईल अशा कार्यपद्धतीचा अवलंब करावा. नव्या बदलांचा स्वीकार करुन स्मार्ट काम करावे. संविधानानुसार शासकीय सेवांबाबत नागरिकांचा हक्क आहे. त्यामुळे प्रशासकीय कामकाजात सर्वसमावेशकता असली पाहिजे. यासोबतच नागरिकांच्या तक्रारी निकाली काढाव्यात, निरंतर शाश्वत विकासाच्या दृष्टीने काम करावे, अशा सूचना त्यांनी अधिकाऱ्यांना दिल्या.

मुख्य कार्यकारी अधिकारी गुलाबराव खरात यांनी प्रशासनातील कामकाज पद्धतीविषयी मार्गदर्शन केले. प्रशासनात काम करतांना अधिकारी व कर्मचाऱ्यांनी चांगल्या भावनेने व सकारात्मक दृष्टीने काम करावे. नागरिकांप्रती मदतीची भावना ठेवा, आपण लोकांच्या सेवेसाठी आहोत यांची जाणीव ठेवून काम करावे, अशा सूचना त्यांनी यावेळी दिल्या.

या कार्यशाळेत उपजिल्हाधिकारी समाधान गायकवाड यांनी जिल्हा प्रशासनाने विकसित केलेल्या सहज प्रणाली, सुलभ सेवा चॅटबॅाट, जिल्हा संकेतस्थळांची माहिती सादरीकरणाद्वारे दिली.

००००

Comments

Popular posts from this blog

लोकशाहीर अण्णाभाऊ साठे महामंडळाची थेट कर्ज योजना

बुलढाणा जिल्ह्याची महान हो कीर्ती

स्वयं अर्थसहाय्यिता नवीन शाळांना मान्यता व दर्जावाढीची शिफारस; हरकती मागविल्या