अॅग्रोटेक 2025 राज्यस्तरीय कृषी प्रदर्शनीला शेतकऱ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद Ø बुलढाणा कृषी विज्ञान केंद्राचे दालन विशेष आकर्षण

 






 

बुलढाणा, (जिमाका) दि. 30 : डॉ. पंजाबराव देशमुख यांच्या 127 व्या जयंतीनिमित्त डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ, कृषी विभाग व आत्मा, अकोला यांच्या संयुक्त विद्यमाने ‘अॅग्रोटेक 2025’ या राज्यस्तरीय भव्य कृषी प्रदर्शनीचे आयोजन दि. 27 ते 29 डिसेंबर 2025 दरम्यान क्रीडांगण, डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ, कृषी नगर, अकोला येथे करण्यात आले होते. या तीन दिवसीय कृषी प्रदर्शनीला राज्यभरातील शेतकऱ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.

प्रदर्शनात विविध नवोन्मेषी कृषी तंत्रज्ञान, आधुनिक शेती अवजारे, सुधारित वाण, नैसर्गिक शेती तसेच हवामान बदलाच्या पार्श्वभूमीवर शाश्वत शेतीकडे मार्गदर्शन करणारी माहिती मोठ्या प्रमाणावर उपलब्ध करून देण्यात आली होती. यामध्ये कृषी विज्ञान केंद्र, बुलढाणा यांचे दालन विशेष आकर्षण ठरले.

हवामान बदलामुळे शेतीसमोरील आव्हानांचा सामना करण्यासाठी कृषी विज्ञान केंद्र, बुलढाणा यांनी शेतकऱ्यांसाठी उपयुक्त व नाविन्यपूर्ण तंत्रज्ञान आपल्या दालनात सादर केले होते. या तीन दिवसांत लाखो शेतकऱ्यांनी दालनास भेट देत ऊसाच्या विविध जाती व लागवड तंत्रज्ञान, आंबा, चिंच, टोमॅटो, वाल, हळद, पेरू व सीताफळ यांच्या प्रसिद्ध जाती, फुलशेती, तुती लागवड व रेशीम उत्पादन, पशुसंवर्धन व दुग्धव्यवसाय, गायींच्या विविध जातींची माहिती क्युआर कोडच्या माध्यमातून जाणून घेतली. तसेच नैसर्गिक शेती, हवामान आधारित कृषी सल्ला, शाश्वत शेतीचे महत्व, एआय आधारित कापूस पीक व्यवस्थापन, भरडधान्य लागवड तंत्रज्ञान व अत्याधुनिक शेती अवजारे याबाबत सविस्तर माहिती देण्यात आली.

या दालनाला प्रधान सचिव(कृषी) विकासचंद्र रस्तोगी, डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ कुलगुरू डॉ. शरद गडाख, संचालक (विस्तार शिक्षण) डॉ. धनराज उंदिरवाडे, संचालक (संशोधन) डॉ. एस. एस. माने, मुख्य कार्यकारी अधिकारी अनिता मेश्राम, प्रधान वैज्ञानिक अटारी पुणे डॉ. शाकीर अली, विद्यापीठातील शास्त्रज्ञ व अधिकारी यांनी भेट देऊन कृषी विज्ञान केंद्राच्या कार्याबद्दल समाधान व्यक्त केले व पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.

 

या राज्यस्तरीय कृषी प्रदर्शनीच्या माध्यमातून लाखो शेतकऱ्यांनी आधुनिक कृषी तंत्रज्ञानाची माहिती घेतली असून, त्याचा उपयोग शेती अधिक उत्पादनक्षम व शाश्वत बनविण्यास निश्चितच होईल, असे मत बुलढाणा कृषी विज्ञान केंद्राचे वरिष्ठ शास्त्रज्ञ तथा प्रमुख डॉ. अमोल झापे यांनी व्यक्त केले.

00000

Comments

Popular posts from this blog

लोकशाहीर अण्णाभाऊ साठे महामंडळाची थेट कर्ज योजना

बुलढाणा जिल्ह्याची महान हो कीर्ती

स्वयं अर्थसहाय्यिता नवीन शाळांना मान्यता व दर्जावाढीची शिफारस; हरकती मागविल्या