सिकलसेलचा प्रसार रोखण्यासाठी जनजागृती मोहीम
बुलढाणा, (जिमाका) दि. 16:
सिकलसेल या आनुवंशिक आजाराचा प्रसार रोखण्यासाठी राज्य
शासनाच्या निर्देशानुसार बुलढाणा जिल्ह्यात विशेष जनजागृती व तपासणी मोहीम दि. 11
ते 17 डिसेंबर या कालावधीत राबविण्यात येत आहे. मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज
अभियानांतर्गत जिल्ह्यातील ग्रामीण व आदिवासी भागांमध्ये सिकलसेल तपासणी, समुपदेशन
व मोफत उपचार सुविधा उपलब्ध करून देण्यात येत जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. अमोल गिते
यांनी दिली.
जिल्हा आरोग्य विभागाच्या वतीने प्राथमिक आरोग्य केंद्रे,
उपकेंद्रे, ग्रामीण रुग्णालये तसेच शासकीय रुग्णालयांमध्ये सिकलसेल तपासणी शिबिरे
आयोजित करण्यात आली आहेत. या शिबिरांमधून सिकलसेल वाहक व सिकलसेलग्रस्त रुग्णांची
ओळख पटवून त्यांना मोफत औषधोपचार, नियमित तपासणी व समुपदेशन सेवा दिली जात आहे.
जिल्हा आरोग्य अधिकाऱ्यांनी दिलेल्या आकडेवारीनुसार बुलढाणा
जिल्हयात सन 2010 पासून आतापर्यंत नागरिकांची 11.50 लाख सिकलसेल तपासणी करण्यात
आली या तपासणीमध्ये सिकलसेल ग्रस्त 244 रूग्ण, थॅलेसिमिया रुग्ण 95, हिमोफिलीया
रुग्ण 48 आणि सिकलसेल वाहक 1739 रुग्ण आढळून आले आहेत. या रुग्णांना संजय गांधी
निराधार योजना तसेच इतर शासकीय आरोग्य योजनांचा लाभ मिळवून देण्याची प्रक्रिया
सुरू आहे.
सिकलसेल हा आजार आनुवंशिक असल्याने लहान वयात तपासणी करणे
अत्यंत महत्त्वाचे आहे. त्यामुळे शालेय व महाविद्यालयीन विद्यार्थ्यासाठी विशेष
जनजागृती कार्यक्रम, व्याख्याने आणि आरोग्य शिक्षण उपक्रम राबविले जात आहेत.
विवाहपूर्व तपासणीचे महत्त्व नागरिकांपर्यंत पोहोचवण्यावरही प्रशासनाचा भर
असल्याची माहिती जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. अमोल गिते यांनी दिली.
0000
Comments
Post a Comment