गुणवत्तापूर्ण आरोग्य सेवा देणे ही प्रशासनाची प्राथमिक जबाबदारी -जिल्हाधिकारी डॉ. किरण पाटील
बुलढाणा (जिमाका), दि. 30 : नागरिकांना
सहज, सुलभ व वेळेत गुणवत्तापूर्ण आरोग्य सेवा उपलब्ध करून देणे ही प्रशासनाची प्राथमिक
जबाबदारी असल्याचे जिल्हाधिकारी डॉ. किरण पाटील यांनी स्पष्ट केले. राज्यस्तरावर निश्चित
करण्यात आलेल्या आरोग्य निदर्शकांमध्ये जिल्हा कोणत्याही परिस्थितीत मागे राहू नये,
यासाठी प्रभावी नियोजन, काटेकोर अंमलबजावणी व सातत्यपूर्ण देखरेख आवश्यक असल्याचे त्यांनी
सांगितले.
जिल्ह्यातील आरोग्य सेवा अधिक सक्षम, गतिमान व लोकाभिमुख
करण्याच्या उद्देशाने दि. 26 डिसेंबर 2025 रोजी जिल्हा एकात्मिक आरोग्य व कुटुंब कल्याण
सोसायटी नियामक समितीची संयुक्त सभा जिल्हाधिकारी डॉ. पाटील यांच्या अध्यक्षतेखाली
पार पडली. या बैठकीस वैद्यकीय महाविद्यालयाच्या अधिष्ठाता डॉ. कैलास झिने, जिल्हा शल्यचिकित्सक
डॉ. दत्तजय बिराजदार, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. अमोल गिते, सहायक जिल्हा आरोग्य अधिकारी
डॉ. हरि पवार, अतिरिक्त जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. रंजित मंडाले, जिल्हा माता व बाल
संगोपन अधिकारी डॉ. मिलिंद जाधव, जिल्हा क्षयरोग अधिकारी डॉ. वर्षा गुट्टे, स्त्री
रुग्णालय वैद्यकीय अधीक्षक डॉ. पाटील, निवासी वैद्यकीय अधिकारी डॉ. प्रविण घोंगटे,
जिल्हा आयुष अधिकारी डॉ. प्रशांत तांगडे, जिल्हा कार्यक्रम व्यवस्थापक तसेच आरोग्य
विभागातील विविध स्तरांवरील अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.
सभेमध्ये जिल्ह्यात राबविण्यात येत असलेल्या आरोग्य
विभागाच्या सर्व योजना, कार्यक्रम, उपलब्ध मनुष्यबळ व साधनसामग्री यांचा सखोल, वस्तुनिष्ठ
व नियोजनबद्ध आढावा घेण्यात आला. क्षयरोग, हिवताप, कुष्ठरोग, सिकलसेल, राष्ट्रीय बाल
स्वास्थ्य कार्यक्रम, नियमित लसीकरण, कुपोषण व मोतीबिंदू नियंत्रण कार्यक्रमांवर विशेष
भर देण्यात आला.
सिकलसेल जनजागृती अभियानाबाबत स्पष्ट निर्देश
राज्य शासनाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार दि. 15 जानेवारी
ते 31 जानेवारी 2026 या कालावधीत जिल्ह्यात सिकलसेल जनजागृती व तपासणी अभियान प्रभावीपणे
राबविण्यात येणार आहे. या अभियानांतर्गत 0 ते 40 वर्षे वयोगटातील नागरिकांची सिकलसेल
तपासणी करण्यात येणार असून, एकही पात्र लाभार्थी तपासणीपासून वंचित राहू नये, याची
विशेष दक्षता घेण्याचे निर्देश देण्यात आले. जिल्हा सिकलसेलमुक्त करण्यासाठी व्यापक
क्षेत्रस्तरीय अंमलबजावणी व लोकसहभाग आवश्यक असल्याचे यावेळी नमूद करण्यात आले.
आयुष्मान भारत योजनेचे 100 टक्के उद्दिष्ट
यावेळी एकत्रित आयुष्मान भारत योजनेअंतर्गत 100 टक्के
आयुष्मान कार्ड वितरण पूर्ण करण्यावर विशेष भर देण्यात आला. पात्र लाभार्थी एकही वंचित
राहू नये, यासाठी सर्व संबंधित यंत्रणांनी समन्वयाने विशेष मोहिम राबवावी, असे निर्देश
बैठकीत देण्यात आले.
00000


Comments
Post a Comment