सिकलसेल निर्मूलनासाठी जिल्ह्यात १५ ते ३१ जानेवारीदरम्यान विशेष मोहीम
बुलढाणा (जिमाका), दि. 24 : सिकलसेल आजाराच्या प्रतिबंध व नियंत्रणासाठी बुलढाणा जिल्ह्यात दि. १५ ते ३१ जानेवारी २०२५ या कालावधीत विशेष सिकलसेल जनजागृती व तपासणी मोहीम राबविण्यात येणार आहे. या मोहिमेच्या माध्यमातून नागरिकांमध्ये सिकलसेल आजाराबाबत व्यापक जनजागृती करण्यात येणार असून वेळेवर तपासणी, निदान व उपचार सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार आहेत.
ही विशेष मोहीम जिल्हाधिकारी डॉ. किरण पाटील व जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी गुलाब खरात यांच्या मार्गदर्शनाखाली राबविण्यात येत आहे. जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. अमोल गिते यांच्या नेतृत्वाखाली संपूर्ण आरोग्य यंत्रणा सज्ज झाली असून जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. दतात्रय बिराजदार यांचेही या मोहिमेस विशेष सहकार्य लाभत आहे.
मोहिमेदरम्यान जिल्ह्यातील प्राथमिक आरोग्य केंद्रे, ग्रामीण रुग्णालये, आरोग्य उपकेंद्रे तसेच शाळा व महाविद्यालयांमध्ये सिकलसेल तपासणी शिबिरे, समुपदेशन व जनजागृती कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येणार आहे. विशेषतः आदिवासी व दुर्गम भागांतील नागरिक, किशोरवयीन मुले-मुली तसेच गरोदर मातांची तपासणी करण्यात येणार आहे.
सिकलसेल आजार हा अनुवंशिक स्वरूपाचा असल्याने त्याची वेळेवर तपासणी व योग्य उपचार अत्यंत आवश्यक आहेत. त्यामुळे जिल्हा आरोग्य विभागाने नागरिकांना या विशेष मोहिमेचा लाभ घेऊन सिकलसेल तपासणी करून घेण्याचे आवाहन केले आहे. सिकलसेलमुक्त बुलढाणा जिल्हा घडविण्यासाठी नागरिकांनी प्रशासनास सहकार्य करावे, असेही आवाहन करण्यात आले आहे.
00000
Comments
Post a Comment