जिल्ह्यात नायलॉन मांजाच्या निर्मिती, वापर व विक्रीवर कायमस्वरुपी बंदी; जिल्हादंडाधिकाऱ्यांचे आदेश
बुलढाणा (जिमाका), दि. 29 : मकर संक्रांतीच्या
कालावधीत पतंग उडविण्याचे प्रमाण वाढत असून त्यासाठी वापरण्यात येणाऱ्या नायलॉन मांजामुळे
मानवी जीवितास तसेच पशु-पक्ष्यांच्या जीवितास गंभीर धोका निर्माण होत आहे. नायलॉन मांजामुळे
जखमी व मृत्यूच्या घटनांमध्ये वाढ होत असल्याच्या पार्श्वभूमीवर पर्यावरण (संरक्षण)
अधिनियमाअंतर्गत संपूर्ण बुलढाणा जिल्ह्यात नायलॉन मांजाची निर्मिती, वापर, विक्री
व साठवणुकीवर कायमस्वरूपी बंदी घालण्यात आली आहे. याबाबतचे आदेश जिल्हादंडाधिकारी डॉ.
किरण पाटील यांनी निर्गमित केले आहेत.
बुलढाणा जिल्ह्यातील सर्व घाऊक व्यापारी, किरकोळ
व्यापारी, साठवणुकदार यांना नायलॉन मांजाची विक्री व साठवणुक करण्यास प्रतिबंध करण्यात
येत आहे. आदेशाची अंमलबजावणी करण्यासाठी सर्व स्थानिक स्वराज्य संस्था व पोलीस विभाग
यांनी स्वतंत्ररित्या पथके तयार करुन आवश्यक ती कार्यवाही करावी. सदर आदेशाचे कोणतीही
व्यक्ती वा संस्था यांनी उल्लंघन केल्यास पर्यांवरण(संरक्षण) अधिनियम 1986 चे कलम
15 अन्वये शिक्षेस पात्र राहिल, असे जिल्हा दंडाधिकारी यांच्या आदेशात नमूद आहे.
00000
Comments
Post a Comment