शेतकऱ्यांना ऑफलाईन पीक पाहणी करता येणार

 


Ø  ग्राम महसूल अधिकाऱ्याकडे पीक नोंदणीसाठी अर्ज करावा

बुलढाणा (जिमाका), दि. 24 : खरीप हंगामामध्ये विहित मुदतीत ई-पीक पाहणीची नोंद न झालेल्या शेतकऱ्यांच्या पिकांची ऑफलाईन पाहणी करण्याबाबत महसूल व वन विभाग, महाराष्ट्र शासनाने दि. 14 डिसेंबर 2025 रोजी शासन निर्णय निर्गमित केला आहे.

या शासन निर्णयानुसार, खरीप हंगाम 2025 मध्ये विहित कालावधीत ई-पिक पाहणीची नोंद न झालेल्या शेतकऱ्यांच्या पिकांची ऑफलाईन पाहणी करण्यासाठी मंडळ अधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली ग्राम महसूल अधिकारी, ग्राम विकास अधिकारी व सहाय्यक कृषी अधिकारी यांची ग्रामस्तरीय समिती स्थापन करण्यात आली आहे.

ज्या शेतकऱ्यांना काही कारणास्तव खरीप हंगाम 2025 मध्ये पिकांची नोंद करता आली नाही, अशा शेतकऱ्यांनी आपल्या गावातील ग्राम महसूल अधिकारी यांच्याकडे दि. 17 ते 24 डिसेंबर या कालावधीत पीक नोंदणीसाठी अर्ज सादर करावेत. अर्ज सादर केल्यानंतर त्याची पोहोच (रसीद) घेणे आवश्यक असल्याचे आवाहन तहसीलदार शेगांव यांनी केले आहे.

प्राप्त अर्जांच्या अनुषंगाने ग्रामस्तरीय समिती संबंधित शेतकऱ्यांच्या शेतात संयुक्तपणे प्रत्यक्ष स्थळ पाहणी करणार असून ही पाहणी दि. 25 डिसेंबर 2025 ते 7 जानेवारी 2026 या कालावधीत केली जाणार आहे. स्थळपाहणीपूर्वी समितीमार्फत पाहणीची तारीख व वेळ निश्चित करून संबंधित शेतकरी तसेच शेताच्या बांधाला लागून असलेल्या किमान 4 ते 5 शेतकऱ्यांना लेखी स्वरूपात पूर्वसूचना दिली जाईल.

प्रत्यक्ष स्थळपाहणीच्या दिवशी खरीप हंगाम 2025 मध्ये शेतकऱ्यांनी प्रत्यक्षात कोणत्या पिकाची लागवड केली होती, याबाबत स्थानिक चौकशी करून पीक नोंदणीच्या अनुषंगाने वस्तुस्थितीदर्शक पंचनामा तयार करण्यात येईल. तसेच शेजारील शेतकऱ्यांचे जबाब नोंदविण्यात येणार आहेत. ज्या शेतकऱ्यांची पीक नोंदणी यापूर्वी गाव नमुना क्रमांक 12 वर प्रतिबिंबित झालेली नाही, त्यांच्याबाबत ही प्रक्रिया राबविण्यात येणार आहे.

वेळापत्रक

  • शेतकऱ्यांनी ग्राम महसूल अधिकारी यांच्याकडे अर्ज सादर करणे : 17 ते 24 डिसेंबर 2025, ग्रामस्तरीय समितीकडून स्थळपाहणी : 25 डिसेंबर 2025 ते 7 जानेवारी 2026, स्थळपाहणी अहवाल उपविभागीय स्तरीय समितीकडे सादर करणे 8 ते 12 जानेवारी 2026,
  • उपविभागीय स्तरीय समितीकडून अहवाल जिल्हाधिकारी यांच्याकडे सादर करणे : 13 ते 15 जानेवारी 2026

शेगाव तालुक्यातील सर्व संबंधित शेतकऱ्यांनी दिलेल्या कालावधीत आवश्यक अर्ज सादर करून या प्रक्रियेचा लाभ घ्यावा, असे आवाहन तहसीलदार शेगाव यांनी केले आहे.

00000

Comments

Popular posts from this blog

लोकशाहीर अण्णाभाऊ साठे महामंडळाची थेट कर्ज योजना

बुलढाणा जिल्ह्याची महान हो कीर्ती

स्वयं अर्थसहाय्यिता नवीन शाळांना मान्यता व दर्जावाढीची शिफारस; हरकती मागविल्या