मतमोजणीच्या दिवशी ‘ड्राय डे’ जाहीर
· मद्य विक्रीस राहणार बंदी
· उल्लंघन करणाऱ्यांवर कारवाई होणार
बुलढाणा,
(जिमाका) दि. 20 : जिल्ह्यातील
11 नगरपरिषदांच्या सदस्यपद व थेट अध्यक्षपदाच्या सार्वत्रिक निवडणुकांची मतमोजणी
रविवारी, 21 डिसेंबर रोजी होणार आहे. या पार्श्वभूमीवर मतदान व मतमोजणीच्या दिवशी
निवडणूक प्रक्रिया पारदर्शक व शांततेत पार पाडण्यासाठी जिल्हाधिकारी यांनी
नगरपरिषदांच्या हद्दीत संपूर्ण दिवस कोरडा
दिवस (ड्राय डे) पाळण्याचे आदेश जारी केले आहे.
राज्य निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार व महाराष्ट्र दारुबंदी
कायद्यातील तरतुदीनुसार निवडणूक प्रक्रिया पारदर्शक व शांततेत पार पाडण्यासाठी
जिल्हाधिकारी यांनी महत्त्वाचा आदेश जारी केला आहे. त्यानुसार सुधारित
कार्यक्रमानुसार होणाऱ्या नगरपरिषदांच्या मतदानाच्या आदल्या दिवशी म्हणजे 19
डिसेंबर रोजी, मतदानाच्या दिवशी 20 डिसेंबर रोजी तसेच बुलढाणा, चिखली, देऊळगाव
राजा, जळगाव जामोद, खामगाव, लोणार, मलकापूर, मेहकर, नांदुरा, शेगाव आणि सिंदखेड
राजा या नगरपरिषदांच्या हद्दीत मतमोजणीच्या दिवशी 21 डिसेंबर 2025 रोजी संपूर्ण
दिवस कोरडा दिवस (ड्राय डे) जाहीर करण्यात आला आहे.
या आदेशानुसार जिल्ह्यातील निवडणूक असलेल्या नगरपरिषदांच्या हद्दीत
सर्व ठोक व किरकोळ देशी व विदेशी मद्य विक्रीच्या अनुज्ञप्त्या बंद ठेवण्याचे निर्देश
देण्यात आले आहेत. संबंधित सर्व अबकारी अनुज्ञप्तीधारकांनी या आदेशाची काटेकोर
अंमलबजावणी करावी, असे आवाहन जिल्हाधिकारी यांनी केले आहे. सदर आदेशाचे उल्लंघन
करणाऱ्या अनुज्ञप्तीधारकांविरुद्ध महाराष्ट्र दारुबंदी कायद्यान्वये कडक कारवाई
करण्यात येणार असल्याचा इशाराही देण्यात आला आहे.
000
Comments
Post a Comment