नगरपरिषद निवडणुकीच्या मतमोजणीसाठी प्रशासन सज्ज

 



 

Ø  मतदान व मतमोजणीची तयारी पूर्ण

Ø  राज्य निवडणूक आयुक्तांनी घेतला पूर्वतयारीचा आढावा

Ø  ११ केंद्रांवर मतमोजणी होणार

Ø  पोलीसांचा चोख बंदोबस्त

 

बुलढाणा, (जिमाका) दि. 16: जिल्ह्यातील १० नगरपरिषद स्थानिक स्वराज्य संस्थांच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी २ डिसेंबर रोजी मतदान पार पडले असून २१ डिसेंबर रोजी मतमोजणी प्रक्रिया पार पडणार आहे. तसेच देऊळगाव राजा नगरपरिषद आणि खामगाव, शेगाव व जळगाव जामोद या नगरपरिषद क्षेत्रातील ७ प्रभागांसाठी २० डिसेंबर रोजी मतदान घेतले जाणार आहे. या पार्श्वभूमीवर मतदान व मोजणीसाठी जिल्ह्यातील निवडणूक प्रशासनाची तयारी पूर्ण झाली असून प्रशासन सज्ज असल्याची माहिती जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी डॅा. किरण पाटील यांनी दिली.

 

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या सार्वत्रिक निवडणुकीच्या पूर्वतयारीच्या अनुषंगाने राज्य निवडणूक आयुक्त दिनेश वाघमारे यांनी दूरदृष्यप्रणालीद्वारे आढावा बैठक घेतली. यावेळी जिल्हाधिकाऱ्यांनी माहिती दिली.या बैठकीला विभागीय आयुक्त श्वेता सिंघल, जिल्हाधिकारी डॅा. किरण पाटील, पोलीस अधीक्षक, सर्व निवडणूक निर्णय अधिकारी  आदी वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

 

या बैठकीत जिल्हाधिकारी डॅा. किरण पाटील यांनी नगरपरिषद निवडणूक विषयक तयारीची माहिती दिली. यात जिल्ह्यातील एकूण ११ केंद्रांवर मतमोजणी होणार आहे. तसेच देऊळगाव राजा नगरपरिषद क्षेत्रातील १० प्रभाग व जळगाव जामोद २ (६अ,६ब,७ब), खामगाव ४ (५अ,७अ,९ब,१६ब) आणि शेगांव १ (४अ,४ब) अशा एकूण १७ प्रभागातील ३० सदस्य पदांसाठी मतदान घेण्यात येणार आहे. या मतदानासाठी एकूण ५८ मतदान केंद्र असणार आहेत. यात देऊळगाव राजा ३०, जळगाव जामोद ६, खामगाव १८ आणि शेगांव ४ मतदान केंद्रांचा समावेश आहे. यामध्ये खामगाव येथे ९ संवेदनशील मतदान केंद्र आहेत. मतदान प्रक्रिया शांततेत व सुरळीत पार पाडण्यासाठी ३४९ अधिकारी व कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. तसेच मतमोजणीसाठी २३३५ पोलीस अधिकारी व कर्मचारी आणि ५ आरसीपी व १२ एसआरपीएफच्या तुकड्यांचा बंदोबस्त पोलीस प्रशासनाकडून करण्यात आला असल्याची माहिती जिल्हाधिकारी डॅा. किरण पाटील आणि पोलीस अधीक्षक निलेश तांबे यांनी दिली.

 

‘या’ ११ केंद्रांवर मतमोजणी होणार

 

राज्य निवडणूक आयोगाच्या सुधारित कार्यक्रमानुसार नगरपरिषद निवडणुकीचे २० डिसेंबर रोजी मतदान झाल्यानंतर २१ डिसेंबर रोजी मतमोजणी होवून निकाल जाहीर करण्यात येणार आहे. त्यानुसार बुलढाणा नगरपरिषदेची मतमोजणी ही नगरपरिषद सभागृह, बुलढाणा,

चिखली- तालुका क्रीडा संकुल,चिखली,

 देऊळगाव राजा- नगरपरिषद सभागृह (२ रा मजला), देऊळगाव राजा,

जळगाव जामोद- नगरपरिषद योगा हॅाल, जळगाव जामोद, खामगाव- राष्ट्रपिता महात्मा गांधी सभागृह, तहसिल कार्यालय, खामगाव,

लोणार - शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था, लोणार,

मलकापूर- शासकीय तंत्र माध्यमिक विद्यालय, मलकापूर,

मेहकर - तालुका क्रीडा संकुल, मेहकर,

नांदुरा- तहसिल कार्यालय, नांदुरा,

शेगाव - तहसिल विभाग, एमएससीबी चौक, शेगाव,

सिंदखेड राजा- नगरपरिषद सभागृह, सिं. राजा येथे मतमोजणी प्रक्रिया पार पडणार आहे.

 

स्ट्राँग रुमच्या सुरक्षेसाठी पोलीस तैनात

 

यासोबतच मतपेट्या ठेवण्यात आलेल्या स्ट्राँग रुमच्या सुरक्षेसाठी सीसीटिव्ही यंत्रणा आणि २२ पोलीस अधिकारी व २२० पोलीस अंमलदार अशा एकूण ४४० पोलीसांचा तर ११ एसआरपीएफ तुकड्यांचा चोख बंदोबस्त करण्यात आला असल्याची माहिती यावेळी देण्यात आली.

 

या बैठकीच्या माध्यमातून जिल्हा प्रशासनाच्या पूर्वतयारीचा आढावा घेवून स्थानिक स्वराज्य संस्थांची निवडणूक प्रक्रिया शांततेत व निर्भय वातावरणात पार पाडण्यासाठी प्रशासन सज्ज ठेवण्याचे निर्देश राज्य निवडणूक आयुक्त दिनेश वाघमारे यांनी यावेळी दिले. त्यानुसार जिल्ह्यातील नगरपरिषद निवडणुकीसाठी निवडणूक व पोलीस प्रशासन सज्ज असल्याचे जिल्हाधिकारी डॅा. किरण पाटील यांनी यावेळी सांगितले.

००००

Comments

Popular posts from this blog

लोकशाहीर अण्णाभाऊ साठे महामंडळाची थेट कर्ज योजना

बुलढाणा जिल्ह्याची महान हो कीर्ती

स्वयं अर्थसहाय्यिता नवीन शाळांना मान्यता व दर्जावाढीची शिफारस; हरकती मागविल्या