Thursday 30 November 2023

दत्तक विधान प्रक्रिया समजून घ्या – जिल्हा बाल संरक्षण अ‍धिकारी

 बुलडाणा, दि. 30(जिमाका): बाल न्याय मुलांची (काळजी व संरक्षण) अधिनियम 2015 व सुधारित 2021 दत्तक नियमावली 2022 नुसार भारतात दत्तक विधान प्रक्रिया राबविली जाते. यानुसार दत्तक विधान प्रक्रिया पूर्ण करून भावी इच्छुक माता-पिता बालक दत्तक घेऊ शकतात, असे जिल्हा बाल संरक्षण अधिकारी दिवेश मराठे यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे कळविले आहे.

            भावी दत्तक माता हे शारीरिक, मानसिक, भावनात्मक आणि आर्थिक स्वरुपात सक्षम असणे आवश्यक आहे. सदर दत्तक विधान प्रक्रियेसाठी दोन्ही पती-पत्नीची सहमती असणे आवश्यक आहे. एकल महिला दत्तकसाठी बालक किंवा बालिका निवडू शकते, एकल पुरुष फक्त बालकाची निवड करु शकतो. बाळ दत्तक घेणेसाठी बालकाचे वय 2 वर्षाच्या आत असावे. भावी दत्तक माता-पिता यांची कमाल वयोमर्यादा संयुक्तीक 85 वर्ष, एकल भावी माता, पिता यांची कमाल वयोमर्यादा 40 वर्ष असावी.

 बालकाचे वय 2 वर्ष ते 4 वर्षापर्यंतचे बालक, भावी दत्तक माता पिता यांची कमाल वयोमर्यादा संयुक्तीक 90 वर्ष, एकल भावी माता, पिता यांची कमाल वयोमर्यादा 45 वर्षे असावी. बालक 4 ते 8 वर्षापर्यंतचा असल्यास माता-पिता यांची कमाल वयोमर्यादा संयुक्तीक 100 वर्षे असावी. एकल भावी माता, पिता यांची कमाल वयोमर्यादा 50 वर्ष, असावी. तर बालकाचे वय 8 ते 18 वर्षापर्यंतचे बालक-भावी दत्तक माता पित्याची कमाल वयोमर्यादा संयुक्तीक 110 वर्षे असावी. एकल भावी माता, पिता यांची कमाल वयोमर्यादा 55 वर्षे असावी. दत्तक विधानासाठी अर्ज दत्तक विधानमार्फत बाळ घेऊ इच्छिणाऱ्या भावी, माता-पिता यांनी ऑनलाईन पोर्टल https://cara.wcd.gov.in या संकेतस्थळावर अर्ज करावा तसेच दत्तक विधानाबाबत अधिक माहितीसाठी जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी कार्यालय अंतर्गत जिल्हा बाल संरक्षण कक्ष, सुवर्ण नगर, बस स्टँड मागे, बुलडाणा येथे भेट देता येईल.

******

No comments:

Post a Comment