Friday 3 November 2023

महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेंतर्गत विहीर व फळबाग लागवडीसाठी अर्ज करण्याचे आवाहन


 

महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेंतर्गत

विहीर व फळबाग लागवडीसाठी अर्ज करण्याचे आवाहन

 

बुलढाणा दि. 3 (जिमाका):  महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेतर्गत जिल्ह्यातील प्रत्येक ग्रामपंचायतीमध्ये विहिरी व शेततळयांची कामे करण्यात येणार आहे. तसेच शेतीपुरक पिकांना प्रोत्साहन देण्यासाठी वृक्ष व फळबागाची लागवड करण्यात येणार आहे. शेतकऱ्यांनी या योजनेचा लाभ घेण्यासाठी अर्ज करण्याचे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. किरण पाटील यांनी केले आहे.

 

महाराष्ट्र गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेतर्गत मिशन मोडवर विहिरी व शेततळयांची कामे सुरु करण्याचे निर्देश मनरेगाचे महासंचालक यांनी दिले आहे. त्याअनुषंगाने जिल्ह्यातील प्रत्येक ग्रामपंचायत येथे 15 विहिरी व 10 शेततळयांची कामे करण्यात येणार आहे. तसेच प्रत्येक ग्रामपंचायत येथे 1000 बांबू रोपे लागवड, 500 शेवगा रोपे लागवड, 2 हेक्टर क्षेत्रावर सार्वजनिक वृक्ष व फळबाग लागवड करण्यात येणार आहे.

 

शेतकऱ्यांना आपल्या शेतात विहीर अथवा फळबाग लागवड करावयाची आहे त्यांनी MAHAEGS Horticulture किंवा Well App वर आपली नोंदणी करावी. तसेच ज्या शेतकऱ्यांना आपल्या शेतात अथवा बांधावर बांबू लागवड, शेवगां लागवड करावयाची आहे त्यांनी ग्रामपंचायत, तालुका कृषि अधिकारी, सामाजिक वनीकरण विभाग यांच्याकडे आपली मागणी सादर करावी, अशी माहिती मनरेगाचे उपजिल्हा कार्यक्रम समन्वयक तथा उपजिल्हाधिकारी यांनी दिली.

000000

No comments:

Post a Comment