Thursday 30 November 2023

मतदान नवीन मतदार नोंदणीवर विशेष भर द्या - विभागीय आयुक्त डॉ. निधी पांण्डेय

 


·

         सहायक निवडणूक अ‍धिकारी यांच्याकडून घेतला कामाचा आढावा


·         एकही नवीन मतदार नोंदणीपासून सुटू नये

·         विशेष शिबिराच्या माध्यमातून नोंदणी वाढविण्याचे दिले निर्देश

·          मतदार नाव नोंदणी प्रक्रियेस गती द्या

बुलडाणा,दि.30(जिमाका): आगामी काळातील सार्वत्रिक निवडणुका लक्षात घेता, सध्या भारत निवडणूक आयोगाच्या आदेशानुसार मतदार यादी पुनरीक्षणाचा कार्यक्रम हाती घेण्यात आला आहे. त्यामुळे या विशेष मोहिमांच्या माध्यमातून जिल्ह्यातील जास्तीत जास्त नवीन मतदारांकडून फॉर्म क्रमांक 6 भरून घेत त्यांची नावनोंदणी करून घेण्यावर भर देण्याचे निर्देश मतदार यादी निरीक्षक तथा विभागीय आयुक्त डॉ. निधी पांण्डेय यांनी जिल्हा प्रशासनाला आज येथे दिले. जिल्हाधिकारी कार्यालयाच्या जिजाऊ सभागृहात आयोजित जिल्हास्तरीय मतदार यादी पुनरीक्षणाच्या आढावा बैठकीत त्यांनी हे निर्देश दिले.

            जिल्हाधिकारी डॉ. किरण पाटील, सहाय्यक आयुक्त तथा समन्वय अधिकारी (भूसुधार) श्यामकांत मस्के, अपर जिल्हाधिकारी सुनील विंचनकर, अपर पोलीस अधीक्षक बाबुराव महामुनी, निवासी उपजिल्हाधिकारी सुनील थोरात, उपजिल्हाधिकारी शरद पाटील, उपजिल्हा निवडणूक अधिकारी श्रीमती सुहासिनी गोणेवार, उपविभागीय अधिकारी राजेंद्र जाधव, समाधान गायकवाड, मनोज देशमुख यांच्यासह जिल्ह्यातील तहसीलदार यावेळी उपस्थित होते.

            विभागीय आयुक्त डॉ. निधी पांण्डेय यांची अमरावती विभागाच्या मतदार यादी निरीक्षक म्हणून नियुक्ती झाल्यानंतर त्यांची ही पहिलीच बुलडाणा जिल्हा भेट आहे. दिनांक 01 जानेवारी 2024 या अर्हता दिनांकावर आधारित मतदार याद्यांचा विशेष संक्षिप्त पुनरिक्षण कार्यक्रमाच्या अनुषंगाने त्यांनी आज ही भेट देत जिल्ह्यातील मोहिमेचा आढावा घेतला.

आगामी काळात जिल्ह्यात सार्वत्रिक निवडणुकीच्या दृष्टीने भारत निवडणूक आयोगाकडून दि. 1 जानेवारी 2024 च्या अर्हता दिनांकावर आधारित मतदार यादी पुनरीक्षणाचा कार्यक्रम विशेष मोहीम स्वरुपात राबविण्यास सुरुवात केली आहे. जिल्हा प्रशासन निवडणूक आयोगाच्या आदेशानुसार जिल्ह्यातील जास्तीत जास्त नवयुवक आणि युवतींची मतदार यादीत नोंदणी करून घेण्यासाठी प्रयत्नरत राहण्यास सांगून विभागीय आयुक्त डॉ. पांण्डेय म्हणाल्या की, यंत्रणेने मतदारांची नावनोंदणी करताना  मोठ्या प्रमाणावर जनजागृती करावी जेणेकरून जिल्‌ह्यातील एकही मतदार नावनोंदणी मोहिमेतून सुटणार नाही, असे त्यांनी सांगितले.

            नवयुवक युवतींची मतदार यादीत नोंदणी करून घेण्यासाठी प्रशिक्षित केंद्र प्रमुखांच्या माध्यमातून सहायक निवडणूक अधिकारी यांनीही यामध्ये विशेष लक्ष घालून नावनोंदणी वाढविण्यावर भर द्यावा. जिल्हा निवडणूक यंत्रणेने घरोघरी जावून सर्व्हे करावा, शाळा महाविद्यालयांमध्ये, आठवडी बाजार येथे केंद्रप्रमुखांना पाठवून मतदार वाढविण्यावर विशेष भर देताना त्यांना उद्दिष्ट‍ देण्याचे निर्देशही डॉ. पांण्डेय यांनी दिले.

दोन दिवसांमध्ये मतदार यादी पुनरीक्षणाची प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी केंद्र प्रमुख आणि सहायक निवडणूक अधिकाऱ्यांनी आपल्या कामाची गती वाढविण्याचे निर्देश देत मलकापूर आणि खामगाव तालुक्यांवर विशेष लक्ष देण्याचे जिल्हाधिकारी डॉ. किरण पाटील यांना सांगितले. जिल्ह्यातील काही तालुक्यांमध्ये अपेक्षित नवमतदारांची नोंदणी झाली नसल्यामुळे विभागीय आयुक्त तथा मतदार यादी निरीक्षक डॉ. पांण्डेय यांनी पुनरीक्षणाच्या या कार्यक्रमामध्ये अधिकाऱ्यांनी अधिक वेगाने ही प्रक्रिया राबविण्याचे निर्देश दिले.

            बुलडाणा विधानसभा मतदारसंघात नवीन मतदार यादी नोंदणी समाधानकारक झाल्याबद्दल त्यांचे अनुभव आणि पद्धती, त्यासाठी घेतलेल्या विशेष मेहनतीबाबत उपस्थित इतर अधिकाऱ्यांना माहिती देण्याच्या सूचना केल्या.

जिल्हा प्रशासनाकडून नवमतदार नोंदणी करण्याबाबत माध्यमांमधून सातत्याने जनजागृती करण्यात येत असून, प्रशासन पातळीवर शाळा-महाविद्यालयांमध्ये, आठवडी बाजार, महिला बचत गटांमध्ये विशेष शिबिरांचे आयोजन करण्यात येत असल्याचे जिल्हाधिकारी डॉ. किरण पाटील यांनी सांगितले. तसेच दर गुरुवारी जिल्हाधिकारी कार्यालयात विविध राजकीय पक्षांच्या प्रतिनिधींसोबत आढावा बैठक आयोजित करून त्यांच्याकडून काही सूचना आल्या असल्यास त्यावर अंमलबजावणी करण्यात येत असल्याचे जिल्हाधिकारी डॉ. पाटील म्हणाले. याशिवाय महाविद्यालयीन वसतीगृहात राहणाऱ्या मुलीकडून महाविद्यालयाचे ओळखपत्र किंवा त्यांचा वसतीगृहाचा राहण्याचा पुरावा ग्राह्य धरून त्यांचीही मतदार यादीत नाव नोंदणी करत असल्याबाबत त्यांनी सांगितले.

तसेच यावेळी जिल्ह्यातील ज्या विधानसभा मतदारसंघांमध्ये नवमतदार नोंदणी कमी झाली आहे, त्यांची कारणे शोधून त्यावर अधिक जबाबदारीने काम करण्यात येईल, असे सांगून तहसीलदार, केंद्रप्रमुखांनी अधिक गतीने मतदारयादी अद्यावत करण्यात येतील, असे सांगितले.  मतदारनोंदणी करताना केंद्र प्रमुख स्तरावर दोन दिवसांपेक्षा जास्त कालावधीपर्यंत फॉर्म क्रमांक 6 पडून राहता कामा नयेत, असे सांगून त्यावर विशेष लक्ष केंद्रीत करण्याचे आदेशही त्यांनी यावेळी उपस्थित अधिकाऱ्यांना दिले. यावेळी जिल्हा उपनिवडणूक अधिकारी श्रीमती सुहासिनी गोणेवार यांनी सादरीकरणाव्दारे जिल्ह्यातील नवीन मतदार यादी पुनरिक्षणाबाबत उपस्थितांना माहिती दिली.

*****



No comments:

Post a Comment