Thursday 9 November 2023

बुधवारी जिल्हा युवा महोत्सवाचे आयोजन; युवांनी सहभागी व्हावे

 

बुधवारी जिल्हा युवा महोत्सवाचे आयोजन; युवांनी सहभागी व्हावे

 

बुलडाणा दि. 9 (जिमाका): क्रीडा व युवक सेवा संचालनालय व कृषी आयुक्तालय, पुणे यांचे संयुक्त विद्यमाने बुधवार दि. 29 नोव्हेंबर रोजी युवा महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. या महोत्सवामध्ये 15 ते 29 वयोगटातील युवकयुवती विविध स्पर्धेत सहभागी होणार आहे.  तरी जिल्ह्यातील युवांनी जास्तीत जास्त संख्येने महोत्सवामध्ये सहभागी व्हावे, असे आवाहन जिल्हा क्रीडा अधिकारी बि.एस महानकर यांनी केले आहे.

 

 युवकांचा सर्वांगिण विकास करणे, संस्कृती व परंपरा जतन करणे, युवकांच्या अंगी असलेल्या सुप्त गुणांना वाव देणे व राष्ट्रीय एकात्मता वाढीस लागण्यासाठी प्रतिवर्षी राष्ट्रीय व राज्यस्तरावर युवा महोत्सवाचे आयोजन करण्यात येते. त्याअनुषंगाने जिल्ह्यात सन 2023-24 या वर्षातील जिल्हा युवा महोत्सवाचे आयोजन दि. 29 नोव्हेंबर रोजी होणार आहे.  

 

युवा महोत्सवाचे आयोजन जिल्हा, विभाग व राज्यस्तरावर करुन राज्याचा प्रतिनिधिक चमु राष्ट्रीय युवा महोत्सवासाठी पाठविण्यात येईल.  युवा महोत्सवामध्ये सांस्कृतीक, समुह लोकनृत्य, वैयत्किक सोलो लोकनृत्य, लोकगीत, वैयत्किक सोलो लोकगीत, कौशल्य विकास, कथा लेखन, पोस्टर स्पर्धा, वक्तृत्व स्पर्धा (इंग्रजी व हिंदी, फोटोग्राफी), संकल्पना आधारीत स्पर्धा, तृणधान्य उत्पन्न वाढीसाठी विज्ञानाचा वापर, सामाजिक विकासात विज्ञानाचे योगदान, युवा कृती, हस्तकला, वस्त्रोद्योग, ॲग्रो प्रोडक्ट या स्पर्धात्मक बाबींचे आयोजन करण्यात येणार आहे.

 

जिल्हास्तर युवा महोत्सवामध्ये सहभागासाठी दि. 1 एप्रिल 2023 रोजी वयाचे परिगणना करुन  15 ते 29 वयोगटातील युवकयुवती सहभागी होवू शकेल. जिल्ह्यातील कृषि महाविद्यालये, कनिष्ठ व वरिष्ठ महाविद्यालये, महिला मंडळ तसेच 15 ते 29 वयोगटातील युवांना युवा महोत्सवामध्ये सहभागासाठी पात्रता राहील. महाराष्ट्राचा रहिवासी असावा. स्पर्धकांनी नाव, पत्ता, जन्म दिनांक, संपर्क क्रमांक, ई-मेल आयडी व वयाबाबतचा सबळ पुरावा सुध्दा सादर करणे आवश्यक राहिल. सहभागी युवक, युवतींना सहभाग व प्राविण्य प्रमाणपत्र सुध्दा वितरीत करण्यात येईल.  तसेच युवा महोत्सवातील प्राविण्यधारकांसाठी रोख पारितोषिक देण्यात येणार आहेत. महोत्सवाबाबत अधिक माहितीसाठी, राज्य क्रीडा मार्गदर्शक उज्वला लांडगे यांच्या मोबाईल क्रमांक 9764732768 वर संपर्क साधावा, अशी माहिती जिल्हा क्रीडा अधिकारी बि.एस.महानकर यांनी दिली.

00000

No comments:

Post a Comment