Thursday 2 November 2023

जिल्हास्तरीय नैसर्गिक सेंद्रिय शेती कार्यशाळा संपन्न

 


जिल्हास्तरीय नैसर्गिक सेंद्रिय शेती कार्यशाळा संपन्न

 

          बुलढाणा दि. 2 (जिमाका):- डॉ. पंजाबराव देशमुख नैसर्गिक शेती मिशन अंतर्गत जिल्हास्तरीय नैसर्गिक शेती कार्यशाळा बुधवार दि. 1 नोव्हेंबर रोजी श्रीराम जानकी मंदिर सभागृह, कारंजा चौक बुलडाणा  येथे पार पडली. यावेळी शास्त्राज्ञांनी सेंद्रिय शेतीबाबत तांत्रिक प्रशिक्षण व मार्गदर्शन केले.

 

कृषी तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणा आत्मा व जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी यांच्या संयुक्त विद्यमाने एक दिवशीय कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले. यावेळी विभागीय कृषी सहसंचालक किसन मुळे ऑनलाईनव्दारे तर डॉ. पंजाबराव देशमुख जैविक शेती मिशनचे संचालक संतोष आळसे, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी मनोजकुमार ढगे, विकास समितीचे कुवरसिंह मोहने, प्रकल्प संचालक आत्माचे पुरुषोत्तम उन्हाळे, कृषी विज्ञान केंद्राचे वरिष्ठ शास्त्रज्ञ अनिल तारू, कृषी विज्ञान केंद्र जळगाव जामोदचे वरिष्ठ शास्त्रज्ञ विकास जाधव, जय किसान शेतकरी गट वाशिम संशोधन संचालक संतोष बी चव्हाण आदी उपस्थिती होते.

 

संचालक संतोष आळसे यांनी डॉ. पंजाबराव देशमुख नैसर्गिक शेती मिशन योजनेची अंमलबजावणी कशा स्वरूपात केली जाईल, याची  बाबनिहाय माहिती दिली. तसेच जिल्हास्तरीय समितीचे कार्य गट व शेतकरी उत्पादक कंपनीच्या माध्यमातून करावयाची कामे, नैसर्गिक शेतीचे प्रामाणिकरण, व्यवसाय कृती आराखडा तयार करणे, आयसीएस प्रामाणिकरण, शेतकरी प्रशिक्षण गावाची निवड करणे, गटाची निवड करणे इ. रूपरेषाबाबत सविस्तर सादरीकरणाच्या माध्यमातून उपस्थितांना करून दिली. नैसर्गिक मिशन राबवत असताना क्षेत्रीय स्तरावरील अधिकारी कर्मचारी यांच्या कर्तव्य व जबाबदाऱ्याबाबत मार्गदर्शन केले.

 

सर्ग विकास समितीचे कुवरसिंह मोहने यांनी गेल्या 20 वर्षापासून सेंद्रिय व नैसर्गिक शेती करत असताना त्यांच्या अनुभवाच्या माध्यमातून  येणारी आवाहन   घ्यावयाची काळजी याबाबत माहिती दिली. हरित क्रांतीच्या अगोदर शेतामध्ये केवळ शेणखत वापरत असत. बियाणे सरळवाण म्हणजे कोणत्याही प्रकारची प्रक्रिया न केलेले वाण वापरल्या जात असे. त्यामुळे जमिनीमध्ये कर्ब योग्य प्रमाणात राहिल्यामुळे जमिनीची सुपीकता वाढून पिकांची वाढ योग्य प्रमाणात होते. त्यामुळे उच्च प्रतीच्या आरोग्यास पोषक उत्पादनाची निर्मिती होत होती. उत्पादनाचे प्रमाण वाढवत असताना रासायनिक खताचा अतिरिक्त वापर करून जमीन नाशवंत करण्याच्या मार्गाने जात आहो. नैसर्गिक व सेंद्रिय शेतीचा अवलंब करणे आज काळाची गरज असल्याचे उपस्थित सर्व अधिकारी, कर्मचारी व शेतकऱ्यांना सांगितले.

 

कृषी विज्ञान केंद्र जळगाव जामोदचे वरिष्ठ शास्त्रज्ञ विकास जाधव यांनी कृषी विद्यापीठ व केवीके यांच्यामार्फत नैसर्गिक शेतीतील सहभाग या विषयावर सविस्तर मार्गदर्शन केले. नैसर्गिक शेती करत असताना वेळोवेळी तांत्रिक प्रशिक्षण व मार्गदर्शन करण्यासाठी शेतकऱ्यांच्या बांधापर्यंत कार्य करण्याची हमी सुद्धा यावेळी दिली.

 

संशोधन संचालक संतोष बी चव्हाण यांनी ऑनलाईनव्दारे शेत बांधावरील प्रयोगशाळा अल्पखर्चात शेतातच नैसर्गिक निविष्ठा निर्मितीचे तंत्रज्ञान वापरून शेतीवर होणारा अतिरिक्त खर्च कशाप्रकारे कमी करता येईल. तसेच ग्रामीण भागात बेरोजगार युवकांना रोजगार निर्मितीसाठी नैसर्गिक निविष्ठा तयार करण्याची लॅब उभारण्याबाबत सविस्तर मार्गदर्शन केले. नैसर्गिक निविष्ठा तयार करण्याची तपासणी केंद्र उभारणी करणे गरजेचे आहे. तसेच निविष्ठा निर्मितीचे महत्त्व विषद केले. त्यासोबतच विभागीय कृषी सहसंचालक किसन मुळे यांनी ऑनलाईनद्वारे उपस्थित सर्व अधिकारी, कर्मचारी यांना मार्गदर्शन करताना योजना अधिक प्रभावीपणे राबविण्यासाठी सर्वांनी अत्यंत सूक्ष्म नियोजन करून अंमलबजावणी करण्याचे आवाहन केले.

 

प्रकल्प संचालक आत्माचे पुरुषोत्तम उन्हाळे यांनी त्यांच्या मार्गदर्शनातून सेंद्रिय शेती योजनांबाबत सविस्तर मार्गदर्शन केले. सेंद्रिय शेती करत असताना कोणकोणत्या घटकाच्या बाबीचे  निरीक्षण करणे गरजेचे आहे व सेंद्रिय शेती करत असताना कोणकोणती काळजी घेणे आवश्यक आहे याबाबत सविस्तर मार्गदर्शन करून उपस्थितांच्या शंका व प्रश्नांचे शंका निरसन केले. सेंद्रिय शेती करणारे शेतकरी भानुदास वनारे विष्णू गडाख यांनी गेल्या अनेक वर्षापासून ते त्यांच्या शेतात राबवीत असलेल्या विविध सेंद्रिय बाबींच्या बाबतीत अनुभव कथनातून सविस्तर मार्गदर्शन केले.

 

जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी मनोजकुमार ढगे यांनी प्रास्ताविकेतून डॉ. पंजाबराव देशमुख नैसर्गिक शेती मिशन याची रूपरेषा व मिशन कशाप्रकारे राबविण्यात येईल. त्याची आवश्यकता काय तसेच नैसर्गिक व सेंद्रिय शेतीचे महत्व व जमिनीचा खालावत चाललेला पोत सुधारण्याच्या दृष्टिकोनातून नैसर्गिक शेतीकडे शेतकऱ्यांना वळण्याची गरज असल्याबाबत माहिती दिली. सोबतच उपस्थित अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना डॉ. पंजाबराव देशमुख नैसर्गिक शेती मिशन प्रकल्प सर्वांसाठी नवीन असल्याने शेतकऱ्यांना याची माहिती होण्यासाठी प्रयत्न होणे गरजेचे आहे आणि शेतकरी नैसर्गिक शेतीकडे वळला पाहिजे यासाठी प्रयत्न आवश्यक आहे याबाबत उपस्थित अधिकारी, कर्मचारी व शेतकरी यांना मार्गदर्शन केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन स्मार्ट प्रकल्प तथा प्रकल्प उपसंचालक आत्माचे नोडल अधिकारी दीपक पटेल यांनी तर आभार प्रदर्शन पुरुषोत्तम उन्हाळे यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी आत्मा कार्यालयातील सर्व अधिकारी, कर्मचारी यांनी परिश्रम घेतले.  

00000

No comments:

Post a Comment