Saturday 18 November 2023

शासनाच्या योजनांचे लाभ सर्वसामान्यांपर्यंत पोहचवा - रोशन थॉमस



    ‘विकसित भारत संकल्प यात्रा’ विशेष अभियान 

बुलडाणा, दि.18 : केंद्र व राज्य शासनाच्या विविध विभागांच्या योजनांचा लाभ समाजातील वंचित घटकापर्यंत पोहचविण्यासाठी ‘विकसित भारत संकल्प यात्रा’ ही विशेष मोहीम  22 नोव्हेंबर ते 26 जानेवारी 2024 या कालावधीत राबविण्यात येत आहे. या मोहिमेच्या माध्यमातून योजनांची प्रभावी अंमलबजावणी करत शासनाच्या योजनांचे लाभ सर्वसामान्यांपर्यंत पोहचवण्याच्या सूचना जिल्हा यंत्रणेच्या विभाग प्रमुखांना मोहिमेचे प्रमुख रोशन थॉमस यांनी दिल्या. या विशेष मोहिमेच्या पूर्वतयारीसंदर्भात जिल्हाधिकारी कार्यालयात आढावा बैठक आयोजित करण्यात आली होती. त्यावेळी श्री. थॉमस बोलत होते.

 जिल्हाधिकारी डॉ. किरण पाटील, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी श्रीमती भाग्यश्री विसपुते, निवासी उपजिल्हाधिकारी राजेंद्र जाधव यांच्यासह जिल्हा यंत्रणेचे प्रमुख यावेळी उपस्थित होते.

भारत जगातील पाचवी सर्वात मोठी अर्थव्यवस्था असूनही, देशातील काही घटक अद्यापही मूलभूत सोयीसुविधांपासून वंचित आहेत. देशाच्या अर्थव्यवस्थेला चालना देण्यासाठी केंद्र व राज्य शासन विविध योजना राबवित आहे. त्यात लोकांना सहभागी करून घेत त्यांचा आर्थिक स्तर उंचावण्याला प्राधान्य देत विशेष मोहीम राबविण्यात येणार असल्याचे श्री. थॉमस यांनी सांगितले. वंचित घटकाला विकासाच्या मुख्य प्रवाहात सहभागी करून घेत यंत्रणांनी अंमलबजावणीची गती वाढविणे आवश्यक असल्याचे सांगून त्यांनी समाजातील एकही घटक या योजनांपासून वंचित राहणार नाही,याची खबरदारी घेण्याच्या सूचना दिल्या.

 देशवासीयांचे जीवनमान सुधारावे, त्यांना आरोग्याच्या सोयीसुविधा, उच्च शिक्षण, रोजगार आदी मिळावेत आणि त्यातून त्यांचा आर्थिक स्तर उंचावला जावा, यासाठी शासन योजनांच्या माध्यमातून सतत प्रयत्नशील आहे. ग्रामीण जनतेमध्ये योजनांची प्रचार-प्रसिद्धी करण्यात येणार असून, त्याबाबतची जनजागृती करून यामध्ये सहभागी करून घेण्यात येणार असल्याचे श्री. थॉमस यांनी सांगितले.

ही विशेष मोहीम शहर, निमशहरी आणि गावपातळीवर राबविण्यात येणार असून, जिल्हा प्रशासकीय यंत्रणेतील सर्व विभागांनी सक्रियपणे सहभागी होऊन आपापल्या विभागांमार्फत राबविण्यात येणाऱ्या योजना जनतेपर्यंत पोहचविण्याचे निर्देशही त्यांनी दिले. आगामी निवडणूक आचारसंहिता लक्षात घेता, ग्रामपंचायत स्तरावर या योजनांची प्रभावी अंमलबजावणी करावी व शासकीय योजनांचा त्यांना लाभ मिळवून देण्याच्या सूचना त्यांनी दिल्या.

सध्या देशभरात केंद्र शासन विविध योजना राबवित आहे. त्याची सर्वसामान्य नागरिकांना माहिती व्हावी, यासाठी जिल्हा ते गावपातळीवर चित्ररथाद्वारे जिंगल्स,पोस्टर्स, छायाचित्रे, ध्वनी-चित्रफिती, पथनाट्य, विविध सांस्कृतिक कार्यक्रमाच्या माध्यमातून प्रचार –प्रसिद्धी करण्यात येणार आहे. ग्रामपंचायत स्तरावर मोहीम यशस्वी करण्यासाठी लोकसहभाग म
हत्त्वाचा असून, अंगणवाडी सेविकांची मदत घेण्यात येणार आहे. विकसित भारत संकल्प यात्रेच्या आयोजनातून देशभरात मोठ्या प्रमाणावर सामाजिक बदल घडून आल्याचे दिसून येणार असल्याचे रोशन थॉमस यांनी यावेळी सांगितले.

विकसित भारत संकल्प यात्रा ही विशेष मोहीम जिल्ह्यात यशस्वी करण्यासाठी जिल्हा प्रशासनाकडून करण्यात येत असलेल्या विशेष कार्यक्रमांची जिल्हाधिकारी डॉ. किरण पाटील यांनी प्रास्ताविकातून माहिती दिली. यामध्ये जिल्हा प्रशासनाकडून आरोग्य विभागामार्फत विविध आरोग्य तपासणी, रक्त तपासणी, प्रधानमंत्री मातृवंदन योजना, प्रधानमंत्री जननी सुरक्षा योजना, विद्यार्थी आरोग्य तपासणी, कर्करोग तपासणी, कृषी विभागामार्फत चालविल्या जाणाऱ्या विविध योजना पोकरा, मागेल त्याला शेततळे, स्वच्छ शहर, सुंदर शहर, घनकचरा व्यवस्थापन,  आधार, पॅन व रेशनकार्ड नोंदणी, दिव्यांगांना वैश्विक ओळखपत्र वाटप, ई- श्रमकार्ड नोंदणी, घरकाम करणा-या कामगारांची नोंदणी, जनधन बँक खाते उघडणे, प्रधानमंत्री सुरक्षा बिमा, जीवन ज्योती बिमा योजना नोंदणी, प्रधानमंत्री श्रमयोगी मानधन पेन्शन योजना नोंदणी, किसान क्रेडीट कार्ड नोंदणी, प्रधानमंत्री किसान सन्मान नोंदणी व दुरूस्ती, एकल महिलांची नविन बचत गटांकरिता नोंदणी, संजय गांधी निराधार, श्रावणबाळ, विधवा पेन्शन योजना, उज्वला योजनेंतर्गत पात्र लाभार्थ्यांची मागणी नोंदविण्यात येणार असल्याचे जिल्हाधिकारी डॉ. पाटील यांनी सांगितले.

 मनरेगा योजनेंतर्गत जॉबकार्ड नोंदणी, नूतनीकरण, वैयक्तिक लाभाची कामे मंजूर करणे, जन्म, मृत्यू व विवाह नोंदणी, मालमत्तेवर एकल महिला व बालके यांची वारस नोंद करणे, मिळकत उताऱ्यावर पती व पत्नीचे संयुक्त नाव नोंदविणे, निवासी प्रयोजनासाठी अतिक्रमण नियमानुकुल करणे, प्रत्येक कुटूंबाला स्वतंत्र नळ जोडणी व दरडोई पाणी, प्रत्येक पात्र कुटूंबाला वैयक्तीक शौचालयाचा लाभ, प्रधानमंत्री जनआरोग्य अभियान, प्रधानमंत्री आयुष्यमान भारत योजनेंतर्गत नोंदणी व महात्मा फुले जीवनदायी आरोग्य योजनेंतर्गत आरोग्य कार्ड, महिला व बालकांची आरोग्य तपासणी पोषण कार्यक्रमाची माहिती देणे, प्रधानमंत्री मातृवंदना, जननी सुरक्षा नोंदणी, लसीकरण कार्यक्रम  आणि स्वच्छ भारत अभियानांतर्गत वैयक्तिक शौचालय अनुदान व घनकचरा सांडपाणी व्यवस्थापनाबाबत नागरिकांना माहिती देत या योजनांचा लाभ मिळवून देण्यात येणार असल्याचे जिल्हाधिकारी डॉ. किरण पाटील यांनी यावेळी सांगितले तर जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी श्रीमती भाग्यश्री विसपुते यांनी आभार मानले.

***** 

No comments:

Post a Comment