Thursday 23 November 2023

विकसित भारत संकल्प यात्रेतून नागरिकांपर्यंत योजना पोहचवा - पालकमंत्री दिलीप वळसे-पाटील

 

जिल्ह्यात विकसित भारत संकल्प यात्रेस प्रारंभ

 


बुलडाणा, दि.२३(जिमाका) : केंद्र शासनाच्या फ्लॅगशिप योजनांचे लाभ लक्षित लाभार्थ्यांपर्यंत पोहचावेत, यासाठी केंद्र आणि राज्य शासनाच्या सहकार्याने बुलडाणा जिल्ह्यात विकसित भारत संकल्प यात्रेच्या प्रसिद्धीरथांना पालकमंत्री दिलीप वळसे-पाटील यांनी हिरवी झेंडी दाखवून प्रारंभ केला. विकसित भारत संकल्प यात्रेच्या माध्यमातून नागरिकांमध्ये शासकीय योजनांची यशस्वीपणे प्रचार व प्रसिद्धी व्हावी, त्यातून त्यांना याबाबत माहिती मिळावी, यासाठी जिल्ह्यातील सर्व यंत्रणांनी योग्य समन्वय ठेवण्याचे आवाहन पालकमंत्री श्री. वळसे पाटील यांनी केले.

येथील जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात 'विकसित भारत संकल्प यात्रे'स प्रारंभ केला. त्यावेळी ते बोलत होते. आमदार डॉ. राजेंद्र शिंगणे, संजय रायमुलकर, जिल्हाधिकारी डॉ. किरण पाटील, मुख्य कार्यकारी अधिकारी श्रीमती भाग्यश्री विसपुते यांच्यासह उपविभागीय अधिकारी, तहसीलदार आदी उपस्थित होते.

केंद्र आणि राज्य शासनाच्या सहकार्याने दि. १५ नोव्हेंबर, २०२३ ते २६ जानेवारी, २०२४ या कालावधीत विकसित भारत संकल्प यात्रेचे आयोजन करण्यात आले आहे. या यात्रेच्या माध्यमातून ग्रामस्वराज्य अभियान राबविले जाणार असून, अद्यापपर्यंत ज्या योजनांचे लाभ लक्ष्यित लाभार्थ्यांपर्यंत पोहोचलेले नाहीत, अशा लाभार्थ्यांपर्यंत पोहचविण्याच्या उद्देशाने विकसित भारत संकल्प यात्रा देशव्यापी मोहीम केंद्र शासनाकडून राबविण्यात येत आहे. या यात्रेसाठी शासनाकडून विविध कल्याणकारी योजनाची सविस्तर माहिती असलेले चित्ररथाद्वारे जिल्ह्यातील नगरपालिका, नगर परिषद क्षेत्र आणि विविध ग्रामपंचायत क्षेत्रामध्ये केंद्र शासनाच्या विविध योजनांची व्यापक प्रचार-प्रसिद्धी केली जाणार आहे. या यात्रेसाठी जिल्ह्याची तिसऱ्या टप्प्यामध्ये निवड झाली असून, आज गुरुवार दि. २३ नोव्हेंबर, २०२३ रोजी पालकमंत्र्यांच्या हस्ते हिरवी झेंडी दाखवून यात्रेची सुरुवात झाली. जिल्ह्यातील नगरपालिका, नगर परिषद क्षेत्र आणि ग्राम पंचायत क्षेत्रात यात्रेचे आयोजन करण्यात आले आहे.

******

No comments:

Post a Comment