Wednesday 22 November 2023

मतदार यादी विशेष पुनरीक्षण शिबिरात नावनोंदणी करावी – जिल्हाधिकारी डॉ. किरण पाटील

 

·         शनिवार आणि रविवार रोजी विशेष पुनरीक्षण शिबिराचे आयोजन 

बुलडाणा, दि.22 (जिमाका): भारत निवडणूक आयोगाने 1 जानेवारी 2024 या अर्हता दिनांकावर वयाची 18 वर्षे पूर्ण करणाऱ्या नवयुवक व युवतींनी शनिवार (दि. 25) व रविवार (दि. 26) रोजी मतदार यादीच्या विशेष पुनरीक्षण कार्यक्रमाच्या शिबिरात नावनोंदणी करण्याचे आवाहन जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी डॉ. किरण पाटील यांनी केले आहे.

 भारत निवडणूक आयोगाने 1 जानेवारी 2024 या अर्हता दिनांकावर वयाची 18 वर्षे पूर्ण करणाऱ्या युवक युवतींच्या मतदार यादीत नावनोंदणी करण्यासाठी विशेष पुनरीक्षण कार्यक्रम जाहीर केला असून, या कार्यक्रमाअंतर्गत दिनांक 27 ऑक्टोबर ते 9 डिसेंबर 2023 या कालावधीत सर्व विधानसभा मतदार संघ व मतदान केंद्रस्तरीय अधिकारी यांच्या स्तरावर दावे व हरकती स्विकारण्यात येणार आहेत. प्राप्त दावे व हरकती निकालात काढून दिनांक 5 जानेवारी 2024 रोजी अंतिम मतदार यादी प्रसिद्ध करण्यात येणार आहे.

            त्यांतर्गत नव्याने नाव नोंदणीस पात्र नागरिक, लग्न होऊन गावात आलेल्या स्त्रिया, गावात कायमस्वरूपी नव्याने वास्तव्यास आलेले नागरिक यांची नाव नोंदणी केली जाईल, तसेच दुबार नावे, मृत व्यक्ती, गावातून कायमस्वरुपी स्थलांतरित झालेल्या व्यक्ती, लग्न होऊन अन्य गावात गेलेल्या स्त्रिया यांच्या नावांची मतदार यादीतून वगळणी केली जाईल. त्यासाठी शनिवार, दि. 25 व रविवार दि. 26 नोव्हेंबर, 2023 रोजी जिल्ह्यातील सर्व मतदान केंद्रांवर, शाळा-महाविद्यालयाचे ठिकाणी, शासकीय- निमशासकीय कार्यालयांमध्ये विशेष मतदार नोंदणी शिबिरांचे आयोजन करण्यात येणार आहेत. तसेच युवा मतदारांची नोंदणी वाढवण्यासाठी महाविद्यालयांमध्ये विशेष शिबिरांचे आयोजन करण्यात येणार आहे. तसेच याबाबत सर्व गावांमध्ये दवडीसुद्धा देण्यात येणार आहे.

            नागरिकांना मतदार नोंदणीसंदर्भात येणा-या अडचणींचे निराकरण करण्यासाठी जिल्हास्तरावर जिल्हा संपर्क केंद्र (नि:शुल्क क्रमांक 1950) कार्यान्वित करण्यात आले आहे. तरी वरील कालावधीमध्ये नागरिकांनी ऑफलाईन पद्धतीने मतदार नोंदणी करण्यासाठी संबंधित तहसिल कार्यालय, केंद्‌रस्तरीय अधिकारी यांच्यासोबत संपर्क साधावा. तसेच ऑनलाईन पद्धतीने मतदार नोंदणी करण्यासाठी Voterportal.in व Voter helpline app चा वापर करून मतदार नोंदणी, वगळणी, दुरुस्ती करण्याचे आवाहन जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी डॉ. किरण पाटील यांनी केले आहे.

*****

No comments:

Post a Comment