Tuesday 7 November 2023

अंमली पदार्थांच्या वापराला प्रतिबंधासाठी सर्व विभागांने पुढाकार घ्यावा; जिल्हाधिकारी डॉ. किरण पाटील





 अंमली पदार्थांच्या वापराला प्रतिबंधासाठी सर्व विभागांने पुढाकार घ्यावा; जिल्हाधिकारी डॉ. किरण पाटील

 

बुलढाणा दि. 7 (जिमाका): अंमली पदार्थांची विक्री जास्त होणाऱ्या परिसरात संबधित विभागाने वेळोवेळी तपासणी करावी. व्यसनमुक्ती केंद्राशी समन्वय ठेवून या सामाजिक प्रश्नाला आळा घालण्यासाठी  सर्व विभागांनी पुढाकार घ्यावा, असे निर्देश जिल्हाधिकारी डॉ. किरण पाटील यांनी दिले.

 

अंमली पदार्थाच्या वापराला आळा घालण्यासाठी जिल्हास्तरीय अंमली पदार्थ विरोधी कार्यवाही समितीची सभा जिल्हाधिकारी कार्यालयात आज घेण्यात आली. यावेळी निवासी उपजिल्हाधिकारी सुरेश थोरात, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरिक्षक अशोक लांडे, जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी मनोज ढगे, यांच्यासह अधिकारी आणि समितीचे सदस्य उपस्थित होते.

 

जिल्हाधिकारी डॉ. पाटील यांनी गेल्या कालावधीत जिल्ह्यात झालेल्या अंमली पदार्थ विरोधी कारवाईची माहिती घेतली. अंमली पदार्थांच्या आहारी प्रामुख्याने युवा वर्ग जात आहे. यामुळे एक पिढीचे नुकसान होणार आहे. अंमली पदार्थाच्या सेवनामुळे समाजातील विविध घटकांवर परिणाम होत असल्याने याविरोधात एकत्रित कारवाई करावी. गांजाची वाहतूक रोखण्यासाठी इतर राज्य आणि जिल्ह्यातून येणारे रस्त्यावर तपासणी नाके उभारण्यात यावे. अंमली पदार्थाचे सेवन करण्यासाठी प्रामुख्याने निर्जन स्थळे, बगीचे, रिकामे कारखाने अशा ठिकाणाचा वापर केला जातो. अशा ठिकाणी पोलिसांनी नियमित गस्त घालावी.

 

अंमली पदार्थांच्या आहारी जाण्याचे प्रमाण विद्यार्थी वर्गात जादा आहे. त्यामुळे शाळा किंवा महाविद्यालयाच्या ठिकाणी तपासणी करण्यात यावी. शाळा परिसरात विद्यार्थ्यांची तपासणी करून त्यांच्याजवळ पदार्थ आढळत असल्यास तात्काळ कारवाई करण्यात यावी. अंमली पदार्थ विरोधात जनजागृती करावी. प्रामुख्याने विद्यार्थी आणि युवा वर्ग यामध्ये व्यवसनाधिन होणार नाही, यासाठी एकत्रितपणे प्रयत्न करणे गरजेचे आहे. त्यासाठी सर्व यंत्रणांची एकत्रितरित्या बैठक घेण्यात यावी. यातून अंमली पदार्थ विरोधात कारवाई करणे शक्य होईल, असेही जिल्हाधिकारी डॉ. पाटील यांनी सांगितले.

0000 

No comments:

Post a Comment