बुलढाण्यात सामाजिक न्याय दिन उत्साहात साजरा समता दिंडी, जनजागृती रॅलीद्वारे समतेचा दिला संदेश

 

बुलढाण्यात सामाजिक न्याय दिन उत्साहात साजरा

समता दिंडी, जनजागृती रॅलीद्वारे समतेचा दिला संदेश

बुलढाणा, दि.27 जिमाका: राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्या जयंतीनिमित्त दिनांक 26 जून हा दिवस दरवर्षीप्रमाणे यंदाही ‘सामाजिक न्याय दिन’ म्हणून बुलढाणा येथे उत्साहात साजरा करण्यात आला. जिल्हा समाज कल्याण विभागाच्यावतीने विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात आले.

या दिवशी सकाळी 8 वाजता जिल्हा परिषद कार्यालय येथून समता दिंडी व जनजागृती रॅलीचे उद्घाटन जिल्हा समाज कल्याण अधिकारी डॉ. अनिता राठोड आणि जिल्हा जातप्रमाणपत्र पडताळणी समितीचे संशोधन अधिकारी मनोज मेरत यांच्या हस्ते हिरवी झेंडी दाखवून करण्यात आले. या रॅलीचे समारोप देखील जिल्हा परिषद कार्यालय येथे झाले.

कार्यक्रमाच्या निमित्ताने नशामुक्ती विषयक चित्रप्रदर्शन स्टॉलचे आयोजन करण्यात आले होते. तसेच, छत्रपती शाहू महाराज व इतर महापुरुषांच्या प्रतिमांना पुष्पहार अर्पण व दीपप्रज्वलनाने कार्यक्रमाचे उद्घाटन करण्यात आले.

कार्यक्रमाची सुरुवात व्यसनमुक्ती शपथवाचनाने झाली. प्रास्ताविक डॉ. अनिता राठोड यांनी करताना शाहू महाराजांच्या नावाने राबविण्यात येणाऱ्या विविध योजनांची माहिती दिली व सामाजिक न्याय दिनाचे महत्त्व अधोरेखित केले.

प्रमुख मार्गदर्शक प्रा. डी. आर. माळी यांनी शाहू महाराजांचे सामाजिक, शैक्षणिक, राजकीय व शेती क्षेत्रातील कार्य विशद केले. "शाहू महाराजांचे शासन म्हणजे खरे लोककल्याणकारी राज्य होते. फुले-शाहू-आंबेडकर यांच्या विचारांतूनच आपण आपल्या जीवनाची दिशा ठरवली पाहिजे," असे त्यांनी स्पष्ट केले.

शाहीर डी. आर. इंगळे व ईश्वर मगर यांनी शाहू महाराजांच्या जीवनकार्यावरील समाजप्रबोधनपर गीत सादर केले. तसेच विश्वनाथ गोतरकर, सुरेश साबळे, समाधान इंगळे व निवृत्ती जाधव यांनी शाहू महाराजांच्या कार्यावर आधारित मार्गदर्शन केले.

कार्यक्रमात विविध योजनांचे लाभार्थी, समाजभूषण पुरस्कारप्राप्त मानकरी, समाजकार्य महाविद्यालयाचे कर्मचारी व विद्यार्थी यांचा सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन तालुका समन्वयक सतीश बाहेकर यांनी केले तर अध्यक्षीय समारोपीय भाषण मनोज मेरत यांनी केले.कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी समाज कल्याण विभागाच्या सर्व कर्मचाऱ्यांनी विशेष परिश्रम घेतले.

0000

Comments

Popular posts from this blog

लोकशाहीर अण्णाभाऊ साठे महामंडळाची थेट कर्ज योजना

बुलढाणा जिल्ह्याची महान हो कीर्ती

स्वयं अर्थसहाय्यिता नवीन शाळांना मान्यता व दर्जावाढीची शिफारस; हरकती मागविल्या