ग्रामविकास व पंचायतराज विभागाचे प्रधान सचिवांनी घेतला आवास योजनाचा आढावा;

आवास योजनेतील घरकुलांच्या कामांना गती द्या - एकनाथ डवले

 

बुलडाणा, (जिमाका) दि. 20:  प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण टप्पा दोन व राज्य शासनाच्या आवास योजनेंतर्गत जिल्ह्यासाठी 1 लाख 20 हजाराहून जास्त घरकुलांचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. उद्दिष्टानुसार जिल्ह्यातील पात्र लाभार्थ्यांना घरकुल उपलब्ध करुन देण्यासाठी कामांना गती देण्याचे व घरकुलांचे उद्दिष्ट पूर्ण करण्याचे निर्देश ग्रामविकास व पंचायतराज विभागाचे प्रधान सचिव एकनाथ डवले यांनी आज येथे दिले.

 

प्रधानमंत्री आवास योजना व विविध विकास योजनांच्या अंमलबजावणीचा सविस्तर आढावा जिल्हा परिषदेच्या सभागृहात पार पडला. या बैठकीत मुख्य कार्यकारी अधिकारी गुलाब खरात, उपमुख्य कार्यकारी अधिकारी बि.एम. मोहन, संजय इंगळे तसेच गटविकास अधिकारी, कृषी सेवक व इतर अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.

 

शहरी व ग्रामीण भागातील प्रधानमंत्री आवास योजनांच्या सद्यस्थिती व अंमलबजावणीची माहिती घेऊन प्रधान सचिव श्री. डवले म्हणाले की, केंद्र व राज्य शासनाने जिल्ह्यासाठी मोठ्या प्रमाणात घरकुल मंजूर केले आहे. त्यामुळे पात्र लाभार्थ्यांकडून आवश्यक ती कारवाई पूर्ण करुन घरकुलाचे उद्दिष्ट पूर्ण करावे. आवास योजनांसाठी जमिनींच्या समस्या सोडविण्यासाठी मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी विशेष लक्ष घालावे. केंद्र व राज्य शासनाच्या आवास योजना वेळेत व पारदर्शक पद्धतीने नागरिकांपर्यंत पोहोचल्या पाहिजेत. गुणवत्ता आणि उत्तरदायित्व हाच जिल्हा परिषदेच्या कामकाजाचा पाया असायला हवा, असे प्रतिपादन एकनाथ डवले यांनी केले.

 

प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण टप्पा एक व टप्पा दोनमध्ये जिल्ह्यात अपूर्ण घरकुलांची संख्या अधिक आहे. विविध कारणांमुळे विभागातील अपूर्ण असलेली घरकुले पूर्ण करण्यासाठी जिल्हा परिषद प्रशासनाने जाणीवपूर्वक कशोशीने प्रयत्न करावे. समाजातील प्रत्येक गोर-गरीब घटकाला हक्काचे घर मिळावे, यासाठी शासनाने अटी कमी करण्यात आल्या आहेत. घरकुलांची उद्दीष्टपूर्ती होण्यासाठी निधी उपलब्ध करून देण्यात येत आहे. त्यामुळे जिल्हा परिषदने चांगली कारगिरी करुन उद्दीष्ट पूर्ण करण्याचे प्रयत्न करावे, असे आवाहन श्री. डवले यांनी केले. त्यानंतर प्रधानमंत्री आवास योजना टप्पा 2, रमाई आवास योजना, शबरी आवास योजना, पारधी आवास योजना, पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर योजना, यशवंतराव चव्हाण मुक्त वसाहत योजना, मोदी आवास योजनाचा आढावा घेऊन आवासाचे प्रलंबित असलेले कामे तातडीने मार्गी लावण्याचे निर्देश प्रधान सचिव एकनाथ डवले यांनी दिले.

00000000

Comments

Popular posts from this blog

लोकशाहीर अण्णाभाऊ साठे महामंडळाची थेट कर्ज योजना

बुलढाणा जिल्ह्याची महान हो कीर्ती

स्वयं अर्थसहाय्यिता नवीन शाळांना मान्यता व दर्जावाढीची शिफारस; हरकती मागविल्या