कृषी योजनांचा लाभ घेण्यासाठी फार्मर आयडी अनिवार्य 3,90,123 शेतकऱ्यांचे फार्मर आयडी तयार

 

कृषी योजनांचा लाभ घेण्यासाठी फार्मर आयडी अनिवार्य

3,90,123 शेतकऱ्यांचे फार्मर आयडी तयार

बुलडाणा, दि. 30 (जिमाका): कृषी विभागामार्फत राबविण्यात येणाऱ्या विविध शासकीय योजनांचा लाभ शेतकऱ्यांना मिळावा यासाठी शेतकरी ओळख क्रमांक दि. 15 एप्रिल 2025 पासून अनिवार्य करण्यात आले आहे. ज्या शेतकऱ्यांनी अजूनही शेतकरी ओळख क्रमांक बनवलेले नसेल, तर त्यांनी तात्काळ आपल्या नजीकच्या नागरी सुविधा केंद्र किंवा ग्राम कृषी विकास समितीकडे जाऊन नोंदणी करून शेतकरी ओळख क्रमांक बनवून घ्यावा, असे आवाहन जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी मनोजकुमार ढगे यांनी केले आहे.

जिल्ह्यात प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेत एकूण 4,34,468 लाभार्थी असून, त्यापैकी 2,99,968 शेतकऱ्यांनी आतापर्यंत फार्मर आयडी काढले आहेत.

शेतकरी ओळख क्रमांकाचे महत्त्व काय?

शेतकरी ओळख क्रमांक अंतर्गत कृषी व संलग्न विभागाकडून शेतकऱ्यांच्या शेताची, आधार क्रमांकाशी संलग्न अशी माहिती एकत्र करून "फार्मर रजिस्ट्री" तयार करण्यात येणार आहे. या माहितीच्या आधारे लाभार्थ्यांची अचूक निवड करून कृषी योजनांचा लाभ अधिक प्रभावी आणि पारदर्शक पद्धतीने वितरित करता येईल.

वारंवार प्रमाणिकरणाची गरज नाही

शेतकरी ओळख क्रमांक तयार झाल्यानंतर शेतकऱ्यांना वारंवार प्रमाणिकरण करण्याची आवश्यकता राहणार नाही. तसेच सातबारा उतारा आधार कार्डाशी लिंक करून ठेवणे आवश्यक आहे.

शेतकरी ओळख क्रमांकासाठी आवश्यक कागदपत्रे:

आधार कार्ड, आधारशी लिंक असलेला मोबाईल क्रमांक, आधारशी लिंक असलेले बँक खाते, 7/12 उतारा (सातबारा) किंवा नमुना 8

जिल्ह्यात आतापर्यंत एकूण 3,90,123 शेतकऱ्यांचे शेतकरी ओळख क्रमांक अर्थात ‘फार्मर आयडी’ तयार करण्यात आले आहेत. शेतकरी ओळख क्रमांक शिवाय कृषी विभागाच्या कोणत्याही शासकीय योजनेचा लाभ मिळणार नाही. त्यामुळे शेतकऱ्यांनी आपला शेतकरी ओळख क्रमांक त्वरित बनवून घ्यावा, असे आवाहन कृषी विभागाच्या वतीने करण्यात आले आहे.

0000

Comments

Popular posts from this blog

लोकशाहीर अण्णाभाऊ साठे महामंडळाची थेट कर्ज योजना

बुलढाणा जिल्ह्याची महान हो कीर्ती

स्वयं अर्थसहाय्यिता नवीन शाळांना मान्यता व दर्जावाढीची शिफारस; हरकती मागविल्या