बुलढाणा जिल्ह्याच्या महिला आता होणार आत्मनिर्भर Ø महिला पतसंस्थांव्दारे येणार आर्थिक क्रांती

 बुलढाणा जिल्ह्याच्या महिला आता होणार आत्मनिर्भर

Ø  महिला पतसंस्थांव्दारे येणार आर्थिक क्रांती

 बुलडाणा, (जिमाका) दि. 23:  राज्य शासनाच्या महत्त्वाकांक्षी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेंतर्गत महिलांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्यासाठी एक महत्त्वाचे पाऊल उचलले जात आहे. या योजनेतून महिलांसाठी नागरी सहकारी पतसंस्था स्थापन करण्याचा निर्णय शासनाने घेतला असून त्याची अंमलबजावणी आता जिल्हास्तरावर वेगाने सुरू झाली आहे.

सदरील पतसंस्था महिला सभासदांच्या सक्रिय सहभागातून स्थापन होतील. त्यासाठी शासनाच्या ८ मार्च, २०१९ च्या परिपत्रकातील निकषानुसार नोंदणीप्रक्रिया राबविली जाईल. या परिपत्रकानुसार शहर भागात पतसंस्थेसाठी किमान ५०० महिला सभासद आणि पाच लाख रुपये भांडवल, ग्रामीण भागात २५० सभासदांसह १.५ लाख रुपये भांडवल आणि तालुकास्तरावर ५०० सभासदांसाठी पाच लाख रुपये, तर जिल्हास्तरावर १५०० महिला सभासदांसह १० लाक्ष रुपये भांडवल आवश्यक आहे.

या उपक्रमाची अंमलबजावणी महिला व बालविकास विभाग, महिला आर्थिक विकास महामंडळ आणि सहकार विभाग यांच्या संयुक्त समन्वयाने केली जाणार आहे. महिला व बालविकास विभाग पात्र महिलांची यादी प्रमाणित करेल. त्यानंतरच पतसंस्था नोंदणीस पात्र ठरेल. 'लाडकी बहीण योजना ही केवळ आर्थिक मदतीपुरती मर्यादित नसून ती महिलांच्या आत्मविश्वास, नेतृत्व आणि स्वयंपूर्णतेचे प्रतीक ठरत आहे. या पतसंस्था स्थापन झाल्यानंतर महिलांना उद्योगासाठी आवश्यक निधी सहज उपलब्ध होणार असून यामुळे स्थानिक महिलाना उद्योजकतेला मोठा आधार मिळेल, असे प्रशासनाकडून सांगण्यात आले.

महिला सक्षमीकरणाच्या दृष्टीने सहकार विभागाने 'लाडकी बहीण ' योजनेतून एक नावीन्यपूर्ण उपक्रम हाती घेतला आहे. यामुळे महिलांना आर्थिक मदत, पतपुरवठा व व्यवसाय विकासासाठी आवश्यक साहाय्य मिळेल, असे जिल्हा उपनिबंधक डॉ. महेंद्र चव्हाण यांनी सांगितले.

या योजनेचा उद्देश महिलांना केवळ आर्थिकदृष्ट्या सक्षम करणे नसून त्यांच्यात नेतृत्व, निर्णयक्षमता व आर्थिक व्यवस्थापन कौशल्य निर्माण करणे हाही आहे. संस्थेच्या स्थापनेसाठी सर्व प्रक्रिया पारदर्शकपणे राबविण्यात येतील, असे सहायक निबंधक ए.बी. इंगळे यांनी सांगितले.

 

00000

Comments

Popular posts from this blog

लोकशाहीर अण्णाभाऊ साठे महामंडळाची थेट कर्ज योजना

बुलढाणा जिल्ह्याची महान हो कीर्ती

स्वयं अर्थसहाय्यिता नवीन शाळांना मान्यता व दर्जावाढीची शिफारस; हरकती मागविल्या