शाळेचा पहिला दिवस उत्साहात...! सिनगाव जहाँगीर येथे शाळा प्रवेशोत्सव जल्लोषात साजरा; शिक्षणमंत्री ना.दादाजी भुसे यांनी केले विद्यार्थ्यांचे स्वागत
शाळेचा पहिला दिवस उत्साहात...!
सिनगाव जहाँगीर
येथे शाळा प्रवेशोत्सव जल्लोषात साजरा;
शिक्षणमंत्री ना.दादाजी
भुसे यांनी केले विद्यार्थ्यांचे स्वागत
बुलढाणा,दि.२३ (जिमाका) : जिल्ह्यातील देऊळगाव राजा तालुक्यातील सिनगाव जहाँगीर
येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत सोमवारी ‘शाळा प्रवेशोत्सव’ मोठ्या जल्लोषात साजरा
करण्यात आला. यावेळी शाळेचा पहिला दिवस खास बनवण्यासाठी विद्यार्थ्यांचे डफडे, ढोलताशाच्या
गजरात वाजतगाजत स्वागत करण्यात आले. राज्याचे शालेय शिक्षणमंत्री ना. दादाजी भुसे यांची
प्रमुख उपस्थिती होती.
दरम्यान, गावातून विद्यार्थ्यांची
पारंपरिक बैलगाडी मिरवणूक काढण्यात आली. या मिरवणुकीनंतर शाळेच्या सत्राचे उद्घाटन
शालेय शिक्षणमंत्री ना. दादाजी भुसे यांच्या हस्ते शाळेची घंटा वाजवून व फीत कापून
करण्यात आले. यावेळी त्यांनी विद्यार्थ्यांना गुलाब पुष्प देऊन प्रेमाने स्वागत केले.
या प्रसंगी आमदार मनोज कायंदे, शिक्षण विभागाचे वरिष्ठ अधिकारी, मुख्याध्यापक, शिक्षक,
पालक आणि ग्रामस्थ मोठ्यासंख्येने उपस्थित होते. यावेळी परिसरात आनंदाचे आणि उत्साहाचे
वातावरण होते.
या प्रसंगी बोलताना शिक्षण
मंत्री ना. दादाजी भुसे म्हणाले, “राज्यातील सर्व विद्यार्थ्यांचे
मी मनःपूर्वक स्वागत करतो. जिल्हा परिषदेच्या शाळांमधून गुणवंत विद्यार्थी घडत आहेत.
पहिली ते बारावीत सुमारे दोन कोटी बारा लाख विद्यार्थी असून हा आपला परिवार आहे. त्यांच्या
आरोग्याची काळजी शासनाला असून यापुढे प्रत्येक विद्यार्थ्यांची आरोग्य तपासणी केली
जाणार आहे. गरज असल्यास राज्य शासन गंभीर विद्यार्थ्यांवर मुंबईतील रुग्णालयात उपचार
करणार आहे.”
ते पुढे म्हणाले, “आजची पिढी तंत्रज्ञान स्नेही आहे. आपल्याला तंत्रज्ञान व आर्टिफिशियल इंटेलिजन्सच्या
युगाशी जुळवून घ्यायचं आहे. यासह विद्यार्थ्यांना शेतावर सहलीसाठी नेण्याची योजना आहे.
राज्यातील प्रत्येक जिल्हा परिषद व नगरपालिकेतील शाळांमध्ये सुसज्ज भौतिक सुविधा उपलब्ध
करून देण्यात येतील. शिक्षणाची अत्याधुनिक साधने निर्माण करण्यावर शासनाचा भर असेल.
त्याचप्रमाणे प्रत्येक विद्यार्थ्याला गुणवत्तापूर्ण व दर्जेदार शिक्षण देण्यासाठी
शासन कटिबद्ध असेल,” असेही मंत्री ना. भुसे यांनी सांगितले.
पालकांना मोलाचा संदेश
“विद्यार्थ्यांच्या आईवडील, आजीआजोबांनी दररोज संध्याकाळी मुलांशी अर्धा तास गप्पा
मारावी. यामुळे त्यांच्या अडचणी समजतील व नातं घट्ट होईल. तसेच पालकांनी आपल्या पाल्याला
बाजारातील व्यवहार, शेतीशी निगडित ज्ञान देणे गरजेचे आहे."
या शाळा प्रवेशोत्सवात इयत्ता
पहिली मधील नवप्रवेशित विद्यार्थ्यांचे फेटे बांधून स्वागत करण्यात आले. त्यामध्ये
शाळेतील विद्यार्थी, शिक्षक, गावकरी, पालक, माता पालक ढोल पथक सहभागी झाले होते.
यावेळी शालेय शिक्षण मंत्री
ना. भुसे यांच्या हस्ते नव प्रवेशित विद्यार्थ्यांचे स्वागत, दप्तर, गणवेश, बूट सॉक्स,
कंपास, वही व पेन व गुलाब पुष्प देऊन स्वागत
करण्यात आले.
एक पेड मॅा के नाम
शाळा प्रवेशोत्सवात ‘एक पेड
मॅा के नाम’ हा वृक्षारोपणाचा अभिनव उपक्रम राबविण्यात आला. यावेळी विद्यार्थ्यांनी
त्यांच्या आईच्या नावे वृक्ष लागवड केली.
बुलढाणा जिल्ह्याच्या दौऱ्यादरम्यान
शिक्षणमंत्री ना. भुसे यांनी जिल्ह्यातील पांगरी येथील जिल्हा परिषद उच्च माध्यमिक
शाळेला भेट दिली. या शाळेमध्ये ‘फ्यूचरिस्टिक क्लासरुम’ या उपक्रमाचे उद्घाटन केले.
तसेच भिवगाव येथील जिल्हा परिषद शाळेला अचानक भेट देत तेथील परिस्थिती जाणून घेतली.
००००
Comments
Post a Comment