शेतकऱ्यांनो, फार्मर आयडी तयार करा, अन्यथा शासकीय योजनांचा लाभ मिळणार नाही -जिल्हाधिकारी डॉ. किरण पाटील यांचे आवाहन

 

शेतकऱ्यांनो, फार्मर आयडी तयार करा, अन्यथा शासकीय योजनांचा लाभ मिळणार नाही

 

-जिल्हाधिकारी डॉ. किरण पाटील यांचे आवाहन

 

बुलढाणा, दि.18 (जिमाका) : शेतकऱ्यांना केंद्र व राज्य शासनाच्या विविध योजनांचा लाभ जलद व पारदर्शक पद्धतीने मिळावा यासाठी ‘अॅग्रीस्टॅक’ योजनेअंतर्गत प्रशासनाकडून शेतकरी माहिती संच तयार करण्यात येत आहे. या अंतर्गत प्रत्येक शेतकऱ्याचा ‘शेतकरी ओळख क्रमांक’ (फार्मर आयडी) तयार केला जात असून, तो नसल्यास शेतकऱ्यांना शासकीय योजनांचा लाभ मिळणार नाही, त्यामुळे शेतकऱ्यांनी आपला फार्मर आयडी तात्काळ तयार करावा, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. किरण पाटील यांनी केले आहे.

 

बुलढाणा जिल्ह्यात अग्रीस्टॅक प्रकल्पाची अंमलबजावणी दि. 12 डिसेंबर 2024 पासून कॅम्प मोडमध्ये, तसेच 21 जानेवारी 2025 पासून नागरी सुविधा केंद्र व कॅम्प या हायब्रिड पद्धतीने सुरू आहे. या मोहिमेत आजअखेर 3,58,674 शेतकऱ्यांचे फार्मर आयडी तयार करण्यात आले आहेत.

 

दरम्यान, जिल्ह्यातील पी.एम. किसान योजनेचे एकूण 4,34,468 लाभार्थी आहेत. त्यापैकी फक्त 2,94,339 शेतकऱ्यांचे फार्मर आयडी तयार झाले असून, उर्वरित 1,40,129 शेतकऱ्यांनी अद्यापही नोंदणी केलेली नाही. या शेतकऱ्यांनी लवकरात लवकर आपला शेतकरी ओळख क्रमांक तयार करून घ्यावा, अन्यथा ‘पी.एम. किसान’, ‘पिक विमा’, ‘पिक कर्ज’, ‘पिक अनुदान’ आदी योजनांचा लाभ मिळणार नाही, असे जिल्हा प्रशासनाने स्पष्ट केले आहे.

 

फार्मर आयडीसाठी आवश्यक कागदपत्रे:

 

आधार कार्ड, आधारशी लिंक असलेला मोबाईल क्रमांक,  बँक खात्याशी लिंक असलेला मोबाईल क्रमांक, सातबारा उतारा / गाव नमुना 8 अ

 

सर्व संयुक्त व समाईक खातेदारांनी प्रत्येक सहधारकाचा स्वतंत्र फार्मर आयडी तयार करणे आवश्यक आहे. तसेच एकदा फार्मर आयडी तयार झाल्यानंतर वारंवार ई-केवायसीची गरज भासत नाही. यासाठी आपला सातबारा उतारा आधार कार्डाशी लिंक करून नजीकच्या नागरी सुविधा केंद्र (सीएससी) येथे जाऊन नोंदणी करावी, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. किरण पाटील यांनी केले आहे.

0000

Comments

Popular posts from this blog

लोकशाहीर अण्णाभाऊ साठे महामंडळाची थेट कर्ज योजना

बुलढाणा जिल्ह्याची महान हो कीर्ती

स्वयं अर्थसहाय्यिता नवीन शाळांना मान्यता व दर्जावाढीची शिफारस; हरकती मागविल्या