प्रधानमंत्री ‘धरती आबा’ अभियानांतर्गत मत्स्यव्यवसायास चालना

 

प्रधानमंत्री ‘धरती आबा’ अभियानांतर्गत मत्स्यव्यवसायास चालना

बुलडाणा, (जिमाका) दि. 20 : आदिवासी समुदायांचे सशक्तीकरण करण्यासाठी प्रधानमंत्री धरती आबा जनजातीय ग्राम उत्कर्ष अभियान राबविण्यात येत आहे. अभियानांतर्गत जिल्ह्यातील अनुसूचित जमातीच्या लाभार्थ्यांना मत्सव्यवसायाला चालना देण्यासाठी अनुदान योजना राबविण्यात येते. या योजनेचा लाभ घेण्यासाठी इच्छुक लाभार्थ्यांनी सहाय्यक आयुक्त मत्स्यव्यवसाय(तांत्रिक), प्रशासकीय इमारत,बस स्टँड समोर, बुलढाणा येथे संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

  आदिवासी भागांचा सर्वांगीण विकास साधण्यासाठी केंद्र शासनाच्या प्रधानमंत्री मत्स्यसंपदा योजनेअंतर्गत धरती आमा जनजातीय ग्राम उत्कर्ष अभियान ही विशेष उपयोजना राबविण्यात येत आहे. या योजनेचा उद्देश आदिवासी समुदायांना पायाभूत सुविधा, आरोग्य, शिक्षण व रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देणे असून, त्याचबरोबर मत्स्यव्यवसाय व जलसंपदाविषयीच्या विविध उपक्रमांना चालना देणे आहे. या उपयोजनेअंतर्गत देशभरातील सुमारे 10 हजार आदिवासी समुदायांमधून 1 लाख वैयक्तिक लाभार्थ्यांना समाविष्ट करण्याचा केंद्र शासनाचा मानस आहे. बुलढाणा जिल्ह्यातील आठ आकांक्षित तालुक्यांतील 43 आदिवासी बहुल व अविकसित गावांचा या योजनेत समावेश करण्यात आला आहे.

योजनेअंतर्गत लाभार्थ्यांना 90 टक्के अनुदान व केवळ 10 टक्के हिस्सा स्वतः भरावा लागणार आहे. यामध्ये 60 टक्के हिस्सा केंद्र शासनाचा तर 40 टक्के हिस्सा राज्य शासनाचा असणार आहे. या योजनेत मत्स्यसंवर्धन तलावांचे बांधकाम, क्षारपड भागांमध्ये नवीन मत्स्यतळ्यांची उभारणी, इन्सुलेटेड वाहन व थर्मल आईस बॉक्ससह मोटरसायकल, तिनचाकी वाहने, फिश किऑस्कची उभारणी, जलाशयांतील बोटुकली संचयन व पिंजरा पद्धतीने संवर्धन, प्रशिक्षण व जनजागृती कार्यक्रमाचा समावेश आहे.

00000

Comments

Popular posts from this blog

लोकशाहीर अण्णाभाऊ साठे महामंडळाची थेट कर्ज योजना

बुलढाणा जिल्ह्याची महान हो कीर्ती

स्वयं अर्थसहाय्यिता नवीन शाळांना मान्यता व दर्जावाढीची शिफारस; हरकती मागविल्या