खाद्य तेल अभियान योजनेंतर्गत गोदाम बांधकाम व तेल काढणी युनिटसाठी अनुदान मिळणार गोदाम बांधकामासाठी ₹12.50 लाख ; तेल काढणी युनिटसाठी ₹9.90 लाख शेतकऱ्यांनी योजनेचा लाभ घ्यावा - जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी मनोज कुमार ढगे

 

खाद्य तेल अभियान योजनेंतर्गत गोदाम बांधकाम व तेल काढणी युनिटसाठी अनुदान मिळणार

गोदाम बांधकामासाठी ₹12.50 लाख ; तेल काढणी युनिटसाठी ₹9.90 लाख

शेतकऱ्यांनी योजनेचा लाभ घ्यावाजिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी मनोज कुमार ढगे

बुलढाणा,दि.24 (जिमाका) : राष्ट्रीय खाद्य तेल अभियान (गळीतधान्य) 2025-26 अंतर्गत शेतकरी उत्पादक संघ किंवा कंपनी, सहकारी संस्था व खाजगी उद्योगांना गोदाम बांधकाम व तेल काढणी युनिटसाठी प्रोत्साहनपर अनुदान दिले जाणार आहे. इच्छुक लाभार्थ्यांनी जुलै 2025 अखेरपर्यंत अर्ज करण्याचे आवाहन जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी मनोज कुमार ढगे यांनी केले आहे.

उत्पादित अन्नधान्याची साठवणूक सुधारण्यासाठी व अधिक भाव मिळवण्यासाठी गोदामाची आवश्यकता लक्षात घेऊन, योजनेत 250 मेट्रिक टन क्षमतेचे गोदाम बांधण्यासाठी प्रत्यक्ष खर्चाच्या 50 टक्के किंवा ₹12.50 लाख (जे कमी असेल) इतके अनुदान मंजूर करण्यात येणार आहे. प्रकल्पासाठी स्मार्ट, वखार महामंडळ, सार्वजनिक बांधकाम विभाग किंवा नाबार्डच्या मार्गदर्शक सूचनांनुसार बँकेकडे प्रकल्प सादर करावा लागेल, कर्ज मंजूरीनंतरच अनुदान पात्रता निश्चित होईल,  अर्ज अधिक प्रमाणात प्राप्त झाल्यास जिल्हास्तरीय कार्यकारी समितीच्या मान्यतेनुसार सोडत पद्धतीने निवड केली जाईल.

तेलबिया संकलन, प्रक्रिया व उत्पादन कार्यक्षमतेत वाढ करण्याच्या उद्देशाने तेल काढणी युनिट (10 टन क्षमता) उभारणीसाठी देखील प्रोत्साहनपर अनुदान उपलब्ध आहे. शासकीय व खाजगी उद्योग, सहकारी संस्था, शेतकरी उत्पादक संघ किंवा कंपनी यांना प्रकल्प खर्चाच्या 33 टक्के किंवा ₹9.90 लाख (जे कमी असेल) इतके अनुदान मिळणार आहे.

तेलबियांवर प्रक्रिया करणारी यंत्रसामग्री, उपकरणे आणि प्रक्रिया युनिटसाठी हे अनुदान दिले जाईल.
 संबंधित संस्थांनी बँकेकडे प्रकल्प सादर करून कर्ज मंजुरी घेणे आवश्यक आहे.
 यासाठीचा अंतिम अर्ज सादरीकरण कालावधी जुलै 2025 अखेरपर्यंत ठेवण्यात आलेला आहे.

तालुका कृषी अधिकारी कार्यालयात संबंधित शेतकरी उत्पादक संघ किंवा संस्था यांनी अर्ज सादर करावा. अधिक माहितीसाठी संबंधित तालुका कृषी अधिकारी यांच्याशी तात्काळ संपर्क साधावा. अधिकाधिक शेतकऱ्यांनी व शेतकरी उत्पादक संघांनी या योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी यांनी केले आहे.

00000

Comments

Popular posts from this blog

लोकशाहीर अण्णाभाऊ साठे महामंडळाची थेट कर्ज योजना

बुलढाणा जिल्ह्याची महान हो कीर्ती

स्वयं अर्थसहाय्यिता नवीन शाळांना मान्यता व दर्जावाढीची शिफारस; हरकती मागविल्या