केंद्रीय राज्यमंत्री रक्षा खडसे यांच्या हस्ते ‘ऑस्ट्रेलिया-भारत क्रीडा उत्कृष्टता मंच’चे उद्घाटन · क्रीडा क्षेत्रात नवे पर्व उदयास
केंद्रीय राज्यमंत्री रक्षा खडसे यांच्या हस्ते
‘ऑस्ट्रेलिया-भारत क्रीडा उत्कृष्टता मंच’चे उद्घाटन
·
क्रीडा क्षेत्रात नवे
पर्व उदयास
बुलडाणा, (जिमाका) दि. 5 : भारत-ऑस्ट्रेलिया देशांमधील क्रीडा क्षेत्रातील
सहकार्य वृद्धींगत करण्याच्या दृष्टीने केंद्रीय
युवा कार्यक्रम आणि क्रीडा राज्यमंत्री रक्षा निखिल खडसे यांच्या
हस्ते गुजरातमधील गीफ्ट सिटीमध्ये ‘ऑस्ट्रेलिया-भारत क्रीडा उत्कृष्टता मंच’चे उद्घाटन बुधवारी करण्यात आले.
दोन देशांमधील क्रीडा सहकार्य वाढवून क्रीडा क्षेत्रातील
गुणवान खेळाडूंचा शोध आणि विकास, स्पर्धा आयोजन, सर्व समावेशकता, खाजगी क्षेत्राची भूमिका, शिक्षण व क्रीडा विज्ञान यांची भूमिका तसेच क्रीडा
क्षेत्रातील व्यापार, पर्यटन
आणि गुंतवणुकीला चालना देणे हे या मंचचे मुख्य उद्देश आहे.
केंद्रीय राज्यमंत्री रक्षा खडसे यांनी भारत आणि
ऑस्ट्रेलियातील क्रीडा क्षेत्रातील वाढत्या सहकार्यावर भर दिला, विशेषत: क्रिकेट आणि हॉकी खेळासह इतर खेळांमध्ये
खासगी क्षेत्राची गुंतवणूक, क्रीडा
विज्ञान आणि क्रीडा उद्योगातील व्यापार हे परस्पर संबंधाचे मुख्य क्षेत्र आहेत, असे त्यांनी सांगितले. पुढे बोलताना त्या म्हणाल्या
की, क्रीडा क्षेत्राबद्दल
असलेली आवड हा भारत आणि ऑस्ट्रेलिया यांना जोडणारा समान धागा आहे. या ऐतिहासिक
मंचाच्या माध्यमातून आम्ही क्रीडा क्षेत्रातील संवादांना क्रिकेट आणि हॉकी
खेळाच्या पलीकडे नेण्याचा प्रयत्न करत आहोत, ज्याद्वारे क्रीडा संरचना आणि क्रीडा उद्योगातील गुंतवणूक
यांच्या वाढीस चालना मिळेल.
“प्रधानमंत्री नरेंद्र
मोदींच्या दूरदृष्टीने क्रीडा क्षेत्राला सामर्थ्यवान करण्यासाठी आम्ही क्रीडा
स्पर्धांचे आयोजन, टॉप्स, फिट इंडिया आणि अस्मिता सारख्या उपक्रमांच्या माध्यमातून, आम्ही कार्य करत आहोत,” असे त्या म्हणाल्या. या
मंचाद्वारे ऑस्ट्रेलियाच्या क्रीडा क्षेत्राच्या विकासातील कल्पनांचा उपयोग करून
भारताला सर्वोत्तम ओळख मिळणार आहे. २०३६ ऑलंपिक आणि पॅरालंपिक गेम्सच्या आयोजनावर द्विपक्षीय
देशांमध्ये आदान-प्रदान करून भारतीय आणि ऑस्ट्रेलियन क्रीडा संस्थांमधील संबंध
मजबूत करणे, क्रीडा
उद्योगातील खासगी गुंतवणूक आणि व्यापाराला प्रोत्साहन देणे, क्रीडा विज्ञान व तंत्रज्ञानाद्वारे खेळाडूंच्या
कार्यक्षमतेत वृद्धी करणे आणि भविष्यातील क्रीडा धोरण तयार करण्यावर भर दिला जाणार
आहे, असेही त्या म्हणाल्या.
गुजरात राज्याचा क्रीडा संरचनांच्या दृष्टीकोनातून वाढता
प्रभाव भारताला क्रीडा महासत्तेच्या मार्गावर गतिल करेल. आदान-प्रदानामुळे मोठ्या भागीदारींतून क्रीडा
संस्कृतीचा विकास होऊन भारत जागतिक क्रीडा शक्ती बनेल, असा विश्वास केंद्रीय राज्यमंत्री रक्षा खडसे यांनी व्यक्त केला.
ऑस्ट्रेलिया-भारत क्रीडा उत्कृष्टता मंच भारताच्या क्रीडा क्षेत्रातील
सक्षम व स्पर्धात्मक वातावरण निर्माण करण्याच्या दिशेने एक महत्त्वपूर्ण पाऊल आहे, ज्यामध्ये ऑस्ट्रेलिया एक महत्त्वाचा धोरणात्मक
भागीदार ठरेल. ज्यामध्ये ऑस्ट्रेलिया–भारत क्रीडा संस्थांमधील संबंध वाढविणे आणि
भारताच्या क्रीडा, उच्च
शिक्षणाच्या संबंधित बाबींवर दीर्घकालीन धोरणांचा समावेश होणार आहे.
ऑस्ट्रेलिया–भारत क्रीडा उत्कृष्टता मंचाच्या उद्घाटन
समारंभाला ऑस्ट्रेलियाचे भारतातील उच्चायुक्त फिलिप ग्रीन, गुजरात राज्याचे क्रीडा
व सांस्कृतिक कार्य मंत्री हर्ष संघवी आणि ऑस्ट्रेलियातील क्रीडा आणि उच्च शिक्षण
संस्थांचे प्रतिनिधी आणि उद्योग क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते.
00000
Comments
Post a Comment