जन्म-मृत्यू प्रमाणपत्रासाठी फेर अर्जासह कागदपत्र सादर करण्याचे आवाहन; > 11 ऑगस्ट 2023 ते 21 जानेवारी 2025 मधील प्रमाणपत्र रद्द

 

जन्म-मृत्यू प्रमाणपत्रासाठी फेर अर्जासह कागदपत्र सादर करण्याचे आवाहन;

>      11 ऑगस्ट 2023 ते 21 जानेवारी 2025 मधील प्रमाणपत्र रद्द

 

बुलडाणा, दि. 25 (जिमाका):  उशिरा जन्म व मृत्यू नोंद केल्यामुळे प्रमाणपत्र देण्यावर लावण्यात आलेली स्थगिती उठविण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला असून जन्म-मृत्यू नोंदणीसाठी आता सुधारित कार्यपद्धती निश्चित केली आहे. त्यामुळे ज्यांची जन्म-मृत्यू नोंदणी रद्द झाली आहे, त्यांनी सुधारित शासन निर्णयानुसार पुराव्यानिशी संबंधित तहसिलदार यांचेकडे फेरअर्ज सादर करावे, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. किरण पाटील यांनी केले आहे.

 

 उशिरा जन्म व मुत्यू प्रमाणपत्र देण्याबाबत शासनाकडे मोठ्या प्रमाणावर तक्रारी प्राप्त झाल्या होत्या.  त्यानुसार शासनाने दि. 21 जानेवारी 2025 नुसार उशिरा जन्म व मृत्यु प्रमाणपत्र वितरणाच्या कार्यवाहीस स्थगिती दिली होती. तथापि, दि. 17 मार्च 2025 रोजीच्या पत्रानुसार ही स्थगिती रद्द करण्यात आली असून      दि. 11 ऑगस्ट 2023 ते 21 जानेवारी 2025 या कालावधीत निर्गमित झालेली प्रमाणपत्रे तहसीलदार किंवा तालुका दंडाधिकारी या पदापेक्षा कमी दर्जाच्या अधिकाऱ्यांनी जारी केली आहेत, ती रद्द करण्यात आली आहेत. त्यामुळे ज्या नागरिकांचे प्रमाणपत्रे रद्द झाली आहेत, त्यांनी सार्वजनिक आरोग्य विभागाचे दि. 12 मार्च 2025 च्या शासन निर्णयानुसार फेरअर्जासह कागदपत्रे संबंधित तहसीलदारांकडे पुराव्यानिशी सादर करावे.

 

> फेरअर्जासाठी आवश्यक पुरावे :  जन्माचा पुरावा(रुग्णालयाच्या नोंदी किंवा लसीकरणाचे पुरावे), मृत्यू नोंदणीसाठी शव विच्छेदन अहवाल, प्रथम खबरी अहवाल किंवा रुग्णालयीन कागदपत्रे, शैक्षणिक पुरावे (शाळेच्या प्रवेश-निर्गम रजिस्टरचा उतारा, बोनाफाईड प्रमाणपत्र, शाळा सोडल्याचा दाखला), रहिवासी पुराव्यासाठी मालमत्ता कराची पावती, पाणीपट्टी, वीज बिल, मालमत्ता पुराव्यासाठी सातबारा उतारा, नमुना 8-अ, वारस नोंदीचे फेरफार, मिळकत उतारा, नोंदणीकृत दस्त, ओळख पुरावा(वाहन परवाना, मतदान ओळखपत्र, आधार कार्ड, पॅन कार्ड, बँक, पोस्ट ऑफिस पासबुक इ.), कौटुंबिक पुरावा (परिवारातील सदस्यांचे जन्म प्रमाणपत्र, शिधापत्रिका, विवाह प्रमाणपत्र इत्यादी) पुरावे अर्जासोबत सादर करावे.

000000000

Comments

Popular posts from this blog

लोकशाहीर अण्णाभाऊ साठे महामंडळाची थेट कर्ज योजना

बुलढाणा जिल्ह्याची महान हो कीर्ती

स्वयं अर्थसहाय्यिता नवीन शाळांना मान्यता व दर्जावाढीची शिफारस; हरकती मागविल्या