22 मार्चपर्यंत सक्रीय क्षयरुग्ण शोध मोहिम; मोहिमेस नागरिकांनी सहकार्य करण्याचे आवाहन

 22 मार्चपर्यंत सक्रीय क्षयरुग्ण शोध मोहिम; मोहिमेस नागरिकांनी सहकार्य करण्याचे आवाहन


बुलडाणा, (जिमाका) दि. 13 : जिल्हा क्षयरोग केंद्राच्यावतीने दि. 10 ते 22 मार्च या कालावधीत शहरातील झोपडपट्टी, विटभट्टी, भटक्याजमाती, स्थलांतरीत कामगार, बेघर कामगार, वृध्दाश्रम, आश्रमशाळा व वस्तीगृह अशा अतिजोखमीच्या भागाचे 3 लाख 1 हजार 533 लोकसंख्येमध्ये सर्वेक्षण करुण सक्रिय क्षयरुग्ण शोधमोहिम राबविण्यात येणार आहे. क्षयरुग्ण शोध मोहिम यशस्वी करण्यासाठी नागरिकांनी सहकार्य करावे, असे आवाहन जिल्हा क्षयरोग अधिकारी डॉ. वर्षा गुट्टे यांनी केले आहे. 


> मोहिमेत आशा स्वयंसेविका आणि आरोग्य कर्मचारी घरोघरी जाऊन घरातील सर्व सदस्यांची क्षयरोगासंदभातील तपासणी करणार आहे. यासाठी जिल्ह्यात 121 पथकांची स्थापना करण्यात आली आहे. तसेच 24 सुपरवाईझर व 242 आशावर्कर व कर्मचाऱ्यांव्दारे सर्वेक्षण करण्यात येणार आहे. 


मोहिमेचे उद्दिष्ट्य क्षयरोगाचे निदानपासून अद्यापही वंचित असणाऱ्या सर्व क्षयरुग्णांचा शोध घेऊन त्यांना औषधोपचारावर आणणे आहे. मोहिमेमध्ये जोखमीच्या क्षेत्र व ठिकाणी गृहभेट देऊन क्षयरोगाची लक्षणे असणाऱ्या व्यक्तींना शोधणे, त्यांची थुंकी नमुने तपासणी, एक्स-रे व आवश्यकते प्रमाणे इतर तपासण्या करुन क्षयरोगाचे निदान करणे आणि औषधोपचार सुरु करणे अपेक्षित आहे. यासाठी राष्ट्रीय क्षयरोग दुरीकरण कार्यक्रमातील कर्मचारी, त्यांचे भागधारक, अशासकीय संस्था तसेच सार्वजनिक आरोग्य सेवेतील कर्मचारी यांचे पथके निवडलेल्या भागात घरोघरी संशयित क्षयरुग्णांचे सर्वेक्षण करणार आहे. 


यामध्ये जिल्हातील वंचित घटक झोपडपट्टी, दुर्गम भाग, वस्त्या, कारागृहातील कैदी, ज्या गावात रुग्ण जास्त असू शकतात असे गावे, एचआयव्ही अतिजोखीम गट, असंघटित कामगार, बांधकाम स्थळाच्या ठिकाणी काम करणारे कामगार, बेघर वृध्दाश्रम अशा निवडलेल्या भागांमध्ये सार्वजनिक आरोग्य सेवेतील कर्मचारी, आशावर्कर, अंगणवाडी सेविका तसेच नर्सिंग कॉलेजचे विद्यार्थी आणि इतर स्वयंसेवक हे गृहभेटीव्दारे संशयित क्षयरुग्णांचे सर्वेक्षण करणार आहे. गृहभेटी दरम्यान पथक सदस्य निश्चित केलेल्या सर्व घरांना भेटी देऊन घरात असलेल्या सर्व व्यक्तींची क्षयरोग लक्षणांविषयी माहिती घेणार असून क्षयरोगाची लक्षणे असणाऱ्या व्यक्तीची थुंकी नमुना गोळा करुन तपासणी करिता जवळच्या प्रयोगशाळा पाठविणार आहे. 


> क्षयरोगाची लक्षणे : दोन आठवडे किंवा त्यापेक्षा जास्त कालावधीचा खोकला असणे, दोन आठवड्यापेक्षा जास्त मुदतीचा ताप, मागील तीन महिन्यामध्ये वजनात लक्षणीय घट, थुंकीवाटे रक्त पडणे, छातीत दुखणे व मानेवारील गाठ. 


सदर लक्षणे असल्यास व्यक्तीने तपासणी करुन घेणे आवश्यक आहे. जिल्ह्यातील शासकीय आरोग्य संस्थांमध्ये मोफत थुंकी नमुना तपासणी, क्ष-किरण तपासणी तसेच डॉक्टरांच्या सल्यानुसार सीवीनॅट मशीनव्दारे तपासणी व्यवस्था उपलब्ध आहे. क्षयरोग विरोधातल्या लढ्यामध्ये सर्वांनी एकत्र येण्याची आवश्यकता असून अद्याप निदान न झालेल्या क्षयरुग्णांचा शोध घेऊन त्यांचेवर उपचार करण्यात येणार आहे. ग्रामीण भागासाठी जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. अमोल गिते तसेच शहरी भागासाठी जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. भागवत भुसारी यांच्या मार्गदर्शनाखली सदर मोहिम राबविण्यात येत आहे.तरी क्षयरुग्ण शोध मोहिमेस सर्वानी सहकार्य करावे, असे आवाहन करण्यात आले आहे. 

00000000

Comments

Popular posts from this blog

लोकशाहीर अण्णाभाऊ साठे महामंडळाची थेट कर्ज योजना

बुलढाणा जिल्ह्याची महान हो कीर्ती

स्वयं अर्थसहाय्यिता नवीन शाळांना मान्यता व दर्जावाढीची शिफारस; हरकती मागविल्या