इतर मागास प्रवर्गातील विद्यार्थ्यांसाठी वसतिगृह प्रवेश अर्जाची १७ ऑगस्ट अंतिम मुदत

 बुलढाणा, दि. 4 (जिमाका)  :  शैक्षणिक वर्ष २०२५-२६ पासून राज्यातील इतर मागास वर्ग, विमुक्त जाती, भटक्या जमाती व विशेष मागास प्रवर्गातील विद्यार्थ्यांसाठी शासकीय वसतिगृह प्रवेश प्रक्रिया सुरू झाली आहे. यामध्ये वसतिगृह योजनेपासून वंचित असलेल्या विद्यार्थ्यांना ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले आधार योजना आणि पंडीत दिनदयाल उपाध्याय स्वयंम योजना यांचा लाभ घेण्यासाठी अर्ज करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

मा. संचालक, इतर मागास बहुजन कल्याण संचालनालय, पुणे यांच्या पत्रानुसार १२ वी नंतरच्या बिगर व्यावसायिक व व्यावसायिक अभ्यासक्रमात प्रथम वर्षाला प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांना सदर योजनांचा लाभ घेण्यासाठी शासकीय वसतिगृहामध्ये अर्ज करणे अनिवार्य आहे. अर्ज http://hmas.mahait.org या संकेतस्थळावर ऑनलाईन पद्धतीने स्वीकारले जाणार असून, अर्ज करण्याची अंतिम तारीख १७ ऑगस्ट २०२५ आहे.

बी.ए., बी.कॉम., बी.एस.सी. तसेच एम.ए., एम.एस.सी. अशा पदवी व पदव्युत्तर अभ्यासक्रमांमध्ये प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांसाठी अर्ज करता येईल. अर्जांची छाननी १८ ते २१ ऑगस्ट दरम्यान होईल. गुणवत्तेनुसार पहिली निवड यादी २२ ऑगस्ट २०२५ रोजी प्रसिद्ध करण्यात येईल. या यादीतील पात्र विद्यार्थ्यांसाठी प्रवेशाची अंतिम मुदत ४ सप्टेंबर आहे. त्यानंतर उर्वरित रिक्त जागांवर दुसऱ्या प्रतिक्षा यादीतील विद्यार्थ्यांची निवड करून यादी ५ सप्टेंबर रोजी प्रसिद्ध होईल. या दुसऱ्या यादीतील विद्यार्थ्यांसाठी प्रवेश घेण्याची अंतिम मुदत २५ सप्टेंबर २०२५  ठेवण्यात आली आहे.

ही सर्व प्रक्रिया शासन निर्णयामधील अटी व शर्तींच्या अधीन राहून राबविण्यात येणार आहे. या योजनेसाठी अधिक माहिती व मार्गदर्शनासाठी इतर मागास बहुजन कल्याण सहाय्यक संचालक मनोज मेरत यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

00000

Comments

Popular posts from this blog

लोकशाहीर अण्णाभाऊ साठे महामंडळाची थेट कर्ज योजना

बुलढाणा जिल्ह्याची महान हो कीर्ती

स्वयं अर्थसहाय्यिता नवीन शाळांना मान्यता व दर्जावाढीची शिफारस; हरकती मागविल्या