नागपूर-पुणे वंदे भारत एक्सप्रेसचे शेगांव येथे जल्लोषात स्वागत ; केंद्रीय आयुष मंत्री ना.प्रतापराव जाधव यांनी हिरवी झेंडी दाखवून केले मार्गस्थ
नागपूर-पुणे वंदे भारत एक्सप्रेसचे शेगांव येथे जल्लोषात स्वागत ; केंद्रीय आयुष मंत्री ना.प्रतापराव जाधव यांनी हिरवी झेंडी दाखवून केले मार्गस्थ
बुलढाणा,दि.१० (जिमाका) : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते उद्घाटन झालेल्या नागपूर-पुणे वंदे भारत एक्सप्रेसचे शेगांव येथे केंद्रीय आयुष मंत्री ना. प्रतापराव जाधव यांच्या उपस्थितीत जल्लोषात स्वागत करण्यात आले. यावेळी ना. प्रतापराव जाधव यांनी या एक्स्प्रेसला हिरवी झेंडी दाखवून मार्गस्थ केले.
या वंदे भारत एक्स्प्रेसच्या स्वागतानिमित्त शेगाव रेल्वे स्थानक परिसरात विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाला केंद्रीय आयुष मंत्री ना.प्रतापराव जाधव आणि आमदार डॅा. संजय कुटे हे प्रामुख्याने उपस्थित होत.
यावेळी ना. प्रतापराव जाधव मनोगत व्यक्त करतांना म्हणाले की, “शेगाव नगरी ही संत श्री गजानन महाराजांच्या वास्तव्यांने पावन झालेली नगरी आहे. देशविदेशातून भाविक शेगाव येथे संत श्री गजानन महाराजांच्या दर्शनासाठी येत असतात. त्यामुळे शेगाव येथे वंदे भारत एक्सप्रेस रेल्वेचा थांबा मिळविण्यासाठी केंद्रीय रेल्वे मंत्र्यांकडे पाठपुरावा केला. त्यांनी ताबडतोब कार्यवाही करुन शेगावचा थांबा समाविष्ट केला. आज त्याचे उद्घाटन होत आहे. याशिवाय गेल्या पंधरा वर्षांमध्ये शेगाव रेल्वे स्थानकात सोयीसुविधा, विकासकामे झाली व होत आहेत. पूर्वीपेक्षा या रेल्वे स्थानकाचा कायापालट होतांना दिसत आहे. येणाऱ्या काळामध्ये आणखी विकासाची कामे केली जाणार आहेत. इतर रेल्वेचा थांबा देखील मिळविण्याचे प्रयत्न सुरु आहेत,” असे केंद्रीय आयुष मंत्री ना. प्रतापराव जाधव यावेळी म्हणाले.
आमदार डॅा. संजय कुटे मनोगत व्यक्त करतांना म्हणाले, “जगात सर्वाधिक रेल्वे प्रकल्प असलेल्या भारत देशाला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पहिल्या क्रमांकावर आणले आहे. आज सर्वांना आतुरता असलेल्या नागपूर ते पुणे वंदे भारत एक्सप्रेचे उद्घाटन झाले आहे. शेगाव ही संत नगरी व अध्यात्मिक नगरी आहे. या नगरीमध्ये मुंबई, पुणेवरुन अनेक भाविक मोठ्या प्रमाणात येतात. त्यामुळे वंदे भारत एक्स्प्रेसचा शेगांव येथे थांबा आवश्यक होता. यासाठी प्रयत्न करणारे केंद्रीय मंत्री अश्विनी कुमार, केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री प्रतापराव जाधव, रेल्वे प्रशासनातील अधिकारी यांचे आभार मानतो. भविष्यात शेगावच्या विकासामध्ये योगदान देणारे काम होत आहेत. आज जे रेल्वेचा कायापालट होत आहे, त्यामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे व्हिजन महत्त्वाचे ठरत आहे,” असे ते म्हणाले.
वंदे भारत एक्स्प्रेस विषयी …
अजनी (नागपूर) ते पुणे वंदे भारत एक्स्प्रेसचा अपडाऊन गाडी क्रमांक २६१०१ व २०१०२ असून ही एक्सप्रेस सकाळी ९.३० वाजता अजनी (नागपूर) येथून सुटणार असून रात्री ९.३० वाजता पुणे येथे पोहोचेल. आणि पुणे येथून सकाळी ६.२५ वाजता निघून संध्याकाळी ६.२५ वाजता अजनी येथे पोहोचेल. या रेल्वेचा वर्धा, बडनेरा, अकोला, शेगाव, भुसावळ, जळगाव, मनमाड, कोपरगाव, अहिल्यानगर, दौंड कार्ड लाईन व पुणे या रेल्वे स्थानकांवर थांबा राहणार आहे, अशी माहिती या कार्यक्रमात देण्यात आली.
०००
Comments
Post a Comment