विशेष लेख : पनीर की ॲनलॉग? ; ग्राहकांनी काळजीपूर्वक निवड करणे गरजेचे!
विशेष लेख :
पनीर की ॲनलॉग?
; ग्राहकांनी काळजीपूर्वक निवड करणे गरजेचे!
आजच्या धावपळीच्या जीवनात ग्राहकांना सहज उपलब्ध होणारे आणि स्वस्त दरात मिळणारे
खाद्यपदार्थ आकर्षित करतात. त्यातही पनीर आणि चीज ही दैनंदिन आहाराचा भाग झालेली लोकप्रिय
उत्पादने आहेत. मात्र अलीकडे बाजारात याच नावाने पनीर अॅनलॉग आणि चीज अॅनलॉग या पर्यायी
वस्तू विक्रीस येत आहेत, ज्या दिसायला आणि चवीलाही तशाच वाटत असल्या तरी त्या खऱ्या
पनीर चीज पेक्षा वेगळ्या असतात. त्यामुळे ग्राहकांनी या बाबत जागरूक राहण्याची गरज
आहे.
खरे पनीर आणि चीज म्हणजे काय? : पनीर हे दूध फाडवून तयार होणारे एक नैसर्गिक
दुग्धजन्य उत्पादन आहे. त्यात भरपूर प्रथिने, कॅल्शियम आणि पोषक घटक असतात. चीज ही
दूधातून तयार केलेली आंबवून घट्ट केलेली उत्पादने आहेत. जी वेगवेगळ्या प्रकारात मिळतात.
पनीर/चीज अॅनलॉग म्हणजे काय? : अनलॉग म्हणजे खऱ्या उत्पादनाची नक्कल करणारे
पर्यायी उत्पादन. पनीर अॅनलॉग किंवा चीज अॅनलॉग हे वनस्पतीजन्य तेल, स्टार्च, कृत्रिम
चव आणि इतर पदार्थ वापरून तयार केले जातात. ते चव, रंग व पोताने खऱ्या पनीर/चीजसारखे
वाटतात. पण त्यात नैसर्गिक दूध नसल्यामुळे पोषणमूल्य कमी असते.
ग्राहकांनी ओळख कशी करावी? : उत्पादनाच्या पॅकेजिंगवर "पनीर अॅनलॉग"
किंवा "चीज अॅनलॉग" असा स्पष्ट उल्लेख असावा. ही भारतीय अन्न सुरक्षा आणि
मानके प्राधिकरणाची (FSSAI) अट आहे. एफएसएसएआय लायसन्स नंबर पाहावे. किंमत खूपच कमी
असेल तर शंका घ्या. स्वस्त दराने दिले जाणारे पनीर किंवा चीज अॅनलॉग असण्याची शक्यता
असते. त्यामुळे पनीर किंवा चीज विश्वसनीय दुकानातून खरेदी करा.
अॅनलॉग वापरणे अपायकारक आहे का? : असं म्हणता येणार नाही, कारण काही अॅनलॉग्स
भारतीय अन्न सुरक्षा आणि मानके प्राधिकरणाची (FSSAI) नोंदणीसह सुरक्षित मानले जातात.
तथापि काही ग्राहकांना यामधून वारंवार सेवनाने थोड्या बहुत प्रमाणात आजार उद्भवू शकतात.
तसेच लहान मुले, वृद्ध आणि आरोग्यदृष्ट्या संवेदनशील व्यक्तींना अशा पर्यायी उत्पादनांमुळे
योग्य पोषण मिळू शकत नाही. म्हणून खऱ्या पनीर किंवा चीजचा वापर पोषणाच्या दृष्टीने
अधिक योग्य आहे.
ग्राहकांनी योग्य माहिती घेऊन निर्णय घेणे हेच त्यांच्या आरोग्याचे रक्षण करण्याचा
मुख्य मार्ग आहे. हॉटेलमध्ये रेस्टॉरंट फास्टफूड सेंटर पनीर अथवा चीज अॅनलॉग वापरत
असल्यास ग्राहकांना स्पष्टपणे माहिती देणे आवश्यक! अलीकडे अनेक हॉटेल्स, रेस्टॉरंट्स
व फास्ट फूड सेंटर्समध्ये पनीर अॅनलॉगचा वापर वाढताना दिसत आहे. मूळ पनीरपेक्षा तुलनेत
कमी किमतीत उपलब्ध होणारे हे उत्पादन व्यावसायिक दृष्टिकोनातून फायद्याचे वाटते. मात्र,
ग्राहकांच्या आरोग्याच्या दृष्टीने आणि त्यांच्या माहितीच्या अधिकाराच्या दृष्टीने,
अशा अन्नपदार्थांबाबत पारदर्शकता ठेवणे अत्यावश्यक आहे.
काय आहे नियमानुसार बंधन? : भारतीय अन्न सुरक्षा आणि मानके प्राधिकरण
(FSSAI) च्या नियमानुसार, जर पनीर किंवा चीज अॅनलॉग वापरले जात असेल, तर ते ग्राहकांना
स्पष्टपणे सांगणे बंधनकारक आहे. अन्न विक्रेत्यांनी अशा प्रकारचे अन्न विकताना
"पनीर अॅनलॉग वापरले आहे" किंवा "चीज अॅनलॉग वापरले आहे" अशी स्पष्ट
आणि वाचता येईल अशी सूचना मेनू कार्डवर, डिस्प्ले बोर्डवर आणि सर्विस देताना देणे आवश्यक
आहे.
पारदर्शकता ग्राहकांचा हक्क : ग्राहक जे अन्न खात आहेत, त्यात नक्की काय वापरले
गेले आहे, हे जाणून घेण्याचा ग्राहकांना पूर्ण अधिकार आहे. अन्नाचे स्वरूप, पोषणमूल्य
व घटक यामध्ये फरक असतो. म्हणूनच ही माहिती मिळणे महत्त्वाचे ठरते. हॉटेल व्यवसायिकांनी
आपल्या मेनूमध्ये पनीर किंवा चीज अॅनलॉग वापरत असल्यास त्याची स्पष्ट नोंद करावी. ग्राहकांची
फसवणूक टाळा व त्यांचा विश्वास जपा. अन्न सुरक्षा कायद्याचे पालन करून व्यवसायात प्रामाणिकपणा
ठेवावे.
"ग्राहक म्हणजे देव" हे लक्षात ठेवून पारदर्शक व जबाबदार व्यवसाय
पद्धती अंगीकारावे!
संकलन :
सतिश आनंदराव बगमारे, माहिती सहायक,
जिल्हा माहिती कार्यालय बुलढाणा
0000
Comments
Post a Comment